स्त्रीवर लादल्या गेलेल्या दुय्यमत्वामुळे ती वर्षांनुवर्षे अत्याचार- अन्याय सहन करत गेली; परंतु हे सहन करणं किंवा सहन होणं ही एक मानसिक प्रक्रियाच आहे. अनेकदा त्यातून मानसिक ताण निर्माण होतात आणि ती मानसिक रोगाला बळी पडते. मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून, संवेदनशील सामाजिक व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. हे व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय, ते कसं करायला हवं आणि तिची ही सोशीकता कुठल्या कुठल्या टप्प्यांवर कशी व का वाढत गेली हे सांगणारे हे सदर दर पंधरा दिवसांनी.
स्त्री च्या अस्तित्वाभोवती जेवढे विरोधाभास असतील तेवढे या जगात इतर कुठल्याही जीवित अस्तित्वाविषयी नसतील. एका बाजूने शहरीकरण, आधुनिकीकरण, जागतिकीकरण प्रचंड वेगाने होत आहे. जगातील विविध देश सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जवळ येत आहेत. अशा वेळी हा विरोधाभास जास्त तीव्रतेने जाणवू लागतो. तसे पाहिले तर अनादिकाळापासून स्त्रीची भूमिका ही पुरुषी भूमिकेच्या तुलनेत दुय्यम दर्जाची समजली जात होती. स्त्रीचा कुठल्याही क्षेत्रातील विकास तुलनात्मकदृष्टय़ा पुरुषाच्या विकासापेक्षा कमी प्रमाणात होतो. व्यावसायिक किंवा नोकरीनिमित्त तिला मिळालेली संधी ही कमी प्रतीची असते. अगदी रोजंदारी कामे करणारी स्त्री किंवा मॅनेजरचे काम करणाऱ्या स्त्रीला खासगी क्षेत्रात तुलनात्मकदृष्टय़ा कमी पगार मिळतो. पुरुषांच्या बरोबरीने तांत्रिक असो वा सुरक्षादल असो, तिच्या क्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते. हा स्त्रीच्या क्षमतेचा प्रश्न आहे, की प्रचलित समाजदृष्टीचा प्रश्न आहे हे ठरवणे कठीणच आहे. स्त्रीची जागा नक्की कुठे आहे? व्हिक्टर ह्य़ुगोसारख्या रोमँटिक प्रवासातला कवी आणि कादंबरीकार स्त्रीबद्दल भाष्य करताना सांगतो की, पुरुष हा एक उत्थापित व भारदस्त माणूस आहे, तर स्त्री ही एक भव्य आदर्शाची प्रतिमा आहे. देवाने म्हणे पुरुषाला मुकुट किंवा सिंहासनासाठी बनविले आहे, तर स्त्रीला एका वेदीसाठी बनविली आहे. पुरुष हा मेंदू आहे, तर स्त्री ही हृदय आहे. हे आज आपण जेंडर रोल किंवा लैंगिक भूमिकेतून पाहतो तेव्हा स्त्रीचा अस्तित्ववाद हा नेहमीच पुरुषाच्या अस्तित्वाच्या तुलनेतून पाहिला जातो. स्त्रीच्या बाबतीत अशा प्रकारचे वैचारिक विवेचन तिची भूमिका एक नाजूक वा भावुक कठोर निर्णय न घेता येणाऱ्या, अशक्त अशा वृत्तींचे दर्शन घडविते.
म्हणूनच आज आपल्या राज्यात काय किंवा पूर्ण देशात काय, स्त्रीवरील अत्याचाराचे, बलात्काराचे प्रसारमाध्यमांमुळे समोर येणारे चित्र आपल्याला हतबल करते, व्यथित करते. आजही स्त्री असहाय आहे का किंवा हतबल आहे का, हा प्रश्न मनात आला तर दुसऱ्या बाजूने ‘वुमन ऑफ सबस्टन्स’ ही संकल्पना आपण खरेच जगवू शकतो का, हाही सवाल समोर उभा राहतो. एक सशक्त, अधिकार व हक्कांची जाणीव असलेली स्त्री डोळय़ासमोर आली, की खरेच प्रचंड ऊर्जा जाणवते, कारण ती दुर्मीळ आहे. ती त्या उच्च पदावर बसली आहे याचा हर्षोन्माद स्त्रीच्या मनात आपल्याला कायम दिसतो, कारण तिला ते पद मिळेल याची खात्री नसते. ही संकल्पना मुळातच स्त्रीने स्वत:च्या अंतर्मनात समाजाने घडवलेले तिचे चित्र ठामपणे बसवलेले आहे का?
पण तरीही स्त्रीच्या भूमिकेतून येणारे ताण व विकल्प बदलता येतील का? कारण ती जेव्हा यशाच्या शिखरावर चढत असते, तेव्हाही ती एक वचनबद्ध आई असते, सेवाव्रती पत्नी असते, प्रेमळ भगिनी असते व आव्हान पेलणारी नोकरदार स्त्री असते. या सर्व भूमिकांतून जात असताना प्रत्येक भूमिकेतून येणारा तणाव तिच्या एकटीवरच असतो.
अलीकडेच एक जाहिरात दिसते टीव्हीवर. पतिपत्नी दोघे आपल्या कामावर जाण्यासाठी त्यांच्या कारमध्ये बसलेले असतात. अचानक पतीला आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर एक रुखरुख दिसते. डोळय़ांत हरवलेपण असते. पुरुषाच्या ते लक्षात येतं. तिला तिच्या छोटय़ा बाळाला घरी सोडून नोकरीवर जाणे जिवावर आलेले असते. स्त्रीच्या मनातला हा भावनिक ओलावा या सर्व भूमिकांतून तीव्रपणे दिसतो. म्हणून जेव्हा वेळ येते की, आता हाती आलेली उत्तम संधी कुटुंबासाठी कुणी घालवायची किंवा तडजोड करायची असेल, तर ती कुणी करायची. तेव्हा आपसूक पुढे येते ती स्त्रीच. मग ती आहे त्या वाटेवरच तशीच थांबते. आपले घरटे सांभाळत असते. तो मात्र केव्हाच पंखाची भरारी घेत आकाशात उंच उडू लागतो. त्याला गवसणी घालण्यासाठी पूर्ण विश्व मिळालेले असते; पण ती मात्र त्या कोशातच राहते.
बहुधा आपण सारे असे गृहीत धरतो की, स्त्रीची ही भावुकता आणि समर्पण करण्याची प्रवृत्ती तिच्या जन्माबरोबरच आली असावी. असेल की नाही हा तेवढा महत्त्वाचा मुद्दा नाही; पण बऱ्याच वेळा केवळ ती एक स्त्री आहे म्हणून ज्या सामाजिकीकरणाच्या परंपरागत प्रक्रियेतून जाते त्यातूनच ती पुढे तशी घडते, मुद्दाम जखडलेली किंवा स्वत:हून मागे पडलेली. लहानपणापासून घरी बहीण-भावाच्या तुलनेत आई जेव्हा भावाला झुकते माप देत राहते आणि त्याच्यासाठी काही खास करतच राहते तेव्हा तिला ती एक परंपरागत शैली आहे असे वाटते. आई घरच्या सगळ्यांना भरपूर जेवण देते. आपल्यासाठी किती उरले आहे, त्याने आपले पोट भरणार की नाही याचा विचार करत नाही. अगदी सगळय़ांच्या शेवटी सगळय़ांना हवे नको ते पाहून काहीच उरले नाही, तर सगळी उरलीसुरली भांडी पुसून ती तिचे जेवण जेवते. पोटात खूप भूक उरलेली असते: पण मग ती भूक भागवताना आई दोन ग्लास पाणी पिऊन पोट भरले आहे, असे मानते. शेवटी दोन ग्लास पाणी पिऊन पोट भरल्याचे स्वीकारायचे ही खरी स्त्रीच्या सामाजिकीकरणाच्या विकासाची शोकांतिका आहे. स्त्रीची मानसिकता ही अशीच घडत जाते. यात समर्पण आहे म्हणून स्वत:चे समाधान करून घेते; पण स्वत:च्या सर्वसाधारण अधिकारांचा स्वत:च गळा दाबत जायचा, हे काही खरे नाही हे तिला कळत नाही. स्त्रीच्या नैसर्गिक स्वातंत्र्याचा अशा पद्धतीने ऱ्हास होताना पाहिले तर स्त्रीला एक माणूस म्हणून आपण किती जागृत राहणे आवश्यक आहे याची जाणीव होईल. पुरुषाच्या पाठी जाण्याची स्त्रीची भूमिका किंवा त्याला पाठीशी घालण्याची प्रवृत्ती या दोन्हीही अभ्यासण्याची गरज आहेच.
आज बायकांना घरगुती हिंसा, लैंगिक हिंसा सोसाव्या लागतात. हिमनगाच्या टोकावरची एखादी कहाणी पुढे येते; पण बाकीच्या सामाजिक बेजबाबदारीच्या घटना पडद्याआड हरवतात. याचे कारण कडवट व गंभीर आहे. तक्रार करण्यासाठी आवश्यक आधार तिला तिच्या आपल्या माणसांकडून मिळत नाही; पण तिने धैर्याने वा शौर्याने ठरविले की, या कुटिल अमानवी घटनेची दाद मागावी, तर पूर्ण व्यवस्थाच नपुंसक आहे की काय असे वाटावे. न्याय मागावा, तर न्याय तरी मिळेल का, हा प्रश्न तिच्या मनात धगधगत असतोच; पण न्यायाच्या या झगडय़ात क्षणोक्षणी तिला मानहानी सहन करावी लागते. अनेक वर्षे त्यात जातात व स्त्री या न्यायाच्या युद्धात स्वत:चाच आत्मविश्वास गमावते. स्वत:च हरपते. कशा पद्धतीने स्त्रीने अशा अन्यायाची दाद मागावी याचे पॅटर्न हे तितके साधे-सरळ नाही आहेत. म्हणूनच असे घृणास्पद प्रसंग उघडपणे सांगण्यास स्त्रिया धजावत नाहीत.
मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून, असंवेदनशील सामाजिक व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे, कारण या शोषित स्त्रिया मग शारीरिक व मानसिक अनारोग्याच्या वाटेने चालतात. इतर कुठे आधार मिळत नाही म्हणून पुन:पुन्हा त्या शारीरिक समस्या घेऊन डॉक्टरकडे जातात. त्या समस्यांचे उत्तर कुणाकडेच नसते. खरे तर त्यांना गरज असते ती एका न्याय्य समाजाची, त्यांच्यावर झालेल्या विटंबनेची वाचा फोडायची. तिच्या क्षमतेचे आणि अस्तित्वाचे जे अवमूल्यन झालेले असते ते समाजात कुणी समजेल का या वैचारिक गोंधळात तिचा मात्र नाहक मानसिक बळी जातो. ती सतत सामाजिक अवस्थेवर अवलंबून असते. त्या सामाजिक पाठबळशिवाय तिला अगतिक आणि ऊर्जाहीन वाटत राहते, कारण वैयक्तिक पातळीवर अन्यायाशी दोन हात करण्याची ताकद तिच्यात नसते.
आज आपण काही स्त्रिया त्यांच्या करीअरमध्ये उच्च स्थानावर पोहोचलेल्या पाहतो; पण त्या किती तरी कमी आहेत. खऱ्या अर्थाने स्त्री पुरुषप्रधान मानसिकतेतून मुक्त झालेली नाही. महिलेच्या अस्तित्वाला आवश्यक अशी महिलाप्रधान मूल्ये व विचारसंहिता खऱ्या अर्थाने अस्तित्वात नाही. म्हणूनच आयुष्य जगताना ते अर्थपूर्ण, स्वत:ची अस्मिता जपून व सकारात्मक पद्धतीने जगणे आवश्यक आहे.
डॉ. शुभांगी पारकर -pshubhangi@gmail.com.