अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुष:।
– भगवद्गीता
भगवद्गीतेत अर्जुनाने भगवंताला विचारलं, ‘‘माणसाची इच्छा नसताना कोणाच्या प्रेरणेने तो पापकृत्य करतो?’’ यावर भगवान सांगतात, ‘‘माणसाच्या मनातील काम व क्रोध हे विकार, त्याला पापाचे आचरण करण्यास प्रवृत्त करतात. ’’ अध्यात्म रामायणात म्हटले आहे, ‘क्रोधात भवति सम्मोहा: सम्मोहात स्मृतिविभ्रम:।’ रागामुळे अविचार उत्पन्न होतो, त्यातूनच बुद्धीचा नाश होतो व माणूस रसातळाला जातो. क्रोधावर ताबा मिळविलाच पाहिजे. विश्वामित्र ऋषींनी कठोर तप केले, ब्रह्मर्षी पद मिळविले, परंतु वसिष्ठ ऋषी विश्वामित्रांना ब्रह्मर्षी म्हणत नव्हते, याचा विश्वामित्रांना फार राग आला. रागाच्या भरात त्यांनी वसिष्ठांची हत्या करण्याचे ठरविले. विश्वामित्र एक दिवस रात्री वशिष्ठ मुनीच्या आश्रमाजवळ लपून बसले. ऋषी बाहेर आले की त्यांच्या डोक्यात मोठा दगड घालून त्यांची हत्या करून पळून जायचे हे त्यांनी नक्की केले. पौर्णिमेची रात्र होती, वसिष्ठ ऋषी पत्नी अरुंधतीबरोबर आश्रमातील अंगणात बोलत होते. वसिष्ठ ऋषी म्हणाले, ‘‘चांदणं किती सुंदर पडलं आहे. अगदी विश्वामित्राच्या तपस्येसारखं.’’ अरुंधती म्हणाली, ‘‘आपणास हे मान्य आहे तर आपण त्यांना ब्रह्मर्षी का म्हणत नाही?’’ वसिष्ठ ऋषी म्हणाले, ‘‘त्यांचा अहंकार गेला तरच त्यांना ब्रह्मर्षी म्हणता येईल. एरवी त्यांच्यासारखी कठोर तपस्या कोणीही करू शकणार नाही.’’ हे ऐकून विश्वामित्रांनी हातातला दगड फेकून दिला. वसिष्ठांच्या पाया पडून ते म्हणाले, ‘‘क्षमा असावी ऋषिराज. आज माझ्या हातून क्रोधामुळे मोठेच पातक घडले असते. आपल्या वक्तव्याने आज माझी भ्रष्ट झालेली बुद्धी शुद्ध झाली आहे.’’ विश्वामित्रांना आलिंगन देऊन वसिष्ठ ऋषी म्हणाले, ‘‘ब्रह्मर्षी विश्वामित्र उठा. लोकांच्या कल्याणासाठी आपणास खूप कार्य करायचे आहे. आज तुम्ही खरे ब्रह्मर्षी झालात.’’
क्रोध हेच अनीष्टाचे कारण, हेच खरे.

– – माधवी कवीश्वर

Story img Loader