आई-वडिलांना पोरके झालेले ज्ञानोबा, माधुकरी मागायला जात, त्या वेळी समाजातील दुष्ट माणसं त्यांना फार त्रास देत. त्यांची टवाळी करत, एक दिवस लहानगे ज्ञानोबा भिक्षा घेऊन येताना त्यांच्या झोळीत एका दुष्टाने घाण टाकली. ज्ञानोबा फार व्यथित झाले. हे जीवन त्यांना नकोसे झाले. त्यांनी प्रायोपवेशन करून प्राणत्याग करायचं ठरवलं. झोपडीचं दार घट्ट बंद केलं.
निवृत्ती, सोपान यांनी विनवणी करूनदेखील ज्ञानेश्वरांनी दार उघडलं नाही. अखेरीस मुक्तानं त्यांची विनवणी केली. त्यांची समजूत घातली. तेच ताटीचे अभंग. त्यात मुक्ता म्हणते, ‘‘अरे, दादा, हे सर्व जग आपलच स्वरूप आहे. अरे कोणी कोणावर रागवायचं?’’
योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा
विश्व रागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी
शब्द शस्त्र झाले क्लेश, संती मानावा उपदेश
विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा
जग संतापाच्या आगीनं पेटलं तर आपण शीतल पाणी व्हावं, आग विझवावी. शब्दांच्या शस्त्रांनी होणारे क्लेश आपण उपदेशाप्रमाणे मानावे, कारण हे जग म्हणजे ब्रह्माच्या सुतानं विणलेलं वस्त्र.. ते ब्रह्म आपलं रूप, मग कोणावर रागवायचं, सांग ना रे दादा..
अरे ज्ञान दादा, तुझी लडिवाळ मुक्ता हाक मारते आहे, तिला दार उघड ना,
तुम्ही तरून विश्व तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा.
ही विनवणी ऐकून ज्ञानेश्वर झोपडीच्या बाहेर आले. लाडक्या मुक्तेला त्यांनी पोटाशी धरलं. ज्ञान ईश्वरी ती ज्ञानेश्वरी, लिहून ज्ञानेश्वरांनी प्रापंचिक दु:खाने तापलेल्या मनावर, शीतल पाण्याचा वर्षांव केला. ज्ञानेश्वरांचं हे सांगणं प्रत्येकाने शिरोधार्ह मानायला हवं. तर चित्ती शांतता मिळेल, समाधान मिळेल.

माधवी कवीश्वर
  madhavi.kavishwar1@gmail.com