पेराल्ता एकच वाक्य उच्चारतात, ‘‘अप्रतिम प्रेझेन्टेशन मृदुला. मला आनंद वाटतो की तुला फेलोशिप देण्याचा निर्णय आम्ही घेतला. नाही तर तुझ्यासारख्या विद्यार्थिनीला ही अ‍ॅकेडमी मुकली असती.’’ मी रात्र रात्र जागून केलेला अभ्यास. ग्रंथालयात घालवलेले शेकडो तास सार्थकी लागले. आणि माझे मन भर्रकन आठ महिने मागे जाऊन पोचलं.. माझ्यासाठी नकार घेऊन आलेल्या त्या ई-मेलपर्यंत..
तुरीनमधल्या आमच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्राच्या कॉफी शॉपमधली १३ डिसेंबरची रात्र.. नव्हे १४ तारखेची पहाट.. एक वाजलाय. साधारण पाचच्या सुमारास एक एक जण निघणार आहे, आपापल्या देशात जायला. जगभरातल्या चाळीस देशांतून एल.एल.एम. (इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ) करण्यासाठी इटलीमधल्या तुरीनमध्ये एकत्र आलेले आम्ही चाळीस जण परत आपापल्या मायदेशात विखुरले जाणार आहोत. परत भेट? कुणास ठाऊक? बहुतेक कधीच नाही! पण एकत्र घालवलेले हे साडेतीन महिने. वय वर्षे चोवीस ते बावन्न या वयोगटातल्या आम्ही चाळीस जणांनी अगदी पंचविशीतले होऊन वर्गात केलेल्या टवाळ्या.. सुट्टीच्या दिवशी पालथा घातलेला इटली.. कॅन्टीनमधल्या जेवणाला घातलेल्या शिव्या.. हे सगळं सगळं न विसरण्यासाठी मनावर कोरलं जाणार आहे! शिवाय इथे वेचलेले अमूल्य ज्ञानाचे कण आयुष्यभर साथ करणार आहेत.
शेवटी तो क्षण येतो.. कॉफीशॉप मधून निघण्याचा, निरोपाचा क्षण! सगळे जण एकमेकांना कडकडून मिठय़ा मारतात.. सगळीकडे ‘चाओ’ म्हणजे इटालियनमध्ये ‘टाटा’चा घोषा होतो.. आणि सगळे जड पायांनी निघतात. पहाटेचे पाच वाजले. माझ्या बॅगा भरून मी कॅम्पसच्या दारात, विमानतळावर मला नेणाऱ्या बसची वाट पाहते आहे. या दारातून मी आज शेवटची बाहेर जाणार आहे, माझ्या काळजाचा एक तुकडा इथेच ठेवून! येताना मी एकटी होते, जाताना मी माझ्या ३९ देशांतल्या वर्गमित्रांच्या भाषा, संस्कृती आणि विचारांचे अंश बरोबर नेणार आहे. आणि माझ्यातला एक छोटा अंश त्यांच्याबरोबर ३९ वेगवेगळ्या देशांत वाटला जाणार आहे.
मी विमानात बसले आहे. डोळ्यात पाण्याचा जाड पडदा तयार झाला आहे. तेवढय़ात माझा इटालियन नंबर वाजतो. ‘‘सलाम आलेकुम मृदुला, आमिर बोल राहा हुँ. फ्लाईट बोर्ड किया है अभी अभी मने. सोचा आखरी बार आपसे बात करू.’’  हा माझा पाकिस्तानी वर्गमित्र आणि रिसर्च पेपरसाठीचा पार्टनर. या एल.एल.एम.ची ही अजून एक देणगी! एका पाकिस्तानी मुसलमान व्यक्तीशी जिवाभावाची मत्री! ‘‘अल्ला हाफिज मृदुला. फिर जरूर मिलेंगे,’’ आमिर म्हणतो आहे.
काय नाही दिलं या कोर्सने मला? वयाच्या कुठल्याही टप्प्यावर शिकणं हे किती आनंददायी होऊ शकतं हे समजलं. एकटीने राहायला शिकवलं. एकटीने स्वत:ला सोबत करत जेवायला शिकवलं. फक्त स्वत:च्या विचारांची सोबत असताना त्यांच्याकडे तटस्थपणे पाहायला शिकवलं. या एकांतात स्वत:वर मनापासून, भरभरून प्रेम करायला शिकवलं. माझं नेहमीचं अन्न मिळालं नाही तरी मी मरत नाही हे मला इथं राहून कळलं. जगाच्या पाठीवर कुठेही मी आता एकटीने राहू शकते याचा आत्मविश्वास मला मिळाला. अनोळखी परदेशी लोकांमधल्या चांगुलपणावर विश्वास टाकायला शिकले. जगातल्या वेगवेगळ्या देश, संस्कृती आणि धर्मातून आल्यामुळे लोक कसे वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतात याचा अभ्यास करायला मिळाला. मायदेशात मी जे समृद्धीचं आयुष्य जगते, त्यातून बाहेर पडून कमीत कमी पशांत, कमीत कमी वस्तू वापरून जगायला शिकले. माझ्या कम्फर्ट झोनमधून स्वत:ला बाहेर ढकलायला शिकले. नव्या भाषा शिकायचा प्रयत्न केला. नवे मित्र-मत्रिणी मिळाले. घराची, घरातल्या प्रेमाच्या माणसांची किंमत समजली. घरापासून लांब राहिले की त्याची किती आठवण येते ते समजलं. माझा रोजचा दिनक्रम जो अनेकदा मला कंटाळवाणा वाटतो आणि ज्यातून सतत पळून जावसं वाटत असतं, त्यातला तोचतोचपणाही आता हवाहवासा वाटायला लागला.
निरोप कधीही कायमचा घ्यायचा नसतो. आयुष्यात चमत्कार कधीही घडू शकतात. आपण कधीही कुठेही परत भेटू शकतो. नाती ही रक्ताच्या पलीकडलीही असू शकतात. नवीन भेटलेल्या माणसांना आणि नव्याने पाहिलेल्या जागांना.. शहरांना.. कधीही विसरायचं नसतं..
माझ्या डबक्यातून बाहेर पडून माझ्याहून खूप शहाणी आणि हुशार माणसं पहिली. मी किती किरकोळ आहे ते समजलं, पण हेही समजलं की, मी स्वत:ला जितकी कमी लेखते तेवढीही नाहीये. एका गावातलं एक छोटं महाविद्यालय हे माझं विश्व. इथे जरासं बरं काम केलं तरी होणाऱ्या कौतुकाने हुरळून जायचं कारण नाही, कारण इथली मोजपट्टी फारच खुजी आहे, असं मी सतत स्वत:ला सांगत असते. आणि त्यामुळे स्वत:च्याच पाठीवर एक छोटीशी शाबासकीची थाप द्यायलाही मी नेहमी मागे-पुढे पाहते. पण मी इतकीही मूर्ख नाहीये हे तेव्हा कळलं जेव्हा मी इथल्या माझ्या वर्गात पहिली आले..
तो दिवस. १२ डिसेंबरचा.. आमची रिसर्च पेपर्सची प्रेझेंटेशन्स चालू आहेत. आमिर आणि मी लिहिलेल्या भारताच्या पेटंट कायद्यामधल्या औषधांबाबतच्या एका विशिष्ट सेक्शनवरचा पेपर मी प्रेझेंट करतेय. या पेपरसाठी प्रा. क्रेग नार्ड, अमेरिकेतल्या क्लेव्हलँड विद्यापीठातल्या विधि महाविद्यालयातले प्राध्यापक आमचे मार्गदर्शक होते. यांची पेटंट कायद्यावरची पुस्तकं मी गेली कित्येक र्वष अभ्यासली होती. आमच्या कोर्समध्ये पेटंट लॉ शिकवायला प्रा. नार्ड अमेरिकेतून येणार आहेत हे कळलं तेव्हा मी आनंदातिरेकाने वेडीच झाले होते. त्यांनी त्यानंतर शिकवलेला हा विषय विसरायचा ठरवला तरी विसरता न येण्यासारखा. नंतर मी आग्रह धरला आणि हे इतके सुप्रसिद्ध प्राध्यापक मला माझ्या रिसर्च पेपरचे मार्गदर्शक म्हणून मिळाले.
माझा पेपर अतिशय उत्कृष्ट आणि बिनचूक झालाय हे मला त्यांनी दोन दिवसांपूर्वीच ईमेलवर कळवलंय. माझं हे प्रेझेन्टेशन प्रा. नार्ड अमेरिकेतून स्काईपवरून पाहणार आहेत. समोरच्या भल्यामोठय़ा िभतभर पसरलेल्या स्क्रीनवर मला त्यांचा गंभीर चेहरा दिसतो आहे. प्रेक्षकांमध्ये माझे ‘इंटरॅक्चुअल प्रॉपर्टी लॉ’ या विषयाच्या वेगवेगळ्या शाखांतले तज्ज्ञ असलेले वर्गमित्र, त्यांच्या पेपरचे मार्गदर्शक असलेले अनेक प्रथितयश प्राध्यापक, माझ्या या अभ्यासक्रमाचे मार्गदर्शक असलेले अतिशय करडय़ा स्वभावाचे प्रा. मार्को रीकोल्फी, आमच्या अ‍ॅकडमीचे संचालक दि पिएत्रो पेराल्ता (मला फेलोशिप का मिळाली नाही म्हणून मी ज्यांच्याशी बोलले होते तेच हे) आणि तिथली ट्रेिनग ऑफिसर मार्था चीकोवोर. हे दोघे जीनेव्हाहून फक्त आमची प्रेझेंटेशन्स ऐकायला आले आहेत.
या सगळ्यांवर नजर टाकून मी थोडीशी धास्तावले आहे. घशाला कोरड पडलेली. तळव्यांना त्या थंडीतही फुटू लागलेला घाम.. पायातली थरथर.. मी एक वकील नसूनही कायद्यावरचा पेपर मला सादर करायचाय या गोष्टीचा मनावर आलेला प्रचंड ताण! प्रा. नार्ड पडद्यावरून आणि
प्रा. रीकॉल्फी प्रेक्षकातून माझ्याकडे रोखून पाहतायत आणि माझा ताण आणखीनच वाढवतायत. मी एका क्षणासाठी डोळे मिटते आणि स्वत:ला सांगते, ‘अगं, हे तुझं रोजचं काम आहे. विसर की हे सगळे इथे बसले आहेत आणि समज की हा तुझा कॉलेजमधला वर्ग आहे. गो क्रॅक इट.’
मी एक दीर्घ श्वास घेते आणि डोळे उघडते आणि माझं प्रेझेन्टेशन सुरू करते. पहिल्याच मिनिटामध्ये मी अतिशय शांत आणि निवांत वाटतेय स्वत:ला आणि बऱ्यापकी लालित्याने फलंदाजी करू लागले आहे.. पुढच्या पाचच मिनिटांत मला श्रोत्यांच्या देहबोलीतला फरक कळू लागला आहे. ते अतिशय मन लावून माझा शब्द न् शब्द ऐकत आहेत. त्यांच्या डोळ्यात ओतप्रोत भरलेलं कुतूहल मला दिसतं आहे. कायदेविषयक प्रेझेन्टेशनमध्ये मी केवढी चित्रं आणि आलेख वापरले आहेत ते पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. भल्यामोठय़ा स्क्रीनवरच्या प्रा. नार्ड यांच्या चेहऱ्यावर कौतुक तरळू लागलं आहे. दि पिएत्रो पेराल्ता ऐकण्यात अक्षरश: तल्लीन झाले आहेत. एकामागून एक स्लाइड पुढे सरकतायत. मी शेवटी निष्कर्षांची चर्चा करते. प्रेक्षकांच्या अनेक प्रश्नांची सफाईने उत्तरं देते. आणि धन्यवाद म्हणून थांबते.
प्रेक्षकांत नीरव शांतता पसरते आणि काही क्षणांत पेराल्ता उठून उभे राहतात आणि टाळ्या वाजवू लागतात. त्यांच्या मागोमाग सगळा वर्ग, सर्व प्राध्यापक आणि हजारो मलांवर प्रा. नार्ड उठून उभे राहतात आणि जवळजवळ एक मिनीट टाळ्यांचा कडकडाट चालू राहतो. प्रा. रीकॉल्फी उठून उभे राहतात आणि म्हणतात, ‘‘या एल.एल.एम. अभ्यासक्रमात आजपर्यंत ऐकलेलं हे सर्वात उत्कृष्ट प्रेझेन्टेशन आहे. अभिनंदन मृदुला! तुला या रिसर्च पेपरमध्ये ७ पैकी ७ गुण मिळाले आहेत. आणि मला या वर्गात हे सांगायला अतिशय आनंद होतो आहे की, एल.एल. एम.च्या या फेस-टू-फेस भागात मृदुला पहिली आली आहे. या आधीच्या लेखी परीक्षांमध्ये आणि इतर सर्व अभ्यासप्रकारांमध्येही तिने सर्वात जास्त गुण मिळवले आहेत.’’ यानंतर कृतकृत्यतेने भरून पावल्याने डोळ्यांत अश्रू दाटून येतात नि मला वर्ग दिसेनासा होतो.
त्याच दिवशीची रात्र. शहराबाहेरच्या एका आलिशान रेस्तरॉमध्ये चालू असलेली आमची फेअरवेल पार्टी. संगीताच्या पायावर थिरकणारी पावलं. आमच्या अ‍ॅकेडमीचे संचालक दि पिएत्रो पेराल्ता माझ्या शेजारी अवतरतात. आणि एकच वाक्य उच्चारतात, ‘‘अप्रतिम प्रेझेन्टेशन मृदुला. मला आनंद वाटतो की, शेवटच्या क्षणी ही फेलोशिप देण्याचा निर्णय आम्ही घेतला. नाही तर तुझ्यासारख्या विद्याíथनीला ही अ‍ॅकेडमी मुकली असती.’’ मी केलेले सगळे कष्ट हे ऐकून भरून पावले. रात्र रात्र जागून केलेला अभ्यास. ग्रंथालयात घालवलेले शेकडो तास सार्थकी लागले. यापेक्षा मोठी पावती कुठली? आणि माझं मन भर्रकन चित्रपटातल्या फ्लॅशबॅकसारखे आठ महिने मागे जाऊन पोचते.. माझ्यासाठी नकार घेऊन आलेल्या त्या ईमेलपर्यंत.. ‘‘वी आर सॉरी टू इन्फॉर्म यू दॅट वीआर अनेबल टू कन्सिडर युअर कॅन्डिएचर ऑफ द अवॉर्ड ऑफ डब्लूआयपीओ फेलोशिप फॉर पर्सुइंग एल.एल.एम. इन इंटलॅक्च्अुल प्रॉपर्टी लॉ अ‍ॅट तुरीन, इटली.’’ पेराल्तांचं आत्ताचं बोलणं आणि आठ महिन्यांपूर्वी मला आलेला तो ईमेल यातील विरोधाभासाने माझ्या चेहऱ्यावर खुद्दकन हसू उमटते.. विजयाचं, कृतकृत्यतेचं, समाधानाचं हसू..(समाप्त)
प्रा. डॉ. मृदुला बेळे -mrudulabele@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा