आपल्या विभूती सांगताना भगवान श्रीकृष्ण सांगतात, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद व सामवेद या चार वेदांत, सामवेद ही माझी विभूती आहे. सामवेदात ज्या ऋचा आहेत त्या गांधारादी सुरात गातात. भगवंताला गायन अतिशय आवडते सा म्हणजे ऋचा, अम म्हणजे स्वर. सामवेद हा संगीताला जन्म देणारा वेद. सामवेद गाणारा भक्त आपल्या गायनातून ईश्वराचे प्रेमच व्यक्त करीत असतो. संगीत भगवंताला अत्यंत आवडते, याबद्दल न्यायमूर्ती राम केशव रानडे यांनी फार सुंदर कल्पना मांडली. आपल्या एका निरूपणात ते म्हणाले, ‘‘श्रोतेहो, विश्वाची निर्मिती, विश्वाची उत्क्रांती करतानाही देवाला संगीताचा आधार घ्यावसा वाटला, कसं ते पाहा, प्रथम सा म्हणजे सागरात जीव निर्माण झाले, नंतर रे म्हणजे रेतीत म्हणजे जमिनीवर जीव निर्माण झाले, नंतर ग म्हणजे गगनात पक्षी निर्माण झाले, नंतर म म्हणजे मनुष्याची निर्मिती झाली. प म्हणजे मनुष्यात जो पराक्रमी आहे तो श्रेष्ठ, त्यानंतर ध म्हणजे जो माणूस धर्माने वागतो तो श्रेष्ठ. त्यानंतर नी म्हणजे जो इंद्रिय नियमन करतो तो जास्त श्रेष्ठ. शेवटी वरचा सा म्हणजे ज्याला ईश्वर साक्षात्कार झाला, तो म्हणजे संत, तो सर्वात श्रेष्ठ मनुष्य या पुढे उत्क्रांती म्हणजे इव्हॉल्युशन ऑफ लाइफ थांबले. देवाला संत ही त्याची सर्वोत्कृष्ठ निर्मिती आहे असं वाटलं. सा रे ग म प ध नी वरचा सा किती सुंदर कल्पना आहे जीवनाच्या उत्क्रांतीची.
पोथी पढ पढ जग मुआ, हुआ न पंडित कोय, ढाई अक्षर प्रेम का, पढे सो पंडित होय- कबीर प्रेमाची अडीच अक्षर फक्त संतांनाच वाचता येतात, सर्व जगावर प्रेम करणारे संत जीवन आनंदात कसं जगावं हे शिकवितात. शैले शैले न माणिक्यं, मौक्तिकम् न गजे गजे, साधवो नाही सर्वत्र, चन्दनं न वने वने -माणिक, मोती, चन्दन हे ज्याप्रमाणे सर्वत्र मिळत नाहीत, त्याप्रमाणे संत ही सर्वत्र मिळत नाहीत, संत, ईश्वर तुमचा पाठीराखा आहे हा दिलासा देतात. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, हे नामजप साधनेच महत्त्व पुन्हा पुन्हा सांगतात. सर्व सुख दु:खाचं कारण आपलं मन आहे, ते मन सकारात्मक करण्याचं मोठं कार्य केवळ संतच करतात.
माधवी कवीश्वर
madhavi.kavishwar1@gmail.com