स्वामी स्वरूपानंदांनी अनेक अभंगातून, समाजाला मार्गदर्शन केले. एका अभंगात ते म्हणतात, स्वामी म्हणे व्हावा ईश्वरी विश्वास संतांचा सहवास सोडू नये. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी स्वामी स्वरूपानंदांनी म्हणजे पावसच्या रामचंद्र गोडबोले यांनी पारमार्थिक जीवनाच्या वाटेवर बाबामहाराज वैद्य यांच्या सोबतीने पहिले पाऊल टाकले आणि पाहता पाहता ते पूर्णत्वाला पोहोचले. एका अभंगात ते म्हणतात,

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हरी ध्यान, हरी ध्यान तेची माझे तत्त्वज्ञान.

मनाला दिव्यत्वाचा स्पर्श झाला की, सगळीकडे ईश्वराचा साक्षात्कार होतो, तसे त्यांचे झाले होते. असा दिव्यत्वाचा स्पर्श निसर्गातूनही होत असतो. निसर्गाचे विविध विभ्रम आपल्याला वेगळ्याच विश्वात नेतात.

मंगेश पाडगावकर एका काव्यात म्हणतात,

मोर केशराचे झुलती पहाटेस दारी,

झऱ्यातुनी दिडता दिडता वाजती सतारी

तसेच

शांत शांत उत्तर रात्री मंद मंद तारे,

तुझे प्रेम घेऊनी येती मंद मंद वारे

अथवा

एक एक नक्षत्रांचा दिवा लागताना

आणि फुले होण्यासाठी कळ्या जगताना

हे निसर्गाचे आविष्कार पाहताना सर्व जग त्यांना आनंदाने भरून गेल्यासारखे वाटते. कवी ग. ह. पाटील लहान मुलांना ईश्वराची ओळख करून देताना सांगतात,

देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो

सुंदर जगातला चंद्र, चांदण्या, फुलं यांचं वर्णन केल्यानंतर ते म्हणतात,

अरे देवा इतुके सुंदर जग तुझे जर …किती तू सुंदर असशील…

आणि हे सारं पुन्हा पुन्हा अनुभवायला मिळावं म्हणून पुन्हा मंगेश पाडगावकर आपल्याला सांगतात,

या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती,

अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी

इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे…

 

माधवी कवीश्वर

madhavi.kavishwar1!gmail.com

मराठीतील सर्व चित्ती असो द्यावे समाधान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Divinity touchdivinity touch