डॉ नंदू मुलमुले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कधी ‘ऑनलाइन’ तर ‘ऑफलाइन’ जगणं आता आपल्या आयुष्याचा भाग झाला आहे, मात्र आभासी जग आणि वास्तव जग यांच्यात गल्लत करायला गेलं की त्यांची अवस्था वीणाताईंसारखी होऊ शकते. अमेरिकेत राहणाऱ्या सूनबाईची पहिली मंगळागौर वीणाताईंनी ऑनलाइन साग्रसंगीत साजरी करून ‘व्हर्चुअल सासुरवासा’चा आनंद घेतला खरा, पण…

दोन पिढ्यांमधला संघर्ष फक्त माणसामाणसांतला आहे असं नाही, तो आभासी आणि वास्तव दुनिया यातलाही आहे. पूर्वी जग एकच होतं, वास्तव जग. भोवतालचं खरं आयुष्य. त्यात राहणारी माणसं खरी होती. त्यांच्या समस्या खऱ्या होत्या. त्यावरचे उपाय खरेखुरे होते.

विसाव्या शतकाच्या अखेरीस या जगावर एक आंतरजाल अंथरलं गेलं. त्यावर एक भ्रामक जग निर्माण झालं. या भ्रामक आणि वास्तव जगात एक फरक; त्यातलं सुख भ्रामक, समस्या मात्र खऱ्या. वास्तवाचे चटके देणाऱ्या. आभासातला ‘आ’ वासून पुढे उभ्या ठाकणाऱ्या. कसरत दोन जगातली एक ‘ऑनलाइन’ आणि दुसरं ‘ऑफलाइन’जग. घरबसल्या ऑनलाइन तिकिटे काढाल, खडतर प्रवास मात्र ऑफलाइन शरीराला करावा लागेल. ऑनलाइन रमी जुगार खेळाल, फटका मात्र खरोखरीच्या खिशाला बसेल. ऑनलाइन प्रेम कराल, संसार मात्र हाडामांसाच्या माणसाबरोबर करावा लागेल.

आणखी वाचा-मासिक पाळीतील मानसिक आरोग्य

‘ऑनलाइन’ हे सुखाचे प्रदर्शन आहे, तर ‘ऑफलाइन’ हे वास्तवाचे दर्शन. सोलापूरच्या आजीची-अमेरिकेतल्या नातवाची भेट ऑनलाइन होईल, पण त्याला घरचा लाडू काही व्हिडीओवर खाऊ घालता येणार नाही. त्यासाठी प्रवास करावा लागेल. थोडाथोडका नाही, तर बारा-पंधरा तासांचा थकवणारा सोलापूर-मुंबईमार्गे थेट बोस्टन, अमेरिकेचा. आपल्याच लेकाच्या अमेरिकी संसारावर खूश असणाऱ्या वीणाताईंना हा ऑनलाइन संसार आभासी आहे, इथल्या समस्यांचा वास्तव डोंगर आपल्यालाच चढायला लागणार आहे, याची लवकरच ऑफलाइन जाणीव झाली.

वीणाताई आणि रमेशराव यांचे एकुलते एक चिरंजीव संकेत बऱ्यापैकी हुशार निघाले. इंजिनीअर होऊन अमेरिकेला जाऊन पोचले. तेथून वधुसंशोधनाच्या वाऱ्या करीत एक सुबक खाशी निवडून लग्न करते झाले. यात पुढाकार रमेशरावांचा, कारण प्रत्येक स्थळाचा (विवाह जुळवण्याच्या परिभाषेतला हा शब्द कालबाह्य होत चालला आहे.) ते स्वभावानुसार, चिकित्सक अभ्यास करीत. त्यात लेकाला फारसे स्वारस्य नव्हते. त्याला फक्त चांगल्या स्वभावाची अपेक्षा होती. आई-वडिलांच्या मंथनातून अखेर एक रत्न बाहेर निघाले. सूनबाई दिशा. संकेतला बायको मिळाली म्हणण्यापेक्षा वीणाताईंना ‘दिशा’ मिळाली.

नवऱ्यासोबत अमेरिकेला जाण्यापूर्वी तिच्यासोबत थोडे-बहुत ऑफलाइन दिवस घालवायला मिळाले. त्यात पारंपरिक विवाहोत्तर पूजा, धर्मकार्ये, व्रतादी कर्तव्येच अधिक. सुनेने ‘हो हो’ केले, कारण लवकरच या रामरगाड्यातून बाहेर पडून आपल्याला हजारो किलोमीटर दूर जायचे आहे, याची तिला कल्पना होती. बोस्टनला दोघे स्थिरस्थावर होईतो वीणाताईंनी इकडे नवऱ्याला ओच्यातला संगणक (लॅपटॉप) घ्यायला लावला. तसा घरी एक कायम स्थापना झालेला ज्येष्ठ संगणक होता. त्यावर मुख्यत: रमेशरावांचे वित्तीय चढ-उताराचे अवलोकन चालायचे. शिवाय तुलनेने जुना, वेगवान जगाच्या स्पर्धेत टिकायला लहान लेकरासारखा कडेवर उचलून घेता येण्याजोगा संगणक जरुरी. रमेशरावांनी आवश्यक त्या चिकित्सा करून तो खरेदी केला. त्या संगणकावर स्वार होण्याचा पहिला मान अर्थात ‘स्काइप’ला. आभासी भेटीगाठीचे जणू ते प्रवेशद्वारच.

आणखी वाचा-सांदीत सापडलेले: आजारपण!

आता रोज सायंकाळी चिरंजीवांच्या संसारात डोकावणे शक्य झाले. त्यासाठी बोस्टन आणि भारताच्या वेळेचे गणित लावण्यात आले. भारत तब्बल साडेनऊ तास बोस्टनच्या पुढे. तिथे रात्रीचे नऊ म्हणजे सोलापुरात सकाळचे साडेसहा. सकाळी उठायची रमेशरावांची फारशी तयारी नव्हती, मात्र वीणाताईंनी त्यांना राजी केलं. तोंडबिंड धुऊन सातला ते सामील होऊ लागले. रोजची खबरबात, इथली, तिथली. तिथले सारेच नवे नवलाईचे. सोलापुरी सून सफाईने मोटार चालवत हापिसात जाते, याच्या कौतुकाचे कढ सासूच्या घशात जिरून चेहऱ्यावर ओसंडू लागले. चिरंजीवही एतद्देशीय आप्तस्वकियांची ख्यालीखुशाली विचारू लागले. रोजचा हा तासाभराचा आभासी दिनक्रम घालवून वीणाताईंचा दिवस त्यानंतर सोलापूरच्या रणरणत्या उन्हात आनंदाने सहन करण्यात जाऊ लागला.

हळूहळू अमेरिका वीणाताईंच्या अंगणी येऊन वसू लागली. त्यांनी आभासी संसार मांडण्यास सुरुवात केली. सूनबाईच्या घरातली पूर्व दिशा कोणती ते ठरव, देवघराची स्थापना कर, रोज सकाळी आटोपशीर का होईना, पूजा करीत जा अशा सूचना सुरू झाल्या. येथे पार्टिशनच्या भिंतीत खिळे ठोकता येत नाहीत, भिंतीवर कागद चिकटवता येत नाही, आकृत्या काढता येत नाहीत, घर सोडताना सारा खर्च वसूल होतो, हे सूनबाईने सांगितल्यावर वीणाताईंनी भिंतीवरल्या सूचना नाइलाजाने खाली उतरवल्या, मात्र येणाऱ्या सणावाराची आठवण आवर्जून करून दिली जाऊ लागली.

जानेवारीत मकरसंक्रांत, मात्र बोस्टनला त्या वेळी भयंकर थंडी असल्याने हलव्याचे दागिने, हळदीकुंकू वगैरे वीणाताईंनी स्काइपवरच साजरे केले. पुढे होळीच्या पुरणपोळीचाही आभासी घास, मग सोलापूरच्या होळीची आभासी धग शेकणं आलं. वटपौर्णिमेला वडाचं झाड नाही, मग कागदावरच वटवृक्ष रेखाटून धागा बांधा. (पुढे तो कागद आणि धागा केराच्या बादलीत गेला.) गुढीपाडव्याला व्हॅक्युम क्लीनरच्या दांडीची गुढी, तिला नव्या ओढणीचं महावस्त्र. त्याला कडुलिंब न मिळाल्यानं स्थानिक झाडाची फांदी, वर उलटा किचनमधला बाऊल असा प्रकार सुरू झाला.

