संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे,
काय म्या पामरे जाणावे हे
– संत तुकाराम
लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य गं्रथ लिहिला, त्या वेळी त्या ग्रंथाचे श्रेय त्यांनी आपल्याकडे न घेता, इतर ग्रंथकर्त्यांना दिले, गीतारहस्याच्या सुरुवातीलाच त्यांनी तुकारामांचे वरील वचन लिहिले. मंडालेसारख्या तुरुंगात, गीतेसारख्या ग्रंथावर टीका लिहिणे किती कठीण असेल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्यांना देण्यात आलेल्या पुस्तकाच्या पानाची नोंद ठेवली जाई. ग्रंथलेखनाचे कागद बांधलेले, तेही मोजलेले असत. लिहिण्याकरिता शाई न देता, शिसपेन्सिल देत, त्या पेन्सिलीला अधिकारी टोक करून देत अशा विचित्र आणि बंदिस्त जागेत टिळकांची प्रतिभा जागृत झाली. इंग्रजांवर तुटून पडणारी त्यांची लेखणी आत्मसुखात मग्न झाली, त्यातून या कर्मयोगी महात्म्याने राष्ट्राला कर्तव्याची जाणीव करून दिली. हा तुरुंग म्हणजे अरुंद अंधारी लाकडाची खोली होती. उन्हाळ्यात ही खोली खूप तापत असे. हिवाळ्यात प्रचंड थंडी, पावसाळ्यात खोलीत डबके साचत असे.
मंडालेच्या तुरुंगात टिळकांजवळ सातारा जिल्ह्य़ातील कढेलोन गावचे वासुदेव कुलकर्णी हे कैदी स्वयंपाकी म्हणून होते. त्यांनी लिहून ठेवले आहे की कारागृहातील टिळक एखाद्या संत पुरुषामागे भासत. पहाटे ते संस्कृत श्लोक म्हणत. मग तास-दीड तास ध्यानधारणा करीत. मुखमार्जन झाल्यावर लिहिण्यास बसत, खाण्यापिण्याच्या कसल्याही आवडी निवडी नसत, एकच ईश्वरी तत्त्व सर्वत्र भरून राहिले आहे. हा बोध त्यांच्या एकूण वर्तनातून जाणवत असे.
त्यांच्यातील शुद्ध चैतन्याची जाणीव आजूबाजूच्या चिमण्यांनाही झाली असावी. टिळक महाराज जेवायला बसले की त्या चिमण्या त्यांच्या ताटाभोवती जमत. त्यांच्या खांद्यावरही बसत, धूळ, अस्वच्छता, खराब पाणी यामुळे त्यांची प्रकृती फार बिघडत असे, त्यातच त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याची तार त्यांच्या हातात पडली, तार वाचून टिळक नुसते स्तब्ध बसले होते. त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल. याची आपण कल्पना करू शकत नाही. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी, प्रापंचिक दु:ख सोसणारे टिळक, संतांच्याच योग्यतेचे होते.
– माधवी कवीश्वर