१८५५ मध्ये स्त्रियांसाठी ‘सुमित्र’ या मासिकाचे प्रकाशन सुरू झाले, तेव्हापासून सुमारे दीडशे वर्षे स्त्रियांची या नियतकालिकांबरोबरच्या नात्याची सुरुवात झाली. स्त्रीमनाशी संवाद सुरू झाला. त्या वेळचे अनेक विषय, परिसंवाद आजच्या काळातही लागू होतील असे आहेत. काय चर्चा रंगायच्या मासिकांतून, काय विषय अभ्यासले गेले पाक्षिकांतून, कशी होती शीर्षके, कोण कोण होत्या लेखिका, संपादिका त्या त्या काळात? हे जाणून घेणे उद्बोधक ठरेल. त्या रंजक अभ्यासाचा हा आढावा दर पंधरा दिवसांनी.
आजच्या युगाचे एका वाक्यात वर्णन करायचे तर ‘माध्यमांचे युग’ असेच करावे लागेल. इंटरनेटच्या माहितीच्या महाजालाने आज अवघे जीवनच व्यापून टाकले आहे. बहुवाहिन्या परस्परांतील स्पर्धेच्या उत्साहात रोज आपल्या ताटात हवे-नको ते सारे वाढत आहेत. मसालेदार राजकारण ते मसालेदार खाद्यपदार्थ, वज्र्य काही नाहीच. या साऱ्या पसाऱ्यात स्त्रियांसाठी खास काय आहे? असल्यास तसे किरकोळच. माध्यमांच्या या पसाऱ्यात विचारांना चालना, प्रबोधन, संस्कार, संवाद फारसे कुठे जाणवत नाही, वाटावं की वन वे ट्रॅफिक आहे.
या दृष्टीने विचार केला की वृत्तपत्रं, नियतकालिकांच्या मुद्रित माध्यमांचे वेगळेपण व वैशिष्टय़ निश्चित जाणवते. समाजातून वृत्तपत्र, नियतकालिकांकडे म्हणजेच मुद्रित माध्यमांकडे आणि माध्यमांकडून पुन्हा समाजाकडे आदान-प्रदानस्वरूपी वाहणाऱ्या अशा प्रवाहांनी समाजमनाचे पोषण होते. वाचकांशी संवाद करीत नियतकालिके, वृत्तपत्रे वाचकांच्या अभिरुचीला विकसित करीत वाचकांना समृद्ध करतात. वृत्तपत्रे वाचकांना दैनंदिन जीवनाबरोबर ठेवतात. तर नियतकालिके (पाक्षिके, साप्ताहिके, मासिके इत्यादी) वाचकांना काळाबरोबर ठेवतात. म्हणूनच मुद्रित माध्यमाचे आणि तत्कालीन समाजाचे, वाचकांचे एक दृढ, जवळचे मानसिक नाते निर्माण झालेले असते. म्हणूनच कोणत्याही काळाच्या अभ्यासाला मुद्रित माध्यमाशिवाय दुसरे प्रभावी साधन नाही.
स्त्रियांच्या संदर्भात तर हे नाते अधिक उत्कट, अधिक जिव्हाळय़ाचे आहे. गेल्या काही वर्षांतील हे नाते नसून जवळजवळ दीडशे (१५०) वर्षांचे जुने आहे. १८५५ मध्ये स्त्रियांसाठी ‘सुमित्र’ या मासिकाचे प्रकाशन सुरू झाले. तेव्हापासून स्त्रियांच्या नियतकालिकांबरोबरच्या नात्याची सुरुवात झाली. स्त्रीमनाशी संवाद सुरू झाला. अजूनही हा संवाद चालू आहेच. या संवादाचा, या जिव्हाळय़ाच्या नात्याचा इतिहास बनला. काळाची स्पंदने त्यात उमटली. काळाच्या प्रत्येक टप्प्यावर संवादाचे स्वरूप पालटले. गुरू-मार्गदर्शक-तत्त्वज्ञ (गाइड, टीचर, फिलॉसॉफर) या तीनही भूमिकांतून स्त्रियांच्या नियतकालिकांनी स्त्रीमनाचे संवर्धन केले. विषय, आशयाचा काळानुरूप कायापालट आपोआप होत राहिला. बोलणारे, लिहिणारे बदलले. वाचणारे, ऐकणारे नवे आले. परंतु परस्परांच्या संवादात कुठेच खंड पडला नाही. कारण स्त्री, स्त्रीमन, स्त्री-जीवन या संपूर्ण काळातला महत्त्वाचा विकसनशील, परिवर्तनशील घटक होता. स्त्रियांच्या विकासासाठी होणारे शैक्षणिक, सामाजिक कार्य त्यातून पालटणारा विचारव्यूह, बदलणारे सांस्कृतिक वातावरण इत्यादींच्या समन्वयातून एकोणिसाव्या शतकाच्या साधारण उत्तरपर्वात स्त्री-जीवनाची दीर्घकाळची घडी बदलून नवीन दिशेने वाटचाल सुरू झाली.
काळाबरोबर उत्क्रांत होत जाणाऱ्या वाटचालीच्या प्रत्येक टप्प्यावर परिवर्तनाच्या स्वरूपानुसार युग संवेदना बदलली. ‘काळाची गरज’ बदलली. त्या बदलांशी समांतर स्वरूपात स्त्री-मनाशी होणारा संवाद बदलला. उद्दिष्टे बदलली. मासिकांचे अंतरंग नवे नवे रूप धारण करीत आले. स्त्रियांच्या मासिकांची नावे व उपशीर्षके बघितली तरी बदलत्या संवादाचे स्वरूप स्पष्ट होईल. १९०० पर्यंत शीर्षके कोणती होती,
तर -‘अबला मित्र,’ ‘स्त्रियांसाठी उपयुक्त मासिक पुस्तक,’ ‘स्त्री शिक्षण चंद्रिका,’ ‘स्त्रियांना उपयोगी पडतील अशा विषयांवर सुबोध लेख,’ ‘गृहिणी,’ ‘कुलवधूंच्या ज्ञानवर्धनार्थ आणि मनोरंजनार्थ मासिक पुस्तक!’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा