पंढरपूरला, चंद्रभागेच्या तीरावर भाविकांनी केलेली घाण काढता काढता, मेलेली गुरंढोरं वाहून नेताना, लोकांनी केलेले अपमान सहन करीत करीत, विठोबाची अनन्यसाधारण भक्ती करणारे संत चोखामेळा यांचं चरित्र मन हेलावून टाकतं.
अबीर गुलाल उधळीत रंग,
नाथा घरी नाचे माझा, सखा पांडुरंग,
अबीर याचा अर्थ सुगंध, आनंदाच्या प्रसंगी गुलाल उधळला जातो. विठोबाला नामदेवाच्या घरी फार आनंद होतो. या अभंगातील नाथ म्हणजे नामदेव. या अभंगात आपली व्यथा ते विठोबाला सांगतात,
उंबरठय़ासी कैसे शिवू, आम्ही जाती हीन,
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन,
पायरीसी होऊ दंग गावुनी अभंग.
हा अभंग आपल्या मनाला स्पर्शून जातो, केवळ उच्च जात नाही म्हणून ईश्वराचे दर्शनही घेता येऊ नये, त्यासाठी देखील बडव्यांचा मार खावा लागावा, भुकेला अन्न नाही, अंगावर धड कपडे नाहीत, राहायला घर नाही, या अवस्थेतही, त्यांच्या मनाचं समाधान टिकून होतं. नामदेवाचं कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटात रोज ऐकणं, हा त्यांचा परमानंद होता. नामदेवाघरचं उष्टं अन्न हा त्यांना प्रसाद वाटत होता. रोज रात्री त्यांच्या घरचं उष्टं अन्न ते आपल्या टोपलीत भरून घरी नेत. त्यांचा अभंग आहे,
जोहार, मायबाप जोहार, तुमच्या, महाराचा मी महार, चोखा म्हणे पाटी आणली, तुमच्या उष्टय़ासाठी आणली. पूर्णत्वाला पोचलेले हे संत चोखोबा.
कबीर एका दोहय़ात सांगतात, ‘जाती न पुछो साधू की, पुछ लिजिये ज्ञान. मोल करो तलवार का, पडा रहन दो म्यान.. साधूची जात पाहू नका, त्याचं ज्ञान पाहा. अरे तलवारीला किंमत आहे, तिच्या म्यानाला नाही.
madhavi.kavishwar1@gmail.com