ईश्वराला एक विषय किंवा वस्तू समजून त्याचा शोध जे घेतात त्यांच्या हाती काहीच येत नाही. साक्षात्काराच्या, आनंदाच्या आणि अमरत्वाच्या संपूर्ण अनुभूतीचे नाव म्हणजेच ईश्वर. ते म्हणजे स्वत:मधल्या चेतनेचेच परम प्रकटीकरण आहे.
मनुष्याला दरिद्री बनवतात त्या इच्छाच. ज्यांच्या खरोखर गरजाच उरत नाहीत तेच धनवान असतात.  इच्छांनी व्यापलेले मन भिकारी होत जाते. ते निरंतर मागतच राहते. ज्यांची कसलीही मागणी बाकी राहात नाही, तेच फक्त समृद्ध असू शकतात. महर्षी कणाद यांचे नाव कणाद कसे पडले याचीही एक आख्यायिका आहे. महर्षी कणाद एकेक कण वेचून गुजराण करीत असत. शेतकरी पिकाची कापणी करीत त्यावेळी खाली पडलेले धान्याचे कण वेचून ते आपला निर्वाह चालवीत. त्यांच्या कष्टाची हकिकत त्या देशाच्या राजाच्या कानावर आली. त्याने आपल्या मंत्र्यांबरोबर महर्षीना विपुल संपत्ती भेट म्हणून पाठवली. मंत्र्यांचे घरी आगमन होताच महर्षी म्हणाले, ‘‘मी तर संतुष्ट आहे. तुम्ही ही संपत्ती ज्यांना जरुरी आहे त्यांच्यात वाटून टाका.’’ असा प्रकार तीन वेळा घडला. शेवटी राजा स्वत: या वैराग्याला भेटावयास आला. आपल्याबरोबर तो पुष्कळ धन घेऊन आला. महर्षीनी ते स्वीकारावे म्हणून राजाने विनविले; परंतु ते म्हणाले, ‘‘ज्यांच्याजवळ काही नाही त्यांना ते द्या. माझ्याजवळ बघाल तर सारं काही आहे.’’ राजाने पाहिले तर त्यांच्या अंगावर फक्त एक लंगोटी तेवढी होती.
          परत आल्यावर राजाने घडलेली सारी हकिकत राणीच्या कानावर घातली. राणी म्हणाली, ‘‘आपणच चुकलात. साधूजवळ जायचे असते ते त्याला काही द्यायला नाही तर त्यांच्यापासून काही घ्यायला! ज्याच्या अंतर्यामी सारे काही आहे तो बाहेरच्या सर्व गोष्टी सोडावयास समर्थ असतो.’’ त्याच रात्री राजा महर्षीकडे गेला. त्याने त्यांची क्षमा मागितली. कणाद त्याला म्हणाले, ‘‘गरीब कोण आहे ते पाहा. माझ्याकडे बघ आणि स्वत:कडे पाहा. बाहेरून नव्हे तर आतून पाहा. मी काही मागत नाही, कशाचीच इच्छा ठेवत नाही आणि यामुळे अनायासे मी एक सम्राटच बनलो आहे.’’
संपत्ती जशी बाहेरची असते तशीच आतलीही. बाहेरची संपत्ती आज ना उद्या हिरावली जाण्याची शक्यता आहे. म्हणून ज्ञानी माणसे संपत्तीला आपत्तीच समजतात. ते शोधतात ती अंतर्यामी नांदणारी संपत्ती. कारण एकदा ती प्राप्त झाल्यानंतर गमावण्याचा धोका नाही. तिचा लाभ हाच खरा लाभ. बाकी सारे काही मिळाले तरी अधिक मिळवण्याची आस राहतेच. परंतु ही संपत्ती मिळाली की आणखी काही मिळवण्याजोगे शिल्लकच राहात नाही. मिळाल्यानंतर त्याची अनुभूती हीसुद्धा तितकीच महत्त्वाची. म्हणून ईश्वराला एक विषय किंवा वस्तू समजून त्याचा शोध जे घेतात त्यांच्या हाती काहीच येत नाही. साक्षात्काराच्या, आनंदाच्या आणि अमरत्वाच्या संपूर्ण अनुभूतीचे नाव म्हणजेच ईश्वर. कुठेतरी बाहेर सापडणारी ती काही एखादी व्यक्ती नव्हे. स्वत:मधल्या चेतनेचेच ते परम प्रकटीकरण आहे.
