तुळशीची देवा बहू प्रीती, आणिक पुष्पे न लागती.. – संत नामदेव
कार्तिक महिन्यात सर्व सृष्टी आनंदाने बहरून येते. याच काळातल्या तुळशीच्या लग्नाला म्हणूनच महत्त्व असते. विश्वव्यापी चेतनेला वृक्षातील चेतनेनं या काळात आवाहन केलेलं असतं, कारण वृक्षातील चैतन्याशिवाय सृष्टीचं कालचक्र कसं चालणार? निष्ठा, प्रेम, धर्म, नीती, सर्जनत्त्व, ईश्वरभक्ती, आणि समर्पण, ही सप्तपदी घालून, विश्वासाचं माप ओलांडून, तुळशी या लग्नाच्या निमित्तानं कृष्णाच्या म्हणजेच या दृश्य जगात प्रवेश करते. आदर्श गृहस्थाश्रम कसा असावा हे तुळस शिकवते. पती-पत्नीमधील प्रेम तिच्या आणि भगवंताच्या नात्यासारखं असावं.. म्हणजे दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी.. इतकं तादात्म्य असावं. तुळशीवृंदावनाला चार कोनाडे असतात. त्यात पणती ठेवायला एक जागा असते. हे चार कोनाडे म्हणजे अतिथी कोणत्याही दरवाजाने आला तरी त्याला प्रवेश आहे हे सांगणे. हे चार कोनाडे म्हणजे जीवनातील चार आश्रम. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम, कोनाडय़ात ठेवलेली पणती त्या त्या आश्रमातील कर्तव्याची आठवण देते. तसेच धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार पुरुषार्थाची देखील जाणीव करून देते. विठोबा हा कृष्णाचा अवतार. तुकाराम महाराज म्हणतात, हा पांडुरंग कसा आहे तर ‘तुळशीहार गळा कासे पीतांबर..’ शिवाजी राजांनी तुकारामांना नजराणा पाठवला, त्या वेळी तुकारामांनी निरोप दिला, ‘आम्ही तेणे सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी..’ काळी, पांढरी अथवा रानतुळस अतिशय गुणकारी आहे. पवित्र्याचं प्रतीक आहे.. वाऱ्यावर डोलणारी तुळस तिच्या देखण्या मंजिऱ्यांमुळे जणू काही सौभाग्यलेणे घालून सजली आहे, असं वाटलं तर त्यात काय नवल? संत बहिणाबाई म्हणतात, जेथे आहे तुळशीचे पान, तेथ वसे नारायण..
माधवी कवीश्वर – madhavi.kavishwar1@gmail.com