पसायदानात, ज्ञानेश्वर माऊलींनी माणसाची दुष्ट बुद्धी नाहीशी होवो आणि आपापसांतील प्रेम वाढो अशी प्रार्थना केली आहे, अगदी नेमकी हीच शिकवण एका हिंदी गीतात अप्रतिम वर्णन केली आहे,
‘ज्योत से ज्योत जगाते चलो,
प्रेम की गंगा, बहाते चलो,
राह में आये जो दीन दुखी,
सब को गले से लगाते चलो’
गीताचे शब्द वाचताना, डोळ्यासमोर हरिद्वारचा गंगेचा घाट उभा राहतो, संध्याकाळी, गंगेच्या आरतीसाठी, घाटावर खूप गर्दी असते, गंगेच्या प्रवाहात प्रत्येकाला दीपदान करायचं असतं, एका द्रोणात फूल आणि त्यात तुपाची वात ठेवलेली असते. आरतीच्या वेळी गरीब श्रीमंत, स्त्री-पुरुष, कसलाही भेदभाव दिसत नाही. एकाने ज्योत लावली की दुसरा त्याच ज्योतीवर आपली तुपाची वात लावून घेतो. दीप प्रज्वलित करतो. या वेळी माणसं एकमेकांना मदत करताना दिसतात. कुठेच संघर्ष दिसत नाही. पांढरा शुभ्र गंगेचा प्रवाह पुढे वाहत असतो. त्यात कुठे गाळ दिसत नाही, त्या वेळी मनात येतं, आपल्या मनातील षड्रिपुंचा गाळ गेल्यानंतरच मनात प्रेमाच्या गंगेचा उगम होत असेल का? एकदा प्रेमाची गंगा मनात वाहू लागली की गीतात म्हटल्याप्रमाणे दिव्यशक्तीचा अनुभव घेता येईल.
सारे जग के कण कण में है,
दिव्य अमर एक आत्मा
एक ब्रह्म है, एक सत्य है,
एक ही है परमात्मा
प्राणो से प्राण मिलाते चलो,
प्रेम की गंगा बहाते चलो..

 

Story img Loader