मूकं करोति वाचालं, पङ्गुम लंघयते गिfर,
यत्कृपा तमहं वंदे परमानन्द माधवम्
श्रीकृष्णाची कृपा झाल्यावर काय शक्य होणार नाही? मुका बोलेल, पांगळा चालेल. एक दिवस राधेनं मुरलीला विचारलं, ‘तू अशी काय किमया केलीस की कृष्ण, तुला अगदी आपल्या ओठाशी धरतो? मला तुझ्यासारखंच त्याच्या अगदी निकट जावंस वाटतं.’ त्यावर मुरली म्हणाली, ‘कृष्ण बोलल्याशिवाय मी बोलत नाही, मी आतून पोकळ आहे. माझ्या मनात कोणतेच विचार नाहीत. अग्नीने पोळून माझे षड्रिपू बाहेर काढले आहेत. हे षड्रिपू म्हणजे मुरलीवरील सहा छिद्रे, सातवे छिद्र ब्रह्म रंध्र आहे. यातून श्रीकृष्णाने फुंकर घातली की सहा छिद्रातील षड्रिपू जातात आणि सुंदर सूर निघतात. मी कृष्णाच्या भक्तीत मुरले म्हणून मी मुरली. तू देखील माझ्यासारखी हो.’
गुजरातचे आद्य कवी कृष्णभक्त संत नरसी मेहता यांनी अनेक काव्यात राधा कृष्णाचं प्रेम व्यक्त केलं आहे ते म्हणतात,
नागर नन्द्जींनो लाल,
रास रमन्ता, मारी नथणि खोवायी,
नथणि आपोणे प्यारा नंदना कुमार,
नरसईयाना स्वामी उपर बलिहार,
हा एक सुंदर गरबा आहे. यात गूढ अर्थ भरलेला आहे. नथ नाकात असते, ध्यान धारणेच्या वेळी योगी अर्धे डोळे बंद करून नाकाकडे दृष्टी ठेवतात. नरसी म्हणतात, हे कृष्णा तू माझ्यावर कृपा कर. योग्यासारखं माझं ध्यान लागू दे. नरसी मेहतांचं मधुबनदेखील गूढ आहे. ते म्हणतात, कृष्ण जिथे राधेला भेटत असे त्या मधुबनाप्रमाणे आपलं मन हे मधुबन आहे. याचे तीन भाग, बा मन अथवा जागृत मन, इथे सर्वाना प्रवेश आहे हे आहे कुंज. त्यानंतर अंतर्मन, इथे आठ गोपींना प्रवेश आहे. या आठ गोपी म्हणजे सत्त्व, रज, तम हे तीन गुण आणि आकाश, वायु, अग्नि, पृथ्वी, तेज ही पाच महाभूतं हे आहे निकुंज. याच्या पलीकडे योग्यांचा जो आनंद कोश ते निभृत निकुंज, इथे फक्त राधेला प्रवेश आहे. जिथे राधा आणि कृष्ण एकरूप होतात. थोडक्यात जीव आणि शिवाची एकरूपता. आत्म्याचं परमात्म्याशी मीलन होय. ईश्वराची भेट मनातच होते हे त्यांना सांगायचं आहे.
माधवी कवीश्वर
madhavi.kavishwari@gmail.com