एका फकिराला कुणीतरी विचारले, ‘‘ईश्वर आहे तर तो दिसत कसा नाही?’’ त्या फकिराने सांगितले, ‘‘ईश्वर म्हणजे वस्तू नाही. ती अनुभूती आहे. तो दिसेल असा कोणताही उपाय नाही; परंतु त्याचा अनुभव अवश्य येऊ शकतो.’’ तथापि, शंका विचारणाऱ्याचे समाधान झाल्यासारखे दिसेना. त्याच्या डोळ्यांमधला प्रश्न कायम होता. तेव्हा त्या फकिराने जवळच पडलेला एक मोठा धोंडा उचलला आणि आपल्याच पायावर मारून घेतला. त्याच्या पायाला खोल जखम झाली आणि तिच्यातून रक्ताची धार वाहू लागली. ती व्यक्ती म्हणाली, ‘‘हे आपण काय केलंत? अशानं आपल्याला फार वेदना होतील. हा कसला वेडेपणा?’’ तो फकीर हसायला लागला आणि म्हणाला, ‘‘वेदना दिसू शकत नाही तरी पण असते. प्रेम दिसून येत नाही तरी पण असते. असाच ईश्वरही आहे.’’
जीवनात जे दिसून येते त्याचीच सत्ता असते असे नव्हे तर जे दिसून येत नाही त्याचीही सत्ता असते आणि दृश्य शक्तीपेक्षा या अदृश्य शक्तीची सत्ता अधिक खोल असते. कारण तिचा अनुभव घेण्यासाठी स्वत:च्या प्राणामध्ये खोलवर उतरावे लागते. तरच त्या अनुभवाला स्पर्श करू शकणारी, त्याला पाहू शकणारी ग्रहणशीलता लाभते, हे जाणण्यासाठी साधारण दृष्टिची नव्हे तर अनुभूतीविषयीच्या खोल संवेदनशीलतेची प्राप्ती व्हावी लागते. तेव्हाच त्या सत्तेचा आविष्कार होतो आणि तेव्हाच समजते की दृष्टीस पडावयाला तो बाहेर थोडाच आहे? तो तर आतच राहतो. तो तर बघणाऱ्याच्या आतच लपलेला असतो.
ईश्वराला शोधावयाचे नसते तर खोदावयाचे असते. स्वत:मधून जे खणत जातात तेच शेवटी स्वत:मधील सत्तेच्या मूळ प्रवाहामधून आणि स्वत:च्या संपूर्ण विकासातून त्याला अनुभवू शकतात. या अनुभूतीसाठी फार काळ लागत नाही.
सत्याचा एखादाही किरण पुरे. ढीगभर ग्रंथांकडून होणार नाही ते काम सत्याचा एखादा अंशही करून दाखवतो. अंधार घालवायचा आहे तिथे मोठय़ा मोठय़ा शास्त्रांचे काय काम? तिथे एखादा मातीचा दिवाच लावायला हवा.
इमर्सनच्या व्याख्यानांना एक म्हातारी धोबीण नेहमी हजर असलेली दिसावयाची. लोकांना प्रश्न पडला, एका अशिक्षित गरीब स्त्रीला इमर्सनची गंभीर भाषणे काय समजणार? शेवटी कुणीतरी तिला विचारले की, ‘‘तुला काही समजते का?’’ त्या म्हाताऱ्या धोबिणीने मोठे अजब उत्तर दिले. ती म्हणाली. ‘‘जे मला समजत नाही त्यासंबंधी काय बोलायचं? परंतु एक गोष्ट मला नक्की समजली आहे आणि इतरांच्या लक्षात ती आली आहे की नाही हे मला ठाऊक नाही. मी तर बोलून-चालून अडाणीच. मला एकच गोष्ट पुरेशी आहे. त्या गोष्टीनं माझं सारं जीवनच पालटून टाकलंय. ती गोष्ट कोणती? तर ती हीच की मीसुद्धा परमेश्वरापासून दूर नाही. एका दरिद्री स्त्रीपासून परमेश्वर दूर नाही. परमेश्वर जवळच आहे. नव्हे माझ्यातच आहे. हे एक लहानसं सत्य माझ्या दृष्टोत्पत्तीला आलं आहे आणि याहून मोठं आणखी कुठलंही सत्य असू शकेल असं मला नाही वाटत.’’
मोठमोठाली तत्त्वे जाणून घेत बसण्यापेक्षा सत्याच्या एका लहानशा अनुभूतीने आयुष्याचे परिवर्तन होऊ शकते. फार जाणून घेण्याच्या मागे लागतात ते जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या आणि नव्या जाणिवांची नवी क्षेत्रे खुली करणाऱ्या सत्याच्या त्या लहानशा स्फुिल्लगापासून बहुधा दुरावतातच.
जीवनामधून अंधाराला घालवण्याचा खटाटोप व्यर्थ होय. कारण अंधाराला घालवता येत नाही. ज्ञानी लोक अंधार घालवीत बसत नाहीत, तर प्रकाश उजळतात.
एक प्राचीन लोककथा आहे. ज्या वेळी मनुष्याजवळ प्रकाश नव्हता, अग्नी नव्हता त्या वेळची ही गोष्ट आहे. तेव्हा रात्र मोठी त्रासदायक वाटे. अंधार घालवण्याचे पुष्कळ उपाय लोकांनी शोधले; पण काही उपयोग झाला नाही. कुणी म्हणाले की, मंत्र म्हणा. तेव्हा मंत्रही म्हटले गेले. कुणी सुचवले की प्रार्थना करा तेव्हा आकाशाच्या दिशेने हात उंचावून प्रार्थनाही केल्या गेल्या; परंतु अंधार हटला नाही तो नाहीच. शेवटी कुणा तरुण तत्त्ववेत्त्याने म्हटले, ‘‘आपण टोपल्यांमधून अंधार भरभरून खड्डय़ांमध्ये फेकून देऊ. असे केल्याने हळूहळू अंधार क्षीण होत जाईल आणि मगच त्याचा अंत होईल.’’  ही उक्ती छान होती! सारी रात्र लोक टोपल्यात अंधार भरायचे आणि खड्डय़ांमध्ये फेकून द्यायचे; पण बघतात तर काय तिथे काहीच नसायचे. शेवटी लोक फार कंटाळून गेले. कारण अंधार फेकून द्यायची एक प्रथाच पडून गेली आणि प्रत्येक माणूस रात्री कमीत कमी एक टोपलीभर अंधार तरी फेकून द्यायला लागला. पुढे त्यांच्यामधला एक तरुण एका अप्सरेच्या प्रेमात सापडला आणि त्याचा विवाह त्या अप्सरेबरोबर झाला. पहिल्या रात्रीच वधूच्या सासरची जी शहाणी म्हातारी माणसे होती त्यांनी तिला टोपलीभर अंधार दरीमध्ये फेकून यायला सांगितले. ते ऐकून अप्सरा खूप हसायला लागली. तिने एक शुभ्र वात तयार केली, एका मातीच्या बुडकुल्यात तूप घातले आणि मग दोन गारगोटय़ा एकमेकींवर घासल्या. लोक विस्मयाने पाहतच राहिले. तेवढय़ात आग निर्माण झाली, दिवा जळू लागला आणि अंधार मावळला. त्या दिवसापासून लोकांनी अंधार फेकून द्यायचे सोडले. कारण ते दिवा पेटवायला शिकले.
आपल्यामधल्या कित्येक जणांना अजूनही जीवनातला दिवा कसा पेटवावा हे समजत नाही. ज्या संधीचे परिवर्तन अलौकिक प्रकाशात होऊ शकते ती संधी ते अंधाराशी लढत बसण्यातच गमावतात.
ईश्वराला प्राप्त करून घेण्याच्या आकांक्षेने भरून जा म्हणजे पाप आपणहूनच नष्ट होईल. जे पापाशी लढत बसतात ते त्यातच खोल फसत जातात. जीवनात विधायक आरोहण करा. निषेधात्मक पलायन करू नका. हेच यशाचे सुवर्णसूत्र आहे.
(‘पथ प्रदीप’ या साकेत प्रकाशनाच्या अनुवादित पुस्तकातील हा संपादित भाग, साभार.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा