स्त्रीचे विशिष्ट अवयव आजही मूळ नावांऐवजी वेगळ्याच नावाने संबोधले जातात. गेल्या महिन्यात ‘दिल्ली मेट्रो’तील स्तनाच्या कर्करोगासाठी सावधानता बाळगा हे सांगणारी मोहीम चक्क ‘चेक युअर ऑरेंजेस’ या नावाने प्रसिद्ध झाली आणि सर्वत्र टीकेची झोड उठली. उपभोग्य वस्तू म्हणूनच आजही अनेक ठिकाणी स्त्रीच्या देहाचे वर्णन केले जाते. अनेकदा स्त्रीसुद्धा याला बळी पडत स्वत:च्या शरीरावर कात्री चालवून घेते. यातूनच ‘व्हजायनल रिजूविनेशन मार्केट’,‘ब्रेस्टॉरन्ट्स’ सारख्या संकल्पना प्रत्यक्षात येतात. स्त्रीचं शरीर, त्याचं वस्तूकरण यावर विविध देशांमधल्या दृष्टिकोनांवरचा लेख…

गेल्या महिन्यात ‘दिल्ली मेट्रो’तील एका जाहिरातीमुळे बराच गदारोळ झाला. स्तनांच्या कर्करोगासाठी जनजागृती करणाऱ्या एका मोहिमेत स्त्रियांना ‘चेक युअर ऑरेंजेस’ (तुमच्या संत्र्यांची तपासणी करा.) असा अजब सल्ला देण्यात आला. संत्र्याची उपमा अर्थातच स्तनांना दिली गेली होती. ही पत्रके ‘मेट्रो’त सर्वत्र झळकल्यावर त्यावर टीकेची झोड उठली. मात्र दिल्ली मेट्रो प्रशासनाने याची दखल घेत लगेचच ही मोहीम मागे घेतली.

Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल
Child Marriage, Supreme Court, Child Marriage Prevention Act,
बालविवाहाचा फेरा : भारत मुक्त कधी होईल?
Tara Bhawalkar, Tara Bhawalkar latest news,
‘‘शिक्षणाच्या जोडीने शहाणपणही यावं’’

समाजमाध्यमांवर एके ठिकाणी म्हटलं गेलं, की, ‘ज्या देशात स्तनांना स्तन म्हणता येत नाही, तिथे स्तनांच्या कर्करोगाबाबत ठोस पावलं कशी काय उचलली जाऊ शकतात?’ हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहेच, पण त्यानिमित्ताने इतर अनेक मुद्द्यांचा विचार करणं आवश्यक आहे. जसं की, स्त्रियांच्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचा सार्वजनिक अवकाशात आणि माध्यमांमध्ये कसा उल्लेख केला जातो? स्त्रियांच्या लैंगिक अवयवांचं चित्रण कसं केलं जातं? पर्यायानं त्यांच्या लैंगिक धारणा, गरजा आणि अडचणी यावर मुक्तपणे चर्चा होते का? हे प्रश्न अर्थातच फक्त भारतापुरते सीमित नाहीत. जगभरात यावर चर्चा होत राहते, आणि तरीही ती चर्चा अपुरीच आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

बहुतेक संस्कृतींमध्ये सामान्यत: स्त्रीच्या जननेंद्रियांचा थेट उल्लेख टाळण्याकडे भर असतो, असं दिसतं. त्यामुळे योनी, योनीच्या आतल्या भागाची रचना, गर्भाशय इत्यादी अवयवांची थेट नावं घेताना माणसं कचरतात. यावर विचार केल्यावर लक्षात येतं की, आपल्या कुटुंबांमध्येही अशा चर्चा सहजासहजी घडत नाहीत. अनेक अभ्यास असंही सांगतात की, पुरुषांच्या लैंगिक अवयवांवर, आणि पुढे जाऊन लैंगिकतेवर, लैंगिक वर्तणुकीवर जितकी मोकळेपणानं चर्चा होते तितकी स्त्रियांच्याबाबतीत होत नाही. त्यामुळे स्त्रियांच्या बाबतीत मुख्यत: दोन गोष्टी घडतात. एकतर त्यांच्या शरीराचं वस्तूकरण (ऑब्जेक्टिफिकेशन) म्हणजे एखाद्या व्यक्तीला केवळ उपभोग्य वस्तू म्हणून वागवणं किंवा मग तिच्या शरीरासंदर्भातील काही अडचणी किंवा विकारांवर वैद्याकीय चर्चा होणं. थोडक्यात, स्त्रीचं शरीर हे उपभोग्य असू शकतं, किंवा मग ते सदोष असतं. त्यापलीकडे जाऊन तिच्या लैंगिक गरजा, आकांक्षा, आनंद, त्याअनुषंगाने तिची वर्तणूक यांवर फार चर्चा घडत नाही. अशी चर्चा व्हायला लागली, की ती आपोआप ‘सेन्सॉर’ होते. त्यामुळे अगदी वैद्याकीय कारणांसाठी जरी स्तनांचा ‘स्तन’ म्हणून उल्लेख केला, तर तो आक्षेपार्ह मानला जातो, आणि त्यातूनच असे विचित्र शब्दप्रयोग केले जातात.

हे वस्तूकरण म्हणजे नेमकं काय? १९९७ मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनपर लेखात बार्बरा फ्रेड्रीकसन आणि टॉमी एन रॉबर्ट्स या मानसशास्त्राच्या प्राध्यापकांनी ‘ऑब्जेक्टिफिकेशन थियरी’ (वस्तूकरणाचा सिद्धांत) मांडला. त्यात त्या असं म्हणतात, की स्त्रियांच्या शरीराला पुरुषांच्या लैंगिक आनंदासाठीच्या वस्तूसारखं वापरलं जातं, आणि याला बाजारपेठेत तसंच माध्यमांमध्ये उत्तेजन मिळतं. यात स्त्रियांचं असणं आणि दिसणं हे त्यांच्या स्वत:च्या आनंदासाठी आणि सौख्यासाठी कधीच नसतं. ते नेहमीच पुरुषांच्या नजरेत आपण अधिक आकर्षक कसे दिसू, या दृष्टीनं आकार घेतं. या प्रक्रियेत हळूहळू स्त्रिया स्वत:चंच वस्तूकरण करायला लागतात. पुरुषांच्या दृष्टिकोनातून स्वत:च्या शरीराकडे पाहायला लागतात. आणि या सगळ्याचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

हळूहळू हे वस्तूकरण म्हणजे जणू काही पुरुषांचा अधिकारच आहे, अशी व्यवस्था निर्माण होते. या वस्तूकरणाला वयाचं किंवा सामाजिक-आर्थिक वर्गाचं बंधन नसतं. ते समाजाच्या सगळ्या स्तरांवर कमीअधिक प्रमाणात होतच राहतं आणि बाजारपेठ त्यावर स्वार होते. दररोज ‘स्त्रियांसाठी खास’ अशा वेगवेगळ्या उत्पादनांचा मारा होत राहतो आणि कंपन्यांना अधिकाधिक नफा मिळत राहतो. स्त्रीने कसं राहावं आणि वागावं याचे नीतिनियम प्रत्येक संस्कृतींमध्ये असतात. पण अशा प्रकारचं वस्तूकरण ही त्याची पुढची पायरी असते. यात कदाचित स्त्रीला स्वत:लाच कळत नाही, की तिचं शोषण केलं जात आहे. हे ‘अप्रत्यक्ष’ शोषण स्त्रियांना सर्वार्थाने मारक ठरतं, हे वेगळं सांगायला नकोच.

याची दोन उदाहरणं पाहू. लॅबियाप्लास्टी(Labiaplasty) हा एक प्रकार अनेकांना माहीत असू शकेल. लेबिया म्हणजे योनीच्या बाहेरील ओठांच्या आकाराची त्वचा.अनेक स्त्रिया हे ‘लेबिया’ प्लॅस्टिक सर्जरीचा वापर करून ‘ठीक’ करून घेतात. अनेक डॉक्टरांचं यावर असं मत आहे, की अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेची खरं तर वैद्याकीयदृष्ट्या गरज असतेच असं नाही. अगदी क्वचित अशी गरज असू शकते, पण त्याचं प्रमाण अत्यल्प आहे. बहुतेकदा समागमाच्या वेळेस आपले अंतर्गत अवयव अधिक आकर्षक, परिपूर्ण दिसावेत यासाठी केलेला हा आटापिटा असतो. त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत, जसं अनेक स्त्रियांच्या लैंगिक इच्छेवर याचा विपरीत परिणाम झालेला आहे. शिवाय इतर काही संसर्गाचा धोकाही उद्भवतो. अमेरिकेत २०१४-२०१५च्या सुमारास विशेषत: कौमार्यावस्थेतल्या किशोरवयीन मुलींचा ओढा या शास्त्रक्रियेकडे अधिक वाढू लागला. त्यातल्या अनेकींसमोर त्यांच्या लेबियाचं एक ‘आदर्श’ चित्र होतं. ते म्हणजे शांत, सुंदर शिंपल्यासारखं. आणि त्याला चक्क ‘बार्बी’ असं म्हटलं गेलं. तीच बार्बी बाहुली, जी प्लास्टिकची असते, आणि जिला जननेंद्रियं नसतात. कुतूहलापोटी मी भारतात याचं प्रमाण किती आहे, हे पाहिलं.

२०१७ मध्ये जगभरात झालेल्या ‘लॅबियाप्लास्टी’मध्ये भारताचा क्रमांक दहावा लागतो. वेगवेगळ्या शहरांत ही सुविधा उपलब्ध आहे. अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि उपचारांच्या बाजारपेठेला ‘व्हजायनल रिजूविनेशन मार्केट’ असं संबोधलं जातं. ‘रिजूविनेशन’ म्हणजे कायापालट, पुनरुज्जीवन वगैरे. एकूणच योनीसंदर्भातले सर्व काही बदलवून टाकणारी ही बाजारपेठ तेजीत आहे. २०३०पर्यंत हे मार्केट आत्तापेक्षा २२ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज वर्तवला जातो. थोडक्यात, यातल्या सगळ्या संभाव्य धोक्यांची कल्पना असूनही स्त्रिया अधिकाधिक प्रमाणात अशा शस्त्रक्रिया करून घेतील हे नक्की.

दुसरं उदाहरण म्हणजे अमेरिकेतील ‘ब्रेस्टॉरन्ट्स’(Breastaurants). रेस्टॉरंट या शब्दामागे ‘ब्रेस्ट’ जोडून तयार केली गेलेली ही संकल्पना. इथे ‘आकर्षक’ कपड्यातल्या मुली परिचारिकेचं काम करत. त्यांना पुरुषांना खूश करण्याचं प्रशिक्षण दिलं जाई. त्याच वेळी त्यांना हेही सांगितलं जात असे, की हा कुठलाही ऐरागैरा क्लब नव्हे, तर एक ‘फॅमिली रेस्टॉरंट’ आहे. म्हणजेच स्त्रियांनी एकाच वेळेस उत्तान आणि आकर्षक असणं अपेक्षित होतं, पण तरीही आब राखून राहणंदेखील अत्यावश्यक होतं. ‘हूटर्स’ (Hooters) या रेस्टॉरंटची साखळी अमेरिकेत १९८३पासूनच विस्तारत होती, त्यांना पहिलं ‘ब्रेस्टॉरन्ट’ म्हणतात. २०१२ मध्ये ‘बिकिनी स्पोर्ट्स बार आणि ग्रील’ या रेस्टॉरंटने अधिकृतरीत्या ‘ब्रेस्टॉरन्ट’ या नावाची नोंदणी केली. परंतु २०१९ मध्ये मात्र ते कायदेशीर कचाट्यात अडकले, आणि त्यांना हे नाव मागे घ्यायला लागलं. तिथे काम करणाऱ्या मुलींचे अनुभव वाचताना असं लक्षात येतं, की जरी अशा ठिकाणी नोकरी करण्यास त्या स्वत:हून तयार झाल्या होत्या, तरीही प्रत्यक्ष काम करायला लागल्यावर मात्र त्यांच्या ‘वस्तूकरणाला’ काही धरबंधच उरला नाही. त्यांच्याकडून करून घेतलेले शारीरिक आणि मानसिक कष्ट त्यांच्या लिखित कंत्राटाहून किती तरी जास्त प्रमाणात होते. त्यामुळे हे सगळं त्यांची ‘वैयक्तिक निवड’ असं म्हणून सहज सोडून देता येत नाही.

थोडक्यात, स्त्रीच्या लैंगिक आशाआकांक्षा आणि वर्तन हे पुरुषांना रिझवणारं आणि पुरुषांनीच ठरवून दिलेलं असलं, तर कदाचित समाजमान्य होतं. तिने स्वत:हून तसे प्रयत्न केले, तर मात्र तितक्याशा बऱ्या प्रतिक्रिया येताना दिसत नाहीत.

पुरुषांच्या नजरेतून स्त्रीकडे पाहणं हे बाजारपेठेपुरतं मर्यादित नाही. २०१३मध्ये सुझन मॉर्गन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अमेरिकेतील काही वैद्याकीय महाविद्यालयांतील पाठ्यपुस्तकांचा अभ्यास केला. त्यात त्यांना असं आढळलं, की बहुतेकदा पुरुषाचं शरीर हे एक ‘नॉर्म’ (आदर्श) मानलं जातं. स्त्रीचं शरीर हे ‘पुरुषापेक्षा वेगळं’ असं प्रतीत केलं जातं. म्हणजे पुरुषाच्या तुलनेत तिच्या शरीराचा अभ्यास होत राहतो. त्यामुळे वैद्याकीय क्षेत्र हे ‘जेंडर न्यूट्रल’ (लिंगभावाप्रति तटस्थ) असतं, या धारणेला धक्का बसला. शरीराचा अभ्यास शिकवतानाच कुठे तरी कळत-नकळत लैंगिक भेदभाव पेरला जातो, आणि त्याचा परिणाम डॉक्टरांच्या एकूण दृष्टिकोनावर होऊ शकतो, हे या अभ्यासाने सिद्ध करू पाहिलं. त्यामुळे काही देशांमध्ये स्त्रीच्या लैंगिक अवयवांना अधिक तटस्थ नावं कशी देता येतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रूढ झालेली इंग्रजी नावं बदलणं अवघड आहे, पण तरीही भाषा बदलल्यानं लिंगभावाप्रति असणारा दृष्टिकोन बदलता येऊ शकतो का, यावर सखोल विचार सुरू आहे. आपल्याच भाषेचं उदाहरण घ्यायचं झालं, तर ‘वल्वा’ किंवा ‘क्लिटोरिज’ला मराठीत चटकन शब्द आठवत नाहीत. कुठल्याही अंतर्गत अवयवांना सरसकट ‘योनी’असं संबोधलं जातं. हे असं का होतं याचा विचार करणं गरजेचं आहे.

याचं एक उत्तर असं आहे, की हे स्त्रीला लैंगिक आनंद देणारे अवयव आहेत. त्यांचा प्रजननाशी काही संबंध नाही. त्यामुळे त्यावर चर्चा करणं टाळलं जातं, आणि ते सातत्याने टाळलं गेल्यामुळे पूरक चर्चाविश्वच निर्माण होत नाही. त्यामुळे सुरुवात करायला हवी ती रोज वापरता येतील असे ‘प्रतिशब्द’ शोधण्यापासून.

या सगळ्यावर सखोल संभाषणं व्हायला हवीत. अनेकदा या चर्चा केवळ पाश्चात्त्य देशांच्या चष्म्यातून होत असतात. स्त्रीचं शरीर, लैंगिकता यावर आपल्यासारख्या देशांमध्ये काय आणि कसं संशोधन झालेलं आहे, हे पाहणंही आवश्यक आहे. ‘ऑरेंजेस’ जाहिरातीमुळे असे अनेक प्रश्न आपल्या मनात यायला हरकत नाही.

gayatrilele0501@gmail.com

Story img Loader