फेसबुक वा व्हॉट्सअ‍ॅपवर अलीकडे मेसेजेस्चं पेव फुटलेलं आपण पाहतोच. नुसतेच शुभेच्छा देणारे मेसेजेस् फॉर्वर्ड करणं अजिबातच हानीकारक नाही, परंतु जिथे माणसांच्या जीविताचा वा भावनांचा संबंध आहे त्या मेसेजेस्बद्दल आपण गंभीर असतो का? आपण त्याची फारशी शहानिशा न करता, त्यावर फारसा विचारच न करता अनेकांना ते फॉर्वर्ड करतो. ते तयार करणारे नामानिराळे राहतात आणि त्यांच्या माहितीवर विश्वास ठेवणाऱ्यांना, ते वाचणाऱ्यांना त्याचा अनेकदा त्रास भोगावा लागतो. सोशल मीडियाचाही सजगतेने विचार करण्याची आता वेळ आलेली आहे.

‘मतिमंदत्वावर हमखास इलाज’ , ‘कोणत्याही प्रकारचा, कोणत्याही अवस्थेतला कर्करोग केमोथेरपीशिवाय बरा करा’ किंवा ‘बायपासला बायपास करा. शस्त्रक्रियेविना हृदयातले ब्लॉक काढा.’ अशा जाहिराती पेपरात आल्या की आपण काय करतो? शांतपणे ते पान उलटतो. ‘आपला काय संबंध?’ असं म्हणून. पण मन त्यांची नकळत नोंदही घेत असतंच. शिवाय पुन्हा पुन्हा त्याच जाहिराती पाहून तर आपल्याला त्या खऱ्याच वाटायला लागतात. आपण नाही गेलो तरी आपल्या नातेवाईकांना, परिचितांना ही ‘बहुमोल’ माहिती इमाने इतबारे आपण पुरवतो. ‘करून पाहायला काय झालं?’ असं आपल्याला वाटत राहतं. त्यामागचा आपला हेतू खरंच शुद्ध असतो. पण ज्यांनी या जाहिराती दिल्या असतात, त्यांचा हेतू तितका शुद्ध असतो का? या सर्व उपचार पद्धतींचे मूल्यमापन (त्यांनी स्वत: नव्हे!) कोणी केल्याचे ऐकले आहे? फक्त या उपचार पद्धतींवरच अवलंबून राहून तब्येतीवर प्रयोग करून पाहणे कितपत सुरक्षित आहे? या प्रश्नामागलं गांभीर्य आत्ताच ठसठशीतपणे जाणवण्याचं कारण म्हणजे आजकाल सोशल नेटवर्कमधून फिरणारे आणि फारसा विचार न करता सहजपणे फॉर्वर्ड होणारे मेसेजेस्.
अलीकडे अशा मेसेजेस्चं पेव फुटलेलं आपण पाहातोच. नुसतेच शुभेच्छा देणारे, विनोदी वा तत्त्वज्ञानात्मक कोट्स असणारे मेसेजेस् फॉर्वर्ड करणं अजिबातच हानीकारक नाही, परंतु जिथे माणसांच्या जीविताचा वा भावनांचा संबंध आहे त्या मेसेजेस्बद्दल आपण गंभीर असतो का? आपण त्याची फारशी शहानिशा न करता, त्यावर फारसा विचारच न करता सरळ एका क्षणाच्या निर्णयावर अनेकांना ते फॉर्वर्ड करतो. उदाहरणच द्यायचं झालं तर अलीकडे, ‘फेसबुक’वर किंवा आपल्या ‘व्हॅट्सअ‍ॅप’वर मेसेज येतो, ‘युनोने जाहीर केले आहे की भारताचे राष्ट्रगीत जगात सर्वोत्तम आहे.’ आपल्याला अभिमान वाटतो. मेसेज फॉर्वर्ड करणाऱ्याने ‘तुमचे देशावर प्रेम असेल तर हे अनेकांना पाठवा.’ असा दमही भरलेला असतो. त्यामुळे आपण आपल्या ओळखीच्या चार-पाच जणांना तो पाठवतो आणि एक सामाजिक कर्तव्य पार पाडल्याचं समाधान मानतो. पण कधी अशी शंका येते का की राष्ट्रगीतांची तुलनाच कशी होऊ शकते? कोणत्याही देशाच्या नागरिकाला स्वत:च्याच देशाचे राष्ट्रगीत थोर वाटणार. कोणाची आई श्रेष्ठ हे ठरवण्यासारखे हे नाही का? कधी ‘हनुमान चालीसा’मधला श्लोक उद्धृत करून म्हटलेले असते, की ‘सूर्यापासून पृथ्वीचे अंतर आपल्या पूर्वजांनी बरोबर सांगून ठेवले होते.’ म्हणजेच हनुमानाने खरेच सूर्यावर उडी मारली आहे याचा हा पुरावा आहे. अंतर किती आहे हे माहिती असणे हे उडी मारण्यासाठी आवश्यक असेल, पण तेवढेच पुरेसे आहे का? हनुमानाची उडीही लहान वाटावी अशा निष्कर्षांवर आपण उडय़ा मारत असतो. मध्यंतरी ‘अमूक अमूक कोल्डड्रिंक पिऊ नका त्यात त्या कंपनीतील एका एड्सग्रस्त कामगाराने आपले रक्त मिसळले आहे’ किंवा ‘ब्लड कॅन्सरवर रामबाण उपाय अखेर सापडला’ यासारखा मेसेज फिरत होता. याची शहानिशा कोणी कशी करावी? प्रत्येक गोष्टीचे फायदे-तोटे असतात. याचेही फायदे नक्की आहेत. मध्यंतरी हरवलेले मूल सापडायला याच सोशल नेटवर्किंगमुळे मदत झाली. किंवा नोकरीच्या संधीही या सोशल नेटवर्किंगमुळे सहज उपलब्ध झाल्या आणि पुढेही होऊ शकतात. पण विनाविचार पाठवलेल्या ‘फॉर्वर्डस्’चं काय?
आजचा काळ हा माहितीच्या ‘महापुराचा’ काळ आहे असे म्हटले जाते. या महापुराच्या लाटांमध्ये आपण वाहवत जात नाही ना हे तपासायची वेळ आली आहे. कारण लाटा निर्माण करणारे नामानिराळे राहतात आणि त्यांच्या माहितीवर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याचा त्रास भोगावा लागतो. मोबाइल तर केव्हापासूनच ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ झालेला आहे. पण आता ‘सोशल मीडिया’ने तर आपल्या आयुष्यात एक छोटीशी सामाजिक क्रांतीच घडवली आहे. तुमच्या घरात घडणाऱ्या क्षुल्लक आणि खासगी गोष्टी तुम्ही जगभर पसरवू शकता आणि जगातल्या मोठय़ा मोठय़ा घडामोडींवर विनोद करून, चर्चा करून त्यांचे ‘क्षुल्लकीकरण’सुद्धा करू न टाकता एका परीने आपणही जागतिकीकरणाला हातभारच लावत असतो की!
एक प्रकारे सर्वाना एका समान पातळीवर आणून ठेवणारी ही व्यासपीठं. ‘व्हॉट्सअ‍ॅप’चा तुमच्या शाळा किंवा कॉलेजच्या बॅचचा ग्रुप घ्या. प्रत्यक्ष आयुष्यात तुम्ही शिक्षक असलात काय किंवा विद्यार्थी असलात काय. ग्रुपमध्ये तुम्ही केवळ मेंबर असता. कोणीही तुमच्याशी केव्हाही चॅट करू शकतो आणि तुम्हीसुद्धा कोणाशीही चॅट करू शकता. किंवा तुम्ही एखाद्या कंपनीचे मोठे अधिकारी असलात तरी तुमच्या हाताखालचा नवशिक्या पोरगा तुम्हाला ‘फेसबुक’वर बिनधास्तपणे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकतो. (तुम्ही स्वीकारलीत की काल भेटलेला मुलगासुद्धा तुमचा फ्रेंड होऊ शकतो) माणसा-माणसातल्या भिंती गळून पडायला सुरुवात झाली असेल तर ते निश्चितच स्वागतार्ह आहे, पण विचारांच्या देवाणघेवाणीचं काय?
