तुकाराम महाराजांचा अतिशय लोकप्रिय अभंग
‘खेळ मांडीयेला वाळवंटी घाई,
नाचती वैष्णव भाई रे’
आषाढ महिन्याची चाहूल लागली की, चंद्रभागेच्या वाळवंटात वारकरी जमू लागतात. खूप आनंदात असतात ते, कसे दिसतात.. गोपीचंदन उटी, तुळशीच्या माळा हार मिरविती गळा, टाळ मृदंग घाई पुष्पवर्षांव, अनुपम्य सुख सोहळा रे.. सर्व जातिभेद विसरून क्रोध, अभिमान टाकून अत्यंत निर्मळ मनाने एकमेकांच्या पाया पडतात. टाळ-मृंदगाच्या भजनात सर्व वारकरी विठोबामय होतात. या टाळ-मृदंगाच्या नादात विलक्षण जादू आहे, असे सोपानदेव चौधरी यांनी आपल्या काव्यात फार सुंदर लिहून ठेवलं आहे. कुठून तरी त्यांना टाळ-मृदंगाची धून ऐकू येते. याबद्दल ते लिहितात, ‘नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोम रोमातून, टाळ मृदंग ऐकल्यावर.’ माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी विठ्ठल विठ्ठल म्हणू लागली. सोपानदेव देहूला गेले त्या वेळी तुकाराम आणि विठोबा यांचं अद्वैत कसं असेल याची त्यांनी कल्पना केली. ते स्नानासाठी इंद्रायणी नदीत उतरले. त्याबद्दल ते लिहितात, ‘इंद्रायणीच्या पाण्यात शहारले अंग अंग, मन झाले ओले चिंब, जैसे भिजले अभंग, याच इंद्रायणीत’
तुकोबांचे अभंग पाण्यात टाकण्यात आले होते, ते सुरक्षित राहिले. हा भक्तीचा चमत्कार पाहून सोपनदेवांचे मनही भक्तिरसाने ओलचिंब झाले. त्यांनाही सगळीकडे विठोबा आहे असा भास झाला. त्याबद्दल ते लिहितात.. ‘वृक्ष दिसला सामोरी, काय सांगू त्याची शोभा, जसे कटीवरी हात, युगे अठ्ठावीस उभा’. वृक्षाच्या फांद्यात त्यांना विठोबाची मूर्ती दिसली. पुढे ते म्हणतात, ‘माझा देह झाला देहू’. देहू गावात तुकाराम होते, म्हणजे जणू मी व तुकाराम एकच आहोत ही अनुभूती. चंद्रभागेच्या वाळवंटात या वारकऱ्यांना सुखाच्या सोहळ्याचा अनुभव येतो. त्यांना ठाऊक असते आवडीने भावे हरिनाम घेतलं की आपली चिंता पांडुरंग करणार आहे. एकनाथांच्या वचनावर या भक्तांचा विश्वास आहे.
madhavi.kavishwar1@gmail.com