संत तुकारामांचे चरित्र पाहिले तर त्यांचा जीवनाविषयीचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला चकित करतो. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली. दुष्काळ, प्रथम पत्नीचे, मुलाचे, आईचे निधन, लोकांनी केलेली फसवणूक, त्यात पत्नी जिजाईचा राग राग. याबद्दल ते लिहितात, ‘पोर मेले बरे झाले, देवा माये विरहित केले, स्त्री द्यावी गुणवंती, तरी तीते गुंते आशा म्हणून कर्कशा पाठी लावी, माता मेली मज देखता, तुका म्हणे हरली चिंता, विठो तुझे माझे राज्य, नाही दुसऱ्याचे काज.’
खरं म्हणजे, तुकारामांची पत्नी जिजाई, अत्यंत कष्टाळू, प्रेमळ, गुणी स्त्री होती. हे फक्त पांडुरंगाला ठाऊक होतं. प्रपंचात नवऱ्याचं लक्ष नाही, घरी मुलांना जेवायला घालायला धान्य नाही अशा परिस्थितीत तिचा क्षोभ झाला तर नवल
नाही. जिजाईच्या स्वभावाचं वर्णन करणारी सुंदर कविता बा. भ. बोरकरांनी लिहिली. कवितेचं नाव आहे, ‘वीट’.
तुक्याच्या पायीची व्हाया जिने वीट,
केली पायपीट चौऱ्याशीची
तयाचा संसार करावया गोड,
हाता पाया फोड येऊ दिले
पोचवाया त्याच्या भुकेला भाकर,
काटय़ांचे डोंगर पालाणिले
न चुकावी त्याची पंढरीची वारी,
म्हणून वोसरी नोलांडिली
आपटली पोरे, आदळीला माथा,
परी त्याचा गाथा सांभाळीला
सार्थक होऊन, तुक्याच्या जन्माचे,
विमान देवाचे आले दारी
असून गर्भार पाचा महिन्यांची,
गाभण म्हशीची आई व्हाया
आलीये मुक्तिला लाविले माघारी,
तुक्याहून थोरवी जिजाईची
डोळ्यापुढे आहे ताजा तो प्रसंग,
रडे पांडुरंग ढसाढसा
गर्भार म्हशीची काळजी घेण्यासाठी, तिनं वैकुंठाचं सुखही नाकारलं हे पाहून पांडुरंगालाही अश्रू आवरले नाहीत. कविता वाचताना आपणही भावुक होतो. नाही का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा