कान्होपात्रेची आर्त विनवणी विठोबाने ऐकली, ‘नको देवराया अंत आता पाहू..’ आणि खरोखरच विठोबाने तिला आपल्या हृदयाजवळ घेतलं. तिला संरक्षण दिलं. आजदेखील कान्होपात्रेची समाधी पंढरपूरला आपल्याला पाहायला मिळते. संतपदाला पोहोचलेल्या कान्होपात्राची भक्ती असामान्य होती. मंगळवेढय़ाच्या शामा नावाच्या गणिकेची ही सुस्वरूप मुलगी. वयात आल्यानंतर, शामाकडे येणाऱ्या व्यक्ती कान्होपात्रेला पाहात ती नजर शामाला व तिला नकोशी वाटे. एक दिवस घरावरून वारकऱ्यांची दिंडी पंढरपूरला जाताना कान्होपात्रेने पाहिली. ती दिंडीत सामील झाली व पंढरपूरला आली. मंदिराची झाडलोट व इतर कामे करून भजन करीत बसायची. इकडे बिदरच्या बादशहाला कान्होपात्रेच्या सौंदर्याबद्दल, नृत्याबद्दल, गाण्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्याने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. पंढरपूरला त्याचे सैनिक कान्होपात्रेला न्यायला आले त्या वेळी फक्त एकदा विठोबाचे दर्शन घेते, असं म्हणून तिनं विठोबाच्या पायावर डोकं ठेवलं. म्हणाली, ‘‘वाघानं हरिणीचं पिल्लू धरावं अशी माझी अवस्था झाली आहे. विठाई धाव.’’ म्हणून तिनं हाक मारली आणि तिथेच देह ठेवला. असंच देहाचं पावित्र्य सांभाळणं मीराबाईच्या चरित्रात पाहायला मिळतं.
मेवाडची ही राणी. राजा भोज याच्या निधनानंतर तिचा दीर विक्रमसिंह तिच्याशी विवाह व्हावा म्हणून तिच्या मागे लागला. त्या वेळी राजवैभव सोडून ती द्वारकेला कृष्ण मंदिरात राहू लागली. मंदिराची झाडलोट करू लागली. तिथेही ज्या वेळी विक्रमसिंहाचे सैनिक मीराबाईला न्यायला आले त्या वेळी तिने कृष्णाचं अखेरचं दर्शन घेते असं सांगून, आपले प्राण कृष्णार्पण केले. कान्होपात्रेचे अभंग आणि मीराबाईची पदे आजही लोकप्रिय आहेत.
घेई कान्होपात्रेस हृदयास..
राजा भोज याच्या निधनानंतर तिचा दीर विक्रमसिंह तिच्याशी विवाह व्हावा म्हणून तिच्या मागे लागला.
Written by माधवी कवीश्वर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-07-2016 at 01:01 IST
मराठीतील सर्व चित्ती असो द्यावे समाधान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spiritual article in loksatta chaturang