मराठी माध्यमांच्या शाळांचं अस्तित्व धोक्यात असणं, घसरता दर्जा याला जबाबदार कोण? याचं उत्तर ‘आम्ही पालक!’ पूर्वी मराठी शाळाच होत्या. आज विविध क्षेत्रांतील एव्हरेस्टवर असणारी माणसं याच शाळांत शिकत होती. त्यांचा अभ्यास ना त्यांचे पालक घरी करून घेत होते, ना त्यांना शिकवणीला पाठवीत होते. मग दर्जा घसरणीला लागायला नेमकं काय घडलं?
कोचिंग क्लासच्या जाहिराती वृत्तपत्रांत झळकू लागल्या. आम्हा पालकांच्या हाती पैसा खेळू लागला. मग आमच्या यश-अपयश, शिस्त, मुलांना वाढविणं, त्यांचं कल्याण याबद्दलच्या साऱ्या संकल्पनाच बदलल्या. हे सारं आठवायचं कारण गेल्या महिन्यात सरकारने प्रसिद्ध केलेला बेस टेस्टचा अहवाल आणि शिक्षकांचं दबक्या आवाजात बोलणं, ‘हा पेशा नकोसा झालाय. पूर्वीसारखी कामात मजा राहिली नाही. सारंच कठीण झालंय..’ ते ऐकताना एक आठवण येत होती. आपल्या पाचवी, सहावीतल्या दोन मुलांची नावं शाळेत घालायला एक पालक आले होते. सोबत फॉर्म भरण्यासाठी त्यांची नववीतली मुलगी होती. अगदी जुजबी माहितीसुद्धा तिला भरता येत नव्हती. त्या दोघांनी माझ्याकडे अपेक्षेनं पाह्य़लं. मी तिला म्हटलं, ‘वाच’. तिला वाचताच येत नव्हतं. मी तिच्या बाबांना म्हटलं, ‘अहो, ही नववीत आली कशी? तिला वाचता-लिहिता येत नाही, हे तुम्हाला कधी कळलं नाही? शाळेत जाऊन कधी चौकशी केली नाही केलीत?’ इ. इ. माझे प्रश्न व्यर्थ होते. ‘त्याचं काय आहे, त्यांची आई बघते सारं..’
मला राहवलं नाही. मी शाळेच्या परवानगीने मुलांशी गप्पा मारायच्या ठरविलं. ज्यांची पालिका शाळा बंद झाली म्हणून नव्यानं प्रवेश घेतलेली मुलं ३७ हा आकडा ‘तीनावर सात’ असा वाचत होती. जोडाक्षरांवर अडत होती. सातवीत आल्यावर त्यांना पाचच्या पुढे पाठ येत नव्हते. ऐकून बॉक्स, टॉप यासारखे सोपे तीन अक्षरी इंग्रजी शब्द लिहिता येत नव्हते. मी त्यांना विचारलं, ‘अरे असं कसं?’ त्यांच्याजवळ उत्तर नव्हतं, पण ती सांगू लागली, ‘आमच्या वर्गावर शिक्षक येत नसत. मग आम्ही शाळेत जायचो नाही. काय शिकवतात तेच कळत नसे.’ त्यांनी आणखी एक सांगितलं, ‘आम्ही शिकवणीला जायचो.’
‘मग तरी येत नाही? असं कसं?’
आता आमच्याभोवती काही आणखी मुलं आणि पालक गोळा झाले. प्राथमिक शाळेतल्या मुलांना जायची घाई होती. सकाळी ७ ते १२.३० शाळा झाल्यावर त्यांना घाईनं डबा खाऊन टय़ूशनला जायचं होतं, तर दुपारच्या अधिवेशनाला येत असलेली मुलं ८.३० ते ११.३० क्लास आटोपून दमली-भागली होऊन शाळेत आली होती. ‘त्यांचा मेंदू थकला नसणार का?’ मी विचार करीत होते. त्यांच्या पालकांनी माझा प्रश्न जणू ओळखला. म्हणाले, ‘बाई काय करणार. शाळेत शिकवीत नाहीत आणि आम्ही शिकवू शकत नाही.’ मी म्हटलं, ‘अहो, शाळेत शिकवीत नाही, असं कसं होईल? आणि शाळेत साडेपाच तास शिकवून मुलांना येत नसेल तर क्लासमध्ये एक किंवा दोन तासांत कसं शिकवीत असतील? त्यांच्याकडे काय जादू आहे? क्लासवाली मंडळी काय शिकली आहेत? ते मुलांना गाणी-गोष्टी सांगतात का? अक्षर सुधारावं म्हणून प्रयत्न करतात का?’ अशा माझ्या अनेक प्रश्नांना त्यांचं उत्तर होतं, मौन. मुलं मात्र त्यांना कोणी विचारीत आहे, हे पाहताच एक-एक आश्चर्यकारक गोष्टी सांगत होती. ‘बाई, शाळेत एक शिकवितात तर क्लासमध्ये दुसरंच.’ ‘ताई आम्हाला लिहायला-वाचायला सांगते आणि आपण वाचत बसते.’
