जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले
तो ची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा
– संत तुकाराम

साधू म्हणजे ज्याने आपल्या सहा शत्रूंचा (काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर) नाश केला आहे, असा माणूस तो ज्या वेळी दुसऱ्याचे दु:ख जाणून त्याला मदत करतो, त्या वेळी तेथे, ईश्वराचा वास आहे, असे समजावे. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई अतिशय सात्विक स्वभावाच्या. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या होत्या. त्या आणि बाबासाहेब मुंबईत राहात असताना एकदा बाबासाहेबांना काही विशेष कामासाठी परदेशात जावे लागले. त्या वेळी, त्यांनी रमाबाईंना धारवाडला आपले स्नेही वराळे यांचे कुटुंबात राहावे असे सुचविले. रमाबाई धारवाडला आल्यानंतर त्यांना वराळे लहान मुलांचे वसतिगृह चालवतात असे समजले. त्यांनी पहिल्या दिवशी मुले पटांगणात खेळताना पाहिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलं दिसली नाहीत. तिसऱ्या दिवशीदेखील मुले दिसली नाहीत म्हणून रमाबाईंनी वराळे यांच्याकडे मुलांची चौकशी केली त्या वेळी वसतिगृहात नियमित येणारे धान्य न आल्यामुळे मुले आदल्या दिवसापासून उपाशी आहेत असे त्यांना समजले. त्यांनी वसतिगृहात फेरफटका मारला त्या वेळी भुकेने मलूल झालेली मुले त्यांना पाहवेनात. आपल्या हातातील सोन्याच्या बांगडय़ा रमाबाईंनी वराळे यांना दिल्या व त्या विकून त्यातून येणाऱ्या पैशातून लौकरात लौकर धान्य आणण्यास सांगितले. वराळे यांनी संध्याकाळपर्यंत सोय नक्की होते असे सांगूनही त्यांनी मुलांना ताबडतोब जेवायला कसे घालता येईल ते पाहा असे प्रेमाने सांगितले. सर्व मुलांच्या त्या क्षणाला त्या आई झाल्या. त्या वेळेपासून रमाबाईंना सर्व रमाई म्हणू लागले.
असाच प्रसंग माघ या संस्कृत कवीच्या पत्नीच्या बाबतीत घडला. मुलीच्या लग्नासाठी एक गरीब ब्राह्मण माघ कवीकडे मदत मागायला आला. त्या वेळी घरात त्या ब्राह्मणाला देता येईल, इतके पैसे नव्हते. माघ कवीच्या पत्नीने आपल्या हातातील सुवर्णकंकण ताबडतोब काढून दिले व मुलीचे लग्न लावा, असे सांगितले. वेळप्रसंगी स्त्रिया ज्या वेळी आईच्या भूमिकेत जातात त्या वेळी तिथे ईश्वराचा वास असतो, नाही का?

माधवी कवीश्वर
madhavi.kavishwar1@gmail.com

Story img Loader