लहान किंवा शालेय वयातल्या मुलांना शिक्षा करावी की नाही, हा नेहमी वादाचा विषय राहिलेला आहे. शिक्षा केल्यामुळे मुलांची कामगिरी सुधारते, हे सिद्ध झालेलं नसलं, तरी सततच्या कठोर शिक्षेमुळे अभ्यास, शाळा मुलांना नकोशी कशी होते आणि त्यांच्या आत्मविश्वासाला कसा धक्का लागतो, हे मात्र अनेक प्रकरणांत बघायला मिळालं आहे. मुलांना भीती घालणाऱ्या शिक्षेची जागा शिस्त लावण्याच्या सकारात्मक प्रयत्नांना का घ्यावी लागेल, हे सांगणारा हा लेख. 

नुकतीच कांदिवलीमध्ये एक घटना घडली. ‘प्रीस्कूल’मधल्या मुलांना मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयानं दोन शिक्षिकांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या प्रसंगात दोन-अडीच वर्ष वयाच्या मुलाला मारणं, गालांना चिमटे घेणं, डोक्याच्या मागे पुस्तकानं थपडा मारणं, अशी शिक्षा करण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला होता. शालेय मुलांना केल्या जाणाऱ्या शिक्षेची खरंच काही आवश्यकता असते का? यामुळे विद्यार्थ्यांचं वास्तव आयुष्यात काही हित साधलं जातं का? त्यांच्या अभ्यासात आणि वर्तनात चांगला बदल होतो का? त्यातही विशेषत: बालवाडीच्या वयात? असे काही नेहमी वादाचे राहिलेले  मुद्दे या निमित्तानं पुन्हा अधोरेखित झाले.

Ramdas Athawales message of unity to Advocate prakash ambedkar
रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Viral video of disabled swiggy delivery boy doing food delivery by riding a cycle
परिश्रमाशिवाय पर्याय नाही! दिव्यांग असूनही करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून वाटेल अभिमान
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
Viral Video Shows Pet Dog Help Her Owner
मैं हूँ ना…! मालकिणीला मदत करण्यासाठी श्वानाची धडपड; काठी काढण्यासाठी मारली उडी अन्… पाहा VIRAL VIDEO
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती

शिक्षा केली म्हणून मूल सुधारलं, असं सिद्ध करणारी संशोधनं झाल्याचं कुठे वाचनात नाही. पण मुलांना शिक्षा झाल्याच्या बातम्या मात्र कानावर येत असतात. बालवाडीला शिकवणाऱ्यांमध्ये बहुसंख्य प्रमाण हे शिक्षिकांचं आहे. आईपासून दूर जाऊन मुलं शाळेतल्या शिक्षिकांवर अवलंबून असतात. घरातली माणसं सोडली तर बालवाडीतल्या आपल्या शिक्षिकेवर या वयातल्या मुलांचं अतोनात प्रेम असतं. ‘आमच्या ताईंनी सांगितलं आहे’ एवढी एकच गोष्ट मुलांना शिस्त लावायला पुरते. मुलं त्यांचं इतकं ऐकतात, की अनेकदा आईलासुद्धा ‘ताई जे म्हणतात ते’ असं ऐकावं लागतं. असं बालवाडीतल्या ताईंचं राज्य मुलांच्या मनावर चालत असतं. हे नातं फार गोड असतं. पण कधी?.. ज्या वेळेला ताई आणि मूल यांच्यात प्रेम असेल, जिव्हाळा असेल. जर शिक्षिका मारत असेल, चिमटे काढत असेल, मुलांच्या डोक्यावर पुस्तक आपटत असेल, तर अशा वागण्यामुळे मुलांच्या मनात भीती निर्माण  होते. एखाद्या शिक्षिकेशी छान नातं तयार नाही झालं तरी एकवेळ चालेल, पण मुलांची त्यांच्या लहानशा विश्वातल्या इतर अनेकांशी असलेली नाती तुटतात.

यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाशी असलेलं नातं. शिक्षणाचा अवघा पाया ज्यावर उभा असतो, ती महत्त्वाची वर्ष म्हणजे बालवाडी. ‘शिक्षणप्रवाहाच्या उगमापाशी’ असं  शिक्षणतज्ज्ञ सुचिता पडळकर यांचं एक पुस्तक आहे, त्यात म्हटल्याप्रमाणे बालवाडी हा शिक्षणप्रवाहाचा उगम आहे. हे बालवाडी शिक्षिकेनं लक्षात घेतलं नाही, तर अभ्यासाविषयी मुलांची आवड कशी तयार होणार? पुढे किमान पंधरा-वीस वर्ष त्यांना शिक्षण घ्यायचं असतं. त्यांचं अभ्यासाशी नातं कसं जुळणार? पाहिलीपासून पुढे अनेक शिक्षक त्यांना शिकवणार आहेत, त्यांच्याशी नातं कसं जुळणार? अभ्यासाबद्दल नकारात्मक मत तयार झालं, तर तो करायला सांगणारा प्रत्येक जण त्यांच्यालेखी ‘नकोसा’ असू शकतो. याचं काय करणार?.. मुलं लहान आहेत, बोलू शकत नाहीत, घरी नीट तक्रार करू शकत नाहीत, याचा अर्थ त्यांना सर्वतोपरी जपण्याची गरज आहे. त्यांच्यावर हुकूम गाजवून मारहाण करणं ही खूपच मोठी चूक आहे.

शिक्षक हाच महत्त्वाचा घटक

पूर्वी मुलांना भरपूर शिक्षा होत असत. मग तेव्हा मुलांच्या मनावर काही वाईट परिणाम होत नव्हता का? हे आताचं नवं फॅड आहे का? वास्तविक त्या वेळी शिक्षा करत करतच शिकवलं जायचं, आणि तेव्हाही मुलांवर अतिरेकी शिक्षांचे वाईट परिणाम होतच होते. मात्र तेव्हा आजच्याइतके मोकळेपणानं ते चर्चिले जात नसत. शिक्षक आणि मुलं यांच्यात एक वेगळं नातं असायचं. काही शिक्षकांचा आदरयुक्त दरारा असे, पण ते ‘नकोसे’ झालेले नसत. शिक्षक आपल्या हितासाठी रागावले यावर मुलांचा आणि पालकांचा विश्वास असायचा. असं जिव्हाळय़ाचं नातं आजही पूर्णपणे हरवलेलं नाही. काही शाळांमध्ये किंवा काही शिक्षक-मुलांमध्ये ते बघायला मिळतं आहे. अशा प्रकरणांतही शिक्षा क्वचितच केली जाणं अपेक्षित आहे. 

मुलांवर प्रेम असलेले शिक्षक मुलांच्या वागण्याला छान समजून घेतात. चुकत असेल तर त्यांना वेळ देतात, त्यांच्याशी बोलतात, त्यासाठी स्वत: अभ्यास करतात. मुलांच्या प्रश्नांची चर्चा इतरांशी करतात. मुलांची वाट सोपी करतात. अशा वर्गामध्ये, अशा शिक्षकांच्या सहवासात मुलं निर्भय असतात. म्हणूनच ती विचार करू शकतात, समजून घेतात, विचार मांडू शकतात. चांगला अभ्यास करतात. अशा मुलांची व्यक्तिमत्त्वं  वेगळी दिसतात. काही शिक्षक मुलांना त्यांच्या पालकांपेक्षाही जास्त चांगले ओळखतात. त्यांच्यातले कलागुण हेरतात, ते जगासमोर आणतात. त्यांनी आयुष्यात कोणती दिशा घ्यावी याबद्दल मार्गदर्शन करतात. प्रसंगी त्यांच्या आईबाबांना भेटून समजुतीच्या चार गोष्टीही सांगतात. अशी असंख्य उदाहरणं देता येतील.

चांगले शिक्षक आपल्यालाही वेगवेगळय़ा वळणावर भेटलेले असतात. अशा शिक्षकांची संख्या आजही चांगली आहे. म्हणूनच शिक्षणव्यवस्था चालू आहे. विद्यार्थीप्रेमी शिक्षकांच्या खांद्यावर ती पेललेली आहे. पण काही वेळा शिक्षक स्वत:च्या समस्यांमुळे किंवा तशीच चुकीची सवय लागल्यामुळे किंवा चुकीच्या मान्यतांमुळे मुलांना मारहाणीसारख्या शिक्षा करतात. अशा शिक्षा सतत चालू राहिल्या तर मुलांवर त्याचे विविध प्रकारे वाईट परिणाम होतात.

शिक्षा कोणत्या?

मुलं अनेक प्रकारच्या शिक्षा सहन करत असतात. त्यामध्ये मारणं, चिमटे काढणं, कान ओढणं, एखादी वस्तू फेकून मारणं, या शारीरिक शिक्षा दिसतात. क्वचित मुलं आपणहून अशा शिक्षा झाल्याचं  सांगू शकतात. मात्र काही शिक्षा ‘दिसत’ नाहीत. त्या त्या मुलाला/मुलीला त्या जाणवतात. मुलांचा शाब्दिक अपमान करणं, त्यांना हसणं, कोणत्याही गोष्टीवरून- नाव, आईवडिलांचा व्यवसाय, जात-धर्म, वेगळी भाषा-बोली यावरून चिडवणं, इतर मुलं चिडवत असतील तर त्यांना न रोखणं, जाणूनबुजून दुर्लक्ष करणं, इतरांशी सतत तुलना करणं, यादेखील एक प्रकारच्या शिक्षाच आहेत. लहान मुलांना यामागचं कारण समजत नाही. पण आपल्याला वेगळी वागणूक मिळते आहे हे समजतं. यामुळे मुलं शिक्षण प्रक्रियेपासून तुटून जातात. बाजूला पडतात. आपल्यातच काही तरी दोष आहे असं त्यांना वाटतं. ही खूप मोठी मानसिक शिक्षा असते. अशा शिक्षा मुलं सहन करतात. यातल्या काही शिक्षा खरं तर शिक्षा वाटणारही नाहीत, मात्र अप्रत्यक्षपणे मुलांवर नकारात्मक परिणाम करतात.

शिक्षेचे मानसिक-शारीरिक-भावनिक परिणाम मुलांना सतत आणि रोज काही अवघड शिक्षांना सामोरं जावं लागत असेल तर काही दूरगामी परिणाम त्यांच्यात दिसून येतात. शिक्षेचा प्रकार कोणताही असो, प्रत्यक्ष शिक्षा होत असताना आणि शिक्षेच्या आठवणींनी मनात नकारात्मक भावना येतात. या नकारात्मक भावनांचा नकारात्मक परिणाम त्यांच्या मनावर होत असतो. मुलं एरवी हसूनखेळून वावरताना दिसत असली तरी नाराज असतात. नकारात्मक भावनांचं ओझं मनावर असेल तर ती मुलं शिकणार कसं?

अगदी एक वर्षांच्या बाळालाही रागावलेलं कळतं. मुलं अशा वेळी कसानुसा चेहरा करतात, रडायला लागतात. हे काही तरी चुकीचं आहे हे त्यांना त्या लहान वयातही कळतं. लहान वयातही मुलांना अस्वस्थ वाटतं. पण ती अस्वस्थता कशामुळे आली आहे आणि याचं काय करायचं हे त्यांना समजत नाही. कारण त्यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी पुरेशी शब्दसंपत्ती नसते. जर हे कायम होत राहिलं, तर मूल धसका घेतं, ताण घेतं, याचं दिसणारं एक लक्षण म्हणजे त्यांना ताप येऊ शकतो किंवा शांत झोप लागत नाही.   

ज्या मुलांना शाळेत किंवा घरी अशा प्रकारच्या शिक्षा सतत होत असतात त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दोन प्रकारचे प्रमुख बदल होऊ शकतात. एक तर अशी मुलं काहीशी भित्री, दबून राहणारी, कमी आत्मविश्वास असलेली होतात किंवा दुसऱ्या टोकाला जाऊन आक्रमक होतात. इतरांच्या मनाचा विचार न करता कसंही वागलं, बोललं तरी चालतं, असा संदेश त्यांना मिळतो. त्यातून त्यांची तशीच व्यक्ती होण्याच्या दृष्टीनं जडणघडण होते. अर्थात सतत, रोज रोज शिक्षा होत असतील तर असे बदल होण्याची शक्यता असते. म्हणून या वयातल्या मुलांशी बोलताना, वागताना जास्त काळजी घ्यायला हवी. अशा मुलांचे शिक्षक संवेदनशील असायला हवेत. असं नसेल, तर ज्या वयात जगाविषयीच्या चांगल्या अनुभवांची बेरीज व्हायला पाहिजे, त्याऐवजी वजाबाकीच होते.

मुलं थोडी मोठी असतील, तर आपण करत असलेल्या चुका आणि त्यामुळे मिळणाऱ्या शिक्षा त्यांना नीट समजतात. मग सारखं शिक्षेला सामोरं जाताना एक प्रकारचा निगरगट्टपणा अंगी येतो. याबाबत मुलं पालकांना घरी काही सांगत  नाहीत. काही मुलांच्या बाबतीत सतत भावना दुखावल्या गेल्या तर ती अबोल होतात, ही परिस्थिती तशीच राहिली, तर पुढे मुलांना मानसिक आजारांचा सामना करावा लागण्याचीही शक्यता असते. त्यांना येणारे अनुभव किती तीव्र आणि दाहक आहेत, त्यावर हे अवलंबून असतं.

मेंदूतला परिणाम  

डॉ. पॉल मॅक्लिन या संशोधकांनी ‘थिअरी ऑफ डाउनशिफ्टिंग’ हा सिद्धांत मांडला आहे. आपल्या मेंदूत तीन स्तर असतात. या तीन स्तरांतल्या मधल्या स्तरात भावनिकतेचं क्षेत्र असतं. चांगल्या-वाईट सर्व भावना इथेच निपजतात आणि रेंगाळतात. इथे आनंदाची भावना असते, तसं भीतीची भावनाही असते. गोष्ट ऐकताना, गाणी म्हणताना, नवा विषय शिकताना, उत्तरं शोधताना मेंदूतल्या वरच्या स्तरात- ‘निओ कॉर्टेक्स’मध्ये रक्तप्रवाह चालू असतो. पण मध्येच कुणी ओरडलं, तर हा रक्तप्रवाह सरकून खालच्या दिशेकडे, म्हणजे मधल्या स्तरात- भावनिक क्षेत्रात वाहायला लागतो. त्यामुळे बुद्धीचं काम काहीसं थांबतं आणि ती जागा भीतीची भावना घेते. अशा परिस्थितीत अभ्यास कसा करणार, हा प्रश्न मेंदूपुढे तयार होतो. म्हणूनच शिक्षेचा परिणाम जसा मानसिक-भावनिक आहे तसाच तो अभ्यासावरही झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अभ्यासात भीती, ताण, चिंता अशा नकारात्मक भावनांचा शिरकाव नकोच.

कायद्यात काय ?

 मुलांना होणाऱ्या शिक्षांच्या संदर्भात ‘युनेस्को’च्या शिक्षण विभागानं वेगवेगळे अभ्यास केले आहेत, निरीक्षणं नोंदवली आहेत. हे अभ्यास healtheducationresources.unesco.org/library/documents/association-between-school-corporal-punishment-and-child-developmental-outcomes या संकेतस्थळावर वाचता येतात. याच अभ्यास/ पाहण्यांच्या आधारावर तीन मुद्दे  मांडले जातात. ते असे-

– मुलांना केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या शारीरिक शिक्षा बंद करण्यात याव्यात.

– शारीरिक शिक्षा होऊ नयेत म्हणून या विचारांचा प्रसार करणं आणि त्याची अंमलबजावणी कशी होईल हे पाहायला हवं.

– मुलांना शिस्त लावायची असेल तर योग्य आणि रचनात्मक मार्ग कोणते हे ठरवणं.

मानवी हक्क आयोगानंही या विषयाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली आहे. ‘युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द राइटस् ऑफ द चाइल्ड’च्या ‘आर्टिकल १९’मध्ये असं म्हटलं आहे, की ‘सर्व प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक हिंसाचारा’पासून मुलांना संरक्षण मिळायला हवं. त्यामुळेच कोणत्याही कारणांसाठी मुलांना शिक्षा करणं हे एक प्रकारे गैरवर्तन आहे.

सकारात्मक शिस्त 

मुलांना शिस्त लावणं आवश्यक असतं. त्यासाठी काही वेळा त्यांच्या कलानं, तर काही वेळा खुबीनं शिस्त लावावी लागते. मात्र शिस्त लावताना मनाला त्या वेळेला वाटेल त्या, आयत्या वेळी सुचतील त्या शिक्षा करणं चूक आहे. मुलांच्यात हळूहळू निर्माण होत असलेला आत्मविश्वास ढासळेल, असं आसपासच्या प्रौढांचं वर्तन व्हायला नको. त्यापेक्षा स्वयंशिस्त कशी निर्माण होईल याकडे लक्ष द्यायला पाहिजे. मुलं अनुकरणातून शिकतात, त्यामुळे ही स्वयंशिस्त मोठय़ांमध्ये असेल, तर वेगळी शिस्त लावावी लागत नाही आणि शिक्षाही कराव्या लागत नाहीत. यासाठी मुलांशी निगडित असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग हवाच.

वास्तविक शाळेत केल्या जाणाऱ्या शिक्षा आणि त्यावर उपाय यावर ‘अ-भय अभियान’ या संस्थेनं विस्तृत अभ्यास केला आहे. ‘मुलांच्या सहभागातून शिस्त’ असं एक पुस्तकही प्रकाशित केलं आहे. यामध्ये सकारात्मक शिस्त कशी निर्माण होईल, याचं विवेचन आहे. सकारात्मक शिस्त या घटकाचं मूळ सूत्र असं, की ज्या विशिष्ट वर्तनासाठी शिक्षा केली जाऊ शकते, ते वर्तन सुधारण्यासाठी योग्य प्रकारे प्रयत्न करणं. केवळ बालवाडीच्या वयातच नाही, तर कोणत्याही वयात शिक्षेनं नाही, तर प्रयत्नानं सुधारणा होऊ शकतात. 

शिक्षा का करू नये?

लहान वयातल्या मुलांमध्ये ऊर्जा खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे त्यांच्या हालचाली जास्त असतात. त्यांच्या मेंदूतला ‘कॉर्पस कलोजम’ हा भाग अजून सक्षम होत असतो. कॉन्सन्टाइन बायकोव्ह या रशियन संशोधकानं मेंदूतल्या या भागाचं महत्त्व उलगडून सांगितलं आहे. पुढच्या संशोधनात असं दिसून आलं, की वयाच्या आठ पासून बारा वर्षांपर्यंतच्या काळात तो विकसित होतो. म्हणून या काळात मुलं अतिशय हालचाली करत असतात, दंगा करत असतात. पण अशा वर्तनासाठी मारणं ही शिक्षा नक्कीच योग्य नाही. मुलांच्या चुका दाखवण्याच्या अनेक सकारात्मक पद्धती आहेत.