प्रापंचिक संकटांनी आणि दुष्काळाने गांजलेले तुकाराम, एक दिवस कोणालाही न सांगता, घराबाहेर पडले, मनाच्या निराश अवस्थेत त्यांनी भामचंद्र डोंगराच्या गुहेत बसून विठोबाचं ध्यान करायचं ठरवलं, पंधरा दिवस ते अन्नपाण्या वाचून ध्यान करीत बसले, त्यानंतर त्यांचा जीवनाचा दृष्टिकोन बदलून गेला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, राजस सुकुमार मदनाचा पुतळा असं विठोबाचं वर्णन करणाऱ्या तुकारामांना, विठोबा केवळ मूर्तीत नसून, आपल्यातच आहे, याची अनुभूती आली.
ईश्वराचा अंश, प्रत्येक माणसात आहे, फक्त तो आपण जाणला पाहिजे, असे ते या अभंगात सांगतात. त्याला ते आत्मा म्हणतात, हा आत्मा म्हणजे काय, तर अगदी शुद्ध मन, ज्या मनात कोणतेही विकार नाहीत, म्हणजे काम क्रोध, मद वगरे विकार नाहीत, अशा मनात, के वळ प्रेम ही भावना असते आणि हाच आत्मा, हाच ईश्वराचा अंश, असे मन २४ तास आनंदात असते, बाह्य़ गोष्टींचा या मनावर परिणाम होत नाही. ज्याप्रमाणे उसातली साखर दिसत नाही, पण ती असते, त्याप्रमाणे, देहातील म्हणजे शरीरातील देव दिसत नाही तो असतोच, दुधात लोणी असते, पण त्यावर प्रक्रिया केल्यानंतरच लोणी येते, एरवी लोणी दिसत नाही, तसे मनावर बंधनांची प्रक्रिया केल्यावर, मनातील षड्रिपू गेल्यावर, आपल्या शरीरातील म्हणजे देहातील ईश्वर जाणवेल, म्हणून शेवटी तुकाराम महाराज सांगतात, अरे, देवळात का जाता, देवळातच फक्त देव असतो असे नाही, आपल्या देहातील देव पहा, आपले सगळे षड्रिपू घालवा आणि अखंड आनंद घ्या, तुकारामांचा अजून एक अभंग आपण ऐकतो, ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ त्याचा भावार्थही हाच आहे. संत कबिरांनी आपल्या अनेक दोह्य़ातून हाच संदेश दिला आहे. एका दोह्य़ात ते म्हणतात,
‘मन मक्का, दिल द्वारिका, काया काशी जान,
दश द्वारे का देहरा, तामे जोती पिछान,
तुझा देव तुझ्यातच आहे, त्याला शोधून तर बघ
माधवी कवीश्वर
madhavi.kavishwar@gmail.com