नारळीपौर्णिमेला नारळ मिळाले, राखीपौर्णिमेला जय अंबे इंडियन स्टोरमध्ये राखीही मिळाली. ती सोलापूरच्या चुलतभावाला बोलावून स्क्रीनवरून बांधण्यात आली. म्हणजे, तिकडे संगणकाला बांधली. इकडे त्याने आपली खिशातून काढून हाताला बांधून घेतली.

मग आले श्रावणातले मंगळवार. वीणाताईंच्या उत्साहाला नारळीपौर्णिमेपासूनच उधाण आलेलं. अरबी समुद्राच्या लाटा अमेरिकेच्या किनाऱ्यावर धडकल्या. सूनबाईची पहिली मंगळागौर. वीणाताईंनी साग्रसंगीत साजरी करायचा चंग बांधला. सोलापूरचे साग्रसंगीत बोस्टनला कसे ऐकू जाणार? पण सूनेने मान डोलावली. तिकडे सारं विकेंडला. त्यात सासू ५ हजार मैलांच्या सुरक्षित अंतरावर. त्यामुळे सुनेची काहीच हरकत नव्हती. एव्हाना रमेशरावांना हा प्रकार बालिश वाटू लागला. पण त्यांनी विचार केला, बायको ‘व्हर्चुअल सासुरवासा’चा आनंद घेतेय, घेऊ द्या.

आणखी वाचा-जेंडर बजेटिंग : विनियोगावर ठरणार यशापयश!

आता एक अडचण. मंगळागौरीचा सणच मंगळवारचा, तो वीकेंडला कसा करता येईल? मंगळवार खरं तर कामाचा दिवस, नवीन नोकरी, तरीही कामाच्या तासांची रदबदली करीत सूनबाईने सकाळची अर्धी सुट्टी निश्चित केली. त्या वेळी इकडे संध्याकाळचे साडेचार. त्यामुळे वीणाताईंनी गोरजमुहूर्तावर समाधान मानले. सोलापूरचा मंगळवार उजाडला. चौरंगाच्या आधी संगणकाची स्थापना झाली.

अनेक कोनांतून संगणक कॅलिडोस्कोपसारखा फिरवत पूजाविधी दोन्हीकडे दिसतील अशी तरतूद करण्यात आली. कलश, दीप, घंटा, अन्नपूर्णेची मूर्ती यापैकी महादेवाची पिंडी आणि एक लक्ष्मीमातेची मूर्ती तेवढी सूनेने नेली होती. म्हणजे वीणाताईंनीच ती सामानात ठेवली होती. तिलाच पार्वती मानून छोट्या स्टुलावर तिची प्रतिष्ठापना करण्यात आली. घंटा-कलश नव्हते. छोटी मेणबत्ती लावून दीप प्रज्वलन झालं. जवळच्या प्ले-एरियातून स्थानिक झाडांची फुले, पत्री मुलाने तोडून आणली होती. सोबत नेलेला शालू सूनबाईनी नेसला.

इकडे वीणाताई पूर्ण तयारीनिशी सज्ज होत्या. चौरंग, आसन, मूठभर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ, कणकेचे दिवे, धूप-दीप, उदबत्ती, नैवेद्या, शमीपासून केना, आघाडा, झेंडू, गुलाब, जास्वंद, मोगरा, सोळा वातींची आरती, अक्षता सारे तयार होते. शेजारच्या दोन सवाष्णी ‘पकडून’ आणल्या होत्या. ‘आता हे घे, ते वाहा, हे म्हण, ते उचल, पाणी शिंपड, सुपारीला कुंकू-अक्षता लाव, वात उजळ,’ अशा सूचना देत देत सुनेकडून पूजा पूर्ण करण्यात आली.

