आजकाल आपल्या देशातही कॉर्डब्लड स्टेमसेल स्टोरेजचा अक्षरश: हजारो रुपयांचा धंदा झालेला आहे. भविष्यातली आशा दाखवत असलेल्या कॉर्डब्लड स्टेमसेलचा एकही उपयोग आज ज्ञात नाही. सध्या तरी आई-वडिलांनी आपल्या बाळाच्या स्टेमसेल पुढे बाळाला गरज भासल्यास त्या वापरून इलाज होतील, अशा आशेने भरभक्कम पैसे खर्च करून सांभाळून ठेवणे म्हणजे चंद्रावर प्लॉट विकत घेऊन निवृत्त झाल्यावर चंद्रावर राहायला जाऊ , असं म्हणत त्यात पैसे गुंतवण्यासारखे आहे! आज तरी ते फक्त भावनिक आवाहनाचे अर्निबध मार्केट ठरते आहे.
त्यापहाटे मी डॉक्टरसारखा नव्हे तर एखाद्या नातेवाईकासारखा एका सुसज्ज हॉस्पिटलमधल्या बाकावर वाट बघत बसलो होतो. माझ्या भाचीचे बाळंतपण होत होते. तेवढय़ात एक मार्केटिंग मॅनेजर अवतीर्णही झाला! हा मार्केटिंगचा माणूस पहाटे पाच वाजता भाचीच्या नवऱ्याला बाळाच्या नाळेमधल्या रक्ताच्या साठवणुकीचे (कॉर्डब्लड स्टेमसेल स्टोरेज) फायदे सांगत होता व अजिजीने आवाहन करीत होता की, ‘‘हीच वेळ आहे. जन्मानंतर काही मिनिटांची! एकदा ती निसटली की पुन्हा कधी येणार नाही. आपण नाळेमधले एरवी वायाच जाणारं रक्त जमा करायचं अन् आमच्या सुसज्ज अशा व्यवस्थेमध्ये ते आम्ही एकवीस र्वष सांभाळू.’’
मला खूप वाटत होतं की त्याला थांबवावं, पण मी मला आवरलं. मला हे बघायचं होतं की काय काय सांगितलं जातंय अन् त्याचा परिणाम काय होतोय? तो मार्केटिंगचा माणूस आर्जवाने भावनेला आवाहन करत होता, ‘‘असं बघा, हल्ली एखादंच मूल असतं अन् आजचे तुमच्यासारखे आई-बाबा खूप सतर्क झाले आहेत, आपल्या मुलाला जगातलं सर्वोत्कृष्ट मिळावं असंच त्यांना वाटतं. फक्त गुगल करा – अमेरिकेत लाखो जोडपी असं कॉर्ड ब्लड स्टोअर करताहेत. मान्य आहे की आज जर तुम्ही मला विचाराल की आज या स्टेमसेलचा काय उपयोग आहे, तर प्रामाणिकपणे मी सांगेन – काही नाही. मग मी तुम्हाला खर्चात का पाडतोय? मी एक सांगीन आत्मविश्वासाने की इतक्या वेगाने संशोधन होतंय की काहीच वर्षे – अन् हे तंत्रज्ञान होणार आहे एकदम क्रांतिकारक! कल्पना करा – देव करो व असं न होवो, पण एखाद्या अपघातात या बाळाचा – आय मीन – मोठय़ा कॉलेजात जाणाऱ्या या तुमच्या मुलाचा स्पायनल कॉर्ड तुटला – पांगळेपणा आला – पण हाताशी हे साठवलेले रक्त आहे – तेव्हाचे डॉक्टर आज तुम्ही दूरदृष्टी दाखवून साठवलेल्या या स्टेमसेल इंजेक्ट करतील मुलाच्या स्पायनल कॉर्डमध्ये – अन् तो पुन्हा आपल्या पायावर उभा राहील!’’
मी थक्क झालो होतो त्याच्या या अत्यंत प्रभावी संवादाने.
भाचीच्या नवऱ्याने विचारलं, ‘‘चेक चालेल?’’
