संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुखी संसाराची वाट दाखवली. त्यातून तिन्ही लोक आनंदाने भरून जातील हा विश्वास दिला. त्यासाठी ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात त्यांनी मनाचे महत्त्व सांगितले. ४१२ ते ४१७ या ओव्या चंचल मनाबद्दल आहेत. अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो आहे, सुखी जीवनासाठी मनाचे महत्त्व आहे, तर हे देवा, ‘हे मन कैसे केवढे ऐसे पाहो तरी न सापडे.. हे मन कसे आहे, केवढे आहे, पाहू म्हटले तर हाती सापडत नाही. पण त्याच्या भटकण्याला त्रलोक्यही कमी पडते, ते बुद्धीला छळते, कोणताही निश्चय करू देत नाही.
अगदी असाच प्रश्न बहिणाबाईंना पडला होता. खान्देशातील एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या बहिणाबाई जीवनाबद्दल खूप विचार करीत. त्यांनीदेखील देवाला मनाबद्दल प्रश्न विचारला आहे, मनाबद्दल त्या म्हणतात..
मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात,
आत्ता व्हत भुईवर, गेल गेल आभायात..
मन पाखरासारखं आहे. क्षणात जमिनीवर, तर क्षणात आभाळात..मन एवढं एवढं, जसा खाकसाचा दाना.. मन केवढं केवढं आभायात बी मावना.. खाकस म्हणजे खसखशीचा दाणा. हा दाणा अगदी लहान असतो, तसं मन कधी अगदी लहान (क्षुद्र) तर कधी आभाळापेक्षाही विशाल होतं. पुढे त्या देवाला विचारतात,
देवा, आस कसं मन? आसं कसं रे घडलं..
कुठे जागेपनी तुले, आस सपान पडलं..
या सर्व प्रश्नांची उत्तरं आधीच भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिली आहेत, ‘अर्जुना, तू मन हे मीची करी, माझिया भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी, मज एकाते.. ईश्वराच्या मनाशी एकरूप होणं, सतत त्याची आठवण ठेवणं, हे किती कठीण आहे, पण त्यासाठीदेखील हरिपाठात ज्ञानोबा सांगतात, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपति येणे पंथे. संतांच्या संगतीत, ज्या वेळी मन बदलेल त्या वेळी श्रीपती, म्हणजे अखंड आनंद मिळेल. ईश्वर दर्शन म्हणजेच अखंड आनंद, जो आनंद बा गोष्टींमुळे खंडित होत नाही, तो आनंद ज्ञानेश्वर माऊली साऱ्या जगाला देते आहे.
– माधवी कवीश्वर