आपण दु:खी होतो, कारण आपलं इतरांनी कौतुक करावं, मला यश मिळावं, त्याने मी आनंदी होईन हेच आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं. कुणीही कौतुक न करताही आणि एखाद्या गोष्टीत यश नाही मिळालं तर आपण आनंदी होऊच शकत नाही. इतकं आपण आनंद या शब्दाला मर्यादित करून टाकलं आहे.
जी वनात आनंद, सुख, समाधान असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. व्यक्ती, वस्तू, वैभव इत्यादी माध्यमांतून तो आनंद शोधण्याचा प्रयत्नही आपण करत असतो. याबाबतीतली आपली स्वत:ची अशी काही मतं असतात आणि ती पूर्णत: योग्यच आहेत असं समजूनच आपण चालत असतो. जसे की मुलाला परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळाले तर मी खूश होईन, त्याचे लग्न होऊन आयुष्यात स्थैर्य आले की मी खूश होईन, मी गाडी घेतली की मी खूश होईन. याचाच अर्थ बाहेर ज्या काही घडामोडी घडतील तेव्हा मी खूश होईन. खरा प्रश्न हा आहे की, बाहेरून मिळणारा आनंद, जो वस्तूंकडून मिळेल किंवा एखाद्या व्यक्तीकडून, तो स्थायी असेल का व तो आनंद माझी आंतरिक शक्ती वाढवू शकेल का?
आपल्या शरीराला थोडासाही त्रास झालेला आपल्याला आवडत नाही. अगदी आरामात राहणेच आपण पसंत करतो. मात्र, मनाच्या बाबतीत नेमकी ही जागरूकता दाखवायला विसरतो. आपण मनाला विसरतो की मनाकडे लक्ष देणे आपणास येत नाही? सर्वासाठी आपण वेळ काढतो, पण स्वत:साठी थोडा तरी वेळ आपण काढतो का? एक क्षणभर तरी थांबून पाह्य़लंय का की आपण स्वत: आनंदी आहोत का? खरेतर आपण किती आनंदी आहोत याचं मोजमाप समोरची व्यक्ती कधीच करू शकत नाही. आनंद ही अशी भावना आहे जिला केवळ तुम्हीच जाणू शकता. आपण आनंदापासून तेव्हा दुरावतो तेव्हा आपण आपल्या मनाचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देतो. समजा, आईला वाटते, माझी मुले शाळेतून घरी येतील. मी छानसा पिझ्झा बनवेन. पिझ्झा पाहून मुले आनंदित होतील व मलाही त्यांनी पिझ्झा खाल्ल्यामुळे बरे वाटेल. आईने पिझ्झा बनवायला सुरुवात केली. आईने तिच्या मन:पटलावर एक दृश्य निर्माण केलं, एका तासानंतर काय घडेल हे तिच्या मनासमोर येऊ लागलं, मुलं पिझ्झा खाताहेत. खाताना खूप आनंदी होऊन म्हणताहेत, ‘आई, तू खूप ग्रेट आहेत, किती गं छान बनवलास पिझ्झा. माझ्या आईसारखी आई कुणाचीच नसेल.’ आईने या दृश्याला मनात तयार क रून ठेवले. मनाची शक्ती इतकी मोठी आहे की आपल्याला जे हवं ते आपण मनासमोर आणू शकतो. आता वास्तवात या. मुले शाळेतून घरी आलीत. आईने प्रेमाने त्यांना पिझ्झा खायला दिला. पण मुलांना मात्र तो आवडला नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, ‘हे गं काय आई, असा कसा बनवलास पिझ्झा? याला तर नेहमीची चवदेखील नाही.’ आता यावर आईची मन:स्थिती कशी होईल? राग तर येईलच, थोडेसे अपमानित झाल्यासारखे वाटेल. निराशा तसेच दु:खाची भावना येऊ लागेल. पुन्हा मुलांवर बरसणं, ‘अरे, मी किती मेहनतीने पिझ्झा बनवला. आणि तुम्ही चक्क म्हणता की आवडला नाही. या मुलांना आईची काही कदरच नाही.’ मन निराशेने ग्रासून जाईल.
तुम्ही स्वत:ला आधीच सांगून ठेवलं होतं की, मुलं पिझ्झा खातील, त्यांना तो आवडेल. मग ते माझी स्तुती करतील. अशा प्रकारे आपण मनाचे पूर्ण प्रोग्रामिंग केले. त्याचा डेटा असा होता की मुले खूश होतील. त्याचा रिझल्ट असा होता की त्यामुळे मी खूश होईन. पण जेव्हा डेटा बदलला, तेव्हा रिझल्टही बदलला. खरेतर डेटा असा असावयास हवा, आनंद ही माझी नैसर्गिक स्थिती आहे. मी पिझ्झा बनवतानादेखील खूश आहे व मुलांना खाऊ घालतानादेखील तितकीच खूश आहे, मुलांना पिझ्झा आवडला तर ठीकच आहे, पण जर का त्यांना पिझ्झा आवडला नाही तर त्याचे कारण त्याच्या चवीत कुठेतरी कमतरता असेल म्हणून असेल. पण आपण मात्र दोन्ही गोष्टींना एकत्र करतो व आनंद गमावतो.
आणखी एक उदाहरण. एका कुटुंबातील श्री.चा वाढदिवस होता. श्री.साठी काही भेटवस्तू आणावी म्हणून सौ. सकाळीच बाहेर पडल्या. कुठेतरी सेल लागलेला. दोन बस बदलून स्वारी दुकानापर्यंत येते. एक छानसा शर्टही घेतला जातो. पुन्हा त्याच ट्रॅफिक-जॅममधून घरी जाईपर्यंत सौ.ची खूप तारांबळ उडाली. संध्याकाळी ऑफिसमधून श्री. घरी आल्यानंतर सौ. आनंदाने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात व सोबत आणलेला शर्टही, पण ‘श्री’ना शर्ट काही आवडत नाही. ‘असा कसा ग रंग याचा? याचे टेक्श्चर पण बरोबर नाही.’ ही वाक्ये ऐकल्यावर सौ.ची मन:स्थिती कशी होईल हे न सांगणंच योग्य. सौ.ची अपेक्षा होती, मी आणलेल्या शर्टामुळे श्री. खूश होतील व ते खूश झालेत तर मीदेखील खूश होईन, पण प्रत्यक्षात मात्र काय घडले?
प्रश्न शर्टाचा असो, पिझ्झाचा असो किंवा कुणी आपल्याबरोबर कसा वागतोय याचा, कुठे ना कुठे आपण हे समीकरण बनवतो की माझ्या आजूबाजूचे लोक जेव्हा आनंदी असतील तेव्हाच मलाही आनंद मिळेल. याचा अर्थ माझ्या आजूबाजूचे लोक दु:खी असतील तर मी आनंदी कशी राहू शकेन? दुसऱ्यांची मन:स्थिती व त्यांच्या व्यवहारावर माझ्या मनाची स्थिती आधारित असणं खरंच कितपत योग्य आहे?
आता पुन्हा एक दृश्य पाहूया. मुले आनंदाने पिझ्झा खाताहेत. त्यांना खाताना पाहून मीदेखील आनंदी आहे. पण त्याच वेळी ऑफिसमधून बॉसचा फोन येतो की, मी केलेल्या कामात खूप चुका आहेत. आता पिझ्झाही तोच आहे, मुलेही तीच, मुले आनंदी आहेत, पण मी मात्र दु:खी. आता तुम्ही म्हणाल, की ही तर वेगळी परिस्थिती आहे. पहिल्या परिस्थितीत मी आनंदी होते, म्हणजे दुसऱ्या परिस्थितीला माझा आनंद घालवायला वेळ लागला नाही. आता आपलं जीवन कशावर आधारित असावं- परिस्थितीवर, लोकांवर की त्यांच्या स्वभावावर?
आपण दु:खी होतो, कारण आपलं इतरांनी कौतुक करावं, मला यश मिळावं, त्याने मी आनंदी होईन हेच आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं. कुणीही कौतुक न करता, एखाद्या गोष्टीत यश नाही मिळालं तर आपण आनंदी होऊच शकत नाही. इतकं आपण आनंद या शब्दाला मर्यादित करून टाकलं आहे.
वैद्यकीयदृष्टय़ा आपणा सर्वाना याची कल्पना असते की जेव्हा बॅक्टेरिया वा जीवाणू माझ्या शरीरावर हल्ला करतात तेव्हाच मला सगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स होतात. पण जर का मी माझ्या शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवली तर बॅक्टेरिया माझ्या शरीरावर हल्ला करूच शकत नाही. जेव्हा आपण शरीरिकदृष्टय़ा कमजोर असतो तेव्हाच या बॅक्टेरियांना संधी मिळते. वातावरण तर नेहमी बदलणारं असतं. कधी कडाक्याची थंडी तर कधी प्रचंड उष्मा यांना आपणास सामोरे जावे लागते. कुठल्याही परिस्थितीत आपणास आपल्या शरीराला निरोगी ठेवणं गरजेचं असते. आपण असं नाही म्हणत की वातावरण तर बदलू दे, मग शरीराकडे लक्ष देऊ, कारण आपण रोजच आपल्या शरीराकडे लक्ष देतो. मग बाहेर कितीही परिवर्तन होऊ दे, बाहेरील परिवर्तनाने आतील स्थितीवर काहीही परिणाम होत नाही. बॅक्टेरियायुक्त वातावरण असूनही आतली प्रतिकारशक्ती आपलं काम न चुकता करते आणि आपणास याचा थांगपत्तादेखील लागत नाही. परिस्थिती या बॅक्टेरियासारखीच आहे. ती तिचं इन्फेक्शन पसरवणारच आहे. पण जसं शरीराकडे लक्ष ठेवता तसं लक्ष मनाकडे दिलं, त्याचीही रोज साफसफाई केली, त्यालाही शरीरासारखं धष्टपुष्ट केलं तर बाहेर काहीही होत असलं, कसलीही परिस्थिती आली तरी तुम्ही आनंदी राहाल, कारण तुमचं मन त्या वेळी स्वाधीन (स्व-अधीन) असेल, पराधीन नाही. ल्ल
(प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ‘ओम शांती मीडिया’ या वृत्तपत्र विभागाद्वारा प्रकाशित झालेल्या आध्यात्मिक प्रवचनांचा मराठी अनुवाद)