रामायणात सीतेचा त्याग सर्वाना माहीत आहे, पण अलीकडच्या काळात, स्वातंत्र्यवीर सावरकरांची पत्नी यमुनाबाई आणि बाबाराव सावरकरांची पत्नी येसूवहिनी यांनी आपल्या पतीच्या कार्यात आपल्या जीवनाची आहुती दिली. सावरकरांची पत्नी, जव्हार संस्थानचे दिवाण भाऊराव चिपळूणकर यांची मुलगी. खूप श्रीमंत, त्यांच्या घरी स्नान करण्यासाठी चांदीचे घंगाळ असे. जावई बॅरिस्टर होतो आहे हे पाहून ते आनंदित झालेले.
स्वातंत्र्यवीरांच्या चरित्रात एक प्रसंग आहे. सावरकरांना ज्या वेळी पन्नास वर्षांची जन्मठेपेची शिक्षा झाली, त्या वेळी अंदमानात नेण्यापूर्वी, त्यांची व त्यांच्या पत्नीची तुरुंगात भेट झाली. माहेरी अतिशय वैभवात बालपण गेलेल्या, त्यांच्या पत्नीच्या वाटय़ाला देशभक्तीच्या धगधगीत निखाऱ्यावरून चालणाऱ्या पतीबरोबर सप्तपदी चालण्याचे जीवन आले. यमुनाबाईंची काहीही तक्रार नव्हती. वीस-बावीस वर्षांच्या आपल्या पत्नीला सावरकर म्हणाले, ‘‘ईश्वराची दया असेल तर पुन्हा भेटू, चार काटक्या एकत्र करून घर बांधून मुलांना जन्म देणे, हा संसार असेल तर असे संसार कावळे चिमण्याही करतात. असं पहा, आपली चूल बोळकी आपण फोडून टाकली, पण त्यामुळे पुढे मागे अनेकांचे संसार सुखाचे होतील, अगदी त्यांच्या घरी सोन्याचा धूर निघेल.’’ यमुनाबाईंनी, त्या वेळीही सावरकरांना सांगितलं, ‘‘आपण माझी चिंता करू नका.. आम्ही सर्व संकटांना सामोरे जाऊ .. पण आपण स्वत:ला जपा.’’ अंदमानात सावरकर असताना माईंचे फार हाल झाले. येसूवहिनीदेखील तितक्याच धीराच्या. बाबारावदेखील अंदमानात देशभक्तीसाठी शिक्षा भोगत होतेच.
चरित्र वाचताना वाटतं या स्त्रिया आपल्या पतीच्या ध्येयाशी किती एकरूप झाल्या होत्या, किती अवघड आहे हे! वेळप्रसंगी घरात धान्याचा कण नाही, ब्रिटिशांना घाबरून समाजातील कोणी त्यांना कसलीही मदत करीत नसत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या स्त्रियांनी कसे दिवस काढले असतील?
सीता निदान रामाबरोबर वनवासात म्हणजे पतीच्या सहवासात होती, पण या स्त्रियांना सहवास नाहीच, नवरा डोळ्यांना दिसतही नव्हता. इथे दिव्यत्वाची प्रचीती येते आणि आपोआप आपले कर जुळतात, आपण नतमस्तक होतो.

माधवी कवीश्वर
madhavi.kavishwar1@gmail.com

Story img Loader