मी त्याला कुजबुजत बाजूला ओढलं व माझा सल्ला दिला की हा नाहक खर्च करू नकोस. असं सांगणारा मी एक स्त्री-रोगतज्ज्ञ होतो, पण त्याचे बाळ आता तासा-दोन तासांत या जगात ‘टय़ाहो’ करणार होतं, त्याच्याकडे खर्च करायला पैसे होते, त्याचा उभरत्या तंत्रज्ञानावर विश्वास होता अन् त्याला ती कायमची हातातून सटकून जाणारी संधी अजिबात गमवायची नव्हती. त्याने मला ‘सॉरी’ म्हटले अन् चेकबुक काढत तो त्या विक्रेत्याकडे अधीरतेने गेला, जणू त्याला आता क्षणाचाही विलंब करायचा नव्हता! किती द्यायचे? त्याने विचारले. ‘‘फक्त ४५,००० रुपये’’ उत्तर आले, (पूर्वी हा रेट ७५,००० होता) चेक दिला गेला. तत्परतेने वारेतून रक्त जमा करायची साधनसामग्री लेबर रूममध्ये पोचवली गेली. अशा या अव्याहत मार्केटिंगचा परिपाक म्हणजे आज आपल्या नवजात बाळाचे कॉर्डब्लड भरपूर पैसे खर्च करून साठवणे ही एक ‘कूल’ गोष्ट झाली आहे. मी स्वत: एक स्त्री रोगतज्ज्ञ. मग मी त्याला असा खर्च करू नको असं का सांगत होतो? त्या साठी जरा खोलात हा मुद्दा तपासावा लागेल.
स्टेमसेल म्हणजे काय? स्त्री व पुरुषाची एक- एक पेशी एकत्र येते व गर्भधारणा होते. एका पेशीपासून अब्जावधी पेशी तयार होतात, या सर्व पेशींमध्ये समान अशा जनुकांच्या आज्ञावल्या असतात. मात्र त्यांचे त्या जनुकांचा वेगवेगळा पण अचूक वापर करत अनेक अवयव, टिश्यू तयार होतात. काही मूलभूत पेशी ज्यांना स्टेमसेल म्हणतात त्यांच्याकडे अशी जादूगारासारखी कोणताही अवयव/ टिश्यू तयार करण्याची क्षमता असते. म्हणजे या स्टेमसेलमधल्या जनुकांचा अमुक स्विच ऑन झाला की डोळा तयार होतो. तमुक ऑन झाला की या विक्रेत्याने सांगितल्यासारख्या स्पायनल कॉर्डमधल्या नव्र्हसेल तयार होतात. जन्म घेतलेल्या शरीरात उरतात फक्त स्पेशेलिस्ट सेल. उदा – हृदयाच्या/ रेटायनाच्या/ कातडीच्या. या स्पेशलिस्ट सेल फक्त त्यांच्यासारख्याच पेशींना जन्म देऊ शकतात. उदाहरणार्थ, कातडीच्या पेशी कातडीचेच नवनवीन थर तयार करत असतात आयुष्यभर. याला अपवाद फक्त सेल आहे नव्र्ह सेल्सचा. नव्र्ह सेल निर्माण होऊ शकत नाहीत आणि त्यामुळे एकदा स्पायनल कॉर्ड तुटला तर तो नव्याने तयार होत नाही, दुरुस्त होऊ शकत नाही.
जन्म घेतल्यावर शरीरात स्टेमसेल तीन ठिकाणी असतात. बोन मॅरो (हाडात), अॅडिपोज टिश्यू (चरबीची पेशी) आणि रक्त. आज अगदी एक रुळलेली पद्धत म्हणून बोनमॅरोमधून स्टेमसेल ट्रान्स्प्लांट करून ल्यूकेमियासारखे काही रोग बरे केले जातात. मात्र हे सर्व प्रकार खर्चीक आहेत व एखाद्याला तंतोतंत जुळणारी बोनमॅरो सापडणं हे या प्रक्रियेतले कठीण आव्हान आहे. बोनमॅरो स्टेमसेल शरीरात त्या त्या अवयवात इंजेक्ट करून विशिष्ट टिश्यूू (उदा – हृदयविकारात मृत झालेल्या हृदयाच्या पेशींऐवजी नव्या पेशींची निर्मिती, अथवा नव्र्हसेल – मज्जापेशीची नवनिर्मिती) निर्माण करण्याचे प्रयोग आता सुरू आहेत. या अशा स्टेमसेल ट्रान्स्प्लांटने डोळ्यातील रेटायनाचे काही आजार, स्पायनल कॉर्डमधले आजार, मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्याने होणारे काही आजार, संधिवात, जळीत, अशा अनेक आजारांवर इलाज शोधण्याचे प्रयोग शास्त्रज्ञांनी उंदरांवर व डुकरांवर सुरू केले आहेत. मात्र आज प्रयोगात वापरल्या जाणाऱ्या स्टेमसेल या बोनमॅरोमधल्या आहेत, कॉर्डब्लडमधल्या नाहीत. कॉर्डब्लड स्टेमसेल प्रत्यक्ष वापरायला अजून बऱ्याच अडथळ्यांना दूर करायची गरज आहे. जास्त संख्येने कॉर्ड ब्लडमधून स्टेमसेल मिळवणे, त्यांचे रूपांतर हव्या त्या अवयवाच्या टिश्यूमध्ये करणे (उदा – हृदय), स्टेमसेल टोचल्यावर त्या तिथे जिवंत राहणे आणि रुजणे, त्यांचे नवीन टिश्यू तयार करण्याचं काम सुरू होणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूळ शरीरानं परक्या स्टेमसेलचा स्वीकार करणे असे सर्व अडथळे कॉर्डब्लड स्टेमसेल ट्रान्स्प्लांटमध्ये आहेत.
कॉर्डब्लड स्टेमसेलच्या ज्या संभाव्य उपयोगाचा एक आमिष म्हणून या कंपन्या उपयोग करतात त्या दाव्यांसंबंधाने आजचे वास्तव असे आहे.
० आईवडिलांनी ज्याच्या स्टेमसेल साठवल्या आहेत, त्या नवजात बाळाला जर विशिष्ट प्रकारचा रक्ताचा कर्करोग झाला तर त्याच्या या साठवलेल्या स्वत:च्या कॉर्डब्लड स्टेमसेल त्याला अजिबात उपयोगी पडत नाहीत, दुसऱ्या व्यक्तीच्या स्टेमसेलचीच गरज लागते, कारण त्याच्या स्वत:च्या स्टेमसेलमध्येसुद्धा तो कर्करोग असतोच! (मात्र काही आजारांत साठवलेल्या स्टेमसेल वापरता येतील, त्याची गरज किती पडेल? तर अगदी नगण्य.)
० अशी गरज पडलीच तरी गेल्या १० वर्षांत झालेले बहुतांशी कॉर्डब्लड स्टेमसेलचे इलाज सरकारी बँकेत मोफत मिळणाऱ्या, कुणाही दुसऱ्या व्यक्तीच्या कॉर्डब्लड स्टेमसेल केले गेले आहेत. आपण सध्या रक्त कसे मिळवतो त्याच पद्धतीने! आपण रक्त काही स्वत:चे काढून साठवून ठेवत नाही की गरज लागली तर वापरू म्हणून! आपण गरज लागल्यावर त्या वेळेस ब्लड बँकेत दुसऱ्या कुणाचेही आपल्या रक्तगटाचे जे रक्त उपलब्ध असेल तेच वापरतो.
० स्टेमसेल मिळवण्यासाठी कॉर्डब्लड हा अनेक पर्यायांवर संशोधन चालू आहे त्यातला फक्त एक पर्याय आहे. तो एकमेव पर्याय नाही. व्यक्तीच्या गालाच्या अस्तरापासून स्टेमसेल मिळवायचे संशोधन सध्या जोरात चालू आहे! हे संशोधन जर यशस्वी झाले तर या साठवलेल्या बँकेतल्या स्टेमसेल संपूर्णत: बिनकामाच्याच ठरतील.
० या साठवलेल्या कॉर्डब्लड स्टेमसेल प्रत्यक्षात वापरायला एक व्यवहारिक अडचण आहे जी अर्थातच या व्यापारी बँकेचा विक्रेता कधीच सांगणार नाही. ती अशी. डॉ. जोन कुर्टझबर्ग या डय़ूक युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरच्या प्रथितयश डॉक्टर. त्या कॉर्डब्लड स्टेमसेल वापरणाऱ्या अगदी मोजक्या तज्ज्ञांपैकी एक आहेत. त्या सांगतात, ‘‘९० पौंडापेक्षा जास्त वजनाच्या व्यक्तीसाठी बँकेत साठवलेल्या कॉर्डब्लड त्याच्या स्वत:च्या स्टेमसेल संख्येनेच अपुऱ्या पडतात अन् म्हणून निरुपयोगी असतात!’’
० कॉर्डब्लड स्टेमसेल साठवण्याची सुरुवात होऊन वीस वर्षे झाली आहेत मात्र त्याच्या संभाव्य आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली नाही. आज अजिबात हे माहीत नाही की या किती वर्षे टिकतात. अमेरिकेतील मिनापोलिस इथल्या सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या नॅशनल मॅरो डोनर प्रोग्रमच्या मॅनेजर मेरी हिलेट यांचा अनुभव धक्कादायक आहे. साठवलेल्या कॉर्डब्लड स्टेमसेलपैकी ७५ टक्के भाग खराब झाल्यामुळे किंवा संख्येने स्टेमसेल कमी असल्यामुळे तो स्टेमसेलचा साठा फेकून द्यावा लागला आहे किंवा संशोधनासाठी वापरायला लागला आहे!
० हे असे साठवलेले कॉर्डब्लड जर उद्या खरंच टिकले व वापरण्यातही आले तरीसुद्धा काही महत्त्वाचे नैतिक प्रश्न निर्माण होतात. उदा: जर २१ वर्षे हे रक्त लागले नाही तर या बँका ते दुसऱ्या व्यक्तीला विकणार का? जर बाळ सज्ञान होण्याअगोदर त्याचे साठवलेले कॉर्डब्लड त्याच्या भावंडांना वा आईबापाला लागले तर ते या अज्ञान बाळाच्या सहीशिवाय वापरले जाणार का? अन् असे वापरले गेले व उद्या त्या बाळालाच लागले तर?
० काही जण जसा दावा करतात तसा खऱ्या अर्थाने हा विम्यासारखासुद्धा प्रकारसुद्धा नाही. कारण समजा ‘मृत्यू’ कव्हर करायला आपण विमा काढला तर ‘मृत्यू’ हे आजघडीला ज्ञात असलेले वास्तव आहे. भविष्यातली आशा दाखवत असलेल्या कॉर्डब्लड स्टेमसेलचा एकही उपयोग आज ज्ञात असलेले वास्तव नाही.
थोडक्यात, आजमितीला आईवडिलांनी आपल्या बाळाच्या स्टेमसेल पुढे बाळावर गरज भासल्यास त्या वापरून इलाज होतील अशा आशेने भरभक्कम पैसे खर्च करून सांभाळून ठेवणे म्हणजे चंद्रावर प्लॉट विकत घेऊन निवृत्त झाल्यावर चंद्रावर राहायला जाऊ असं म्हणत त्यात पैसे गुंतवण्यासारखे आहे!
अर्थातच, अशी छानछोकी व चैनच ज्यांना स्वेच्छेने करायची आहे त्यांनी ती करावी बापडी, कोण रोखू शकते त्यांना? मात्र इतरांनी भावनेच्या आहारी जाऊन खोटय़ा आशेने फसू नये एवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठीच खासगी कंपन्यांना पैसे देऊन कॉर्डब्लड स्टेमसेल साठवायला विरोध आहे, सरकारी बँकात मोफत साठवायला नाही. (भारतात अशी सरकारी बँक नाही.)
स्टेमसेलचा हा जो व्यापार, जगात व भारतात चालू आहे तो हिमनगाचे एक टोक आहे व येणाऱ्या भविष्याची नांदी आहे. यापुढे फार्मास्युटिकल कंपन्या व तंत्रज्ञान विकणाऱ्या कंपन्या रोज नवनवे खरेखोटे तंत्रज्ञान समाजाच्या माथ्यावर मारायला अग्रेसर असणार आहेत. माझ्या भाचीच्या नवऱ्यासारखी गत समाजाची होणार आहे. कारण ज्या पूर्णार्थाने तांत्रिक गोष्टी आहेत, त्यांच्याबद्दल अगदी सुशिक्षित रुग्णही अनभिज्ञच असणार आहेत आणि त्याबद्दल नैतिक निर्णय घ्यायची जबाबदारीही या जबाबदारीचे योग्य भान असणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या संस्थांनाच आणि कायदे करणाऱ्या सरकारला घ्यावी लागणार आहे. स्टेमसेलबाबत जागतिक अनुभव काय आहे या बाबतीत?
फ्रान्स व बेल्जियममध्ये या तंत्रज्ञानाच्या खासगी वापरावर चक्क बंदी घातली गेली आहे! तिथल्या माझ्या भाचीच्या नवऱ्यावर भारतातल्यासारखा प्रसंगच ओढवत नाही खिशातून चेकबुक
काढायचा! अमेरिकेत गेली २० वर्षे हा व्यापार चालू आहे, पण या देशातल्या व्यावसायिकांच्या संघटना अन् काही डॉक्टर हे अत्यंत पारदर्शकतेने या कंपन्यांविरुद्ध ठाम भूमिका घेताना आढळतात, अनभिज्ञ रुग्णांचे तसे प्रबोधन करताना दिसतात. त्यापैकी काही ठळक उदाहरणे अशी.
अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशिअन्स अॅण्ड गायनॅकॉलॉजिस्ट – (ACOG) तसेच अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडिएट्रिशिअन (AAP) या वैद्यकीय संस्थांनी मुळी असा सल्ला दिला आहे की खासगी कॉर्डब्लड स्टेमसेल बँकेत साठवण्यासाठी जोडप्यांनी अजिबात पैसे खर्च करू नये! ज्या कुटुंबात आनुवंशिक व जनुकीय आजारांचा इतिहास आहे अशांनीच परवडत असेल तर स्टेमसेल साठवाव्यात, त्यासुद्धा काहीही आशा न ठेवता! आणि त्यांनासुद्धा सरकारी कॉर्डब्लड बँकेचा पर्याय जास्त समर्थनीय आहे व त्यात काही खर्चसुद्धा नाही!
अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडिएट्रिशिअन संस्थेशी संलग्न असणारे ऑकलंड रिसर्च इन्स्टिटय़ूटचे डॉ. बटर्रम ल्युबीन म्हणतात, ‘‘या खासगी कॉर्डब्लड स्टेमसेल साठवण्याचा धंदा करणाऱ्या बँका भविष्यातील अज्ञाताची भीती दाखवून आईबापाला घाबरवून टाकतात, जे आज अजिबात विज्ञानाने सिद्ध केले नाहीत असे दावे करतात.’’
हाउस्टनच्या बेलर कॉलेज ऑफ मेडिसिनमधले लहान मुलांच्या शाखेचे प्रोफेसर डॉ. विल्यम शेअरर तर याही पुढे जाऊन असं सांगतात, ‘‘या व्यापारी बँका जणू अशी वातावरण निर्मिती करतात की तुम्ही जर आपल्या बाळाचे कॉर्डब्लड आमच्याकडे साठवलं नाही तर तुम्ही नक्कीच उलटय़ा काळजाचे आईबाप आहात! पण वास्तव हेच आहे की असे रक्त साठवण्यात फायदा आहे. हा या कंपन्यांचा दावाच तद्दन खोटारडा आहे!’’
जागतिक आरोग्य संस्थेच्या वेबसाइटवर जीन पॉल पीर्ने याला दुजोरा देत म्हणतात, ‘‘बाळासाठी काहीही करायला तयार असलेल्या बिचाऱ्या आईबापांना कोणताही नैतिक विधिनिषेध नसणाऱ्या कंपन्या ज्याचा अजिबात भरवसा नाही, जे आज विज्ञान अजिबात सिद्ध करत नाही अशा खोटय़ा गोष्टींसाठी पैसे खर्च करायला मोहात पाडतात!
भारतात खासगी कंपन्यांच्या या अर्निबध धंद्याविरुद्ध सरकार किंवा वैद्यकीय संस्था संघटना पुढे येत लोकांचे प्रबोधन करताना आढळतात का? तर उत्तर आहे दुर्दैवाने – नाही. फक्त स्टेमसेलबाबतच नाही, भारतात येणाऱ्या नव्या तंत्रज्ञानावर सामाजिक नियंत्रण आणण्याबाबतीत अक्षम्य अशी उदासीनता आहे. भारतात आजवरचा इतिहास असा आहे की आधी अशा नवनव्या तंत्रज्ञानांचा काही खासगी डॉक्टरांकडून अन् खासगी कंपन्यांकडून अंदाधुंद गैरवापर होतो अन् मगच सिनेमातल्या पोलिसासारखी सरकारला जाग येऊन कायदे होतात! (आता सरोगसीवर कायदा होतो आहे) सोनोग्राफीने लिंगनिदान करणे, स्त्री गर्भ काढून टाकणे आणि कायदेशीर आणि नैतिक आज्ञावल्या तयार न करता सरोगसीचा धंदा करणे – (भाडय़ाने दुसऱ्या स्त्रीची गर्भपिशवी स्वत:चा गर्भ वाढवायला वापरणे) अशी इतर काही ठळक उदाहरणे आहेत. एका बातमीनुसार तर आंध्र प्रदेशमधे एका वैद्यकीय व्यावसायिक संघटनेच्या स्थानिक शाखेने व्यापारी कॉर्डब्लड बँकेच्या सहभागितेतून या महान तंत्रज्ञानाबद्दल ज्ञान देण्यासाठी आणि त्याचा प्रसार व भलावण करण्यासाठी चक्क डॉक्टरांचे सीएमई (सततचे प्रशिक्षण) आयोजित केले होते!
भारतात गेल्या ३० वर्षांत ‘वैद्यकीय सेवा’ ही रुग्णांचा मानवी अधिकार व डॉक्टरांची सेवा असं न उरता आता ती एक विक्रीलायक वस्तू (कमोडिटी) बनली आहे जी डॉक्टर विकतात अन् रुग्ण खरेदी करतात. असंही एक जनमत तयार झालं आहे की जेवढी ही सेवा महाग व तंत्रज्ञान नवं तेवढा या आरोग्यसेवेचा दर्जा छान. अशा या बाजारातल्या आरोग्यसेवांच्या वास्तवाचे एक रूप आहे हा कॉर्डब्लड स्टेमसेल स्टोरेजचा धंदा. आरोग्यसेवांच्या खुल्या बाजारामुळे एक गंभीर विरोधाभास तयार झाला आहे. एकीकडे भारतात ज्यांना परवडते त्यांच्या गळ्यात कॉर्डब्लड स्टेमसेल स्टोरेजसारख्या भ्रामक आरोग्यसेवा सर्रास मारल्या जात आहेत अन् दुसरीकडे त्याच भारतात ३/ ४ कोटी लोक दरवर्षी गंभीर आजारपणात खासगी वैद्यकीय सेवा विकत घेण्यासाठी जमीनजुमला, दागदागिने विकावे लागून दारिद्रय़रेषेखाली ढकलले जात आहेत. हा विरोधाभास सामाजिक स्वास्थ्यासाठी योग्य नाही आणि खरं म्हणजे आरोग्यसेवेला ‘कमोडिटी असण्यातून’ बाहेर काढत इंग्लंड, कॅनडा, थायलंड यासारखी आरोग्यसेवा (युनिव्हर्सल हेल्थ केअर) भारतात आणण्याची वेळ आली आहे की जिथे प्रत्यक्ष आरोग्यसेवा घेताना रुग्ण व डॉक्टरमध्ये आर्थिक देवाणघेवाण होणार नाही. (टॅक्स वा तत्सम मार्गाने सरकारला त्यासाठी मोल मोजावे लागेल) अशा या व्यवस्थेत कॉर्डब्लड स्टेमसेलच्या संशोधनासाठी सरकारी बँका असतील जिथे स्टेमसेल ठेवण्या-घेण्यासाठी काहीही पैसे द्यावे लागणार नाहीत.
हे जेव्हा होईल तेव्हा होईल. पण ते होईपर्यंत तत्काळ गरज ही एका केंद्रीय पातळीवरील स्वायत्त संस्थेची आहे की जिच्यात सरकार, मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडिया, डॉक्टरांच्या व्यावसायिक संघटना आणि नागरी संघटनांचे समान प्रतिनिधी असतील. ही संस्था स्टेमसेलसह येऊ घातलेल्या प्रत्येक नवनवीन तंत्रज्ञानांच्या दाव्यांची शास्त्रीय कसोटीवर व सामाजिक हित लक्षात घेऊन पारख करेल आणि फक्त योग्य तंत्रज्ञानालाच सामाजिक वापरासाठी परवानगी देईल. भारतात सरकार, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया व डॉक्टरांच्या व्यावसायिक संघटना हे आव्हान स्वीकारणार का?
डॉ. अरुण गद्रे -drarun.gadre@gmail.com
‘कॉर्डब्लड’चकवा
आजकाल आपल्या देशातही कॉर्डब्लड स्टेमसेल स्टोरेजचा अक्षरश: हजारो रुपयांचा धंदा झालेला आहे. भविष्यातली आशा दाखवत असलेल्या कॉर्डब्लड स्टेमसेलचा एकही उपयोग आज ज्ञात नाही.
आणखी वाचा
First published on: 27-06-2015 at 01:04 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cord blood stem cells storage