तिकडे सुनेनेही एका गुजराती गृहिणीला ‘रिक्वेस्ट’ करून घरी बोलावले होते. तिला ऑनलाइन मंगळागौरीची कहाणी ऐकवण्यात आली. ‘सारू सारू’ करीत काही कळलेले नसताना तिने ती ऐकून घेतली. नंतर आरती, प्रसाद. कॅमेरा जवळ नेऊन दिवा ओवाळणे, तिकडे सुनेने हात फिरवून डोळ्याला लावणे, प्रसाद तोंडात टाकणे वगैरे प्रकार सुरू केले. हे कधी न पाहिलेल्या बाया, कॅमेराच्या कक्षेत येण्याच्या वीणाताईंच्या सूचनेने संगणकावर जाऊन पडल्या. कनेक्शन तुटले, मंगळा इकडे आणि गौर तिकडे! शेवटी रमेशरावांनी हिकमतीने ते पुन्हा जोडले. तोवर फोनवरून सुनेला गुजराती बेनसोबत फुगडी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या. एव्हाना तास-दीड तास निघून गेला होता.

सुनेची अर्धी सुट्टी संपत आली होती. गुजराती गृहिणीची दुकान उघडण्याची वेळ झाली. ती मणीमंगळसूत्राचा आहेर घेऊन निघून गेली. सोलापूरच्या सवाष्णी नवरे घरी येण्याची वेळ झाली म्हणून आपापला आहेर घेऊन निघून गेल्या. सूनेने ‘बाय’ म्हणण्याची आणि सोलापूरचे ‘सर्व्हर डाऊन’ होण्याची एकच गाठ पडली. तोवर आठ दिवसांपासून धावपळ करीत असलेल्या वीणाताईंचेही ‘सर्व्हर डाऊन’ झाले. बॅटरीचा चार्ज संपत आला. काही काळ त्या संगणकाच्या पडद्याकडे पाहत राहिल्या. त्यावर पोरगा-सुनेचे स्टेटस दिसत राहिले. मग तेही क्षीण पडत गेले. मावळले. संगणक बंद पडला. आभासी जगातला व्हर्चुअल सूर्य अस्तंगत झाला.

आणखी वाचा-सांधा बदलताना : मन करा रे थोर!

पोरगा-सुनेचा संसार पृथ्वीच्या गोलार्धाच्या दुसऱ्या जगात राहिला. सोलापूरचा सूर्य उतरत्या उन्हातही तळतळू लागला. त्याचे व्हर्चुअल नव्हे, खरे चटके बसू लागले. आभासी जगाचे बाष्पीभवन होऊन ते सोलापूरच्या आभाळात तरंगू लागले. रमेशराव त्यांचा चुकलेला ‘मॉर्निंग वॉक’ संध्याकाळी घ्यायला निघून गेले. सवाष्णी जेऊन-खाऊन तृप्त झाल्या. प्रसाद बांधून घरी परतल्या. वीणाताईंसमोर पूजेनंतरच्या पसाऱ्याचा डोंगर उभा राहिला. सकाळी कामवाल्या बाईने बुट्टी मारली होती. तिला श्रावणाचे अधिक मोबदल्याचे आवताण होते. ‘कंबर दुखते’ असा बहाणा व्हर्चुअल करून तिने सुट्टी टाकली होती. खरकट्या भांड्यांचा ढीग मोरीत जमा झाला होता. त्यातली किमान कामाची दोन-चार भांडी तरी घासून घेणे क्रमप्राप्त होते. तिथे सून मदतीला येणं शक्य नव्हतं.

आतापर्यंत समोर ‘हो आई, नाही आई, बरं आई’ करणारी सून स्क्रीनवरनं अंतर्धान पावली होती. तिच्या संसारात आता वीणाताई नव्हत्या. ती वीणाताईंच्या जगात नव्हती. क्वांटम भौतिकीच्या जगातली ती आता प्रसिद्ध मांजर झाली होती. एकाच वेळी अस्तित्वात असलेली आणि नसलेली.

वीणाताईंनी कंबर कसली आणि हळूहळू पसारा आवरायला सुरुवात केली. आपल्या पुढ्यातला संसार खरा, आपली दुखरी कंबर खरी, बाकी सारे आभास याची त्यांना स्वच्छ जाणीव झाली.

nmmulmule@gmail. com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clash between two generations in virtual and real world mrj