मुकुल, लीनाचा क्लास तीन तास चालतो. एक तास शिकवितात आणि बाकी दोन तास गाईड किंवा सरांनी दिलेल्या वहीतून उत्तरं उतरवून काढतात आणि मग पाठ करतात. ते पाठ झालं की नाही, हे दुसऱ्या दिवशी सर पाहतात. सर चुकलेली उत्तरं पाच वेळा लिहून आणायला सांगतात.
‘अरे, मग शाळेचा गृहपाठ कधी करता?’ त्यांचं म्हणणं होतं, ‘बाई, जागून सारं करावंच लागतं. कारण सर मारतात. आई-बाबांना फोन करतात. धमकावतात.’ राणी, विपुल यांच्यासारखी काहीजण दोन वेळा क्लासला जातात. संध्याकाळच्या क्लासना गृहपाठ करून घेतला जातो, तर सकाळी लेखन, वाचन.
‘अरे मग खेळता कधी? गोष्टीची पुस्तकं वाचता कधी? नाच, गाणं, बुद्धिबळासारखा खेळ असं काही शिकावं. शाळेच्या एखाद्या टीममध्ये भाग घ्यावा, असं वाटत नाही का तुम्हाला?’
‘बाई, आई-बाबा ऐकत नाहीत. म्हणतात, मार्क मिळवायचे तर हे केलंच पाहिजे!’
पण पुस्तकातली उत्तरं, तेही रेडीमेड पाठ करण्यानं हे सारं कसं होईल? त्यांच्या इतर क्षमता कशा विकसित होतील? माझा प्रश्न मनात राहतो. परशू सांगत असतो की, त्याच्या वर्गात पहिली, दुसरीचे एकत्र वर्ग, तिसरी-चौथीचे एकत्र असे वर्ग एकत्रच घेतले जातात. बाहेरच्या खोलीत तास होतो. आत स्वयंपाकघर. घरात आई-बाबा, दादा-ताई जो कोणी रिकामा असेल तो वर्ग घेतो. शिकणारा आणि शिकविणारा यांच्यात सूर जुळायचे तर त्यांच्या नात्यात सातत्य हवं, हे इथं कसं जमत असेल? मुले आता रंगात येत आणखी काही सांगू पाहत होती. माझ्या या प्रश्नावर मात्र ती गप्प झाली. ‘अरे पण, कशाला जाता क्लासला? आणि इतकं करून साधं बोलणं पण तुला समजत नाही. पाच वाक्यंदेखील एखाद्या विषयावर स्वत: विचार करून बोलता येत नाहीत. ते का? स्वत:चा अभ्यास स्वत:च करायला काय होतं?’ यावर हेमू विचारीत होता, ‘बाई, अभ्यास स्वत:चा स्वत: कसा करायचा? तो करता येतो?’ इतर साऱ्यांनी त्याच्या प्रश्नात सूर मिसळले. कारण त्यांना ‘अभ्यास’ या शब्दाची ओळख झाली तेव्हापासून शाळेच्या बरोबर त्यांनी शिकवणीला जाणं सुरू केलं होतं. पुस्तकं शाळेतून फुकट होती, पण वह्य़ांच्या खरेदीबरोबर गाईड, वर्कबुकची खरेदी केली जात होती. स्वत:चा विचार करायचा, धडे वाचायचे, प्रश्नांची उत्तरे शोधायची हे त्यांनी कधी केलंच नव्हतं. मग संदर्भ शोधणे, शब्दकोशाचं, शब्दांचे अर्थ शोधणं हे दूरच. केवळ पुस्तकातील धडे, त्यांची प्रश्नं-उत्तरं यातच गुरफटून गेल्यानं त्यांची शब्दसंपत्ती, अनुभवविश्व मर्यादित राह्य़लं होतं. आकलनक्षमता कमी झाली होती. स्वत:चा वेगळा विचार करणं त्यांना जमत नव्हतं. हे सारं कशासाठी तर चांगले मार्क मिळावेत म्हणून! शाळेतले मार्क हेच एकमेव मुलांच्या प्रगती, यश, वाढ मोजण्याचं साधन आहे का?
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, शाळेने काही वास्तव कारणासाठी पैसे मागितले तर खळखळ करणारे, दंगाधोपा करणारे पालक या ‘टय़ूशन्स’ना पैसे मोजीत असतात. त्यातूनच प्रचंड काळा पैसा तयार होत असतो. कारण सारा व्यवहार रोखीने चालतो. आयकरामध्ये हा दाखविला जात नाही. गल्लोगल्ली कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेले हे शिकवणीचे वर्ग आहेत. बरेच वेळा नोकरी न मिळाले, स्वेच्छानिवृत्ती घेतलेले, अर्धवट शिक्षण सोडलेले बरेचजण हे वर्ग घेत असतात. दहावी नापास, बारावी नापासही वर्ग घेतात ही वस्तुस्थिती आहे. काही वेळा एखादा आपल्या नावानं वर्ग सुरू करतो. मग त्याला प्रतिसाद मिळाला की चक्क इतरांना आपल्या वर्गात नोकर म्हणून नेमतो. ज्ञान, माहिती, शिकविण्याचं तंत्र साऱ्याच बाबतीत सुमार असणारी ही मंडळी मुलांना दर्जेदार शिक्षण कसं पुरवीत असतील?
पालकांना परवडत नाही म्हणून मुलांना अनेक गोष्टी शासन फुकट वाटतं. मात्र हेच पालक टय़ूशनसाठी रुपये १५० पासून काही हजार रुपयांपर्यंत दरमहा पैसे मोजीत असतात. कित्येकजण वर्षांची किंवा दोन-तीन वर्षांची फी आगाऊ घेत असतात. हे आकडे केवळ मराठी माध्यमापुरते मर्यादित आहेत. हल्ली तर वार्षिक परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच शिकवणीवर्गात अभ्यास सुरू होतो. सुट्टीचा निर्भेळ आनंद मुलं उपभोगू शकत नाहीत. सुट्टीत पूर्वी जे केलं जाई- ट्रेकिंग, छंदवर्ग इ. इ. तेही या मुलांना करता येत नाही. पालकांना याचं महत्त्वच कळत नाही. आपणच आपल्या मुलांचे पंख छाटतोय, हे त्यांच्या लक्षात येत नाही. हेच दुर्दैव आहे.
आमची चर्चा शांतपणे ऐकणारी प्रथमेश, संकेत, ईशा, वैष्णवी अशी आठ-दहाजण पुढे आली. त्यांची गतही चौथीतून पाचवीत येताना वेगळी नव्हती. शिकवणीवर्गाला जाऊनही मार्क काही मिळत नव्हते. त्यांच्या मुख्याध्यापिकांनी संस्थाचालक, माजी शिक्षक, सामाजिक उत्तरदायित्व जपणारे यांच्या मदतीने एक योजना आखली. तळातील ४० विद्यार्थी शाळा भरण्यापूर्वी दीड तास येऊ लागले. अट एकच, कोणत्याच शिकवणी वर्गाला जायचं नाही. पालकांना विश्वासात घेतलं गेलं. मार्क मिळवणं नाही, तर या वयात लिहिता-वाचता येणं, संकल्पना समजणं महत्त्वाचं आहे, हे पटवून दिले गेले. काही मुलं गळली. काही सातत्याने पाचवी ते सातवी येत राहिली. आता त्यांनी गाईड, वर्कबुक घेणं बंद केलंय. काहींनी हिंदी, गणित, इंग्रजी, होमी भाभा अशा परीक्षा दिल्या. आता इयत्ता, दहावीला आलेली ही मंडळी सांगत होती, ‘आम्हाला बोर्डाच्या परीक्षेत छान मार्क मिळतील.’ अवांतर वाचनाची त्यांना गोडी लागली आहे. अभ्यास स्वत:च कसा करायचा असतो, तो कसा करायचा, हे समजल्याने त्यांचे पुढेही अडणार नाही.
त्यांचा आत्मविश्वास पाहून वाटत होतं, शाळेनं मनावर घेतलं, संस्थांना थोडं स्वातंत्र्य दिलं, सामाजिक संस्थांची मदत मिळाली तर अजूनही परिस्थिती सावरता येईल. मुलांना नाही तर पालकांना समजावून सांगण्याची, साम, दाम, दंड या अस्त्रांचा वापर करण्याची गरज आहे. सरकारने जाहीर केलेल्या ‘बेस टेस्ट’च्या निकालापेक्षाही वास्तव भयानक आहे. केवळ शाळा आणि शिक्षकांना दावणीला बांधून काही साध्य होणार नाही. रोगाचं मूळ कारण आहे घर आणि पालक.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा