मी भूतकाळातून भानावर आले.. काही क्षणांतच न्यूयॉर्क शहर. सारंच अनोळखी. आपली माणसंदेखील अनोळखी. जवळ आलेलं जग. दुरावलेली माणसं. वर्तुळासारखी आत्मकेंद्रित. सारे ३६० अंश स्वत:साठी. सारी स्वत:ची स्पेस. त्यात इतरांचा शिरकाव नको. कोन नकोत, बाजू नकोत. फक्त स्वत:चा परीघ आखून घेणारी त्रिज्या- स्वत:ची त्रिज्या- हवी. राधिकेच्या परिघावरून तिचं मन गाठता येईल? तिची त्रिज्या होता येईल?.. भूमिती शिकवणं सोपं, आयुष्याची भूमिती जगणं कठीण! एक पाऊल टाकलं की पुढचं पाऊल पडतं.. सरळ रेषेत पुढं जात राह्यचं, एवढंच उरतं.
‘मॅ म, यॉ कॉफी.’
‘थँक्स.’
‘माय् प्लेझऽऽ..’ गोड हास्य. एअर हॉस्टेसनं दिलेली कॉफी घेत मन भविष्यकाळाचा वेध घेऊ लागलं नि त्यातून भूतकाळात जाणं अपरिहार्य होतं ..
तीस र्वष मुलांना शाळेत इंग्लीश-गणित शिकवत आले. आता पुन्हा नव्याने इंग्लिश शिकावं लागणार! गणिताचं एक बरं असतं. गणित जगभर तेच असतं. त्यातून भूमितीची गंमत वेगळीच..
नानांच्या- माझ्या सासऱ्यांच्या- वयाला ९० र्वष पूर्ण झाल्याबद्दल, ‘नव्वदी-पूर्ती’ सोहळा आप्तेष्ट-स्नेह्य़ांच्या सहवासात साजरा करावा, असं मनात आलं, ते मी नानींना-सासूबाईंना बोलून दाखवलं. कारण अशा गोष्टी नानांना कधीच पटल्या नाहीत. त्यांची षष्टय़ब्दीपूर्ती, पंच्याहत्तरी, सहस्र चंद्रदर्शन- काहीच साजरं करू दिलं नव्हतं त्यांनी. नानी म्हणाल्या-
‘तुझं ऐकतील, तूच बोल त्यांच्याशी!’
कसं आणि काय बोलणार? नानांची ९० र्वष पूर्ण होताना, मनोहरांची ६० पूर्ण होत आहेत अन् राघवची ३० र्वष. आजोबा-मुलगा-नातू यांच्यात तीस तीस वर्षांचं अंतर. तिघांचे जन्म चैत्रातले, तारखांनी एप्रिलमधले. नानांशी विषय काढून त्यांच्या ‘ज्योतिषी भाषेत’ म्हटलं, ‘कसं आहे नाना, या वर्षी दुर्मिळ ‘काटकोन-त्रिकोण’ योग आहे..’
‘काटकोन-त्रिकोण योग?.. हे नानीचं डोकं निश्चित नाही. ती मला चांगलं ओळखते. ज्यात आपलं कर्तृत्व काहीच नाही, त्याचे कसले सोहळे अन् समारंभ..’
‘कर्तृत्व नाही म्हणूनच तर, देवाचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त करायची सग्यासोयऱ्यांसोबत. तुम्ही नव्वद पूर्ण, म्हणजे मनोहर साठ अन् राघव तीस पूर्ण. तीन कोनांची बेरीज एकशेऐंशी. आहे की नाही ‘काटकोन-त्रिकोण’ योग!’
‘वाटलंच! हे गणिती डोकं तुझंच. गुड. पण बेटा, बाजूंशिवाय कोन सिद्ध कसे करणार?’
‘आम्ही आहोत ना- नानी आणि मी- तुमच्या बाजूने कोन सांभाळायला. त्यानिमित्ताने राघव-राधिकेलादेखील बोलावू अमेरिकेतून. लग्नाला वर्ष होऊन गेलं, आलेत कुठे?’
‘तसं असेल तर प्रश्नच नाही. गो अहेड!’
सोहळा तर निर्वेध पार पडला. सग्यासोयऱ्यांत या वेळेस राधिकेचे माहेरचेदेखील होते. फक्त राधिकाच येऊ शकली नाही. राघव एकटाच आला चार दिवसांसाठी. अन् जाताना जिवाला घोर लावून गेला. दोघांच्या लग्नाला जेमतेम वर्ष झालंय. आय.टी. इंजिनीअर असलेल्या राघवने, एम.एस. झाल्यानंतर अमेरिकेतच सेटल व्हायचं ठरविलं होतं. ते पचवणं आम्हाला जड गेलंच.. मग लग्नासाठी त्याच्या मागे लागलो. लग्न ठरविलं त्यानेच ‘नेट’वर. तेसुद्धा सहा महिने राधिकेशी ‘चॅटिंग’ केल्यानंतर. राधिका मूळची पुण्याची, डॉक्टर. तेव्हा न्यूयॉर्क येथे ‘गायनॅकॉलॉजी’त उच्च शिक्षणासाठी स्थायिक. राघव दुसऱ्या टोकाला कॅलिफोर्नियात. लग्न झाल्यानंतरदेखील दोघं एकाच देशात. पण पूर्व-पश्चिम दोन दिशांना. हजारो कि.मी. अंतरावर, वेगवेगळ्या टाइम-झोनमध्ये! क्वचितच कधी भेट होणार, सुट्टी मिळाली की.. पण कुठंतरी बिनसत गेलं. स्वभाव जुळेनात म्हणे. जुळण्यासाठी सहवास तरी हवा ना? शहरातल्या अंतरापेक्षा मनातलं अंतर वेगानं वाढत गेलं.. इतकं की, आता घटस्फोटापर्यंत वेळ येऊन ठेपलीय! हे सारंच अघटित- अनपेक्षितरीत्या सामोरं आलं, जेव्हा राघवनं आम्हा दोघांना पुढच्या वादळाची कल्पना दिली.. कसं कुणास ठाऊक नानांना कुणकुण लागलीच!
नानांचा राघववर अतोनात जीव. इतका की परस्पर लग्न ठरविल्यावर, त्यांनी राधिकेची पत्रिका पुण्याहून मागवून घेतली अन् राघवच्या पत्रिकेशी जुळल्यावर मगच लग्नाला ‘ग्रीन सिग्नल’ दिला. हे सारं राघवच्या नकळतच!.. आणि म्हणूनच त्यांना हा धक्का सहन झाला नाही. तसं थेट कधीच बोलले नाहीत, पण मधनंच प्रश्न विचारायचे, ‘राधिका नाहीच आली.. का गं नसेल आली?’
‘नाना, तिचं शिक्षण-नोकरी एकदमच चालू आहे. नसेल शक्य झालं.. आणि फोनवर तुमच्याशी- नानींशी बोललीच की, पुण्या-मुंबईसारखं सहज नाही येता येत..’
‘तेवढं कळतं मला, बेटा. पण राघवदेखील मनमोकळा नाही वाटला मला पूर्वीसारखा, हरवल्यासारखा वाटत होता.’
यावर काय बोलणार? त्यातच मग एकदा त्यांना अर्धागवायूचा झटका आला. वयाच्या ७० व्या वर्षी पायी नर्मदा परिक्रमा करणारे नाना, ‘व्हीलचेअर’ला जखडले गेले! अन् त्यांची ही अवस्था पाहून नानींचा धीर खचला. अन् एका पहाटे बासष्ट वर्षांचा संसार एकतर्फी संपवून झोपेतच अहेवपणी गेल्या!
मनोहरांचा- ह्यांचा- स्वभाव नानांचा मुलगा असून दुसऱ्या टोकाचा. स्वत: इंजिनीअर झाल्यावर अमेरिकेत जायची संधी मिळूनसुद्धा नानांच्या विरोधामुळे जाता आलं नाही, त्यामुळे नानांशी संवाद केवळ औपचारिक, नैमित्तिक. गेली तेहतीस र्वष तर मीच त्या दोघांमधली दुभाषासारखी ‘संवादिनी’. राघवने अमेरिकेला जाण्यासाठी ह्य़ांनी सर्व सोपस्कार केले. पैशाला कमी पडू दिलं नाही. उच्च शिक्षण घेऊन त्यानं परत यावं ही मात्र मनोमन इच्छा. राघवनं तिकडेच स्थायिक व्हायचं ठरविल्यावर मात्र बदसूर लागल्यासारखी मनाची तार तुटलीच! नोकरीनिमित्त ह्य़ांचं अर्ध जग पाहून झालं होतं. मात्र कधी तरी राघवकडे जाऊन राहता यावं म्हणून माझादेखील पासपोर्ट काढून ठेवला होता. पण नाना-नानींच्या या वयात सोडून जाणं मनाला पटेना. त्यामुळे जाणं झालं नाही. तो रागदेखील धुमसतोय..’ आपलं जाणं तर नाहीच होणार. तो तरी कशाला येईल? नव्वदीचा आजोबा, साठीचा बाप.. बरा आहे तिकडेच. त्याचंदेखील काय चुकलं? आम्हाला संधी मिळाली असती, तर आम्हीदेखील हेच केलं असतं. त्याचं भविष्य त्यानं पाहिलं तर कुठं बिघडलं? आमचं जे व्हायचं ते होईल.. मनातला जुना कडवटपणा बाहेर पडतो अशा वेळेस. मी थिजल्यासारखी ऐकत राहते.
धाग्यांनी जोडलेली नाती कायदेशीरपणे तोडता येतात- जे राघव राधिका करू पाहत आहेत- पण रक्ताची नाती नाही तोडता येत. ती फक्त विस्कटत जातात. विसंवादी होत जातात. जिवाच्या आकांतानं हा संवाद सुसंवाद व्हावा, असं नेहमी वाटतं, पण प्रत्येकाच्या स्वभावाचे कंगोरे सांभाळत, घराची आकृती विस्कटू न देण्याची धडपड अपुरी पडते तेव्हा हताश व्हायला होतं. एरवी नाना-मनोहर-राघव यांच्यात वाढत चाललेला दुरावा, विस्कटलेले कोन सांभाळणाऱ्या आम्ही तिघी रेषा म्हणजे नानी-मी-राधिका तर बाहेरून आलेल्या. केवळ धाग्यांनी जोडलेल्या या घराशी. नानी सारेच संपवून गेल्या. वर्षभरात घटस्फोट घ्यायची वेळ आलेल्या राधिकेची, तिची अशी कारण विचारधारणा असणार, निश्चित, पण फोनवर त्यावर कितीसं बोलणार? घटस्फोटासारख्या हळव्या विषयावर- तेसुद्धा सासू-सुनेनं बोलण्याएवढा मोकळेपणा येण्याएवढा सहवासदेखील नाही. लग्नसमारंभापुरती झालेली तोंडओळखच.. तरीही हे बोलणं व्हायलाच हवं. घटस्फोट टाळणं शक्य असो वा नसो, या सगळ्यात राघवमुळे राधिकेवर अन्याय होता कामा नये.. पण हा प्रत्यक्ष संवाद व्हावा कसा?
एक दिवस नानांनी बोलावलं अन् शेजारी बसायला सांगितलं. काही क्षण शांततेत गेले. नंतर ते हळूहळू बोलू लागले..
‘तू या घरात आलीस तेव्हा नानीबरोबर माई- तुझी आजेसासू-देखील होती. ती आमची सावत्र आई, पण सख्ख्या आईसारखी माया. १९२०-२५ च्या त्या काळात अप्पांनी घराचा- बाहेरचा रोष पत्करून तिच्याशी- विधवेशी- पुनर्विवाह केला. आम्हा मुलांवर अन्याय- सावत्रपणा होऊ नये म्हणून’ मूल होऊ न देणे’ ही तिचीच अट! जेमतेम पंधरा वर्षांत ती ‘पुनर्विधवा’ झाली, हे तिचे भोग!  सुशीलेचं- नानीचं- ‘सुवासिन’ जाण्याच्या विचाराचं मूळ कदाचित माईच्या या ‘दुहेरी वैधव्यात’ असावं. तसं ती कधी बोलली नाही. संसार, नातीगोती सांभाळत राहिली. शारीरिक व्याधी न भोगता सुटली एवढंच. खरंतर माझं तिच्याकडे दुर्लक्षच झालं, असं आता मला तीव्रतेनं जाणवतं. मनोहरदेखील माझ्यासारखाच. अमेरिकेला जायचं होतं त्याला, अन् मी पत्रिका पाहून विरोध केला. तो कडवटपणा कायम मनात बाळगून, तो माझ्याशी तुटकपणे वागत आलाय.. ती दरी काही मी बुजवू शकलो नाहीच. तू या घरात आल्यापासून आमचे तऱ्हेवाईक स्वभाव, मनाचे कंगोरे सांभाळत घर बांधून ठेवलंस याची मनोहरला कितपत जाणीव आहे, कल्पना नाही.. एरवीदेखील बाहेरून आलेल्या तुम्हा सुनांची घरच्या पुरुषांनी जाणीव ठेवणं हा गुण दुर्मिळच. तुझ्याच भाषेत, भूमितीच्या कोनांना बाजूंशिवाय अस्तित्व नसतं, हेच विसरलं जातं. आमच्यासाठी तुम्ही होतात, आहात. तुम्ही दोघं मात्र तसे एकटेच असणार आहात. राघव कदाचित नसेल तुमच्याजवळ. त्याचं वा राधिकेचं भविष्य, या बाबतीत मी काही बोलणं निर्थकच.  एक विचारू?
‘आज परवानगी मागताय, नाना?’
‘तसं नाही बेटा, तुम्हा बायकांना समजून घेणं पुरुषांना जमणं कठीण. राघवला राधिका कितपत समजली असेल, जेमतेम एक वर्षांत- तेसुद्धा इतकं दूर राहून?. की घटस्फोटापर्यंत वेळ यावी? आपली तर राधिकेशी लग्नकार्यापुरती चार दिवसांची तोंडओळख, फोनवर ख्यालीखुशाली विचारण्यापुरती, तिनं या विषयावर बोलण्यासाठी इथं यावं ही अपेक्षादेखील चूकच, तरीदेखील..’ नाना अवघडल्यासारखे बोलायचे थांबले.
‘नाना.. मी देखील याच दिशेने विचार करतेय काही दिवस. तिकडे राधिकेबरोबर आठ दिवस राहून, प्रत्यक्ष समजून घ्यायचं, राघवलादेखील बोलून पाहायचं, त्यातून जे निष्पन्न होईल ते,  प्रामाणिकपणे स्वीकारायचं. नाहीतर राघवमुळे राधिकेवर अन्याय झाला, ही रुखरुख आयुष्यभर मन कुरतडत राहील! आठ दिवसांचा प्रश्न आहे. तुम्ही आणि मनोहर..’
‘त्याची नको काळजी करूस बेटा. बाप असलो तरी आज्ञाधारक मुलासारखा वागेन मी मनोहरबरोबर.. प्रायश्चित्त घेतल्यासारखा!’ असं म्हणून नाना मनावरचं ओझं दूर झाल्यासारखं हसले, मनमोकळं. कितीतरी दिवसांनी.
हे सगळं जमेल मला? खरी परीक्षा तर आताच आहे.
राघव तर फोनवर म्हणाला, ‘आई, तू का नको तो उपद्व्याप करत आहेस? अननेसेसरी वेस्ट ऑफ टाइम अ‍ॅण्ड मनी.. खरं सांगू आई, वुई आर नॉट मेड फॉर इच अदर, दॅट्स ऑल.’
‘राघव, हे फार आयडिअ‍ॅलिस्टिक वाक्य आहे रे. निर्थक. नो बडी इज एव्हर मेड फॉर द अदर, प्रेमविवाहात सुद्धा. यू हॅव मेक-अप् फॉर द अदर, मोल्ड युवरसेल्फ फॉर द अदर.’
‘लहानपण आठवलं आई. एकाच इंग्रजी शब्दाला दोन वेगळे शब्द सांगायचीस तू. त्यामुळे होमवर्कमध्ये फुलमार्क्‍स मिळायचे, पण आता मी..’
‘तू मोठा झाला आहेस, असंच ना. पण लाइफ पार्टनर जोडताना होमवर्क केलं होतंस ना? स्वत: न बदलता दुसऱ्यानं बदलावं, ही अपेक्षा नसावी. कुणाला बदलायचं नसेल, तर ‘लग्न’ हे त्यांच्यासाठी नाहीच. जुन्या काळी लग्नाला ‘शरीरसंबंध’ हा शब्द वापरायचे, तेवढंच मग शिल्लक उरतं. मग लग्नच काय घटस्फोटदेखील पोरखेळ ठरतो. एरवी मग आहेच की ‘लिव्ह-इन’ रिलेशनशिप. बांधीलकी नको, जबाबदाऱ्या नको. त्याग तर नकोच नको. जिथं त्याग नसतो, तिथं प्रेमदेखील नसतं राघव.. पण मी राधिकेशी बोलायला येणार आहे ते तिची बाजूदेखील आम्हाला कळावी म्हणून  त्यासाठी तू दोन दिवस न्यूयॉर्कला यावंस ही अपेक्षा. त्यानंतरदेखील तुमचा निर्णय कायम राहिला तरी तक्रार नसेल.. मी वाट पाहीन, राघव.’ राघवने आवश्यक कागदपत्रं पाठविली, हेदेखील पुढच्या पावलासाठी पुरेसं होतं.
राधिका फोनवर म्हणाली, ‘आई, तुम्ही फार अपेक्षा ठेवून येताय, खरं ना? एक सांगते, मी निव्वळ पैसा वा स्वातंत्र्यासाठी करियरिस्ट नाही. बट् आय लव्ह माय प्रोफेशन अ‍ॅज्वेल.. स्त्री-रोग हा माझा विषय आहे, अन् ज्ञान खूपच अपुरं आहे. अमेरिकेत राहण्याचा माझा अट्टहास नाही, तसा विरोधही नाही. तुम्ही आलेलं मला निश्चित आवडेल.. फक्त हे कारण नसतं तर जास्त आवडलं असतं, आई. मी एअरपोर्टवर वाट पाहीन.’
एरवी टूरवर जाताना उत्साहात असणारे मनोहर, मी निघताना मात्र बावरले.. ‘शेवटी एकटीच निघालीस.. काळजी वाटते, माधवी. जमेल ना?’
‘तुमचं ‘इन्स्ट्रक्शन बुक’ इतकं भरलेलं आहे की चुकायची इच्छा असली तरी मी चुकणार नाही.. त्यामुळे मी एकटी नाहीच! तुम्ही तुमची अन् नानांची काळजी घ्या.’
नमस्कार करून निघताना नाना नि:शब्द. डोळे भरलेले.
‘लेडीज अ‍ॅण्ड जंटलमेन, वी आऽऽ निअरिंग द सिटी ऑफ जॉय.. प्लीज् फॅसन् युव् सीट्-बेल्ट्स..’
.. मी भूतकाळातून भानावर आले. काही क्षणांतच न्यूयॉर्क शहर. सारंच अनोळखी. आपली माणसंदेखील अनोळखी. जवळ आलेलं जग. दुरावलेली माणसं. वर्तुळासारखी आत्मकेंद्रित. सारे ३६० अंश स्वत:साठी. सारी स्वत:ची स्पेस. त्यात इतरांचा शिरकाव नको. कोन नकोत, बाजू नकोत. फक्त स्वत:चा परीघ आखून घेणारी त्रिज्या- स्वत:ची त्रिज्या- हवी. राधिकेच्या परिघावरून तिचं मन गाठता येईल? तिची त्रिज्या होता येईल?.. भूमिती शिकवणं सोपं, आयुष्याची भूमिती जगणं कठीण! एक पाऊल टाकलं की पुढचं पाऊल पडतं.. सरळ रेषेत पुढं जात राह्यचं, एवढंच उरतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा