पालकांमधील भांडणं मुलांच्या जीवनातील विविध पैलूंवर परिणाम करू शकतात. यामध्ये शारीरिक, भावनिक, मानसिक आणि सामाजिक घटकांचा समावेश आहे. आनंदी आणि बागडण्याच्या वयात आईवडिलांच्या भांडणांचा मुलांच्या कोवळ्या मनावर गंभीर परिणाम होतो. त्यांच्या वागण्यातही आपसूक बदल होतात. मुळात आईबाबा का भांडतात? याचे कारण शोधण्याचा तीही प्रयत्न करत राहतात. अबोला, घरातील बिघडलेल्या वातावरणामुळे मनाची घुसमट होते शिवाय ज्या भांडणाचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही, त्याबाबतीतही त्यांच्या मनात भीती निर्माण होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुले नेहमीप्रमाणे बागेत खेळत होती. इतक्या मोठ्या सोसायटीत भरपूर लहान-मोठी मुले होती. त्यामुळे कधी कोणाला मित्रमंडळी मिळाली नाहीत, असे व्हायचे नाही. सुरभी तिच्या गँगबरोबर ठिक्कर खेळत होती. तेवढ्यात तिच्या हातावरच्या घड्याळाचा गजर वाजला आणि तिचा चेहरा कसानुसा झाला. ती जोरात निघाली. तिचा धाकटा भाऊ वेदांत शेजारी झोक्यापाशी नंबर लावून उभा होता. त्याची झोका मिळण्याची वेळ आली होती आणि तो आनंदाने टाळ्या वाजवत झोका थांबायची वाट पाहत होता. तेवढ्यात सुरभीनं त्याचा हात धरून त्याला खसकन ओढलं आणि घरी निघाली. त्यानं विरोध करायचा क्षीण प्रयत्न केला, पण त्याला माहिती होतं की, त्याच्या विरोधाला सुरभी मुळीच किंमत देणार नाही.

हेही वाचा…ईतिश्री : थोडीसी बेवफाई?

हे रोजचंच होतं. बरोबर आठ वाजताचा गजर सुरभीच्या हातावरच्या घड्याळात वाजला की, ती असेल तिथे हातातलं काम टाकून घरी पळायची आणि बरोबर वेदांतलाही घेऊन जायची. तिच्या या बरोबर आठ वाजता निघून जाण्याच्या सवयीमुळे सोसायटीच्या सर्व मुली तिला ‘सिंड्रेला’ म्हणत, पण सुरभीला त्याचं काहीच वाटत नव्हतं. निदान ती तसं दाखवत तरी नव्हती.

घरापाशी पोहोचतात तिनं खिशाला लावलेली सेफ्टी पिन काढली आणि खिशातून घराची चावी काढून दाराचं लॅच उघडलं. वेदांतला हाताला धरून तिनं नेलं ते थेट बाथरूममध्ये. त्याचे आणि स्वत:चे हातपाय धुवून झोपायचे कपडे घालून ती त्याला डायनिंग टेबलवर बसवून स्वत: किचनमध्ये गेली. मावशींनी स्वयंपाक बनवून झाकून ठेवला होता. तो गरमच होता. सुरभीनं सराईतपणे स्वत:चं आणि त्याचं ताट वाढलं आणि डायनिंग टेबलवर आणलं. पुढची वीस-तीस मिनिटे दोघे शांतपणे जेवत राहिले. वेदांतला स्वत:च्या हातानं खायला शिकवल्यावर सुरभीचं काम आता खूपच कमी झालं होतं. वेदांतच्या ताटातले शिल्लक राहिलेले दोन-तीन घास बघून सुरभीनं डोळे वटारले. वेदांतनं खांदे उडवून, डोळे आकाशाकडे नेऊन तिला वेडावून दाखवलं आणि दोन्ही घास संपवले. त्यानंतर सुरभीनं ताटे उचलली बेसिनमध्ये ठेवली. हे सर्व संपेपर्यंत नऊ वाजले होते. आई-बाबा अजून त्यांच्या खोलीत बसून काम करत होते.

हेही वाचा…‘ती’ च्या भोवती : विस्तारलेल्या आईपणाचा प्रत्यय!

आईच्या मीटिंगमधल्या बोलण्याचा आणि बाबांच्या की-बोर्डचा आवाज येत होता. दोन्ही मुले बेडरूमच्या दारात उभं राहून त्यांच्याकडे बघत होती. बाबानं वर बघितलं आणि ओठावर बोट ठेवून त्यांना जवळ बोलावलं. आवाज न करता दोघे त्याच्याजवळ गेले. वेदांतला मांडीवर घेऊन बाबानं दोन-चार मुके घेतले आणि कानात काहीतरी विचारलं. वेदांतनं मानेनंच हो, म्हटलं आणि स्वत:च्या पोटावरून हात फिरवून दाखवला. बाबांनी त्याचा अजून एक मुका घेऊन त्याला खाली उतरवलं. आता सुरभीचा नंबर होता. तेच सर्व रुटीन पार पाडून तीसुद्धा खाली उतरली. आता दोघे आईसमोर उभे राहिले. सुरभीनं आईला एक फ्लाइंग किस दिला आणि गोड हसून फक्त ओठांनीच गुड नाईट म्हटलं. आवाज न करता वेदांतनं एखाद्या युरोपियन राजकुमाराप्रमाणे कमरेत लवून एक पाय वाकून नाटकी पोझ घेतली आणि जोरात ‘गुड नाईट, माय लेडी’ म्हणून ओरडला. सुरभीच्या चेहऱ्यावर भीती दाटली. ती आईकडे बघत होती, पण आई चांगल्या मूडमध्ये होती. तिने त्याला व सुरभीला फ्लाईंग किस दिला आणि रूममधून जाण्याची खूण केली.
दोघे बाहेर पडली आणि घराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या स्वत:च्या बेडरूममध्ये गेली. ते बेडरूममध्ये जाताच वेदांतची बडबड चालू झाली, ‘‘आज कोणती स्टोरी सांगणार? हिस्ट्री की इंग्लिश?’’ सुरभीनं स्वत:ची दोन्ही पुस्तके त्याच्यासमोर धरली. त्यानं इंग्लिशचं पुस्तक निवडलं. सुरभीचा तो आवडता विषय आहे हे त्याला माहिती होतं. सुरभीनं एक धडा उघडून वाचायला सुरुवात केली आणि वेदांत पांघरुणात शिरून ती गोष्ट ऐकू लागला. सुरभीचा गोड आवाज आणि रूममधला मंद लाईट यांच्या एकत्रित परिणामामुळे तो दोन मिनिटांत झोपला. सुरभी वाचतच राहिली. पुढच्या आठवड्याच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये तो धडा होताच. तिचा अभ्यास चालू राहिला. धडा वाचून संपल्यावर ती अलगद उठून स्वत:च्या बेडकडे गेली. लाईट बंद केला, पण झोपली नाही.

बराच वेळ ती जागी होती. आईचा ‘मीटिंगवाला’ आवाज लांबून येत होता. बाकी काहीच आवाज नव्हता. खूप वेळाने आईचा आवाज बंद झाला आणि तिला किचनमधल्या हालचालींची चाहूल लागली. आवाजावरून तिच्या लक्षात आलं की, आई आणि बाबा दोघेही जेवण वाढून घेत आहेत. सुरभीच्या पोटात कसं तरी व्हायला लागलं. छाती धडधडायला लागली. बराच वेळ ती जिवाचा कान करून ऐकत होती. अनेकदा रात्रीचं जेवण करताना काहीतरी बिनसतं आणि भांडण सुरू होतं हे तिला अनुभवानं माहिती होतं. तिनं अशी अनेक भांडणं ऐकली होती. कधी कधी भांडण प्रत्यक्ष ऐकायला मिळालं नाही, तरी दुसऱ्या दिवशी सकाळी घरात जो सन्नाटा असायचा त्यावरून तिला कळायचं की, काल भांडण झालेलं आहे आणि ते अजून मिटलेलं नाही.

हेही वाचा…सांधा बदलताना : पालकत्वाच्या मर्यादा

आई-बाबा का भांडतात? हे तिला पूर्णपणे कधीच कळलं नाही, पण ते दोघेही एकमेकांवर खूप पटकन चिडतात आणि बारीकशा गोष्टीनंही भांडण सुरू होतं हे तिच्या लक्षात आलं होतं. त्यांना ऑफिसचा त्रास आहे. त्यांचे दोन्ही आजी-आजोबांशीही भांडण झालं आहे, हेही तिला कळलं होतं, पण इतक्यांदा आणि इतकं मोठं भाडणं का होतं, हे तिला मुळीच समजलं नव्हतं. आजी-आजोबांना सांगितलं तर भांडण आणखीच वाढतं हेसुद्धा ती अनुभवानं शिकली होती. ते भांडायला लागले की, ती झोपल्याचं सोंग करून त्यांचं भांडण ऐकत राहायची. असंच एकदा तिनं ऐकलं, ‘‘मग निघून जा ना. कोणी धरून ठेवलंय तुला? ताबडतोब निघ. बॅगा भरून देऊ का?’’

‘‘का बरं? मी का जाऊ? तू जा. माझी मुलं सोडून मी का जाऊ? त्यांची शाळा, मित्र का डिस्टर्ब करू? तू जा ना! घे तुला हवं तितकं स्वातंत्र्य एकदाचं.’’

हे ऐकल्यानंतर सुरभीच्या मनात एकदम काहीतरी चमकलं. भांडण यांचं होत असलं, तरी हे आपल्यासाठी एकत्र राहतात. म्हणजे आपण छान असलो, तर ते हे सगळं बिघडेल असे वागणार नाहीत, पण आपण त्यांचा त्रास वाढवला तर ते वेगवेगळे होतील आणि मग काहीतरी भयंकर होईल. काय होईल त्याची तिला कल्पना नव्हती, कारण घरात आई-बाबा आणि वेदांत नाही म्हणजे कसं होईल? याची कल्पना करूनच तिला कसं तरी व्हायचं आणि पोटात दुखायला लागायचं. त्यामुळे आई-बाबांना आपला आणि वेदांतचा मुळीच त्रास झाला नाही पाहिजे, असा तिनं निश्चय केला. शाळेतून तक्रार नाही, सोसायटीत कुणाशी भांडणे नाहीत आणि घरात काही त्रास नाही. अगदी वेदांतचासुद्धा काही त्रास नाही, असं तिनं पक्क ठरवलं. हे सगळं वेदांताला समजवायला फार वेळ लागला नाही. तोसुद्धा घाबरला होताच. त्यामुळे तो सुरभीचं सर्व ऐकायला लागला. ती सांगते तसं वागलं की, भांडण होणार नाही याची त्यालाही खात्री पटली. तसं सुरभीनं त्याला पुन:पुन्हा सांगितलंच होतं. अशा रीतीने वेदांत आणि सुरभी स्वत:ला आणि घराला सांभाळत होते. आपल्यासाठी आई-बाबा एकत्र राहतात म्हणजे आपण कायम छान राहायचं, कारण ते आपल्यावर रागावले, त्यांना त्रास झाला की, सगळं संपलं. असं त्यांना ठाम पटलं होतं. हा सगळा विचार करत, आठवणी काढत सुरभीला कधी झोप लागली, ते तिलाच कळलं नाही. सकाळचा अलार्म तिला ऐकू आलाच नाही. वेदांतनं तिला उठवलं तेव्हा तिचे डोळेही उघडत नव्हते, पण जबाबदारीची जाणीव तिला झोपू देईना. पटकन उठून तिनं आवरायला सुरुवात केली.

हेही वाचा…स्वभाव – विभाव : ते असे का वागतात?

आई-बाबा एकमेकांशी बोलत नव्हते. एकमेकांकडे बघणंही टाळत होते. त्यामुळे दोघांनी पटपट आवरून काढता पाय घेतला. बस स्टॉपवर ते दोघेच होते. वेदांतनं तिला नेहमीप्रमाणे विचारलं, ‘‘काल भांडण झालं का?’’
‘‘मला नाही ऐकू आलं. मला झोप लागली. कळलंच नाही.’’
‘‘पण आता ते बोलत नाहीयेत. मला माहीत नाही काल काय झालं ते.’’

वेदांत सुरभीला चिटकून उभा राहिला. दोघेही काहीच न बोलता स्कूल बसची वाट बघत होते. स्कूल बसमध्येसुद्धा ते तसेच चिटकून एका सीटवर बसून राहिले. बसमधल्या मावशींना याची सवय होती. त्यांना वाटायचं, ‘‘किती शहाणी मुलं आहेत ही. इतरांसारखे भांडत नाहीत. एकमेकांची काळजी घेतात. खिडकीतून काही दिसलं, तरी दुसऱ्याला दाखवतात. एकमेकांना किती जीव लावतात हे दोघं. सगळी मुलं अशी समजूतदार झाली, तर किती छान होईल. कधी बसमध्ये आरडाओरडा नाही. भांडण नाही. काही वस्तू विसरत नाहीत. शिवाय बसमध्ये चढताना ‘गुड मॉर्निंग’ म्हणतात आणि जाताना ‘थँक्यू’ म्हणतात.’’ मावशींनी मनातच त्या दोघांची दृष्ट काढली. मावशी आपल्याकडे बघून काहीतरी चांगला विचार करत आहेत, हे सुरभीला समजलं आणि तिनं सरावानेच एक छान स्माइल दिलं. मावशीही छान हसल्या.

शाळेत दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत सुरभीच्या वर्गात खूप मोठा दंगा झाला. कोणीतरी टीचर्स रूममध्ये जाऊन ते सांगितलं. वर्गशिक्षिका आणि मावशी पळत पळत आल्या तेव्हा वर्गात दोन मुलांची धमाल मारामारी चालू होती. एकमेकांचे शर्ट ओढून ते त्वेषाने भांडत होते. एकाच्या शर्टची दोन बटणे तुटली होती आणि दुसऱ्याच्या गालावर नखांचे ओरखडे होते. बाईंनी एकाला धरलं आणि मावशींनी दुसऱ्याला. इतर मुले जोरात टाळ्या पिटून, ओरडून भांडणाऱ्या मुलांना आणखीनच प्रोत्साहन देत होती. बाईंनी सर्व मुलांना वर्गाबाहेर हाकलले. मावशीसुद्धा गालावर ओरखडे आलेल्या मुलाला घेऊन मेडिकल रूममध्ये गेल्या. वर्गात फक्त त्या बाई आणि तो शर्ट फाटलेला मुलगा असे दोघेच जण होते. तेवढ्यात, त्यांचे लक्ष कोपऱ्यात बसलेल्या सुरभीकडे गेलं. ती हुंदके देऊन, पण अजिबात आवाज न करता रडत होती. मारामारी करणाऱ्या मुलाला हाताशी धरून बाई सुरभीजवळ गेल्या. सुरभीनं स्वत:च्याच अंगावर उलटी केली होती आणि ती घाबरून थरथरत होती. तो मुलगाही एकदम कावराबावरा झाला.

हेही वाचा…एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व!

बाईंनी सुरभीला जवळ घेऊन हळूहळू थोपटायला सुरुवात केली. मग मात्र सुरभीचा बांध फुटला. ती ओक्साबोक्शी रडायला लागली आणि रडता रडता सांगत होती, ‘‘बाई, प्लीज माझा वर्ग बदला ना. इथली मुलं खूप भांडतात. प्लीज, प्लीज माझा वर्ग बदला ना.’’

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Children s lives affected by parental conflict emotional struggle highlights impact psg