पूर्वी निदान ई-मेल वाचायला, ‘एफबी’वरचे आपले पान बघायला, कॉम्प्युटरसमोर तरी बसायला लागत असे. पण आता तेवढेही कष्ट घ्यावे लागत नाहीत. आता स्मार्टफोनमुळे तर आपण एकाच वेळी आणि बहुधा चोवीस तास बऱ्याच ठिकाणी कॉन्टॅक्ट ठेवून असतो. कॅलिफोर्नियातल्या आपल्या नातवापासून ते कोल्हापूरच्या आपल्या मावस नणंदेपर्यंत! या सतत निरनिराळ्या लोकांशी संपर्कात आल्यामुळे एक मात्र नक्की झालंय. आपण दोन पातळ्यांवर जगतो आहोत असं सारखं वाटत राहतं. एक खऱ्या आयुष्यातले आपण. एक आई म्हणून, एक नोकरी करणारी बाई म्हणून वगैरे आणि दुसरे आपल्या व्हच्र्युअल आयुष्यातले आपण. अमक्या तमक्या बॅचची विद्यर्थिनी म्हणून, लांबलांबच्या नातेवाईकांच्या ग्रुपमधले एक आपण. सकाळचा चहा पितापिता अमेरिकेतल्या आपल्या भाच्याला गुडनाइट करू शकतो. आणि जन्मात न पाहिलेल्या कुणाच्या तरी सासऱ्यांचा आत्मा स्वर्गात जावा, अशी ईश्वराकडे हक्काने प्रार्थना करू शकतो. कोणी म्हणेल यात वाईट काय ?
वाईट काहीच नाही. बहुतेकदा दोन्ही पातळ्यांवरती आपण मजेत जगत असतो. कारण एकमेकांना छेदणारं या दोन्ही पातळ्यांमध्ये फार काही असत नाही. पण जेव्हा एका पातळीवरचा तो माणूस आणि दुसऱ्या पातळीवरचा तोच माणूस हे एकमेकांशी विसंगत वागतात तेव्हा आपणही बुचकळ्यात पडतो. यातला कोणता माणूस खरा असा विचार मनात येत राहतो. उदा- सरळ, निर्विकार चेहऱ्याने वावरणारा माणूस अश्लील जोक्स ग्रुपवर फॉर्वर्ड करतो. किंवा भौतिकशास्त्राचा एखादा प्रोफेसर देवळांमध्ये मॅग्नेटिक फिल्ड जास्त असतात म्हणून तिथे एनर्जी वेव्हज् असतात असा मेसेज पाठवताना दिसतो. सकाळी एखादा मित्र ग्रुपवर फोटो पोस्ट करतो ते आपल्याला लालबागच्या राजाचे कसे अप्राप्य दर्शन मिळाले याचे. आणि हाच मित्र संध्याकाळी लालबागच्या राजाच्या बेहिशेबी मालमत्तेबद्दल जाब विचारणारी, माध्यमांनीच त्याचे कसे अकारण स्तोम माजवले आहे याचे विवेचन करणारी पोस्ट टाकतो. यातला कुठला विचार त्याचा स्वत:चा म्हणायचा? की ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर पोस्ट करताना काहीच विचार करायचा नसतो? कधी एखादा एम.डी. मेडिसीन पदवी असलेला डॉक्टर स्वत: न वाचताच लांबलचक २२ कलमी पोस्ट पाठवतो, त्यात शंखध्वनीने डास आणि जंतू नष्ट होतात, असे छातीठोकपणे लिहिलेले असते. त्याबद्दल त्यांना हटकले की ‘चलता है ना.. फॉर्वर्ड तर केलंय. मी स्वत: थोडंच लिहिलंय?’असे म्हणून आपली जबाबदारी झटकली जाते. ‘चिल.. कु २२२ ल! टेंशन मत ले यार!’ असं म्हणून फॉरवर्ड करणाराच आपली समजूत काढतो. खरंच का हे ‘जाऊ दे’ म्हणून विसरून जावं असं आहे? त्याने फॉर्वर्ड केले आहे ते त्याला पटले, आवडले, आणि ते आपणही वाचावे असे वाटते म्हणूनच ना?
