अश्विनीताईबरोबरच्या प्रत्येक भेटीत मला जाणवलं आहे, ती काय आहे हे तिला पूर्ण माहीत आहे. त्याविषयी ती पूर्ण शांत आहे. तिला कसलाच अभिनिवेश नाही. ती ‘शास्त्रीय गायिका’ नावाच्या किंवा इतर कुठल्याही नावाच्या साच्याच्या पल्याडची आहे. एवढं सगळं लिहूनही ती खूपशी लिहायची राहिलीच आहे. तिच्या गाण्यापलीकडेही ती खूप  काही आहे..
मला अश्विनीताईची आणि माझी पहिली भेट लख्ख आठवते. ‘सावली’ चित्रपटाच्या निमित्तानं झालेली. त्यात मी एका मोठय़ा शास्त्रीय गायिकेच्या मुलीची भूमिका करत होते. ती मुलगी लहानपणापासून आईकडून शास्त्रीय संगीत शिकलेली. छंद म्हणून गाणं शिकत असणं आणि शास्त्रीय संगीत अनेक र्वष शिकत असणं यात मोठा फरक आहे. माझी भूमिका अशा तयारीच्या, पट्टीच्या गायिकेची होती, त्यामुळे प्रत्यक्षात जरी मी गाणं शिकत असले तरी या भूमिकेसाठी नक्कीच वेगळय़ा तयारीची गरज होती. माझी फार आवडती शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे माझ्या घरापासून जवळ राहाते हे माहीत होतं. वाटलं, ती तिच्या विद्यार्थिनींना शिकवत असताना तिचे, त्यांचे हावभाव, हातवारे यांचं निरीक्षण केलं तर मला ‘सावली’साठी नक्की मदत होईल. घाबरत तिला फोन केला. घाबरत अशासाठी की काही माणसांपर्यंत तुमचा हात पोचणारच नाही असं वाटतं, इतकी ती तुमच्यासाठी मोठी असतात. माझ्यासाठी अश्विनीताई आणि तिचं गाणं तसंच, पल्याडचं होतं. चांगलं शास्त्रीय गाणाऱ्या कुणाच्याही भवती मला एक धीरगंभीर वलय दिसत राहातं. ही माणसं देव किंवा तत्सम जी कुणी शक्ती असेल तिच्या सगळय़ात जवळची माणसं असतात असा माझा विश्वास आहे. मी कुठल्याही संगीतात भावनेच्या वाटेने शिरते. मला शास्त्रीय संगीतातले राग, ताल यांची माहिती आहे, पण फारशी नाही. त्यामुळे वैयक्तिक माझ्यापुरतं बोलायचं झालं तर ‘तयारी’ आणि लफ्फेदार तानांपेक्षा कुठलासा एखादाच एकटा अति स्वर माझ्यावर घाला घालतो. भीमसेनजींचा, कुमारजींचा, किशोरीताईंचा प्रत्येक स्वर तो घाला घालतो. ‘रहना नही ऽऽ’ असं किशोरीबाईंनी म्हटलं की ‘देस विराना है’ हे पूर्ण व्हायच्या आत डोळे झरायला लागतात. या सगळय़ांच्या पुढच्या पिढीत माझ्यापुरतं बोलायचं झालं तर माझ्या डोळय़ातलं पाणी काढणारे आर्त स्वर शास्त्रीय आवाजांनी लावले त्यात अश्विनी भिडे-देशपांडे हे नाव नेहमीच होतं, आहे आणि राहील. या पाश्र्वभूमीवर त्या आवाजाला भेटायला मिळणार या नुसत्या कल्पनेनंही माझं जे व्हायचं ते झालं होतं. कुठूनसा तिचा नंबर मिळवून फोन फिरवला. पलीकडून एक मंजुळ ‘हॅलो’ आला. त्या ‘हॅलो’भोवती कुठलंच वलय नव्हतं. खूप सहजता होती. सच्चेपणा होता. तिला भेटीचं कारण सांगितल्यावर ती म्हणाली, ‘ये की, बुधवारी जमेल?’ न जमण्याचा प्रश्नच नव्हता. तिच्या घराच्या पायऱ्या चढता चढताच तानपुऱ्याचे स्वर कानी यायला लागले. तिनंच दार उघडलं आणि आम्ही दररोज भेटत असल्यासारखी ती गोड हसली. ओळखीचं. तत्क्षणी जाणवलं, तिला भेटण्याआधी मी ‘शास्त्रीय गायिका’ नावाची झूल तिला पांघरली होती. तिलाच काय शास्त्रीय संगीत गाणाऱ्या सर्वानाच ती मी पांघरायचे. ‘यांना आपण घाबरायला हवं’ असं स्वत:ला बजावायचे. अश्विनीताईच्या त्या सहज हसण्यानं तिनं ती झूल शांतपणे स्वत:वरून काढून घडी करून माझ्या हातात ठेवली आहे असं वाटलं. ‘बस’ म्हणून ती आत गेली आणि कुठूनसा स्वत:च्या हाताने केलेला जुईच्या फुलांचा गजरा आणून माझ्या हातात ठेवला.
त्यानंतर तिनं स्वत:च्या हातानं बनवलेला दहीभात एका छोटय़ा ताटलीत माझ्यासमोर ठेवला आणि म्हणाली, ‘खाऊन झालं की ये’. तो खाऊन मी ‘त्या’ खोलीत गेले. या खोलीत तानपुरे अखंड झणकारत होते. अश्विनीताईचे डोळे बंद होते. कुठल्याशा रागातली कुठलीशी तान ती समोरच्या विद्यार्थिनींना शिकवत होती. ती तान तिनं स्वत: विजेसारखी घेतली आणि डोळे उघडून एका विद्यार्थिनीला तशीच घ्यायला खुणावलं. ती विद्यार्थिनी तबल्याच्या कुठल्या मात्रेपासून सुरू करावं या बाबत साशंक असावी, कारण अश्विनीताई एकदम म्हणाली, ‘‘उचल, उचल!’’ आणि स्वत:च निसटणारी ‘सम’ उचलून तिनं विजेसारखी पुढची तान घेतली. ते पाहून मला वाटलं, हे सगळं किती दैवी आहे. मला हे कधी मिळेल का.. मला इथे असता येईल का..त्यानंतर काही वर्षांनी मी अश्विनीताईच्या त्याच घरी बसले होते. मी तिला विचारायला आले होते, ‘मला गाणं शिकवशील का? म्हणून. तेव्हा ती कुठून कुठून खूप साऱ्या मैफिली देशोदेशांत करून नुकती भारतात परतली होती. मी वेळ घेऊन घरी गेले. त्या    दिवशीही थकूनच घरी आली होती ती. तिच्या घरातल्या बाहेरच्या टेबलवर तिनं नुकतीच अमेरिकेहून आणलेली एक छोटी लाकडी मगर होती. ताई समोर आली. नेहमीसारखं गोड हसली, बसली. माझ्या मनात भीतीनं कल्लोळ माजला होता. ‘तिला कसं विचारू? तिला काय वाटेल?’ सारख्या प्रश्नांचा. अचानक तिनं समोरची ती मगर हातात घेतली. तिचा तोंडाकडचा भाग हातात धरून किंचित हलवला. अचानक शेपटीपर्यंतचा मागचा भाग लहर पसरत गेल्यासारखा अलगद हलला. ती म्हणाली, ‘ही मला फार आवडली. हे बघ, तिला असं अलगद हलवलं की तिची शेपटी बघ कशी हलते. तिचा एक एक मणका कसा हलत जातो बघ. मला हे बघणं ‘ऑलमोस्ट मेडिटेटिव्ह’ वाटतं. मी खूप दमले असेन की हे असं करत राहाते. मला खूप फ्रेश वाटतं मग.’ मी पाहात राहिले. तिची हळूहळू एक शांत तंद्री लागत चालली होती. एका क्षणी तिच्यासाठी आसपास त्या मगरीशिवाय कुणीच नव्हतं. इतकी तीव्र एकाग्रता. मला सुरुवातीला तिच्या-माझ्यातल्या त्या शांततेची भीती वाटत होती, पण हळूहळू मीही त्या मागरीकडे बघायला लागले. मनातली भीती, प्रश्न कुठेसे विरून जायला लागले. ती मगर, तिचं शेपटीपर्यंत मणक्या मणक्यातनं हलत जाणं, ते बघणारे अश्विनीताईचे एकाग्र डोळे एवढंच उरलं. माझीही एक तंद्री लागली. एका क्षणी ती शांतपणे म्हणाली, ‘‘का भेटायचं होतं तुला मला?’’ तोवर मीही शांतावले होते. म्हटलं, ‘‘माझी तयारी तुमच्यासमोर गायची नाही हे मी जाणते. मला शिकायला उशीर झालाय हेही खरंय. पण तरी, मी रियाज करेन ही हमी देते. शिकवाल का मला?’’ ती शांत हसली. मगर बाजूला ठेवून म्हणाली, ‘‘आपण भेटू या. मी वेळ देईन तुला. मग बघू या पुढे काय होतं.’’
 आमच्या गाण्याच्या शिकवणीला ‘भूप’पासून सुरुवात झाली. शिकवताना, ‘‘पंचमावरून गंधारावर येतात मध्यमशिवाय यायचं हे नीट लक्ष द्यावं लागेल.’’ हे सांगताना तिच्या डोळय़ात जे निरागस भाव होते ते बघून जाणवलं, ती आता माझ्या शेजारी उभी आहे. माझ्यातल्या भीत्यांच्या शेजारी. खरं तर ती या सगळय़ाच्या पार केव्हाच गेलेली आहे. कितीतरी अवघड, अनवट राग, ताल, त्यांच्यात तिनं रचलेल्या कितीतरी बंदीशी या सगळय़ानंतर पंचमावरून गंधारावर मध्यमाशिवाय येण्यातलं अप्रूप ती कुठून आणते. एकदा ती रागविस्तार शिकवताना म्हणाली, ‘‘कमीत कमी सुरांमध्ये राग दाखवता आला पाहिजे. हे मला माझ्या आईनं शिकवलं.’’ त्यानंतरच्या तिच्या एका मैफिलीला गेले तेव्हा तिच्या आधी एक उत्तम गायक गायला होता. लफ्फेदार ताना, चकाचक झालं गाणं. त्यानंतर ही आली. नीरव शांततेत एकेक पणती लावल्यासारखा एकेक स्वर एकापुढे एकापुढे एक ठेवत गेली. मैफल संपली तेव्हा एक ‘माहौल’ बनला होता. तेवणाऱ्या असंख्य पणत्यांचा. तेव्हा जाणवलं, हा ‘माहौल’ ही अमूल्य, दैवी गोष्ट आहे. तिथे कुठलीच पळवाट नाही. चमत्कृतीपूर्ण ताना किंवा कशामागेच ‘लपणं’ नाही. तडजोडी नाहीत. जीतोड ‘तयारी’ आहे पण ती ‘दाखवण्याचा’ अट्टहास नाही.
 एकदा कुणीसं तिला विचारलं होतं, ‘‘विशिष्ट राग विशिष्ट वेळीच का गायचा?’’ तेव्हा ती म्हणाली होती, ‘‘हे बघ, नियम वगैरे सगळं ठीक आहे, पण ‘भाव’ सगळय़ात महत्त्वाचा. प्रत्येक रागाचा एक स्वभाव आहे हे खरं, पण ‘रागीट’ स्वभावाचा माणूस काय नेहमी सतत ‘रागीटच’ असतो का. त्याच्या आयुष्यात इतरही भावभावनांचे क्षण येतच असतात की, तसंच रागांचं आहे. ‘करुण’ रसाचा राग नेहमी करुणच का असावा? मात्र वेळांचं म्हणशील तर कुठल्या वेळी काय गावं हे आपल्या पूर्वजांनी फार सखोल अभ्यासानं ठरवलं आहे असं मला वाटतं. मैफिलीचं म्हणशील तर कधीकधी एखादा ‘करुण’ राग मी कारुण्यानं गायला जाते पण तो राग म्हणतो, ‘‘आज मी आनंदी आहे, मला नाही व्हायचं करुण!’’ तेव्हा त्याचं न ऐकता मी ‘कारुण्यानंच’ तो दाखवत राहिले तर त्या दिवशी जमूनच येत नाहीत गोष्टी. एक तर मला तरी त्याच्या कलानं घ्यावं लागतं किंवा त्याला माझ्या, मगच जमून येतो माहौल..
अश्विनीताईच्या गाण्यापलीकडेही ती खूप काही आहे. उत्तम ड्रायव्हर आहे. ती मुंबई ते बेळगाव एकदा न थांबता सलग गेली होती. गाडी पंक्चर झाली तर तिचं टायर स्वत: बदलू शकते. तिची तानपुऱ्यावर फिरणारी बोटं टायर बदलताना कशी दिसतील याचा विचार करून मला अप्रूप वाटतं. ती व्हॉटस्अ‍ॅपवर आहे. ती परवाच आमच्याबरोबर राजमाची शिखर चढली. ती मला ‘अहो जाहो’ करू देत नाही. तिला आयफोन आवडतो. ती तंत्रानं अद्ययावत आहे. इतर कुणालाही न दिसणाऱ्या गोष्टी तिला दिसतात. एकदा आम्ही ट्रॅफिकमध्ये असताना ती म्हणाली, ‘‘हे बघ, या दोन्ही गाडय़ांचे नंबर ३३४५च आहेत!’’  तिचा नवरा राजनदादानं तिच्याविषयी म्हटलेलं वाक्य मला पटतं, तो म्हणाला होता, ‘‘तिला थ्री टाइम्स पुढचा प्रोसेसर बसवला आहे!’’ तिच्या प्रत्येक कार्यक्रमात किंवा अगदी ती ‘राजमाची’ चढत असतानासुद्धा राजनदादा ज्या पद्धतीनं तिच्याबरोबर असतो ते शब्दांत मांडणं शक्य नाही. त्यासाठी एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल. तिनं भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये रिसर्च स्कॉलर म्हणून काम केलंय. बायोकेमिस्ट्रीत पीएच.डी. केली आहे. तासन्तास तिथल्या लॅबमध्ये कसलेले प्रयोग करताना तिथल्या एसीतनं जो आवाज यायचा त्याचा सूर ‘षडज्’ पकडून ती गात असे आणि तिची एक वेगळीच तंद्री लागत असे. मी ‘कला’ शाखेची असल्याने मला ‘शास्त्र’ सोडून युगं लोटलीत. तरीही ताना घेता घेता कुठलीशी वेगवेगळय़ा रंगांची द्रव्यं काचेच्या चंचुपात्रातनं, परीक्षानळय़ातनं एकमेकांत निगुतीने मिळवणारी अश्विनीताई मी कितीदातरी मनात रंगवली आहे. या सगळय़ामुळे ती नुसती ‘शास्त्रीय’ नाही तर ‘शास्त्रीय’ शास्त्रीय गायिका आहे असं मला वाटतं. म्हणूनच ती तिचा गानविचार इतक्या निकोपानं मांडू शकत असेल का? तिच्या गाण्यातल्या भावना आणि गाननियम यांच्या समतोलाला तिचं हे संशोधिका असणं कारणीभूत असेल का? तिच्या विषयीचे हे आणि असे अनेक प्रश्न घेऊन मी तिला शोधत शोधत गाणं आणि त्याच्या भवतालचंही खूप काही शिकते आहे.
 तिच्या गावी असलेल्या तिच्या घरी तिचा एक तानपुरा आहे. दरवेळी तिथे गायला बसताना तो तानपुरा काढला की त्याच्या खिळीतनं एक विंचू बाहेर येतो. तो ती बाहेर सोडून येते. तो परत परत येतो. पण ती त्याला मारत नाही. आम्ही गमतीनं म्हणतो, तो मागच्या जन्मीचा मोठा गायक असणार जो अश्विनीताई गावी नसताना तिच्या तानपुऱ्यावर रियाज करायला तिच्या घरी येतो. पुन्हा पुन्हा पुनर्जन्म असतो का मला माहीत नाही. पण असला तर मलासुद्धा कुठल्याना कुठल्या रूपात तिच्या तानपुऱ्याच्या आसपास राहायला आवडेल.   
कधीकधी ती नुकती न्हाऊन गायला बसते. केस सैल बांधलेले असतात. लांबसडक बोटं तानपुऱ्यावर फिरत असतात. डोळे मिटलेले. कुठलीशी सुरावट बांधत ती षडजावर पोचते आणि त्या क्षणी तिचे केस आपोआप सैल सुटतात. मोकळे. ते बांधायला तिला उसंत नसते. कारण तिचा एक हात तानपुऱ्यावर असतो आणि दुसरा हवेत, अज्ञाताचा वेध घेत असलेला. तिच्या चेहऱ्यावर एक दैवी हसू उमलतं. मला ती तेव्हा सरस्वती वाटते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा