चित्त शुद्ध तरी, शत्रू मित्र होती,
व्याघ्र ही न खाती, सर्प तया
– संत तुकाराम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भामचंद्र डोंगराच्या गुहेत विंचू-सापांच्या वस्तीत अन्नपाण्याशिवाय विठोबाचे ध्यान करणाऱ्या तुकोबांना विषारी प्राण्यांनी इजा केली नाही. सर्व विश्वात एकच एक शुद्ध जाणीव भरून राहिली आहे, हा अनुभव घेताना त्यांनी सांगितले, ‘ज्या वेळी आपलं मन अगदी शुद्ध असते त्या वेळी आपल्याला कोणीही शत्रू नसतो.’ अगदी हाच अनुभव, एकनाथांना शुलभंजन पर्वतावर आला. एकनाथांचे गुरू जनार्दनस्वामी यांनी एकनाथांना परमार्थिक साधनेसाठी शुलभंजन पर्वतावर एकांतात जायला सांगितलं. १२ वर्षांचे एकनाथ डोळे मिटून ध्यान करू लागले की, जंगलातून एक मोठा काळा सर्प त्यांच्या कमरेला विळखा घालून आपला फणा त्यांच्या डोक्यावर धरत असे. ज्यामुळे त्यांना ऊन-पाऊस यापासून संरक्षण मिळत असे. रानात एका गुराख्याने हे पाहिले व तो ओरडला त्या वेळी एकनाथांना हा प्रकार समजला. सर्पाने इजा केली नाही, याचे स्पष्टीकरण देताना जनार्दनस्वामींनी देखील ज्या वेळी चित्त शुद्ध असते त्या वेळी शत्रू मित्र होतात हे सांगितले. श्री गोंदवलेकर महाराज साधनेसाठी नैमिषारण्यात जायला निघाले, त्या वेळी अरण्यात असलेले त्यांच्या वाटेतील सर्प बाजूला होऊन त्यांना वाट करून देत. अगदी अलीकडच्या काळातदेखील आपण पाहतो हेमलकसाला
डॉ. आमटे दाम्पत्याला अस्वल, तरस, बिबटे, साप, मगर कोणीही इजा करीत नाही. कारण या प्राण्यांवर त्यांनी केलेले शुद्ध प्रेम. वन्य प्राण्यांचं अनाथालय असायला हवं, या कल्पनेतच वैश्विक प्रेमाचा आविष्कार दिसून येतो. मेलेल्या माकडिणीचं पिल्लू त्यांनी आपल्या अपत्याप्रमाणे सांभाळलं. त्यातून जंगली जनावरांच्या पिल्लाचं संगोपन करायला सुरुवात केली. त्यात राणी अस्वल आणि नेगल बिबटय़ा ही हिंस्र समजली जाणारी जनावरं त्यांची विशेष लाडकी. डॉ. आमटे बिबटय़ाच्या तोंडात अगदी बिनधास्त हात घालतात त्या वेळी ‘चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र ही न खाती सर्प तया’ या तुकारामांच्या वचनाची आठवण होते.

माधवी कवीश्वर
madhavi.kavishwar1@gmail.com