आपण हे लिहिलेलं नाही, केवळ फॉर्वर्ड केले आहे असे म्हणून आपल्याला आपली जबाबदारी झटकता येईल का? हा दुटप्पीपणा नव्हे? की आपण मासिकाच्या संपादकासारखे ‘यातील विचारांशी संपादक सहमत असेलच असे नाही’ असे धोरण फॉर्वर्डस्च्या बाबतीत मनात ठेवून आहोत?
यातून काय काय उद्भवू शकेल याची कल्पना आपल्याला आहे का? एका परिचिताने तिचा वैयक्तिक अनुभव सांगितला. तिच्याच एका मैत्रिणीचा फोटो, सोबत बरेच काही खोटेनाटे लिहून तिच्याचकडे मेसेज म्हणून आला. चौकशी केली असता हे सर्व ‘गम्मत’ म्हणून त्यांच्याच एका मित्राने केल्याचे कळले. पण एकदा हातात मेसेज आल्यावर फोटो आणि ‘बातमी’ (?) जगभर पसरायला कितीसा वेळ लागणार? ‘त्या’ मैत्रिणीच्या कुटुंबाला प्रचंड मनस्ताप भोगावा लागला. पुढे रीतसर चौकशी झाली, पोस्ट निर्माण करणाऱ्यांना अटक झाली. पण ती फॉर्वर्ड करणाऱ्या असंख्य हातांना बेडय़ा घालणे अशक्य. मात्र हे सगळं ऐकल्यावर राहून राहून वाटत राहिलं, हाती काही माहिती आली की ती कोणतीही शहानिशा न करता केवळ फॉर्वर्ड करणारे लोकसुद्धा ‘पार्टी टू क्राइम’ नाहीत का? सगळ्यात आधी बातमी द्यायच्या नादात अर्धसत्य बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिन्यांना का दोष द्यायचा मग? आपणही छोटय़ा पातळीवर तेच करत नाही आहोत का?
निवडणुकांच्या काळात तर या अशाच प्रचारकी मेसेजेस्नी आणि पोस्ट्सनी फोनची सर्व जागा व्यापून टाकली होती. एखादी चिखलफेक करणारी पोस्ट, एखादा जोक दिवसभर वेगवेगळ्या ग्रुप्सवर फिरत राहत असे. कदाचित त्या खऱ्या असतील किंवा नसतील, पण सततच्या माऱ्याने त्या नक्कीच खऱ्या आहेत असे वाटू लागत असे. त्यातसुद्धा त्या माणसाच्या राजनैतिक चुकांपेक्षा त्याच्या लफडय़ांची चविष्ट चर्चाच जास्त. महत्त्वाच्या, आपल्याशी जास्त संबंधित असलेल्या बातम्यांवरून आपले लक्ष यातून उडते, याचे भान वाचणाऱ्यांना राहत नसे. आणि परस्पर विचारांना छेद देणाऱ्या अनेक मेसेजेस्नी तर मनाचा गोंधळ उडतो तो वेगळाच.
त्याचबरोबर नित्यनेमाने फिरणारे मेसेज म्हणजे अमका अमका धर्म श्रेष्ठ आहे कारण.. आणि पुढे बऱ्याच गोष्टींची सरमिसळ यादी. आजच्या वैज्ञानिक कसोटय़ा लावून ते सिद्ध केल्याचा दावा करणारी. यातल्या काही बाबींची मुद्दाम तपासणी करणे आवश्यक आहे. उदा: पूर्वी शेणाने भिंती सारवायला सांगितल्या जात असत आणि आजही ती चांगली पद्धत आहे कारण शेणात खूप क्षार असतात. पण त्या खनिजांचा आपल्याला आजच्या भिंती लिंपून कसा उपयोग होईल, असे कोणालाही विचारावे असे वाटत नाही. किंवा जानवी घातल्याने ‘अ‍ॅक्युप्रेशर’ होते आणि त्याने बरेच रोग दूर पळतात. आता शरीराभोवती सैल गुंडाळलेल्या जानव्याने काय दाब दिला जाणार? किंवा घराला पानांची तोरणं लावल्याने हवा शुद्ध होते. यात तोरणांनी घराला शोभा येते, प्रसन्नता वाटते इतपत ठीक आहे, पण हवा शुद्ध करायला किती प्रमाणात तोरणं लावायला लागतील? पण यातला काहीच विचार हे मेसेज फॉर्वर्ड करणारे करताना दिसत नाहीत. वाचणारा सारासार विचारशक्ती बाजूला ठेवून, संपूर्ण मेसेज न वाचताच भराभर पुढे पाठवतो.
आपला धर्म चांगला आहे हे पटवायला अशा चुकीच्या माहितीचा आधार का लागावा? किती तरी कालबाह्य़ वाटतील, आताच्या काळात विसंगत ठरतील, अशा प्रथा आपण केवळ ‘पूर्वज करत होते म्हणून’ करत असतो. या अशा पोस्ट्सनी नकळत याच वृत्तीला खतपाणी घातले जाते. चर्चा झाली नाही तर किती तरी प्रथांचे अंधानुकरण होत राहील. या उलट, मनाला लावून न घेता, मोकळेपणी वाद घालण्यासाठी सोशल मीडिया हे एक उत्तम माध्यम आहे हे सोयीस्करपणे विसरले जाते.
सॉक्रेटिसची एक साधी पण सुंदर गोष्ट आहे. Triple filter test या नावाने प्रचलित असलेली. सॉक्रेटिसला त्याचा एक मित्र भेटला आणि तिथे हजर नसलेल्या तिसऱ्याच मित्राबद्दल तो बोलायला सुरुवात करणार, इतक्यात सॉक्रेटिसने त्याला अडवले आणि विचारले, ‘‘तू हे जे सांगतोयस त्याबद्दल तुला संपूर्ण खात्री आहे का?’’ मित्र गडबडून म्हणाला, ‘‘नाही, मी नुसतंच ऐकलं की.. ’’ यावर सॉक्रेटिसने विचारलं, ‘‘तू जे सांगणार आहेस ते चांगलं आहे का?’’ यावरही मित्र उत्तरला, ‘‘छे छे ..उलट..’’ पुन्हा सॉक्रेटिसने त्याला थांबवलं आणि विचारलं, ‘‘निदान माझ्या उपयोगाचं तरी आहे का?’’ मित्राचे उत्तर नकारार्थी आलं. त्याला पुढे न बोलू देता सॉक्रेटिसने म्हटलं, ‘‘मग, ज्या गोष्टीची सत्यता तुला माहिती नाही, जी गोष्ट चांगलीही नाही आणि उपयुक्तही नाही अशा गोष्टीत मी माझा वेळ का घालवू?’’
हीच तिहेरी चाचणी सोशल मीडियाला लावली तर आपल्याला आलेले किती तरी फॉर्वर्ड्स आणि पोस्ट्स आपोआप बाद होतील. पण दुर्दैवाने आपल्यातले किती तरी जण कोणतीच चाचणी न लावता ‘आला मेसेज केला फॉर्वर्ड’ एवढेच करतात. आणि त्यातून होणारं नुकसान तसंच फॉर्वर्ड होत राहातं. म्हणूनच फॉर्वर्ड करताना थोडं थांबा, विचार करा आणि मगच पुढे पाठवा. झालाच तर याने फायदाच होईल.

Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
loksatta readers response
लोकमानस : हे केवळ चुकांवर पांघरूण
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Mother strangled her child shocking video viral on social media
आई की वैरीण? चिमुकल्या मुलाला जमिनीवर झोपवलं, गळा आवळला अन्… VIDEO पाहून होईल काळजाचं पाणी पाणी
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
Story img Loader