तिनका कब हू न निंदिये, जो पाव तले होय
कब हू उड आखो पडे, पीड घनेरी होय
– संत कबीर
कबीर सांगतात, पायाखालच्या धुळीलादेखील कमी समजू नका, कारण त्या धुळीचा एक कण जर डोळ्यात गेला तर प्रचंड वेदना होतात. याचाच अर्थ, कोणालाही कमी लेखू नका, कारण त्या व्यक्तीमधील सुप्त शक्तीचा आपल्याला कधीही अंदाज येत नाही.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं लहानपण अतिशय त्रासदायक होतं. अस्पृश्य कुटुंबात जन्म झालेल्या भीमाला प्रचंड बुद्धिमत्ता असून तथाकथित उच्चवर्णीय लोकांकडून फार अपमान सहन करावे लागले. शाळेत, सरकारी कचेरीत त्यांची जात आडवी येत असे. याही परिस्थितीत भीमाने अभ्यासापासून आपलं लक्ष विचलित होऊ दिलं नाही. इंग्रजीवर प्रचंड प्रभुत्व असलेल्या भीमानं बी.ए. परीक्षा प्रथम श्रेणीत पास केली. सयाजीराव गायकवाड यांनी हुशार भीमाला शिष्यवृत्ती दिली आणि भीमराव आंबेडकर पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. आता ते बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखले जाऊ लागले. अमेरिकेत अर्थशास्त्र, राजकारण, समाजकारण, नीतिशास्त्र, व्यापार यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. तिथे एम.ए., पीएच.डी. या पदव्या मिळवल्या. अमेरिकेत त्यांना कुठेही जातीयता आढळली नाही. भारतात आल्यानंतर त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध चळवळ चालू केली. त्यामुळे महाड येथे चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले झाले. नाशिकच्या काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळाला.
शिक्षणानेच समाजपरिवर्तन होईल म्हणून त्यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. मुंबईला सिद्धार्थ कॉलेज काढलं. त्यांचे पहिले गुरू बुद्ध, दुसरे गुरू कबीर, कारण कबीराला बुद्धाचे तत्त्वज्ञान समजलं, असं ते म्हणत.
‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’, हा त्यांचा संदेश होता. ‘भारतरत्न’ या किताबाने गौरवल्या गेलेल्या बाबासाहेबांची योग्यता त्यांच्या लहानपणी कोणालाही कळली नाही.
– माधवी कवीश्वर
madhavi.kavishwar1@gmail.com