आयुष्याच्या प्रवासात तुम्हा-आम्हा सगळ्यांच्याच वाटय़ाला कधी ना कधी, कुठे ना कुठे चौथी सीट येतेच.या चौथ्या सीटवरच्या प्रवाशाची कुचंबणा समजून घेऊन थोडंसं अंग आक्रसलं आणि मन अधिक दिलदार केलं तर प्रत्येकाचा चौथ्या सीटवरचा प्रवास सुखकर होईल.
गाडी स्टेशनवर थांबता थांबता मिताने गाडीत अक्षरश: उडी ठोकली. हातातली पर्स वरच्या रॅकवर टाकून बसलेल्या प्रवासिनींवर भर्रकन नजर टाकली. तिला हवा तो चेहरा दिसला नाही. तेव्हा तिने मानेनेच कुठे उतरणार, हे विचारायला सुरुवात केली. एक ‘भायखळा’, दुसरी ‘दादर’ अखेर तिसरी त्याच्याही अलीकडचं ‘विक्रोळी’ उद्गारली आणि मिताचा जीव भांडय़ात पडला. ती त्या बाकाजवळ जाऊन टोकाला उभी राहिली. विक्रोळीला उतरणारीची वास्तविक खिडकीची सीट होती. पण सगळ्या जणी आत खिडकीकडे सरकणार आणि मिताच्या वाटय़ाला चौथी सीट येणार हा रेल्वेतला अलिखित नियम होता. नियमाप्रमाणे सगळ्या सरकल्या.. पसरल्या.. आणि मिताच्या वाटय़ाला चौथ्या सीटचा चतकोर कोपरा आला. पहाटेपासून स्वयंपाक, नवऱ्याचा- मुलांचा डबा, मशिनवरचं कपडे धुणं, पूजाअर्चा आणि इतर अनेक कामं धावतपळत उरकणाऱ्या मिताने समोरच्या दांडीचा घट्ट आधार घेत, त्या चौथ्या सीटच्या कोपऱ्यात कशीबशी बसकण मारली. तिच्या समोर तसंच अंग चोरून बसलेल्या माझ्या मनात आलं, आज ‘मधली सीट’ लाभलेल्या या बायकांनी थोडंसं अंग आवरून घेतलं तर चौथ्या सीटवरची मी काय, मिता काय, थोडा तरी आरामात प्रवास करू, नाही का? बरं ‘सुपातले जात्यात’ या न्यायाने आजची मधली सीटवरची उद्या कदाचित चौथ्या सीटवर येणारच आहे. मग का नाही तिला चौथ्या सीटवालीची कुचंबणा कळत? पण कळत नाही म्हणा किंवा तात्पुरतं त्याचं तिला विस्मरण होतं असंही म्हणा!
टीव्हीवरच्या ‘हॅलो सखी’ कार्यक्रमात ‘घरगुती हिंसाचार’ या विषयावरचा कार्यक्रम केल्यानंतर, घरी आलेल्या एका फोनची मला आठवण झाली. अत्यंत सुशिक्षित, उच्चभ्रू घरातली ही पुत्रवधू! तिला तातडीने मदत हवी होती. तिचा पती तिला लग्न झाल्यापासून गेले वर्षभर मारहाण करीत होता. सिगरेटचे चटके देत होता. रात्रभर त्याचा विकृत शृंगार सोसून सकाळी उठलं की हाच नवरा तिच्याशी अत्यंत प्रेमाने वागत होता. चारचौघांत तिची काळजी घेण्याचं, तिचं कौतुक करण्याचं नाटक करीत होता. वर्षभर हा छळ सोसल्यानंतर धीर करून तिने सासूला हे सांगितलं. त्यावरची सासूची प्रतिक्रिया विलक्षण होती. ‘त्यालाच काय, आम्हालाही तू फारशी आवडली नव्हतीस. पण नाइलाजाने आम्ही तुला होकार दिला.’ सासूने हे केवळ सांगितलंच नाही, तर तिचा मुलगाच प्रत्यक्ष बायकोचा छळ करतो ऐकल्यावर ती आणखी आक्रमक झाली. मुलाला समज देऊन, आपल्या सुनेला आपल्या कुटुंबात सामावून घेण्याऐवजी, सुनेला संसारातून जणू उठवून लावण्यासाठी तिने आणखीच अंग अस्ताव्यस्त पसरलं आणि त्या भरल्या घरात, सून वळचणीला अंग चोरून बसलेल्या पाखरागत दिवस काढू लागली. टीव्हीवरच्या त्या कार्यक्रमाने तिला हिंमत दिली. तिनं चौथ्या सीटवरचा आपला अधिकार सांगितला.
