यावद वित्तोपार्जन सक्त:।
तावन् निज परिवारो रक्त:।
असं म्हणून जगद्गुरू शंकराचार्यानी सामान्य माणसाच्या काळजीत भरच घातलेली आहे.
निवृत्ती जवळ आलेल्या प्रत्येक माणसाला भेडसावणारा प्रश्न म्हणजे, रोज सकाळी उठल्यावर, आऽऽ वासून पसरलेल्या एखाद्या लांबलचक अजगराप्रमाणे भासणाऱ्या दिवसभराचा वेळ कसा घालवायचा? मलाही गेले वर्षभर हा प्रश्न भेडसावत आहे. मी माझ्या परीने या प्रश्नावर मात करण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधून पाहिले.
सर्वात प्रथम मनांत येणारा पर्याय म्हणजे दुसरीकडे कुठेतरी कमी महत्त्वाचे व वेळेचे काटेकोर बंधन नसलेले काम पाहणे. पण थोडा विचार केल्यानंतर असे लक्षात आले की आता या वयात कुठेतरी कनिष्ठ पातळीवरचे काम करणे व आपल्यापेक्षा वयाने व अनुभवाने कमी असलेल्या लोकांचा साहेब म्हणून स्वीकार करणे फारच कठीण आहे. हे म्हणजे जिथे फुले वेचली तिथे गोवऱ्या वेचण्यासारखे आहे.
वेळ घालविण्याचा आणखी एक हुकमी मार्ग म्हणजे वेगवेगळय़ा पोस्ट ऑफिसेसमध्ये वेगवेगळय़ा प्रकारचे पाच-सहा खाती उघडणे. ही सर्व खाती चालवण्यासाठी आणि त्यांची पासबुके अपडेट करण्यासाठी आपल्याला दिवसाचे आठ ताससुद्धा कमी पडतील. पण वारंवार पोस्ट ऑफिसात गेल्यामुळे रक्तदाब आणि नैराश्यासारखे गंभीर विकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी हा पर्याय लगेचच बाद केला. बायकोशी वादविवाद करणं हा खरं तर आयुष्यभर पुरून उरेल असा पर्याय आहे. पण या वादविवादात आपली कधीच सरशी होत नाही, हा आजवरचा अनुभव व त्यातून न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे मी त्यापासून दोन हात दूर राहणेच पसंत केले.
आणखी एक पर्याय, जो अनेक लोक मनापासून निवडतात, तो म्हणजे वधू-वर सूचक मंडळ काढणं. ज्या गोष्टीबद्दल आपल्या मनांत संभ्रमाची स्थिती आहे, ती गोष्ट दुसऱ्याने करण्यासाठी पुढाकार घेणं हे माझ्या तत्त्वात बसत नाही.
पौरोहित्य शिकून भिक्षुकी करावी, असा टिपिकल ब्राह्मणी विचारही माझ्या डोक्यात चमकून गेला. भटजींना इन्कम टॅक्स भरावा लागत नाही याचं मला नेहमीच आकर्षण वाटत आलेलं आहे. पण यातला सगळय़ात मोठा प्रॉब्लेम म्हणजे इतके दिवस जीन्स व टी-शर्ट घालून फिरायची सवय असल्यामुळे, एकदम धोतर व टोपी घालून, गर्दीच्या रस्त्यातून, कुठलीही अप्रिय घटना न घडता आपल्या यजमानाच्या घरी पोहोचणे हा आहे.
असं निरनिराळय़ा विचारांचं थमान माझ्या डोक्यात चालू असताना एक दिवस अचानकपणे मला या समस्येवर तोडगा सापडला व अत्यानंदाने, आíकमिडीजप्रमाणे मला युरेका युरेका असे मोठय़ांदा ओरडावेसे वाटले. माझी बायको आर्ट्स ग्रॅज्युएट असल्यामुळे तिला आíकमिडीज माहीत नाही व युरेका तर त्याहूनही माहीत नाही. सुरेखाप्रमाणेच युरेका हे कुठल्या तरी मुलीचे नांव आहे, असा जर तिचा समज झाला तर भलताच घोळ व्हायचा, म्हणून मी मनातल्या मनात ओरडून घेतलं.
त्यात असं झालं की मध्यंतरी काही कारणांमुळे १-२ दिवस आमच्या घरातील सर्व मंडळी बाहेर जाणार होती. बायको मुले नसती घरा। तोचि दिवाळी दसरा।
हय़ा उक्तीवर आमच्या सर्व मित्रांची ठाम श्रद्धा आहे. त्यामुळे एवढी चालून आलेली सुवर्णसंधी आमचे मित्र सोडणं शक्यच नव्हतं. माझ्या परवानगीची फारशी वाट न पाहता आमच्या मित्रांनी परस्पर पार्टीचा बेत आखून टाकला.
दोन दिवस आमच्या घरी यथेच्छ धुडगूस घालून जो, तो आपापल्या घरी निघून गेला. सर्व जण निघून गेल्यावर एक गोष्ट प्रकर्षांने माझ्या लक्षात आली की घरात प्रचंड पसारा झालेला आहे व ही यायच्या आत जर तो आवरला गेला नाही तर माझी काही धडगत नाही. मी तातडीने हातात झाडू घेतला व तास-दीड तास झटून घर बऱ्यापकी ठाकठीक केलं. या सगळय़ा प्रकारात एक गंमत झाली, ती म्हणजे माझे आखडलेले हात-पाय एकदम मोकळे झाले व हँगओव्हर कुठल्या कुठे पळून गेला.
एक-दोन दिवसांनी पुन्हा गंमत म्हणून मी हातात झाडू घेतला व चांगली तास-दीड तास साफसफाई करून घर बऱ्यापकी चकाचक केलं. परत परिणाम तोच. आखडलेलं अंग पूर्णपणे मोकळं झालं व एकदम हलकं हलकं वाटू लागलं. थोडा बारकाईने विचार केला तेव्हा असं लक्षात आलं की केर काढणं म्हणजे योगसाधनाच आहे.
नीट विचार केला तर तुमच्याही लक्षात येईल की िभतीवरची व छतावरची जळमटं काढताना ताडासन, जमिनीवरचा केर काढताना हस्तपादासन, सोफ्याखालचा किंवा पलंगाखालचा केर काढताना शल्भासन, भुजंगासन, काही अवघड जागी पोहोचण्यासाठी क्वचितप्रसंगी अर्धमत्सेंद्रासन अशा अनेक आसनांचा आधार घ्यावा लागतो. वीरासन व वज्रासनाशिवाय तर केर काढणे व भरणे केवळ अशक्यच आहे. नाकांत धूळ गेल्यामुळे, कपालभाती, भस्रिका, रेचक, कुंभक असे वेगवेगळे प्राणायाम आपोआपच होतात. निवृत्तीनंतर हा एक स्तुत्य उपक्रम होऊ शकतो, असं माझ्या लक्षात आलं.
हय़ा उपक्रमातली इंटरेिस्टग गोष्ट म्हणजे हे काम रोज करता येण्यासारखे आहे. आपल्याकडील वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व वेगवेगळय़ा प्रकारची प्रदूषणं, यामुळे तुमच्या घरात धुळीची कधीच कमतरता भासत नाही. रोज उगवणारा सूर्य जसा नवीन असतो तसे रोज, तुमच्या घरात प्रकट होणारे जळमट नवीनच असते. तंटामुक्त गाव, हागणदारीमुक्त गाव, गरिबी हटाव, मागेल त्याला मागेल तेवढी वीज, असे कधीही पूर्णत्वाला न जाणारे उपक्रम आपले चाणाक्ष राजकारणी वर्षांनुवष्रे राबवत असतात. त्याच चालीवर ‘धूळमुक्त घर’ हा उपक्रम आपण आयुष्यभर राबवू शकतो.
या सगळय़ा प्रकारातून आणखी एक, भले ती कितीही धूसर असली तरी, एक ‘चमत्कारी’ शक्यता निर्माण होऊ शकते, ती म्हणजे तुम्ही चक्क तुमच्या बायकोच्या कौतुकाला पात्र ठरू शकता. जी गोष्ट बाहेरच्या जगात गेली २५-३० वष्रे एवढी मर्दुमकी गाजवून शक्य झालेली नाही ती गोष्ट, तुम्ही तुमच्या स्वत:च्या घरात हातात केरसुणी घेतल्यामुळे शक्य होऊ शकते. क्या बात है।
कुणीतरी म्हटलंच आहे की Life is nothing but creating new possibilities. So why not create one for you.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा