आवा निघाली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा
संत तुकारामांची ही अप्रतिम काव्यरचना. वय झाल्यानंतरदेखील, सूनबाई घरात आल्यानंतर देखील म्हातारीचं लक्ष प्रपंचात अडकलेलं आहे. तिला म्हातारपणी काही परमार्थ व्हावा, पंढरपूरला जावं असं वाटतं, पण घरात अडकलेलं मन, पंढरपूरला जायला तयार होत नाही.
तुकारामांनी किती छान लिहिलं आहे..
आवा निघाली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा
वारकऱ्यांबरोबर यात्रेला निघलेली म्हातारी गावाच्या वेशीपर्यंत जाऊन परत येते. सुनेला सांगते,
परिसे गे सुनबाई, नको वेचू दूध दही,
करी जतन फुटके पाळे, उखळ मुसळ जाते,
माझे मन गुंतले तेथे, ..
हे बघ, दूध दही वाया जाऊ देऊ नको. माझं तिखट-मिठाचं पाळं अगदी फुटायला आलं आहे. पूर्वजांचं आहे ते, ते सांभाळून वापर. उखळ-मुसळ जोरात आपटू नकोस. पुढे ती सांगते, भिक्षुक आल्या घरा, सांग गेली पंढरपुरा, कोणालाही भीक घालायची नाही. सासू पंढरपूरला गेली म्हणून सांग आणि हो, तूदेखील अगदी बेताने, कमी जेव.
काय गंमत आहे पाहा, सर्व ऐकून घेतल्यावर सूनबाई म्हणते, मी सगळं लक्षात ठेवीन, तुम्ही यात्रेसी जावे सुखे.. हे ऐकल्यावर मात्र सासूबाईंचा विचार बदलतो. हिला मी घरात राहायला नको आहे म्हणून ही सटवी आग्रह धरते आहे. असं आहे काय? ती मनात म्हणते, सटवीचे चाळे खोटे, म्या जावेसे इला वाटे.. शेवटी म्हातारी आपला निर्णय सांगते.
आता कासया यात्रे जाऊ , काय जाऊन तेथे पाहू..
मुले लेकरे घरदार, हेची माझे पंढरपूर
अशा तऱ्हेने प्रपंचात अडकलेला माणूस, अगदी अखेपर्यंत त्यातून बाहेर पडत नाही. या प्रपंचातील कोणतीही वस्तू, अखेरीस आपण बरोबर नेणार नाही, हे त्याच्या ध्यानात येत नाही, अंतकाळी या वस्तू इथेच राहणार म्हणून तो शेवटी दु:खीच होऊन इहलोक सोडतो
माधवी कवीश्वर
madhavi.kavishwar1@gmail.com