मुलांनी आपली मते, मग ती अभ्यासाबाबत असो वा शिक्षकांबाबत, परीक्षांविषयी असो वा गणवेशासंबंधी मोकळेपणाने मांडावीत म्हणून ‘बालसभा’ सुरू झाली. ती मुलांना इतकी आवडली की आता दर महिना अखेरीस मुलं त्याची वाट पाहू लागली!
मुलांनी आपली मतं फक्त आपापसात मांडायची का? मुलांपेक्षा वेगळय़ा असणाऱ्या यंत्रणेपर्यंत ती कशी पोचणार? मुलांवर होणाऱ्या अंतर्बाह्य़ परिणामांना कसं मोजता येणार? मुलांना काय हवंय यापेक्षा मोठय़ांना काय हवंय याचाच विचार का होतो? मुलांना व्यासपीठ मिळतं ते फक्त स्पर्धापुरतं. म्हणजे वक्तृत्व, कथाकथन, प्रश्नमंजुषा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम अशा माध्यमांतून. पण त्याही पलीकडे मुलांना खूप बोलायचे असते, समजून घ्यायचे असते. खूप खूप छोटय़ा अपेक्षा असतात मुलांच्या. म्हणूनच मुलांना हवं असतं त्यांचं असं व्यासपीठ!
शाळेनं ठरवलं हे व्यासपीठ मिळणं हा मुलांचा हक्क आहे. मुलांना हक्काबरोबर जबाबदारी आणि कर्तव्यंही समजली पाहिजेत. व्यासपीठाचा कसा वापर करायचा याची तर जाणीव हवीच हवी. यातूनच शाळेच्या मनात एक वेगळीच कल्पना आली. कल्पना प्रत्यक्षात आकार घेऊ लागली. कल्पनेला आकार कसा मिळाला त्याचीच ही गोष्ट. कशी घेतली जाते ही बालसभा?
दिवस असतो महिनाअखेरीचा. महिनाअखेर म्हटलं की सामान्यत: शिक्षक हिशेब, कॅटलॉग, महिनाअखेरच्या बैठका यात दंग. मुलांना कुणी सांभाळायचं? त्यापेक्षा दोन-तीन तास होतात नि मुलांना घरी सोडलं जातं. म्हणूनच मुलांनी महिनाअखेर म्हणजे हक्काची सुट्टी असं गृहीत धरलेलं असतं.
पण आज शाळेत वेगळंच चित्र होतं. शिक्षक तिकडे त्यांचं त्यांचं काम करत होते. आणि सर्व शाळेची मुलं गटागटांत बसली होती. कुणीही मोठं माणूस तिथे नव्हतं. ‘‘शाळेकडून तुमच्या अपेक्षा, शाळेबद्दलची तुमचं मत, तुमचे विचार, शाळेकडून हव्या असणाऱ्या गरजा याबद्दल तुम्ही आपापसात बोलायचं. एकानं ते सगळं नोंदवून घ्यायचं. तुम्ही केलेल्या नोंदी आपण मुख्याध्यापकांकडे देऊ. चर्चा होईल’’ सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मुलं मोकळेपणानं आपापली मतं नोंदवत होती.
मुलांच्या वयाप्रमाणे मुलांच्या गरजा, अपेक्षा व्यक्त होऊ लागल्या. वर्गात पंखे हवे, टी.व्ही. हवा, प्रत्येक वर्गात संगणक हवा, खेळांचा तास खेळाचा व्हावा, खेळाच्या तासाला मैदानावर सोडावे, असे विचार गटांकडून आले. तसे ग्रंथालयात आम्हाला आमच्या आवडीची पुस्तकं मिळावी, पुस्तकं लगेच बदलून मिळावीत, वाचनाचा तास हवा अशीही मागणी आली. काही विषय समजत नाहीत, काही शिक्षकांनी शिकवलेलं समजत नाही, अभ्यासाचा कंटाळा येतो, अशीही खंत व्यक्त होत होती. शाळेतले आवडते उपक्रमही मुलांच्या मतातून व्यक्त होत होते. मुलांनी चांगल्या गोष्टींबद्दलची मतं व्यक्त केली होती. कुणा कुणा शिक्षकांच्या शिकवण्यातल्या आवडलेल्या घटकांचीही नोंद मुलांनी केली होती. तर शाळेतल्या घडामोडींत कोणता बदल करता येईल हेही मुलांनी सुचवले होते.
हे किती छान घडत होतं की शाळा खऱ्या अर्थाने ‘बालकेंद्री’ होत होती. बालसभेने शाळेला आनंदी केलं होतं. बालसभा खूप काही बोलत होती. यातून लक्षात येत होतं की शाळेबद्दल मुलं किती विचार करतात ते! मुलांना समजून घेण्यासाठी ही बालसभा होती. गावात ग्रामसभा तशी शाळेत बालसभा. प्रत्येकाला स्वतंत्र अधिकार. आपलं मत मोकळेपणाने मांडण्यासाठीचं हे व्यासपीठ. अशी बालसभा आता त्या शाळेत नियमित होते. म्हणजे मुलं वाट बघत असतात. शाळेच्या लक्षात आलं, मुलं किती वेगवेगळा विचार आपापल्या पद्धतीनं करत असतात. मुलांच्या गरजा केवळ वस्तुरूप नसतात तर भावनिकही असतात. मुलं आपल्या पद्धतीने गुणवत्तेचा विचार करतात. म्हणून एखाद्या विषयाची एखादी तासिका भावली नसल्याची नोंदही मुलं करत होती. तशी ‘विदाऊट युनिफॉर्म’च्या दिवशी कपडे कसे असावे हाही विचार मुलं करत होती. अगदी मुख्याध्यापकांपर्यंतची आपली मतं मुलं मांडत होती.
इथेच तोल सांभाळायची गरजही शाळेनं लक्षात आणून दिली. आचार-विचार-उच्चारस्वातंत्र्याचा स्वैराचार होता कामा नये, याची काळजीही शाळेनं घ्यायची ठरवलं. म्हणूनच कधी कधी आपली मतं नोंदवताना मुलांचा तोल जातोय हे लक्षात येताच मुलांना भानही दिलं. मुलांची विद्यार्थीसभा/ बालसभा कुणी मोठं नसताना होऊ लागली. सुरुवातीला थोडा गोंधळ झाला पण एकदा व्यवस्था लावून दिल्यावर अडचण आली नाही. सभा संपल्यावर आपल्या नोंदी घेऊन प्रतिनिधी
शाळाप्रमुखांची भेट घ्यायचे. शाळाप्रमुख नोंदी वाचून बालसभेचा समारोप करण्यासाठी कधी मुख्याध्यापक येऊ लागले कधी इतर शिक्षक. मुलांनी बालसभेत नोंदवलेल्या प्रत्येक मुद्दय़ाची दखल घेऊ लागले. त्यावर ते मुलांशी चर्चा करू लागले. त्याच सभेत शक्य आणि अशक्य अशा दोन्ही बाजूंनी विचार मांडू लागले. प्रत्येक मुद्दय़ावर चर्चा होत होती. मुख्य म्हणजे मुलांना त्यामुळे विश्वास वाटू लागला की बालसभा म्हणजे असाच चालणारा निर्जीव उपक्रम नाही. बोललं नि सोडून दिलं की असं घडत नाही तर प्रत्यक्षात कार्यवाही केली जातेय.
समजा, एखादी गोष्ट शाळेनं ठरवली नि ती घडली नाही तर त्याचेही समर्पक स्पष्टीकरण या बालसभेत दिलं जाऊ लागलं. या बालसभेतून शाळेच्या भल्याचाच विचार व्यक्त होऊ लागला. आता बालसभा सुरू असतानाच तिकडे शिक्षक कक्षात शिक्षकसभा सुरू असते. पूर्वी मुलं महिनाअखेरची सुट्टी हवी, अशी मागणी करत होती. आता बालसभेची मागणी करतात. मुलांच्या अपेक्षेतून शाळा आता बदलू लागली.
‘किती छान!’ शाळा म्हणाली, बरं झालं आता कागदाला नको इतकं महत्त्व दिलं जात नाही. किंबहुना मुलांसारखी जिवंत पुस्तकं जर इतरांनी वाचली, समजून घेतली तरच काही तरी घडेल. मुलांना आकलन किती झालं हे चाचपण्यासाठी उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरं मुलं सोडवतात. तसं मुलांच्या संदर्भातलं आकलन व्हावं म्हणून शाळेचा हा ‘बालसभा’ उपक्रम खूपच उपयोगी पडतो आहे.