‘पुढचा काळ फार डिमांडिंग असणार आहे आई. कधी कोणतं फिल्ड पुढे येईल सांगता येत नाही. म्हणून आतापासूनच मुलांना ऑलराऊंड तयार करायचं. दे शूड ब्लूम इन्टू नाईस पॅकेजेस.’ चिरंजीवांनी सुनेचीच री ओढली. आई लक्ष देऊन ऐकत गेल्या. त्यांना खोलवर जाणवलं की इथे प्राथमिक दृष्टिकोनातच फरक पडतोय. आई-बाप चांगलं प्रॉडक्ट बनवायला निघाले होते. ‘प्रॉडक्ट’ हा शब्द त्यांना फारसा माहीत नसला तरी त्याबद्दल आग्रही होते. इथे मुळी आकर्षक पॅकेजिंगवरच भर आहे.  
‘आई गंऽ आजपासून राही शाळेतून अर्धा तास उशिरा घरी येईल हं.’ बूट घालता घालता चिरंजीवांनी सांगितलं तेव्हा आई पेपर वाचत होती. किंचित डोकं वर काढून बघणार तोवर पुढचं वाक्य आलं, ‘आजपासून तिचं बुद्धिबळ सुरू होतंय.’
        ‘बुद्धिबळ?’
‘चांगलंय ना. शाळा सुटल्यावर तिथेच क्लास घेणारेत. शेवटी कॉन्संट्रेशन वाढलं, विचार करायची सवय लागली तर चांगलंच ना!’
‘चांगलं तर आहे पण शाळेअगोदर पण तिचा क्लास असतो ना कशाचा तरी..’
‘ती नाऽ ती मॅथ्स ऑलिम्पियाडची तयारी असते. दोनच महिने चालेल ती. म्हटलं, लेट हर ट्राय दॅट. आपली आहे तेवढी जादा फी भरण्याची ऐपत..’
‘पण तिची कुवत आहे का? एकूणच गणितामध्ये रमताना दिसत नाही ती.’
‘म्हणूनच तर! म्हणूनच तिला त्यात घालायचं. तिला तिचं भलं-बुरं कळायची अक्कल नाहीये अजून. तोवर आपणच.. तू बघ जरा तिचं वेळापत्रक वगैरे.’ चिरंजीव सटकताना घाईत म्हणाले.
आईंना हसूच आलं. नातवंडांची वेळापत्रकं ‘बघणं’ एवढं एकच तर काम होतं त्यांना. बाकी बहुतेक रोज घडामोडी आपल्या आपण होतच होत्या. मुलांची ये-जा.. त्यांच्यासाठी ठरलेल्या वाहनांची ये-जा.. नोकर मंडळींची ये-जा.. फोन, निरोप, वगैरे वगैरे.. सगळ्याचा परिणाम एकच. सर्वाची कमालीची व्यग्रता. राही जेमतेम अकरा वर्षांची होती, पण तिचाही संपूर्ण दिवस ‘पॅक्ड’ असे. त्यात आता हा बुद्धिबळाचा क्लास वाढला. शाळेतून आल्यावर नातीला जेवायला गरमा गरम वरण-भात तरी मिळावा असं आईंना वाटे. त्यासाठी त्या योग्य वेळी कुकर लावत. आता नव्या वेळापत्रकानुसार तो किती वाजता लावावा या विचारात त्या असतानाच सून आतून म्हणाली,
‘त्यांना म्हणावं, तिला खूप जेवायला घालू नका. लगेच तीन वाजता भरतनाटय़मला जायचं असतं तिला. पोट फार भरलं असलं तर शरीर लवत नाही. टीचर म्हणत होत्या.’
‘शाळेतून घरी आल्यावर ती खूप भुकेजलेली असते गं.’
‘आजपासून असणार नाही. शाळा सुटल्या सुटल्या खायचा एक छोटा जादा टिफिनपण देणार आहे मी तिला. ठीक आहे?’
सून म्हणाली म्हणजे ते ठीकच असणार, असं आईंनी मानून घेतलं. तेवढय़ात नातू बास्केटबॉलच्या कोचिंगहून परत आला. घामाघूम झालेला, दमलेला स्पष्टच दिसत होता तो. तरीही धापा टाकत आपल्या मम्मीला म्हणाला,
‘मम्मीऽ ऑफिसमधून येताना माझं गिटार नक्की आणशील ना आज?’
‘बघते बाबा जमलं तर.’
‘बघू नको. जमव. आतापर्यंत नक्की रिपेअर झालं असणार ते. मुद्दाम तुझ्या ऑफिसजवळच्या शॉपमध्ये तूच टाकलंस ना ते दुरुस्तीसाठी?.. आज आण नक्की. नाही तर गिटारचे सर मला रागावतील.’
त्याचं बोलणं ऐकल्यावर आईंना आठवलं, खरंच की, गेले काही दिवस घरातली याच्या गिटारची टय़ँवटय़ँव ऐकू येत नाहीये. नवीन आणलं होतं तेव्हा सारखा त्याच्या राशीला लागलेला असायचा हा. कुंगफूचा क्लास लावल्यापासून तो नाद जरा मागे पडला की काय? खरं तर तो कराटेवाला होता. त्यातले कसले कसले बेल्ट मिळवलेही होते त्याने, पण मग घरात कुंगफूची लाट आली. दरम्यान राहीचा काही दिवस कॉम्प्युटर ग्राफिक्सचा क्लास झाला. तिला खरा नाद आहे तो शामक दावरच्या डान्स क्लासचा. पण ट्रॅडिशनल इंडियन डान्स फॉर्मची बेसिक माहिती तरी हवी म्हणून तिच्या मम्मीनं तिला भरतनाटय़मला आग्रहाने घातलं. पहिल्याच काही महिन्यांत तिच्यासाठी भरतनाटय़मचा संपूर्ण पारंपरिक पोशाख, नकली दागिन्यांसह खरेदी करून झाला. त्या पोशाखात शिरल्यावर कार्टी सुंदर दिसत होती, शंकाच नाही. तिच्या अंगात नाच किती शिरला असेल याबद्दल शंकाच होती, पण आई ते विचारू शकल्या नाहीत. तेवढा निवांतपणा होताच कोणाला?
दुपारी निवांतपणे त्या वाचत पडलेल्या असताना सूनबाईचा फोन आला. ‘त्यांना म्हणावं’, ‘त्यांना म्हणावं,’ असं मुलाकडे न म्हणता ती थेट आपल्यालाच काही तरी म्हणतेय त्याअर्थी तेवढंच महत्त्वाचं काम असणार हे आईंनी ओळखलं. तिच्या दृष्टीने ते होतंच. दिवाळीच्या सुट्टीत कॉलनीत एक जण संस्कृत पाठांतर वर्ग घेणार होते. त्यांच्या घरी जाऊन ते काय काय, कसं कसं पाठ करून घेणार आहेत हे विचारून येण्याचं काम आईंनी करावं असं सूनबाईंचं म्हणणं होतं. ते कळल्यावर आईंनी जरा बिचकतच विचारलं, ‘एखादी फॉरिन लँग्वेज मुलांना शिकवायची म्हणत होतात ना गं तुम्ही दोघं? परवा-तेरवाच ऐकलं मी.’
‘ती तर शिकवूच. त्याला पर्याय नाही मॉडर्न टाइम्समध्ये. पण ‘सन्स्क्रीत’ रिसायटेशनपण युजफूल असतं ना आई? मुलांची डिक्शन क्लिअर होते म्हणतात त्याने. तुम्ही उगाच शंभर-दोनशे बग्जचा इश्श्यू करू नका. ओ.के. वाटलं तर नाव घालून टाका राहीचं. तेवढंच सुट्टीत संस्कृत पदरात पडेल.’
आता काही दिवसांनंतर घरात गिटारबरोबरच ‘या देवी सर्वभूतेषू’ वगैरे गुंजणार हे आईंनी ओळखलं. दिलेलं काम चोख पार पाडून त्या घरी आल्या. असं काही पाहिलं, ऐकलं की त्यांना पाठीला डोळे फुटल्यासारखं जुनं आठवायचं. त्यांच्या लहानपणी ती चौघं भावंडं होती घरात. बाबा एकटे कमावते. आईला घरकामात मुलींकडून मदत हवी. यामुळे त्यांना आणि त्यांच्या ताईला शाळेशिवाय फार काही करायला मिळालंच नाही कधी. शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडून पाण्यावरची रांगोळी शिक, काशिदा काढायला शिक, सुट्टीत पलीकडच्या वाडय़ातल्या विहिरीत पोहायला जा इतपतच उपक्रम केले. दोघा भावांवर आई-बाबांची भिस्त होती. त्यांच्यातही शक्यतो मोठय़ा भावाने धाकटय़ा भावाचा अभ्यास घेतला. मोठा जरा अंगापिंडानं दणकट म्हणून त्याला तालमीत घातला होता. धाकटा पडला रडतराव, त्याच्यावर तेवढेही पैसे घरच्यांनी खर्चले नाहीत. पुढे कॉलेजसाठी परगावी हॉस्टेलवर राहिल्यावर मोठा भाऊ सुंदर माऊथऑर्गन वाजवायला शिकला तेव्हा त्याला गाण्याबिण्याची आवड असेल की काय असा घरच्यांना संशय आला. रडतराव वाटणाऱ्या धाकटय़ाने वकिलीत छान नाव काढलं. त्याच्या वेळी वक्तृत्वाचा- पब्लिक स्पीकिंगचा क्लासबीस असणं शक्यच नव्हतं. तरीही त्याची त्याने वाट शोधली.
आई-बाबांना केवढा अभिमान होता याचा. ‘पोरं उत्तम, धडधाकट आणि मेहनती बनवली आहेत आम्ही. त्यांचं गाडं कुठे अडायचं नाही.’ ते फुशारकीने सांगायचे. पुढे तसं झालंही. सगळ्या भावंडांनी चुकत-माकत, लवकर-उशिरा आपापल्या वाटा शोधल्याच की! तो शोध बरा होता की आताची ही धुमश्चक्री बरी? कळायला लागण्या आधीपासूनच पोरांना शंभर वाटांवरून गरागरा फिरवण्याची?
आईंनी उगाचच मनात हिशेब मांडले. शहाणपणाने ते मनातच ठेवले. रात्री निजण्यापूर्वी पाच-दहा मिनिटं मुलांशी बोलायला मिळे तेव्हा संस्कृत पाठांतरवर्गाचं माहितीपत्रक सुनेपुढे ठेवलं. ती घाईनं म्हणाली,
‘त्यांना म्हणावं नुसता सुट्टीत का क्लास घेता? नेहमी घ्या.’
‘नेहमी वेळ मिळेल का पोरांना? अभ्यास थोडा का असतो?’
‘तो असणारच हो. पण आता नुसत्या पुस्तकी हुशारीला कोण विचारतो आहे? सॉफ्ट स्किल्स हवीत. मल्टिफॅसेटेड व्हायला हवीत मुलं.’
‘दमतील ना ती.’
‘दमू देत थोडी. आम्ही सगळे पॉसिबल इनपुट्स घालत राहणार बघा. त्यासाठी वाटेल तेवढा पैसा ओतणार. पुढे त्यांनी असं नको म्हणायला की आमच्या आई-बाबांनी आम्हाला अमूक दिलं नाही.’
‘अच्छाऽ म्हणजे आपल्या कानी सात खडे, म्हणून का हे सगळं?’
‘च्यक्. पुढचा काळ फार डिमांडिंग असणार आहे आई. कधी कोणतं फिल्ड पुढे येईल सांगता येत नाही. म्हणून आतापासूनच मुलांना ऑलराऊंड तयार करायचं. दे शूड ब्लूम इन्टू नाईस पॅकेजेस.’ चिरंजीवांनी सुनेचीच री ओढली. आई लक्ष देऊन ऐकत गेल्या. क्षणभर गांगरल्या. मग सावरल्या. त्यांना खोलवर जाणवलं की इथे प्राथमिक दृष्टिकोनातच फरक पडतोय. आपले आई-बाप चांगलं प्रॉडक्ट बनवायला निघाले होते. ‘प्रॉडक्ट’ हा शब्द त्यांना फारसा माहीत नसला तरी कसाबद्दल आग्रही होते. इथे मुळी आकर्षक पॅकेजिंगवरच भर आहे.
हरकत नाही. हाही दृष्टिकोन असू शकतो. हीही एका काळाची गरज असू शकते. ती भागवण्याची धडपड होऊ शकते. मात्र तिच्या जास्त आहारी जाता जाता कुठे तरी मूळ मुद्दलच डावं किंवा कमअस्सल राहील का? हा विचार केला जातो का?
निदान आपल्या नातवंडांचं तरी तसं होऊ नये अशी मनोमन प्रार्थना करत त्या निजायला गेल्या.    
mangalagodbole@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा