आयुष्यातला नातेसंबंधांचा गुंता सोडवणे महाकठीण. संतांनी यावर फार चांगले मार्गदर्शन केले आहे. सामान्य माणूस आपली मुले, जवळचे आप्तेष्ट, बहीण-भाऊ  यात फार गुंतलेला असतो. अपेक्षेप्रमाणे या नात्याला प्रतिसाद मिळाला नाही तर तो दु:खी होतो. यासाठी जीवन समजून घ्या, असं संत सांगतात.

आपल्या मुला-बाळांविषयी संत एकनाथ सांगतात, आपली मुलं कशी तर ‘पक्षी अंगणात आले, आपला चारा चरून गेले.’ पक्ष्यांचं काम झालं की ते उडून जातात, तसं आपली मुलंसुद्धा स्वावलंबी झाली की, आपल्यापासून दूर जाणार. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मुलं कशी असतात, तर  ‘गोरूवे बैसली रुखा तळी’ म्हणजे उन्हापासून रक्षण करण्यासाठी जशी गुरं झाडाच्या सावलीत बसतात, ऊन गेले की निघून जातात, तशी तुमची मुलं गरज असेल त्यावेळीच तुमच्याकडे येतील. असे जर आहे तर मुलं वाढवण्याचा आनंद घ्यावा. आपली मुलं स्वावलंबी झाली की आपल्यापासून दूर जाणार हे ध्यानात घ्यावे. आपल्याजवळच्या नातेवाईकांसाठी समर्थ रामदास स्वामी दासबोधात सांगतात,

‘कर्म योगे सकळ मिळाली,

येके स्थळी जन्मा आली,

ते तुवा आपुली मानली, कैसी रे पढतमूर्खा’

पूर्व जन्माच्या कर्मबंधनाने एका ठिकाणी जन्माला आलेल्या व्यक्तींना तू ममत्वाने आपली माणसे मानतोस. तू किती मूर्ख आहेस. आपण समाजात पाहतो अगदी जवळच्या नात्यातदेखील किती भांडणे होतात त्यावेळी हे वचन सार्थ आहे असे वाटते. स्वार्थी नातेसंबंधांबाबत तुकाराम महाराज म्हणतात, ‘जन हे सारे दिल्या घेतल्याचे, अंतकाळचे कोणी नाही’ असं जर आहे, तर नात्याबाबत काय भूमिका घ्यावी हा सामान्य माणसाला प्रश्न पडतो.

त्यावर पुन्हा रामदास स्वामी सांगतात, ‘जयासी वाटे सुखची असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकाळ त्यागावे, दु:ख मूळ जे’ हेच तर कृष्णाने भगवद्गीतेत अर्जुनाला संगितले, ‘ अर्जुना, तू नात्याचा मोह सोड, अरे, तुला कौरव तुझे भाऊ  वाटतात, पण कौरवांना तुम्ही पांडव भाऊ  आहात असे वाटत नाही. तू फक्त तुझे कर्तव्य कर..’

 

– माधवी कवीश्वर

madhavi.kavishwar1@gmail.com