रेल्वेच्याच प्रवासात भेटलेली एक प्रवासिनी मंदा! सहज गप्पा सुरू झाल्या आणि चौथ्या सीटवरच्या कुचंबणेचा आणखी एक पैलू नजरेस पडला. मनाला स्पर्श करून गेला. नवरा सरकारी खात्यात नोकरीला. वरकमाई भरपूर. त्या कमाईची उधळण बारबालांवर करताकरता हा गृहस्थ सरळ संसारातून उठून त्या बारबालेच्या घरीच राहायला गेला. आता संपूर्ण पगार वरकमाईसकट थेट त्या बाईच्या हातात पडू लागला. मंदा विरारला तिच्या तीन मुलांसह राहते. नवरा आठवडय़ातून एकदा येतो. चार पैसे हातावर टिकवतो. ज्यात रेशन भरणं, कपडेलत्ते आणि मुलांच्या शाळेचा खर्च भागवणं अशक्य असतं. त्यात पुन्हा पोट भरण्यासाठी मंदाने घराबाहेर पडून कोणतंही काम करायचं नाही हा नवऱ्याचा कडक आदेश! त्यामुळे उपासमारीने व परिस्थितीने बेजार झालेली मंदा त्या दिवशी नवऱ्याचा अर्धा तरी पगार आपल्या हाती पडावा ही विनंती त्याच्या साहेबाला करायला निघाली होती. मंदा, तिचा नवरा आणि तीन मुलं त्यांच्या सुखी संसारात मधोमध बारबालेने बसकण मारली आणि चौथ्या सीटवर अंग आक्रसून बसण्याची वेळ आली मंदावर! कोणी सांगावं? कधी तरी या मंदाच्या जागेवर आजची मधल्या सीटवरची ही बारबाला जाऊन बसेल. कारण कदाचित तिची आजची मधली सीट उद्या एखाद्या तिसऱ्या बाईने बळकावलेली असेल?
मुग्धा, पूर्णपणे अबोल. जणू शब्दच हरवल्यासारखी! ती पाच-सहा वर्षांची होती तेव्हापासून तिने आपल्या आईवडिलांना भांडतानाच पाहिलं. वडील रात्री-बेरात्री दारू पिऊन तर्र्र होऊन यायचे. आईचं आणि त्यांचं आल्या आल्या भांडण सुरू व्हायचं. अनेकदा मुग्धा त्यांच्या भांडणाच्या आवाजाने दचकून जागी व्हायची. एकदा मात्र तिला गाढ झोप लागली. सकाळी उठली तेव्हा घरात भरपूर गर्दी आणि काळीनिळी पडलेली आई असं दृश्य तिने पाहिलं. आई गेली. वर्षांच्या आत आजारी पडून बाबाही वारले आणि मुग्धा पोरकी झाली. मध्यम परिस्थितीतल्या काका-काकूंनी तिला आपल्या घरी नेलं. मुग्धाच्या येण्यामुळे आपल्याला मिळणाऱ्या सुखसोयी, आपल्यावर होणाऱ्या खर्चावर मर्यादा येतात हे तिच्या दोघीही चाणाक्ष चुलत बहिणींनी ओळखलं आणि बघता बघता त्यांनी हात-पाय पसरून बसायला सुरुवात केली. मुग्धाला दिलेलं खाणं खाऊन टाक, तिचा शाळेचा डबा फस्त कर, तिच्यासाठी फ्रॉक घ्यायचं ठरलं की आपल्या मागण्या हट्टाने पुऱ्या करून घे.. एक नाही, अनेक मार्गानी दोघी बहिणींनी तिला जीव नकोसा करून टाकलाय. मुग्धा प्राणपणाने, निगरगट्टपणे ही चौथी सीट घट्ट पकडून आहे. कारण या अफाट जगात एकटीने, उभ्याने प्रवास करण्याएवढं बळ तिच्या पायांत अजून तरी आलेलं नाही.
सुब्रता एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीला लागली, तेव्हा तिला अस्मान ठेंगण झालं होतं. नोकरीला लागून आठवडा होतोय नाही तोच तिच्या लक्षात आलं की आपल्या उच्च शिक्षणामुळे, आपल्या उच्च पदामुळे इथल्या जुन्या, जाणत्या मंडळींच्या स्थानाला हादरा बसलाय. बघता बघता या मंडळींची एकी झाली. आणि सुब्रताला चौकटीबाहेर ढकलण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू झाला. तिच्या कामात चुका काढणं, तिला सहकार्य न करणं, संध्याकाळी उशिरापर्यंत तिला बसवून ठेवणं, बॉसकडे सातत्याने तिच्या तक्रारी करणं आणि तिच्यावर नको त्या कॉमेंट्स करणं या सगळ्यामुळे सुब्रता आक्रसून गेलीय. पण भरभक्कम पगाराची ही नोकरी सोडायला मन राजी नाही. त्यामुळे तीसुद्धा तशीच चिवटपणे ही चौथी सीट लढवत राहिली आहे.
आयुष्याच्या प्रवासात तुम्हा-आम्हा सगळ्यांच्याच वाटय़ाला कधी ना कधी, कुठे ना कुठे ही दुर्दैवी चौथी सीट येतेच. पण त्यापूर्वी कधी तरी आपण मधल्या सीटवरचे सुदैवी प्रवासीही असतो. मधल्या सीटवर असतानाच या चौथ्या सीटवरच्या प्रवासिनीची कुचंबणा समजून घेऊन थोडंसं अंग आक्रसलं आणि मन प्रशस्त, अधिक दिलदार केलं आणि त्या चौथ्या सीटवरच्या प्रवासिनीलाही तिचं हक्काचं स्थान पुरेसं उपलब्ध करून दिलं, तर प्रत्येकाच्याच वाटय़ाला येणारा चौथ्या सीटवरचा हा प्रवास सुखकर नाही का होणार?
नव्या वर्षांत नव्या स्वरूपात,नव्या विषयांसह ‘चतुरंग’ तुम्हाला भेटतो आहे. प्रत्येक लेखावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत. तुमची मते, तुमचे विचार आम्हाला लिहून कळवा. निवडक प्रतिक्रिया नक्कीच प्रसिद्ध करु ‘लोकसत्ता चतुरंग’, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई, ४००७१० किंवा ईमेल करा. chaturang@expressindia.com