बहिणाबाईंच्या ओव्या संतांसारख्या जीवनाचं समग्र स्वरूप दाखविणाऱ्या. मनाबद्दल त्या म्हणतात, मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा, जशा वाऱ्याने चालल्या, पान्यावरल्या रे लाटा.. चंचल, अस्थिर मनाचं वर्णन अनेक संतांच्या अभंगात व ग्रंथात सापडते, स्वामी विवेकानंद म्हणतात, माईंड इज लाइक अ लेक अ‍ॅण्ड एव्हरी थॉट इज लाइक अ व्हेव, अपॉन द लेक. जस्ट अ‍ॅज इन लेक, व्हेव्हज् अराईजेज अ‍ॅण्ड डिसअ‍ॅपिअर, दीज थॉटस् व्हेव्हज् आर कन्टीन्युअसली राईिझग अ‍ॅण्ड डिसअ‍ॅपिअिरग. तलावात जसे पाण्याचे तरंग दिसतात व पुन्हा नाहीसे होतात तसे मनातील विचारांच्या तरंगाचे स्वरूप आहे. या विचारांच्या तरंगाबद्दल प्रसिद्ध इंग्रजी लेखकाने, मार्क ट्वेनने एक अनुभव त्याच्या डायरीत लिहून ठेवला. मार्क ट्वेन एका चर्चमध्ये प्रवचन ऐकायला गेला होता. त्याला ते प्रवचन फारच आवडले. त्याने प्रवचन संपल्यानंतर आपण निदान दहा डॉलर देणगी द्यावी हा विचार केला. देणगी स्वीकारणारा माणूस मार्क ट्वेनजवळ येईपर्यंत निदान पंधरा मिनिटे लागतील असे दिसत होते. त्या अवधीत पाच मिनिटांनी त्याला वाटले, दहा डॉलर जरा जास्तच होतात पाच डॉलरच द्यावेत, असे तर खूप प्रवचनकार असतात. या विचारांनी मार्कचे प्रवचनात लक्ष लागेना. आणखी पाच मिनिटांनी देणगीचे तबक खूप डॉलरनी भरलेले त्याने दूरवरून पहिले, त्या वेळी त्याला वाटले यांना भरपूर डॉलर मिळाले आहेत, आपण देणगी देण्याची काही गरज नाही. देणगी गोळा करणारा माणूस मार्क ट्वेनजवळ आला त्या वेळी नोटांनी भरलेले ते तबक पाहून यातले काही डॉलर आपणच कोणाचं लक्ष नाही हे पाहून खिशात टाकावे हा विचार त्याच्या मनात आला. आपल्या मनाकडे वेगळेपणाने पाहणाऱ्या मार्क ट्वेनला अगदी थोडय़ा वेळात मनाची झालेली ही स्थित्यंतरे पाहून फार आश्चर्य वाटले. आपल्या डायरीत त्याने हा प्रसंग लिहिला व पुढे लिहिले आपल्या मनात चांगली कृती करावी हा विचार आला तर ती कृती अगदी ताबडतोब करावी. विलंब करू नये. कारण चांगल्या विचारांचे तरंग पाहता पाहता नाहीसे होतात. क्षणाक्षणाला बदलणारे हे मन कसे आहे हे कोणालाही समजलेलं नाही. कधी ना कधी मार्क ट्वेनसारखा अनुभव आपणही घेतलेला असतो. नाही का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा