दासबोधात गृहस्थाश्रमाचे, महत्त्व समर्थ रामदासांनी सांगितले आहे, विवाह झाल्यानंतर गृहस्थाश्रमाला सुरुवात होते, या आश्रमात गृहिणीला महत्त्व आहे, गृहिणी कशी असावी या बद्दल कालिदास म्हणतो, गृहिणी ही पतीची सचिव, तसेच त्याची सखीदेखील असली पाहिजे. ती पतीच्या ध्येयाशी एकरूप झाली पाहिजे. अलीकडच्या काळात, यासाठी साधना आमटे आपल्या डोळ्यांसमोर येतात, एक उच्चशिक्षित, सधन घरातील तरुणी, गळ्यात फक्त काळ्या मण्याची पोत घालून, सुती साडी नेसून, मुरलीधर आमटे या युवकाशी विवाह करते. त्यांच्या कार्यात समरस होताना, चुलीवर २५, ३० माणसांचा स्वयंपाक करते, विंचू-साप-इंगळ्यांना घाबरत नाही, केवळ पाच महारोगी आणि एक गाय घेऊन आनंदवनात राहते, हे सारेच विलक्षण.
गृहस्थाश्रमाचा हा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून,
डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदा आमटे, हेमलकसा येथे आले, जिथे घनदाट जंगल आहे, उन्हाची तिरीपदेखील नाही, या वस्तीत सधन घरातील मंदा, आपल्या पतीच्या कार्यात समरस झाली, आदिवासी स्त्रियांची बाळंतपणे करू लागली, पतीबरोबर आदिवासी वस्तीत जाऊ लागली, घरात नळ नाही, झोपायला धड जागा नाही, जेवणाचा पत्ता नाही, असे असूनदेखील अनाथ प्राण्यांनाही मायेची सावली द्यायची, हे नक्कीच सोप्पं नाही.
या दोन्ही स्त्रियांनी, गृहस्थाश्रम, हा कर्मयोग समजून त्याचा उपयोग समाजसेवेसाठी केला, आपल्यासमोर गृहस्थाश्रमाचा आदर्श उभा केला, बाबांना आणि डॉ. प्रकाश यांना मॅगसेसे पुरस्कार मिळाला, त्यात या गृहिणींचा ८० टक्के वाटा आहे, कालिदासाला अभिप्रेत असलेली गृहिणी ती हीच.