तुकाराम महाराजांचा हा प्रसिद्ध अभंग, त्यात ते म्हणतात, मुंगी लहान असते, पण तिला साखरेचा कण खायला मिळतो, बलाढय़ हत्तीला मात्र, माहुताच्या अंकुशाचा मार खावा लागतो. पुढे ते म्हणतात, ‘जया अंगी मोठेपण तया यातना कठीण’, व्यवहारातदेखील आपण पाहतो, खूप श्रीमंत लोकांना, त्यांच्या जवळ असलेल्या संपत्तीचाच जास्त त्रास होतो, कधी पैशावरून कुटुंबात कलह होतात, कधी चोर येऊन संपत्ती लुटून जातात, ज्याच्या हातात सत्ता असते, त्याचा त्रास आणखी वेगळा, माणूस लौकिकाने जेवढा मोठा तेवढा त्याला गर्व असतो. ते म्हणतात, वृक्ष ताठ उभा असतो, म्हणून तो महापुरात वाहून जातो, महापुरात लव्हाळे मात्र वाचतात. माणूस जेवढा मोठा तेवढय़ा त्याच्या संवेदना बोथट होतात, आपले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या एका कवितेत देवाजवळ, मला मोठेपणा नको अशी विनवणी केली आहे.
मेरे प्रभू मुझे इतनी ऊंचाई कभी मत देना
गैरोको गले न लगा सकू,
इतनी रुखाई कभी मत देना
मला इतकं उंचावर नेऊ नको, जिथे मला खाली वाकून, माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना मी आलिंगन देऊ शकणार नाही, माझं मन संवेदनाशून्य होऊ देऊ नकोस. त्याचं कारण देताना ते म्हणतात,
ऊंचे पहाडपर पेड नाही लगते,
पौधे नाही उगते, न घास ही जमती है
जमती है सिर्फ बर्फ, जो कफन की तरह सफेद और मौत की तरह थंडी होती है
जो इतना ऊंचा, उतना एकाकी होता है
चेहेरेपर मुस्काने चिपका, मन ही मन रोता है, मेरे प्रभू, मुझे इतनी ऊंचाई कभी मत देना
हिमालयासारख्या उंच पहाडावर झाडं उगवत नाहीत, तिथे हिरवळ नाही, फक्त बर्फ जमा होते,
बर्फाला त्यांनी कफन म्हणजे मृतदेहावर घालण्याच्या वस्त्राची उपमा दिली आहे. असा उंच पहाड त्यांना मृतवत वाटतो, त्यात काहीही चैतन्य नाही, म्हणजे संवेदना नाहीत, अटलजींना संवेदनाशून्य मन नको आहे, म्हणून ते म्हणतात,
प्रभू मुझे इतनी ऊंचाई कभी मत देना
तुकारामांना तेच म्हणायचं आहे, लहानपण देगा देवा..
माधवी कवीश्वर
madhavi.kavishwar1@gmail.com