गाणं हा मनाचा उद्गार आहे याची जाणीव मला आतूनच झाली. खूप मजेत असले की गाणं सहजपणे उमटत जाई. आजही असंच होतं. निसर्गाच्या सान्निध्यात असले, समुद्रकिनारी असले, दूरवर पसरलेल्या पर्वतराजींच्या रंगछटा न्याहाळत असले, एवढंच काय, कालपर्यंत अंग मिटून घेतलेली कळी आज फूल होताना पाहूनही स्वर गळयातून उमटत जातात. स्वराशी तद्रूप झाल्यावर जी उन्मनी अवस्था होते तिनं तृप्तीचा येणारा अनुभव शब्दातीत, अवर्णनीय म्हणावा असा जाणवला. त्यातूनच अनवट रागांच्या गाठी सोडवणं हा माझा छंद वाढीला लागला.
अ जूनही केव्हातरी स्वप्नात दादर, िहदू कॉलनीमधल्या आमच्या घरात मी भाऊंच्या (माझ्या वडिलांच्या)मांडीवर बसलेय हे दृश्य दिसत राहातं.. सारं वातावरण तानपुऱ्याच्या जवारीदार सुरांनी भारून गेलेलं, त्यात भाऊंच्या गोड, धारदार आवाजाची मोहिनी वातवरणात पसरलेली.. मांडीवर असताना झोपेच्या गुंगीत अनेकदा भाऊंच्या छातीवर डोकं टेकवलं की त्यांच्या हृदयाची धडधड आणि आवाजाची स्पंदने जाणवत. त्या स्पंदनांनी मला स्वर, तालाच्या झोपाळयावर अलगद झुलवलं, जोजवलं आणि आयुष्यभर पुरणारी साथ दिली..
मी केव्हा, कशी गायला लागले हे मला कळलंच नाही. बोलणं आणि गाणं एकत्रच सुरू झालं असावं. कारण गाण्यासाठी काही वेगळं करावं लागलंच नाही. गाणं हाच माझा श्वास झाला आणि श्वासाचं प्रयोजन गाणं झालं.
मी दीडेक वर्षांची असेन भाऊंनी बायकांनीच सर्व भूमिका (पुरुष भूमिकासुद्धा) केलेलं ‘सं. मानापमान’ नाटक बसवलं होतं. माझी मोठी बहीण वीणा माझ्या जन्मानंतर लगेचच देवाघरी गेल्यानं भाऊ मला कधी दूर ठेवत नसत. त्यामुळे नाटकाच्या तालमी असोत वा गाण्याच्या शिकवण्या, माझा मुक्काम त्यांच्या पाशीच असे. परिणामी नाटय़संगीताच्या निमित्ताने नाटयपदं कशी गावीत याचे संस्कारही होत गेले. संवादाबरोबर आवाजाचा लहानमोठेपणा, पिच, शब्दांवर जोर, स्वरांदोलनं हीदेखील खूप काही सांगत असतात हे कळू लागलं. त्याचा गाण्यात कसा उपयोग होतो, हेही कळत गेलं. कारण अजाण वयात रात्ररात्र नाटकं आणि गाण्याच्या मफलींना आई-भाऊंबरोबर जाण्याचा सराव झाला. बरं, रात्री जागरण झालं म्हणून शाळा किंवा अभ्यासाला दांडी नाही! त्यामुळे तेही एका बाजूला सहजपणे होत गेलं.
गाणं हा मनाचा उद्गार आहे याची जाणीव मला आतूनच झाली. खूप मजेत असले, की गाणं सहजपणे उमटत जाई. आजही असंच होतं. छान निसर्गाच्या सान्निध्यात असले, समुद्रकिनारी असले, दूरवर पसरलेल्या पर्वतराजींच्या रंगछटा न्याहाळत असले, एवढंच काय, कालपर्यंत अंग मिटून घेतलेली कळी आज फूल होताना पाहूनही स्वर गळयातून उमटत जातात. मला गाण्याकरिता काही विशेष आविर्भाव कधीच करावा लागला नाही. कारण गातो म्हणजे आपण काही वेगळं करतोय असं वाटलंच नाही.
भाऊंनी स्वरसाधना करून घेतली आणि ही जन्मभर करतच राहायची हे पटवलं. तेही स्वरभरणा करीत असत. या साधनेनं मनाची एकाग्रता, श्वासावर नियंत्रण ठेवणं, सबुरी, मनाचा धीर हे साधतं. हा त्यांचा अनुभव मलाही आला. एवढंच नव्हे तर एकंदरीतच मनाच्या व्यापाराचा अभ्यास झाला.
स्वराशी तद्रूप झाल्यावर जी उन्मनी अवस्था होते तिनं तृप्तीचा येणारा अनुभव शब्दातीत, अवर्णनीय म्हणावा असा जाणवला.
मला अनेकदा विचारलं जातं की तुम्ही मफलीची तयारी कशी करता? माझ्या मनात मफल कायमच सुरू असते. काही शिकलं, ऐकलं की ते सोडवायचं, स्वत:साठी त्याचा अभ्यास करायचा हा माझा नेहमीचा शिरस्ता.
उस्ताद गुलुभाई जसदनवालांनी १९६८ च्या १६ ऑगस्टला शिकवायला प्रारंभ केला तेच ‘भूपनट’ या रागापासून. माझं वय लहान असूनही तोवर मी नटाचे प्रकार गात असल्यानं शिकताना मला जड गेलं नाही. अनवट रागांच्या गाठी सोडवणं हा माझा छंद वाढीला लागला.
मी मफल केव्हा करू लागले म्हटलं तर अगदी १०-१२ व्या वर्षी मी दोन-अडीच तास गात असे. भाऊंच्या गुरुपौर्णिमेला किंवा परिचितांच्या, जाणकारांच्या घरी झालेल्या बठकीत मी कानडा प्रकार, नटाचे प्रकार सहज पेश करत होते, जोडीला नाटय़संगीतही असे. एका मफलीला विजय तेंडुलकर आले होते. ‘‘काय गळा फिरतोय या मुलीचा, वीजच जणू!’’ असं कौतुकही केलं. एका कार्यक्रमानंतर
पं.नारायणराव व्यास म्हणाले, ‘‘पोरी, जयपूर घराण्याचं शिवधनुष्य उचलू पाहातेस. प्रत्यंचा लावून वामनरावांना धन्य कर.’’  मला वाटतं या सर्व आशीर्वाद, सदिच्छांनी मला माझ्या जबाबदारीची जाणीव करून दिली. ते नुसतं कोरडं कौतुक नव्हतं. मी ज्या मार्गावरून सहज म्हणून चालत होते, ती वाट किती कठीण आहे आणि कुठे नेते, याचा विचार मला अंतर्मुख करत गेला.
‘साधना’ या शब्दाची प्रचीती मी रोज घेत होते. ज्यावेळी माझा शाळा कॉलेजचा अभ्यास एवढीच माझी जबाबदारी होती, तेव्हा माझ्यासाठी गाणं मनाचा विरंगुळा पण बुद्धीसाठी रोज नवं कोडं होतं. ते कोडं सोडवण्यातला बौद्धिक आनंद खूप निरागस होता. मला कोणा पुढं काहीही सिद्ध करायचं नव्हतं. सुदैवानं कोणतंही गाणं, चीज एकदा ऐकली की माझी झाली. इतकी बुद्धी टिपकागदासारखी होती. त्यामुळे ‘पुढय़ात वही ठेवून गाणं म्हणजे आपल्या स्मरणशक्तीवर आपलाच विश्वास नाही’, अशी माझी धारणा झाली आणि ती अजूनही आहे. त्या काळात मी जो गाण्याचा अभ्यास केला तो साधनेच्या व्याख्येत बसत होता की नाही हे माहीत नाही. पण एका खोलीची जागा, सतत पाहुणे, कुणी राहायला येणारे, कुणी चहापाणी करून जाणारे, शिकणारे यामुळे घर भरलेलं. स्वत:च्या स्वरसाधनेसाठी मी कधी गॅलरीत बसायची. कधी कधी आठदहा दिवस तेवढंही करता यायचं नाही. मग मनातल्या मनात रागांचं चिंतन, मनन करण्याची सवयच लागली. दुसरे शिष्य शिकताना आणि स्वत: शिकताना असं दुहेरी शिक्षण होऊ लगलं. एकंदरीत गाणं नाही, असा एकही दिवस जात नसे.
आमच्याकडे अनेक संगीतज्ञ, नाटककार, समीक्षक, सतत येत असल्यानं संगीत विश्वाची ओळख अनेक पलूंनी पक्की होत गेली. अनेक बंदिशी, राग अनायासे पदरात पडू लागले. भाऊंना कार्यक्रमाचं बोलवणं आल्यावर ते कसे बोलतात, व्यवहार कसा सांभाळतात, नकार घायचा असेल तर काय करतात, प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी ते कसे असतात हे बघायला मिळालं, त्यातून मी मफलीची कलाकार म्हणून घडत गेले. गुरूगृहातच जन्माला आले हे माझं सद्भाग्यच! आपसूकच गुरुकुल पद्धतीनं घराणेदार गायकी शिकता आली. भाऊंकडे ज्याला पद्धतशीर (Formal) शिक्षण म्हणतात ते ५/६ व्या वर्षी सुरू झालं आणि ५/७ व्या वर्षांत मफलीच्या वरच्या श्रेणीच्या रागदारीची तालीमसुद्धा सुरू झाली. गुलुभाईंप्रमाणे गुरुवर्य अझीझुद्दीन खाँसाहेब (बाबा)देखील अनवट रागातल्या दुर्मीळ बंदिशी मला शिकवू लागले. काही वेळा पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. जितेंद्र अभिषेकी हेदेखील हजर असत. आम्ही तिघेही एकदम शिकत असू. अन्य कलाकार आपल्या मफलीत हे राग कसे मांडतात हे मी आवर्जून ऐकत असे त्यामुळे मला माझ्या मफलीत मी काय करावं याबद्दल विचार करावा लागे.
माझ्या मफलीमागे इतर अनेक कलाकारांच्या मफलींचे माझे श्रवणानुभव आहेत. माझी एखादी मफल ठरली, की ती कितीही दिवसांनंतर असली, तरी तानपुरे तत्काळ मनात झंकारू लागतात. वेळेचा अंदाज येताच काय काय गाता येईल याचा विचार इतर व्यापातून मनात डोकावू लागतो. तरीही मी कधीच सगळा मेन्यू अगोदर ठरवून ठेवत नाही. खरंतर प्रत्यक्ष मफलीत जे गायचं ते फार मनात घोकलं तर त्यातली उत्स्फूर्तता जाते असं वाटतं, त्यामुळे एखादा राग गाणं म्हणजे घोटलेलं गाणं नव्हे अशी माझी कल्पना आहे. काही वेळा श्रोत्यांकडे पाहून आयत्या वेळी (त्यात जाणकार आणि विशेषत: गायक-वादक असतील तर) मी काय गायचं ते ठरवते. ग्रीन रूममध्ये जरी काही विचार करून आले असले तरी आयत्यावेळी रागही बदलते. एखाद-दोन वेळा तर विलंबित बंदिश गायल्यावर त्याला शोभेलशी द्रुत (अर्थ आणि रचनेच्या दृष्टीने) बंदिश मी गातागाता नव्याने रचलेली आहे. अशा मन्मना रचना त्या त्या वेळच्या रागाच्या मांडणीतून निर्माण झालेल्या, आवेगातून निर्माण झालेल्या आहेत.
पण एका रात्री मी मास्टर कृष्णरावांचा कौशीकानडा रेडिओवर ऐकला. ती रात्र आणि पुढचे कित्येक दिवस माझ्या मनावर त्याचाच पगडा होता. मी दुसरा काही विचारच करू शकत नव्हते. अखेरीस ३ आठवडयांनी मी तो राग एका मफलीत गायले तेव्हा मी मोकळी झाले. एखादा राग पछाडतो म्हणजे काय याचा तो उत्कट अनुभव होता.
माझ्या मफलीतल्या शास्त्रीय गायकीत ‘पाणी घालून लोकांसाठी पचायला हलकी’ करण्याचा प्रयोग जसा मी कधी केला नाही तशी जाणूनबुजून उगाच गूढ, अनाकलनीय आणि भ्रमित करणारी गायकीही मी कधी लोकांपुढे मांडली नाही. जशी मी, तशी माझी गायकी. उपशास्त्रीय संगीत प्रकारांना मी कधी वाळीत टाकलं नाही. त्यातही काय रस आहे, आनंद आहे, सौंदर्य आहे ते मी खूप लहानपणापासून ऐकल्यामुळे मला जाणवलेलं होतं. सुदैवानं भाऊ, गुलुभाईंजी अथवा बाबांनी मला कधी ठुमरी, दादरा, नाटय़ संगीत किंवा गझल गाण्याला मनाई केली नाही. उलट ते प्रकार शिकवले. रसूलन बाई, सिद्धेश्वरी देवी, बेगम अख़्तर अशा दिग्गजांच्या कार्यक्रमांना ते मला घेऊन जात. मलाही ते प्रकार गाताना अवघड वाटले नाहीत. श्रोत्यांमधून फर्माइश आली तर एखाद वेळी गझलही गाते मी. पण मर्यादा पाळूनच. रसपरिपोष करावा हा नियम मी नेहमी पाळते.
७-८ फेब्रुबारी १९७९ ला मुंबईत रंगभवनमध्ये पं. रविशंकरांचा सतार वादनाचा कार्यक्रम होता. त्यापूर्वी होतकरू कलावंत म्हणून मला कार्यक्रम द्यायला बोलावलं गेलं. त्यादिवशी एका वेगळ्याच आवेशाने मी गायले. माझ्यानंतर पंडितजींना ऐकण्यासाठी म्हणून आधीच हजारों श्रोत्यांचा जमाव उपस्थित होता त्यावेळी श्री मेहरा हे वयोवृद्ध रसिक आले होते. मी बिहागडा आणि बसंतीकेदार राग गायले. तंबोरे ठेवून मी श्रोत्यांना वंदन केलं आणि श्री मेहरा मोठय़ाने म्हणाले, ‘‘कोण कहे छे, केसरबाई जीवती नथी! आ छोकरी ने सांभळो, केसरबाई जीवती छे!’’  पं. लक्ष्मणराव बोडसांनी साश्रु नयनांनी आशीर्वाद दिला, ‘‘यावच्चंद्र दिवाकरौ तुझ्या दोन्ही (सडोलीकर आणि जयपूर अत्रौली) घराण्यांची कीर्ती अखंड राहो!’’
त्याच वर्षीच्या ३ जूनला सबर्बन म्युझिक सर्कलनं माझी सकाळची बठक ठेवली होती. जाणकार श्रोत्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या सर्कलचा कलाकारांना एक वेगळाच धाक होता. त्या दिवशी श्रोत्यात समीक्षक तात्या बाक्रे, गायक नीनू मुझुमदार, विष्णुदास शिराळी आणि आणखीही संगीतज्ञ हजर होते. गुलुभाईजी होते. बटुक दीवानजी आणि सत्येंद्र भाई त्रिवेदीदेखील होते. मी सव्वा नऊला ‘मियाँ की तोडी’ने मफल सुरू केली. विभास, िहडोल (१५ च मि.), मध्यंतरांनंतर बहादुरी तोडी, सारंग आणि भरवीनं शेवट करेपर्यंत दुपारचे दोन वाजले होते. वेळेचं भान तर नव्हतंच, पण गंमत म्हणजे भरवी म्हणून मी तंबोरा ठेवला आणि पाहाते तो विलक्षण स्तब्धता पसरली होती. मीही बुचकळ्यात पडले आणि अचानक टाळ्यांचा कडकडाट झाला. नीनू मुझुमदार भाऊ आणि गुलुभाईजींचं अभिनंदन करताना डोळे पुसत होते, ‘‘आम्हाला दुसऱ्याच जगात नेलं हो श्रुतीनं!’’ असं वारंवार म्हणत होते.
१९७६ ला दिल्लीत प्रथमच ‘सप्तसुर’ संमेलनात गायले. गाणं संपताच निवृत्तीबुवा स्टेजवर आले आणि अश्रुभरल्या डोळ्यांनी मला म्हणाले,‘‘तू वामनरावांच्या तपश्चय्रेचं सार्थक केलंस. ‘जयपूर’ची गायकी तूच गाशील!’’ श्रोत्यांमध्ये आकाशवाणी व दूरदर्शनचे अधिकारी होते. मुंबईला परतण्याच्या आतच माझ्या नावे दिल्लीहून तार आली ‘‘ऑडिशन टेस्ट न घेताच मला ‘बी हाय’ श्रेणी प्रदान केली होती.’’
एका पावसाळी संध्याकाळी बेगम अख्तर माझ्या घरी माझं गाणं ऐकायला आल्या. स्वत:ही गायल्या. त्यांचं गाणं मी रेकॉर्ड करून घेतलं. काही वर्षांनंतर त्यांनी गुलुभाईंना भेट दिलेला तानपुरा ‘‘यह अब आपका है’’ असं म्हणून गुलुभाईंच्या पुतण्याने मला दिला. ती अपूर्व भेट माझ्या गुरूंची अखेरची इच्छा होती. माझ्यासाठी प्रसादच होता.
देवाचे आशीर्वाद पाठीशी आहेत, गुरूंच्या विद्य्ोचं बळ आणि शुभाशीर्वाद सर्व प्रसंगांतून तारून नेतात आणि आपण चांगलं माणूसही असलो तर रसिकांचं प्रेम भरभरून मिळतं याचा वारंवार प्रत्यय येतो. आपल्या स्वरात दैवी प्रसाद भरून राहातो याची प्रचीती येणारे प्रसंग अनेक घडले. त्यापकी एकच सांगते.
परदेश दौऱ्यात एक रुग्णआजी माझ्या कार्यक्रमाला हट्टाने आल्या. वेदनाशामक औषधाने गुंगी येते म्हणून ते न घेता आल्या. घरची मंडळी धास्तावली होती की मध्येच वेदनांमुळे आजींना घरी न्यावं लागेल. कार्यक्रमाचे ३ तास त्या बसल्या आणि संपल्यावर हळूहळू स्टेजवर येऊन मला मिठी मारून म्हणाल्या, ‘‘आज कित्येक वर्षांनंतर मी पूर्ण शुद्धीवर राहून वेदनारहित काळ व्यतीत केला. तुझ्या गाण्यानं मी इतका वेळ माणूस म्हणून जगले.’’
यापेक्षा मोठा आशीर्वाद कोणता असेल?
माझं गाणं माझ्यासाठी एक संरक्षक कवच आहे. वय नुसतंच कॅलेंडरच्या तारखा बदलून वाढत नसतं अनुभवाची जोड नसेल तर उपयोग काय? आई-भाऊंच्या आजारपण आणि जाण्यानं जगाची ओळख पटू लागली. पण हर तऱ्हेच्या बऱ्या-वाईट प्रसंगातसुद्धा मन ताळ्यावर राहाण्यासाठी संगीताची फार मदत झाली. भाऊ गेले तेव्हा मी सातारा-पुण्याचे ‘बठकीची लावणी’ आणि ‘देवगाणी’चे कार्यक्रम आटोपून पहाटे ३.२५ ला घरी आले. ‘भाऊ नाहीत’ हे कळलं. मी सुन्न झाले. अपेक्षित होतं तेच झालं. पण कुठेतरी आत एक गाण्याची ओळ मन व्यापून होती. पुढचे सगळे व्यवहार पार पडले, पण गाणं आत चालूच होतं. माझ्या अपरिमित दुखाची धार त्यांनं बोथट केली. मी कोसळले नाही. अटळ घटना स्वीकारली. नामजपही हेच काम करतो.
माझ्या संगीतानं मला माझा शोध लागला. जीवन आणि अध्यात्म संगीतापासून वेगळे नाहीत ही गोष्ट आपोआप ध्यानात येऊ लागली. जीवनातलं सौर्दय, प्रेम, कला, विद्या, शास्त्र, सादरीकरण, शरीराची व मनाची शिस्त अशा साऱ्या संकल्पना हळूहळू जशा स्पष्ट झाल्या तसा जीवनातला रस कसा घ्यावा हेही कळू लागलं.
आज एका संस्थेची प्रमुख म्हणून काम करताना, अलिप्तपणे परंतु संस्थेच्या हितासाठी जागरूक राहून, शिस्तीनं, सत्यानं संगीत कलेची सेवा करण्याचं व्रत पार पाडताना संकटात डगमगून न जाता नेटानं पुढे जाण्याची प्रेरणा मला माझ्या संगीतानं दिली. बंधनात राहून मुक्तीचा अनुभव म्हणजे माझं संगीत, हा साक्षात्कार घडल्यामुळे आता केवळ आनंदच आनंद! हीच खरी मुक्ती!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


‘चतुरंग मैफल’ मध्ये पुढील शनिवारी (२७ एप्रिल)  सुप्रसिद्ध  चित्रकर्ती प्रफुल्ला डहाणूकर.


‘चतुरंग मैफल’ मध्ये पुढील शनिवारी (२७ एप्रिल)  सुप्रसिद्ध  चित्रकर्ती प्रफुल्ला डहाणूकर.