‘सुमित्र’ हे स्त्रियांसाठीचे पहिलेवहिले मासिक १८५५ साली प्रसिद्ध झाले. या काळात ‘शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.’ ही जाणीव झाल्यानेच स्त्रियांनाही शिक्षणाच्या प्रवेशद्वारातूनच नेले पाहिजे, हा विचार विकसित झाला. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यासाठी कार्य करण्याचा ध्येयाने पुरुषवर्ग भारावून पुढे आला.

स्त्रि यांसाठी प्रसिद्ध होणाऱ्या ‘सुमित्र’ या पहिल्या मासिकाचे प्रकाशन १८५५ मध्ये सुरू झाले. सांस्कृतिक दृष्टीने ही एक घटना होती. परंतु योगयोगाने घडली नव्हती. स्त्रियांच्या संदर्भात विकसित होत आलेल्या जाणिवेचे ते फलित होते.
१८१८ कंपनी सरकारचे राज्य सुरू झाल्यानंतर काही वर्षांनी प्रबोधनपर्वाची सुरुवात झाली. नवशिक्षणाने ज्ञानाचे महत्त्व पटल्याने शिक्षण प्रसाराने वेग घेतला. त्याच बरोबर सामाजिक सुधारणांची अनिवार्यतासुद्धा जाणवली. परंपरागत विचारांची बंधने दृढ असल्याने सामाजिक प्रबोधनाचीही गरज होतीच. तत्कालीन तरुण पिढीला सामाजिक स्थिती-गतीच्या होणाऱ्या जाणिवेमध्ये ‘स्त्री’ एक महत्त्वाचा घटक होता. स्त्रीच्या जीवनातील शिक्षणाचा अभाव, बालविवाह, केशवपन, बाल-जरठ विवाह यांसारख्या रूढींनी स्त्री-मनाची होणारी कोंडी जाणवत होती. स्त्रियांची विपन्न स्थिती घरात, समाजात प्रत्ययास येत होती. स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी काही तरी केले पाहिजे. स्त्रियांना शिक्षण दिले पाहिजे. हा विचार पुढे आला.
‘शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.’ ‘शिक्षण सर्वागीण सुधारणेचे प्रवेशद्वार आहे.’ ही जाणीव झाल्यानेच स्त्रियांनाही शिक्षणाच्या प्रवेशद्वारातूनच नेले पाहिजे, हा विचार विकसित झाला. ‘एक स्त्री सुधारली की एक कुटुंब सुधारते’ या विचारांनीच महात्मा फुले यांनी १८४८ मध्येच पाच विद्यार्थिनींना बरोबर घेऊन पुण्यात भिडेवाडय़ात स्त्री-शिक्षणाचा प्रारंभ करून दिला होता. इतकेच नव्हे तर १८६६मध्ये भारतात आलेल्या मेरी कार्पेटर यांनी ‘स्त्रियांना प्रशिक्षण देऊन स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी तयार करावे’ असे सुचविले परंतु त्यापूर्वीच महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना ‘शिक्षिका’ म्हणून तयार केले होते. हे आपण जाणतोच.
त्याच सुमारास मराठी वृत्तपत्रसृष्टी स्थिरावत होती. समाज प्रबोधन व लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम असणाऱ्या मराठी वृत्तपत्रसृष्टीचा प्रारंभ बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण (१८३२) व दिग्दर्शन (१८४०)च्या रूपाने करून दिला. अन्य विषयांबरोबर ‘स्त्री-शिक्षण’ हा वृत्तपत्रांतील एक प्रधान विषय होता.
स्त्री-शिक्षणाचे महत्त्व समाजाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रीतीने सातत्याने पटवून दिले जात होते. एक उद्बोधक उदाहरण बघता येईल. १८५४ मध्ये ‘ज्ञानप्रसारक’मध्ये क्रमश: ‘उपदेशपर कथा’ नावाची कथा प्रसिद्ध झाली. या कथेतील नायिका पतीबरोबर जहाजातून प्रवास करीत असताना वादळ होते. जहाज फुटून ती दुसऱ्या बेटावर जाते. पतीने तिला शिकवलेले असते. म्हणूनच चार वर्षे पुरुषवेश धारण करून ती शाळेत शिकविण्याचे काम करते. ‘प्राणप्रिय पतीला’ पत्र लिहून सर्व हकिकत कळवते. बेटावरील राजाच्या मदतीने पतीकडे परत येते. अशी कथा. शाळेत पुरुषवेशात शिकवणाऱ्या नायिकेचे तसेच शेवटी नायक उमाकांत पत्नीला जहाजातून उतरवून घेण्यास आला आहे, अशी चित्रेही आहेत. नायिका परतल्यावर स्वत:ची शाळा काढते. स्त्रियांना शिकविण्याचे काम सुरू करते. कथेच्या शेवटी सहा तात्पर्ये आहेत- त्यातील पाचवे तात्पर्य महत्त्वाचे आहे. ‘विद्याभ्यास मनुष्यास अवश्य आहे. असे जाणून पुरुष व स्त्रिया यांमध्ये भेद न धरता त्यांस विद्या शिकवली असता विद्येपासून होणारे जे लाभ आहेत ते झाल्यावाचून कधीही राहणार नाहीत.’ हे तात्पर्य व पुरुषवेशात शिकविणाऱ्या नायिकेचे चित्र अतिशय सूचक आहे. पतीने तिला शिकवले. परंतु नोकरी करण्यासाठी तिला पुरुषवेश घ्यावा लागला. कारण जिथे ‘स्त्री-शिक्षण’ समाजाला स्वीकारणे जड होते तिथे स्त्रीने नोकरी करणे. ‘बाप रे बाप!’ परंतु स्त्री-जीवनाविषयीचे नवे भानही व्यक्त होतेच. ती स्त्री शिकली होती म्हणूनच ती परक्या बेटावर चार वर्षे राहू शकली. परत आल्यावर तिने स्त्रियांना शिकविण्याचे काम सुरू केले. कथा-लेखक भविष्याचे सूचनच करीत होता.
 स्त्री-शिक्षणासाठी पूरक प्रयत्न, तसेच स्त्री-मनाचे प्रबोधन करण्यासाठी स्वतंत्र नियतकालिक असावे ही जाणीवही अन्य कार्यातूनच पुढे आली. स्त्रियांना शिकविण्यासाठी समाजाने तयार होणे आवश्यक होते. तसेच स्त्रियांच्या मनाची तयारीसुद्धा होणे गरजेचे होते. स्त्रियांचे विषय वेगळे, स्त्रियांच्या उद्बोधनाची गरज वेगळी त्यासाठी स्वतंत्र नियतकालिकच हवे की जे स्त्रियांना स्वतंत्रपणे वाचता येईल. काळाच्या गरजेने हे भान विचारवंतांच्या मनात जागे केले.
एल्फिन्स्टन महाविद्यालयातील
प्रो. रीड आणि पॅटर्न यांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन १८४८ मध्ये ‘स्टुडंट लिटर्स व सायंटिफिक’ सोसायटीची स्थापना केली होती. ऑगस्ट १८५५ मध्ये रामचंद्र गोपाळ टिपणीस यांच्या संपादनाखाली ‘सुमित्र’चा वीस पृष्ठांचा पहिला अंक प्रसिद्ध केला. ‘मराठी मुलींचे मासिक पुस्तक’ असा उपमथळा होता. ‘स्त्रियांच्या अंत:करणास उपदेश घेऊन त्यांची वर्तणूक सुधारेल अशा प्रकारचे विषय निरंतर दिले जातील’ असे उद्दिष्ट स्पष्ट दिले होते. शेजारी शेजारी बसून मासिक वाचणाऱ्या दोन मुलींचे चित्र पहिल्या अंकाच्या अनुक्रमणिकेबरोबर होते. पहिल्या अंकात संपादकांनी म्हटले आहे- ‘‘आपल्या देशात अलीकडे खऱ्या विद्येचा बराच प्रसार होत चालला आहे व लोककल्याणाची अनेक कामे प्रचारात आली आहेत. त्यातीलच स्त्री-शिक्षण हे एक होय. स्त्रियांस विद्या शिकवू नये, अशा सर्व लोकांच्या गैरसमजुतीमुळे पूर्वी याचा पाया घालण्यास लोककल्याणेच्छु विद्वानांस फार मेहनत घ्यावी लागली. परंतु त्यांच्या कामास यश येऊन स्त्री-शिक्षणाची वृद्धी होत चालली आहे असे दिसते. तर त्यास साह्य़ व्हावे या हेतूने हे पुस्तक काढण्यास आरंभ केला आहे. परंतु तो सिद्धीस नेणे हे सर्वाकडे आहे.’’
ऑगस्ट १८५५ ते मे १८५७ अशी साधारण दोन वर्षे प्रसिद्ध होणाऱ्या ‘सुमित्र’ मासिकाने स्त्रियांच्या मासिकाची ज्ञान, उद्बोधन व मनोरंजन याची उत्तम सांगड घालून एक नमुनाच तयार केला. अभंग, संवाद, सुबोध, आयुष्याचे बळ, रीतीने वागावे, स्त्रियांचा मोठेपणा, सृष्टिसौंदर्य तर माहिती नावाच्या सदरात- मांजर, कुत्रा, कॉफीचे झाड इ. विषय हाताळले गेले होते. या सर्वच सदरांमधून शिक्षणाचे महत्त्व, माहिती, वैचारिक उद्बोधन, उपदेश इत्यादी विषयांवर चर्चा होती. अशी आठ सदरे पहिल्या अंकापासून होती. ‘सुमित्र’चे प्रकाशन दोन वर्षांनी थांबले. परंतु लवकरच ‘सुमित्र’ने तयार केलेल्या संकल्पनेचा विस्तार करणारी, स्त्रियांची मासिके प्रसिद्ध होऊ लागली. महत्त्वाचे म्हणजे फक्त मुंबईतच नव्हे तर अलिबाग, वेंगुर्ले, ठाणे इत्यादी गावांतून स्त्रियांची मासिके प्रसिद्ध होऊ लागली. १८६४ मध्ये सदाशीव ज्ञानेश्वर प्रभू यांनी ‘स्त्रीभूषण’ सुरू केले. त्या पाठोपाठ ‘अबला मित्र’ (१८७६), ‘गृहिणी’ (१८८७), ‘स्त्री शिक्षण चंद्रिका’ (१८९९) ‘केरळ कोकीळ’ (१८८६) इत्यादी मासिकांनी १९व्या शतकाचा उत्तरार्ध गजबजून गेला. स्त्री-शिक्षणाचे महत्त्व, स्त्रियांच्या अज्ञानी स्थितीविषयी वाटणारी सहानुभूती संपादक विविध प्रकारे व्यक्त करीत. ‘स्त्री भूषण’ने आपले ब्रीद वाक्य काव्यात वर्णन केले आहे. ‘देशस्थिती सुंदर व्हावयाते। ज्ञानी कराव्या आधीहो स्त्रियांते। सूज्ञा दिसे मुख्य उपासना ही। यावाचुनी अन्य उपाय नाही।’
या काळात स्त्रियांसाठी कार्य करण्याच्या ध्येयाने पुरुषवर्ग भारावून पुढे आला त्यातून मासिकाचे अंतरंग, विषयांचे वैविध्य निर्माण झाले. शिक्षण-ज्ञान म्हटले तरी अनेक पैलू त्याला होते. कधी प्रत्यक्ष, तर कधी संवादातून, तर कधी ओवी अभंगांतून स्त्रियांपर्यंत विषय पोचवला जाई. ‘स्त्री-मनाशी’ संवाद करण्याची लय यातूनच गवसली आणि संवाद सुरू झाला. स्त्रियांना ज्ञानाबरोबर समकालीन जीवनाचे भान येऊ लागले. विकासाची पाऊलवाट नकळत उमटत गेली.    n
डॉ. स्वाती कर्वे -chaturang@expressindia.com

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
student could not bear stress of studying she became depressed and left home
मुलं मुली असे का वागतात? नैराश्य, अभ्यासाचा ताण, चिंता, घर सोडणे…