वृषाली मगदूम

भीतीची उगमस्थानं अनेक, रूपंही अनेक… पण तिचा अनुभव नेहमीच नकोसा असतो असं म्हणता येणार नाही. अनेकदा ती हवीशीही असते! थरार अनुभवण्यासाठीच नव्हे, तर आयुष्यातले मोठे आणि कायम लक्षात राहणारे धडे शिकण्यासाठीही. भीतीवर मात करायची असेल, तर सकारात्मकता असायलाच हवी असं नाही, पण स्वीकारात्मकता नक्कीच गरजेची आहे!

important tips for getting a personal loan
वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी चार महत्त्वाचे सल्ले; त्वरित कर्ज घेताना कोणत्या चुका टाळाव्यात?
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
Lumps keep growing in your furniture at home
घरातील फर्निचरमध्ये ढेकूण सतत वाढत आहेत? ‘या’ सोप्या जालीम उपायांनी ढेकणांना लावा पळवून
सेकंड हॅण्ड बाईक खरेदी करण्याचा विचार करताय? त्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या
Mother and son did theft, Nagpur theft,
नागपूर : पोटासाठी काहीही! मायलेकाने चहाटपरी लावण्यासाठी…
Prajwal Revanna Rape Victime
Prajwal Revanna Chargesheet: ‘बलात्कार करताना पीडितेला हसायला सांगायचा’, प्रज्ज्वल रेवण्णाच्या विकृतीचा कळस
What is the meaning of o in o clock
O’clock Meaning: घड्याळातील वेळ दर्शविण्यासाठी ‘O’clock’ असे का म्हणतात? हे आहे कारण
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक

गोष्ट २००६ मधली , नणंदेच्या मुलाच्या लग्नानिमित्तानं दिल्लीला गेलो होतो. दिल्ली शहर पाहायचं म्हणून दिल्लीच्या मेट्रो स्टेशनपाशी आलो. तिथल्या एस्कलेटरवरून वरती स्टेशनवर जायचं होतं. आमच्याबरोबरच्या सांगली-कोल्हापूरहून आलेल्या पाहुण्यांना त्याचं दडपण आलं होतं. शूरवीर बनून मी एस्कलेटरवरून जाणं किती सोपं आहे, हे दाखवण्याच्या फुशारकीनं सर्वांत आधी पाय टाकला. आणि नेमका माझ्या साडीचा पदर त्यात अडकला नि ते मशीन मला खेचू लागलं. मी जोरजोरात ओरडू लागले. वरही जाता येईना आणि खालीही उतरता येईना. क्षणभराचाच प्रसंग असेल… नणंदेच्या नवऱ्याला अक्षरश: मला उचलून खाली ठेवावं लागलं. त्यानंतर एस्कलेटरची माझ्या मनात प्रचंड भीती बसली. ती काढण्याचा मी अनेकदा प्रयत्न केला. ‘काय होतंय बघू… जमवायचंच आज!’ म्हणून मी जवळ गेले, की पाय जडशीळ होऊन जायचे, छातीत धडधडायचं, घाम फुटायचा. नवरा अजित आणि मुलगा सौरभनं माझी भीती काढण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण माझा पायच उचलायचा नाही. मग लिफ्टचा पर्याय उरायचा. नाही तर मी जिने चढून-उतरून जायचे. २०१४ मध्ये आम्ही युरोप टूरला गेलो. टूर गाईडला माझ्यासाठी सगळीकडे लिफ्ट शोधावी लागायची. मग तो खूप वैतागायचा. पर्यायच नसेल तर मी खालीच बसून राहायचे. या टूरमध्ये धाडस करायचंच, असा निश्चयही करायचे. पण आजचं धाडस उद्यावर ढकलायचे. अखेर तो दिवस आलाच. टूर गाईडनं एक तास आधी मला सांगितलं, ‘‘आज या एस्कलेटरवरून आपण जाणार आहोत. इथून परत येणार नाही. त्यामुळे तुम्हाला यावंच लागेल.’’ धडधडत्या अंत:करणानं मी पर्यायाची शोधाशोध केली, पण पर्याय मिळाला नाही. मग मी माझी ओढणी माझ्या पर्समध्ये टाकली. पर्स, मोबाइल, सर्व अजितकडे दिलं, त्याचा हात घट्ट पकडला आणि एस्कलेटरवरून प्रवास केला… तो अत्यंत आनंदाचा क्षण होता. ही झटका पद्धत मला लागू पडली. भीतीची भावना संपल्यानंतर आपल्याला भीती वाटली होती याची आठवण आली तरी हास्यास्पद वाटतं.

हेही वाचा…महागडी पुस्तके आपण मुलांच्या हाती केव्हा देणार?

भय ही भावना खूप वैयक्तिक आहे, व्यक्तिनिष्ठही आहे. ‘मला कधी आनंद झाला नाही’ किंवा ‘मी कोणत्याही गोष्टीचं कधी दु:ख केलं नाही,’ असं म्हणणाऱ्या व्यक्ती आपणाला भेटू शकतील कदाचित, पण भीतीची भावना कधीच अनुभवली नाही असं कोणी भेटणार नाही. भीतीच्या भावनेनं आपला ताबा घेतला की त्यातून सुटका होत नाही. खूप असहाय वाटतं. पण इतरांना आपलं भय कळत नाही. या व्यक्तीला एवढी साधी गोष्ट करता येत नाही, याचं इतरांना वाटणारं आश्चर्य आपल्याला अधिकच दुबळं करून टाकतं.

प्रत्येकाला भय वाटतं. पण कोणाला कशाचं भय वाटेल हे सांगता येत नाही. कोणाला अंधाराचं, तर कोणाला गर्दीचं भय वाटतं. भय आणि गरज परस्परांवर अवलंबून आहेत. वाहन चालवणं ही अत्यावश्यक गरज झाली, की ती भीतीवर मात करते. स्त्रियांचं वाहन चालवण्याचं प्रमाण अत्यल्प आहे, त्याचं एक कारण भय आहेच. पण त्यांच्यासाठी ते कदाचित अत्यावश्यक नसतं हेही आहे. अपघाताच्या रोज कळणाऱ्या भयानक बातम्या असोत, की जवळच्या, परिचित माणसाचं होणारं अकस्मित निधन, ते इतकं धक्कादायक असतं, की मनात अपघाताबद्दल भीतीच निर्माण होते. आपल्या घरातलं कोणी कामासाठी बाहेर पडलं आणि परत येण्याची वेळ टळून गेली, की भीती हळूहळू मनाचा कब्जा घेऊ लागते. तिला बाजूला सारण्याचा, मनाची समजूत घालण्याचा आपण कसोशीनं प्रयत्न करतो. पण वेळ सरत जातो तशी भीती वाढत जाते. एखादं संगीत टिपेला पोहोचतं, तशी भीती उच्चांक गाठते. उग्र रूपही धारण करते.

हेही वाचा…‘आपल्या’ गोष्टी!

मला आठवतंय, परीक्षा संपली, की दर उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आजीकडे कोकणात जायचे. बैलगाडीतून दिवसभर शेतात जायचं… जांभळं खायची, पाटाच्या पाण्यात पाय टाकून बसायचं, संध्याकाळी घरी येऊन चोखायचा आंबा आणि तूप-भात-मेतकूट खाऊन आजीच्या गोधडीत शिरायचं. आम्ही बरीच भावंडं असायचो. आजी आम्हाला भुताच्या गोष्टी सांगायची. भुताचे पाय उलटे असतात, त्याची सावली पडत नाही, रात्रीचं बाहेर फिरलं की ते तुमच्या मानगुटीवर बसतं, असंही आजी सांगायची. स्वयंपाकघराला लागून परसदार होतं. मग जीव मुठीत धरून मी अंधाराकडे डोळे फाडून बघायचे. भूत दिसतंय का बघत जायचे. मागून कोणीतरी येतंय, दबकी पावलं वाजतात, असे भास व्हायचे. दोनच मिनिटांचं अंतर, पण मी इतकी जोरात धावायचे, की आजीच्या पुढे जाऊन धापा टाकत उभी राहायचे. खूप वर्षं अंधार आणि भूत यांच्याबद्दलची भीती मनात रुतून बसली होती. आज कळतं, की कोकणात साप-विंचवांचं प्रमाण खूप असल्यामुळे आम्ही रात्रीचं बाहेर जाऊ नये, म्हणून आजी भुताचं भय आमच्या मनात निर्माण करायची.

भीतीच्या भावनेमुळे जाणिवा सावध होतात, विचारांचा वेग वाढतो, ‘फाईट’ की ‘फ्लाईट’ हा निर्णय तात्काळ होतो. भीती माणसाला धोक्यापासून पळून जायचं, थांबायचं, की लढायचं, या निर्णयासाठी तयार करते. ही क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये असते.

भीतीला आपण टाळतो, तिच्यापासून दूर पळतो, तसं भीतीला जवळही करतो. भीतीची अनुभूती घ्यायला आपल्याला खूप आवडतंही. त्यामुळेच स्कूबा डायव्हिंग, पॅराग्लायडिंग, रिव्हर राफ्टिंग अशा गोष्टींमधून लोक थरार अनुभवतात. वाटलेल्या अनामिक भीतीचं वर्णन करतात. पोटात खड्डा पडल्याचं सांगतात. पण पुन्हा पुन्हा तो अनुभव घेतात. या भीतीत हवीहवीशी वाटणारी अनुभूती असते. अमेरिकेत डिस्ने वर्ल्डमध्ये ‘अ‍ॅनिमल किंग्डम’ असा एक विभाग आहे. त्यात ‘अवतार’ चित्रपटातल्या सृष्टीसंबंधीचा भाग लोकांसाठी आकर्षणाचा आहे. एका खुर्चीत पट्टा लावून, थ्रीडी गॉगल घालून बसायचं आणि पर्वत, वन्यजीव, वनस्पती, यांचं अतिशय जवळून दर्शन घ्यायचं. भीतीनं इतकं आक्रमण केलेलं असतं, की हे कधी संपेल आणि त्या जगातून मी कधी बाहेर येईन, या विचारात ती चार मिनिटंही प्रचंड भयावह वाटतात. ‘भीती अशी विकत घ्यायला कोणी सांगितलीय का?’ असं म्हणत या भीतीची अनुभूती घेण्याचा मोह मलाही आवरला नव्हता.

हेही वाचा…‘टाँगलेन’ची अनोखी गल्ली!

आणखी एक प्रसंग आठवतोय. दहा वर्षं झाली या गोष्टीला. १५ ऑगस्टचा दिवस. रानसई धरण जवळच आहे, ते बघायला जाऊ असं आम्ही कुटुंबीयांनी ठरवलं. धरणाचं गेट बंद होतं. त्या वर्षी पाऊस भरपूर झाल्यानं धरणावरून धबधब्यासारखं पडणारं पाणी दिसत होतं. मला पाण्याची भयंकर ओढ, पण पोहायला येत नाही याची नेहमी खंत वाटायची. याओढीमुळे पाण्यामध्ये मी नेहमीच खूप आत आत जायचे, पण नुसतेच हात मारायचे. समुद्राच्या पाण्यात तर पायाखालची वाळू सरकण्याची अनुभूती घेत मी झपाटल्यासारखी आत शिरायचे. हरिद्वारला स्त्री म्हणून मला रिव्हर राफ्टिंगला नाकारलं होतं, याचा मला इतका राग आला होता, की भांडून मी रिव्हर राफ्टिंगचं तिकीट द्यायला लावलं होतं. तो २१ किलोमीटरचा चित्तथरारक अनुभव घेतला, तेव्हा भीतीचा लवलेशही नव्हता. आताही रानसई धरणाच्या पाण्यात मागे वळून न बघता मी आत शिरले. कमरेएवढ्या पाण्यात आले. पाय घट्ट रोवून अजून पुढे सरकत राहिले. अचानक एका दगडाला ठेचकळले आणि पाण्यात पडले. गटांगळ्या खायला लागले. माझी सर्व माणसं खूप दूर होती. मी जोरात ओरडत होते, पण धरणातून पडणाऱ्या पाण्याचा प्रचंड आवाज, त्यात इतर लोकांच्या ओरडण्याचा आवाज मिसळत होता… माझा आवाज माझ्याभोवतीच फिरतोय हे मला कळत होतं. आता मी बुडून मरणार या भीतीनं मी गोठून गेले. आकांतानं ओरडत असताना बाहेर आलेला माझा हात कोणी तरी घट्ट पकडला आणि मला खेचतच पाण्याबाहेर आणलं गेलं. एका क्षणात भीतीचं रूपांतर सुटकेत झालं. पण त्याचक्षणी भय खोलवर रुजलं. दर वेळी या भीतीवर मात करायला मी धडपडायचे, पण पाय लटपटायचे, पाणी डोळ्यांभोवती फिरायला लागायचं. पण नंतर पाण्याच्या आदिम ओढीनं या भीतीवर मात केली. मी स्वत:ला फटकारत, ‘सपोर्ट सिस्टीम’ घेत सातत्यानं पाण्याच्या प्रवाहाला सामोरी जात राहिले. भीतीवर स्वार व्हायचं असेल तर भीतीवर मात करणं आवश्यक आहे. माझ्या लक्षात आलं, माझ्या भीतीचं खरं कारण एस्कलेटर किंवा पाण्याचा प्रवाह नसून अंतर्मनात दडलेला एक विचार आहे. भीतीपोटी माणूस अनाठायी धाडस करत नाही, पण भीतीवर काबू मिळवायचा असेल, तर तिला हळूहळू सामोरं जाणं, तोंड देणं, हाच उपाय आहे, हे मी अनेक प्रसंगांतून शिकले. वेळ लागला, पण जाणीवपूर्वक मी हे केलं.

माझी खूप जवळची मैत्रीण, सुजाता. तिला काही कारणास्तव भीतीचा अ‍ॅटक आला होता. पॅनिक झाली होती ती. भीती वाटू लागली, की मला फोन करायची आणि वाटणाऱ्या भीतीचं वर्णन करायची. ‘दार वाजलं तरी भीती वाटते, दार उघडायची भीती वाटते, छातीवर कोणी तरी दगड ठेवल्यासारखं वाटतं, गुदमरायला होतंय. पण असं किती दिवस चालणार?’ मग मी तिला मन शांत ठेवून, डोळे मिटून बसायला सांगायचे. समज, की ‘दारावरची बेल वाजलीय… सुजाता जागेवरून उठलीय… एक पाऊल, दोन पाऊल, दहा पावलं… सुजातानं दार उघडलंय… गौरी मावशी आल्या आहेत. त्यांना घेऊन ती घरात आलीय…’ सुजाता मनातल्या मनात एक एक पाऊल पुढे टाकायची, मनातच दार उघडायची, संवाद करायची. प्रत्यक्ष दार उघडायला तिनं पंधरा दिवस घेतले. तिची मुलगी बंगळूरूला शिकायला गेली होती, पती पंजाबमध्ये सहा महिने कंपनीच्या कामासाठी गेले होते. त्यांची काळजी, एकटं राहण्याची भीती, या साऱ्या भावनांचा ताण तिला आला होता. ते सारं अशा रूपात बाहेर पडत होतं. रोज सकाळी भीतीनं पकड घेतली की ती माझ्याशी बोलायची. तासभर संवाद चालायचा. मग ‘आता बरं वाटतंय’ म्हणायची. असा हळूहळू माझा आधार घेत, स्वत:ला समजावत, काही वेळा स्वत:ला रागवत तिनं भीतीवर मात केलीच.

भावनेला वेळेत ओळखणं खूप आवश्यक आहे. एखाद्या वेळी भीती आपल्या नियंत्रणात राहिली नाही, तर तात्पुरत्या काळापुरती औषधं घेतल्यानंही व्यक्ती पूर्वपदाला येते. पण या पर्यायाचा स्वीकार करण्याची लोकांची अनेकदा तयारी नसते. भीतीवर स्वार व्हायचं असेल, तर तिला सामोरं जाणं महत्त्वाचं आहे. भीतीच्या भावनेवर काबू मिळवला नाही, तर भीती आपल्या प्रगतीत अडसर बनते, ती पुष्कळदा अनाठायीही असते.

हेही वाचा…सांधा बदलताना : हस्तांतरण..

हेही वाचा…भीतीसाठीचे अनेक घटक आपल्याच आयुष्यात, आपल्याच लोकांमध्ये असतात. नोकरी-व्यवसायात आज जीवघेणी स्पर्धा चालू आहे. या स्पर्धेशी मुकाबला करू शकलो नाही तरी भीती वाटत राहते. काहींना अपयशाची भीती वाटते. एकटेपणाच्या भीतीतून अनेक व्यक्ती मनोरुग्ण झाल्याचं, आत्महत्येला प्रवृत्त झाल्याचंही आपण सातत्यानं पाहतो. मृत्यूविषयी कल्पनेचे खेळ करत व्यक्ती भीतीच्या आहारी जाते. पण मृत्यू ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्हाला मृत्यू हवा म्हणून तो येणार नाही किंवा नको म्हणालात तरी थांबणार नाही. हे माहीत असताना आपण आपलं आयुष्य चिंताग्रस्त का करायचं, हे साधं अध्यात्म या भीतीवर मात करू शकतं.

भीती माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे दोन कप्पे तयार करते. व्यक्तीच्या मनात एक असतं आणि ती व्यक्त काही तरी वेगळंच करते. एक द्वंद्व, दुभंग व्यक्तिमत्त्व तयार होतं. जे सांगता येत नाही, दाखवताही येत नाही. यातूनही शारीरिक लक्षणं दिसू शकतात. छातीत धडधड, घशाला कोरड, पोटात दुखणं, डोकं दुखणं, छातीवर ओझं ठेवल्यासारखं वाटणं, वगैरे. या साऱ्याचं भय आणि दडपण व्यक्तीच्या प्रगतीत अडसर बनतं. माणूस माणसालाच घाबरतो. मी असं बोललो, तर काय परिणाम होईल… मी असा वागलो, तर मला काय ऐकावं लागेल… ही अनामिक भीती असते. वरिष्ठांशी बोलता न येण्याचं भय तर सार्वत्रिक आहे. पद, पैसा, प्रतिष्ठा, लिंग, वर्ग, जात, यांनी वरच्या पायरीवर असणाऱ्या माणसाचं भय वाटतं. यामुळे संवादात दरी तयार होते.

हेही वाचा…‘एका’ मनात होती : जोडीदाराशिवायचं एकटेपण!

‘निर्भया’ प्रकरणानंतर माजी न्यायमूर्ती जे. एस. वर्मांनी ‘मनाचे दिवे पेटते ठेवा’ असं सांगितलं होतं. पण आजही स्त्रिया-मुलींना भयमुक्त आणि सुरक्षित वातावरणात जगता येत नाही, हे वास्तव आहे. मनातली भीतीची भावना घालवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. ती एक संथ प्रक्रिया आहे. सातत्यपूर्वक ही प्रक्रिया करत आपण निर्भय होऊ शकतो. नियमित ध्यान आणि योग याचा शरीर आणि मन शांत व समतोल ठेवण्यासाठी उपयोग होतो. आज भावनांवर मात करण्याचे ‘फंडे’ सांगणाऱ्या पुस्तिका, काही मिनिटांचे व्हिडीओ, ‘पॉझिटिव्ह थिंकिंग’चे कार्यक्रम, ऑनलाइन व्याख्यानं, अनेक गुरूंचे सत्संग यांचा भडिमार चालू आहे. रस्ता चुकलेला माणूस या साऱ्यात आधार शोधतो, पण अनेकदा त्याला तो मिळत नाही, कारण यामध्ये बऱ्याचदा काही विचार नसतो, उपाय नसतो. फक्त आकलन न होणारी ‘थिअरी’ असते.

हेही वाचा…इतिश्री : मुलांचा लग्नाला नकार?

भीती घालवायची असेल तर उपाय आपल्यातच आहे. सकारात्मक नाही, स्वीकारात्मक होण्याची गरज आहे. भूतकाळाला गाडणं, भविष्यकाळात न रमणं, वर्तमानात जगणं आवश्यक आहे. स्वत:चा सरसकट स्वीकार केला, तर त्रास होत नाही. त्यामुळे क्षमाशीलतेची वृत्ती ठेवणं आपल्याच हिताचं आहे. प्रवास सोपा नाही, पण अशक्यही नाही. ‘भय इथले संपले आहे,’ हे आपणच म्हणायचं आहे!

vamagdum@gmail.com