पावसचे संत स्वरूपानंद स्वामी यांनी त्यांच्या ‘संजीवन गाथा’ या ग्रंथात ईश्वराच्या शरणागतीची सुंदर पदे लिहिली आहेत. त्यातील एक पद म्हणजे ‘मागणे हे एक देई भक्ती प्रेम देवा तुझे नाम गाईन मी’. त्यात ते शेवटी म्हणतात, ‘स्वामी म्हणे पायी ठेवीन मी माथा तेणे माझ्या चित्ता समाधान..’ नयनरम्य कोकण परिसरात पावस येथे स्वामी स्वरूपानंदांची समाधी आहे. नाम जप साधना आणि ज्ञानेश्वरीपठण यामुळे तो सर्वच परिसर सकारात्मक स्पंदनांनी भारलेला आहे. स्वामी देहात असताना १९७० मध्ये पेंग्विन आणि लोंगमन ग्रीन या प्रकाशन संस्थांचे प्रमुख सर रॉबर्ट अॅलन पत्नीसह पावसला आले होते. स्वामींचे एक भक्त त्यांना कोकणचा निसर्ग दाखवायला घेऊन आला होता. हा भक्त या परदेशी पाहुण्यांना घेऊन स्वामींच्या दर्शनाला गेला. स्वामींना पाहताच या परदेशी पाहुण्यांच्या डोळ्यांतून प्रेमाश्रू वाहू लागले. या पाहुण्यांशी स्वामी इंग्रजीत बोलत होते. त्यांना जीवनाचे स्वरूप सांगताना ते म्हणाले, ‘सुवर्ण आणि अलंकार नांदती साचार सुवर्णची. म्हणजे अलंकार वेगळे असले तरी त्यातील सोने एकच. त्याप्रमाणे माणसे वेगळी असली तरी त्यातला परमात्मा एकच.’ या भेटीत सर रॉबर्ट यांना स्वामींनी भगवान रमण महर्षी ‘ हू एम आय?’ ही पुस्तिका भेट म्हणून दिली. त्यातील संस्कृत शब्दांचे इंग्रजी भाषांतर करून दिले. स्वामींच्या भेटीनंतर सर रॉबर्ट यांनी लिहून दिले, ‘या सत्पुरुषाच्या डोळ्यांत मला येशू ख्रिस्ताच्या डोळ्यांतील करुणा दिसली. जगाचा उद्धार करण्याचे सामथ्र्य त्यांच्या हातात आहे.’ स्वामींनी संपादित केलेली ‘अभंग ज्ञानेश्वरी’ अनेकांना मार्गदर्शन करीत आहे. स्वामींचे चरित्र लिहिणारे परांजपे म्हणतात, ‘पवित्र गंगेपेक्षाही संत चरित्र अधिक पवित्र आहे. त्रिविध ताप घालवणारे ते एक महान तीर्थ आहे. निवांत बसून संतांची नुसती आठवण केली तर मन शांत होते, हा आपलाही अनुभव आहे नाही का?’
माधवी कवीश्वर
madhavi.kavishwar1@gmail.com