डॉ. स्मिता लेले – dr.smita.lele@gmail.com
श्रेयस आणि प्रेयस आहाराचा समतोल साधण्याकरिता दिवसातून एकदा तरी अल्कलाइन पदार्थ खायला हवा, उदा. उकडलेला दुधी. पालेभाज्या, फ्लॉवर, ब्रोकोली, पाणभाज्या, कंदमुळं, बदाम व नट्स हे इतर काही अल्कलाइन अन्नपदार्थ. आठवडय़ातून २-३ वेळा आलटूनपालटून सर्व प्रकार खाण्यामध्ये येणं चांगलंच. ‘क’ जीवनसत्त्वयुक्त अल्कलाइन अन्नपदार्थ खाल्ले तर प्रतिकारशक्ती वाढते. सध्याच्या करोना विषाणूच्या साथीच्या काळात नेहमीच्या वरण-भाताबरोबर लिंबाची फोड घ्यायलाच हवी!
महात्मा गांधी नेहमी विशिष्ट आहार घेत, जसं की खजूर, बदाम, बकरीचं दूध किंवा अलीकडे नेतेमंडळी, नामवंत मंडळी विशिष्ट आहार घेतात. बऱ्याचदा आपण असं वाचतो, की अल्कलाइन अन्नपदार्थ खावेत. आता तर अल्कलाइन पाणीसुद्धा बाटलीतून विकलं जातं. यामागे काही विज्ञान आहे का? हे समजून घेतलं पाहिजे.
नॅचरोपॅथीमध्ये एक विचार असा आहे, की काही खाद्यपदार्थ हे आम्ल आहेत तर काही अल्कलाइन. रासायनिकदृष्टय़ा संत्र्याचा रस हा नक्कीच आंबट आहे. पण त्याचं नाव ठळकपणे अल्कलाइन पदार्थाच्या यादीमध्ये झळकलेलं पाहून मन चक्रावून जातं. हे समजण्यासाठी ‘पीएच’(pH) म्हणजे नक्की काय हे कळलं पाहिजे. हे कळण्याआधी रसायनांचं ‘पिरिऑडिक टेबल’ समजलं पाहिजे. निसर्गामध्ये अनेक मूलद्रव्यं आहेत. त्यांच्या अणू वस्तुमानाप्रमाणे लहानापासून मोठा अशी एक यादी वैज्ञानिकांनी सुमारे २५० वर्षांपूर्वी केली. आतापर्यंत ११८ मूलद्रव्यांचा शोध लागला आहे, पण त्याची सुरुवात फक्त ६३ नं झाली होती. हे पिरिऑडिक टेबल म्हणजेच तक्ता आडवी व उभी मांडणी करून लिहितात. सर्वात लहान अणू ‘हायड्रोजन’- त्याचा क्रमांक १ व पुढे २- ‘हीलियम’ वायू. ही ओळ संपली. नंतर ३ ते १० ही मोठी ओळ लिहून पुढे ११ ते १८ क्रमांकांच्या मूलद्रव्यांची नावं त्याच्या खाली येतात. रसायनशास्त्राचा अभ्यास करताना असं आढळलं, की दर ८ मूलद्रव्यांनंतर येणाऱ्या मूलद्रव्याचे गुणधर्म तक्त्यात त्याच्या डोक्यावर लिहिलेल्या मूलद्रव्यासारखेच आहेत. उदा. ११ क्रमांकाचं मूलद्रव्य ‘सोडियम’ (सूत्र- ‘एनए’) आणि १९ क्रमांकाचं मूलद्रव्य ‘पोटॅशियम’ (सूत्र ‘के’) ही वागायला सारखी आहेत. रोज खायचा पदार्थ- मीठ म्हणजे ‘सोडियम क्लोराइड’, पण त्याऐवजी कधी ‘पोटॅशियम क्लोराइड’ खाल्लं तरी रसायन म्हणून फारसा फरक पडत नाही. म्हणूनच या मांडणीला ‘पिरिऑडिक’ म्हणजे ‘आवर्ती’ तक्ता असं हे नाव दिलं आहे. अशा प्रकारे तक्त्याच्या डावीकडच्या उभ्या स्तंभामध्ये धातू आहेत, तर उजवीकडच्या स्तंभामध्ये अधातू. सोडियम, पोटॅशियम यांसह सर्व धातू हे विद्युत प्रवाहक व ‘अल्कलाइन आयन’ देणारे आहेत.
वनस्पतींच्या पेशींचं पूर्णपणे ज्वलन होऊन राख होते, तेव्हा ती अल्कलाइन असते. आपली आजी किंवा त्याच्या अगोदरची पिढी जेव्हा खूप चांगले साबण, डिर्टजट नव्हते, तेव्हा भांडी घासण्यासाठी राख वापरायचे. ती राख कोणती असायची? लाकडावर किंवा कोळशावर स्वयंपाक केल्यावर राख मिळे. वनस्पतीजन्य पेशींची राख अल्कलाइनअसल्यामुळे भांडी स्वच्छ होतात आणि खराब होत नाहीत, किंवा गंजत नाहीत. आम्ल वापरून कोणी स्टीलची भांडी किंवा धातूची भांडी धूत नाहीत. कधी तरी चमकवण्यासाठी तांबं किंवा पितळ चिंच वापरून घासतो ते वेगळं. पण सरसकट रोज भांडी साफ करायची आहेत तेव्हा अल्कलीनंच साफ करतात, त्यामुळे त्यावरचे स्निग्ध पदार्थ, प्रथिनयुक्त चिकटलेलं अन्न निघतं. वनस्पतींच्या वाढीसाठी रासायनिक खतं- ‘एनपीके’- अर्थात ‘नायट्रोजन’(रासायनिक नाव -‘एन’) आणि ‘फॉस्फरस’(‘पी’) आणि जोडीला ‘पोटॅशियम’ (‘के’) वापरतात. वनस्पतीच्या राखेमध्ये पोटॅशियम हा धातू मिळतो आणि याव्यतिरिक्त ‘कॅल्शियम’ आणि इतर मूलद्रव्यं मिळतात. हे सगळे अल्कली धातू आहेत. म्हणून दुधी भोपळा आणि इतर वेलीच्या भाज्या असलेल्या भोपळा, पडवळ, शिराळी, कारलं या सर्व अल्कलाइन भाज्या आहेत.
बहुतेक मूलद्रव्यं ही क्षार स्वरूपात निसर्गामध्ये आढळतात आणि पाण्यामध्ये त्यांचं विघटन होऊन ‘आयन’ तयार होतात. याचमुळे जमिनीमधील बोअरचं पाणी क्षार विरघळून खारं बनतं. त्याचं प्रमाण ‘टीडीएस’ अर्थात ‘टोटल डिजॉल्वड् सॉलिड्स’. हे पाणी पिण्यायोग्य गोड व्हावं म्हणून त्यातील आयन हे ‘मॅग्नेशियम’, ‘कॅल्शियम’ अशा धातूंचं ‘आयन एक्स्चेंज रेसिन’ वापरून काढले जातात. मीठ (सोडियम क्लोराइड) हे उदाहरण घेतलं तर दोन आयन बनतात. एक म्हणजे धन विद्युतभारित
(सोडियम +) आणि ऋण विद्युतभारित (क्लोराइड -). सर्वात लहान हायड्रोजन आयन हा धन विद्युतभारित (एच +) असतो. तो खूप पटकन दुसऱ्या पदार्थासह संयोग पावत असल्यामुळे नुसता राहात नाही. खूप तीव्र आम्लामध्ये मोठय़ा प्रमाणात हे एच+ आयन असतात. म्हणून त्याचा पीएच कमी – ० ते २ असतो, आणि सगळ्या वस्तू विरघळून टाकण्याची आणि प्रक्रिया करण्याची क्षमता जास्त असते. ‘फ्री रॅडिकल्स’ हे मानवी आरोग्यासाठी हानीकारक आहेत. याविषयी अधिक पुढच्या लेखात बघूच.
तीव्र अल्कली हे खूप कडू आणि त्याचा पीएच (स्र्ऌ) १० ते १२ असतो. पाण्याचा पीएच साधारण ७ आणि मधुर चवसुद्धा या पीएचच्या जवळपास. सर्वसाधारण खाद्यपदार्थ हे पीएच ४ ते ९ मध्ये येतात. तर मानवी रक्तदेखील पीएच ७ च असतं. पीएच ही हायड्रोजन आयनचं ऋण घातांक स्वरूपात मापन करण्याची मोजपट्टी आहे. ही पट्टी हायड्रोजन आयनचा १० चा ऋण घातांक दर्शवत असल्यानं जेव्हा पीएच १ नं कमी-जास्त होतो, तेव्हा १० पटीचा फरक पडतो. म्हणून अति आम्ल वस्तूमध्ये थोडं पाणी घातलं तरी आम्लता फारशी बदलत नाही. रोज सकाळी जर आपली जीभ पांढरी होत असेल तर याचा अर्थ जठरामध्ये अॅसिडिटी – आम्लता जास्त आहे. त्यामुळे जिभेवर बुरशीचा साका तयार होतो. आयुर्वेद चिकित्सा करताना रोगी व्यक्तीची जीभ पाहिली जाते. अशा प्रकारे निसर्गानं आपल्या तोंडामध्ये ‘पीएच’दर्शक बसवला आहे!
ज्या अन्नाच्या पचनानंतर म्हणजेच मंद ज्वलन क्रियेमुळे ‘आम्ल रेसिडय़ू’ (राख) बनते तेव्हा आजारपण येतं. एखादं अन्न ‘अल्कलाइन’ की ‘आम्ल’, हे समजण्यासाठी खाद्यपदार्थाचा पीएच न बघता त्या पदार्थाचं पूर्ण पचन झाल्यानंतर जे घटक रक्तामध्ये जातात त्याचा पीएच पहिला जातो. ज्या खाण्यामुळे रक्ताला आम्लता येणार असेल, ते पदार्थ खाणे चांगले नाही. त्याच्या विरुद्ध काही अन्नपदार्थ हे अल्कलाइन आहेत आणि ते चांगले, कारण ते रक्ताचा पीएच ‘न्यूट्रल’ करण्यासाठी, समतोल राखण्यासाठी मदत करतात. अल्कलाइन अन्नपदार्थामध्ये पहिलं नाव संत्री, मोसंबी. ज्याला ‘सायट्रस फ्रुट’ म्हणतात त्यांचं आहे. रासायनिकदृष्टय़ा संत्र्याचा रस हा नक्कीच आंबट आहे. तरीसुद्धा तो अल्कलाइन खाद्यपदार्थ आहे, कारण त्याची राख सोडियम, पोटॅशियम अशा अल्कली धातूंची असते. एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे, की जेव्हा आपल्या शरीरात जास्त आम्लता निर्माण होते तेव्हा केवळ पोटात नाही तर सर्वत्र आम्लता वाढते. त्यामुळे त्वचेचे आजार, अॅलर्जी आणि हळूहळू इतरही काही शारीरिक किंवा मानसिक अस्वस्थता (‘डिसऑर्डर’) होतात. आपण वाचत आलो आहे, की मैदा, बिस्कीट, केक, चॉकलेट, साखर, तसंच मांसाहारी पदार्थ कमी खायला हवेत. त्यात तंतुमय पदार्थ कमी असतात आणि ते खाऊन आम्लता वाढते. कोंडय़ासहितचा, जीवनसत्त्व असलेला हातसडीचा तांदूळ, पचनास हलकंअसं अन्न, विविध रंगांच्या भाज्या व फळे जरूर खायला हवीत. आरोग्यासाठी, त्वचेसाठी ते चांगलं. बऱ्याचशा प्रेयस आहारानं (‘जंक फूड’नं) आपलं रक्त ‘अॅसिडिक’ होतं. त्याचा पीएच उदासीन करण्यासाठी श्रेयस आहार- म्हणजे योग्य असा अल्कलाइन आहार घेतला पाहिजे. आपल्याला आनंदी जीवन जगायचं आहे. त्यामुळे केवळ सतत आरोग्यदायी पदार्थ आपण खाऊ शकत नाही. म्हणून श्रेयस आणि प्रेयस असा आहाराचा समतोल साधण्याकरिता दिवसातून एकदा तरी अल्कलाइन पदार्थ खाल्ला तर बरं- उदा. उकडलेला कोवळा दुधी. वयाची ५० वर्षे उलटल्यावर अशा प्रकारची भाजी जर रोज सुमारे १ लहान वाटी (७० ग्रॅम) पोटात गेली तर आरोग्य चांगल्या प्रकारे राखता येईल.
दुधीसारख्या भाज्या पूर्णपणे शिजवून खाल्ल्या तर विरघळणारे तंतुमय पदार्थ मिळतात. त्यामुळे आतडय़ातील विषारी मूलद्रव्यं शोषली जातात. विरघळणारे तंतुमय पदार्थ चांगले असतात, कारण ते आतडय़ामध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी शोषून जेलीसारखे होतात. जी भाजी पूर्ण शिजल्यावर मऊ व काचेसारखी थोडी पारदर्शक दिसते ती चांगली. पण चरबट, तंतुमय राहिली तर त्यामध्ये विरघळणारा भाग (सोल्युबल फायबर) कमी आहे व न विरघळणारा चोथा- ‘सेल्युलोज’ जास्त आहे असं समजावं. खूप जास्त चोथा खाल्ला तर पोटात वायू (गॅसेस) होतो. इतर अल्कलाइन अन्नपदार्थ- पालेभाज्या, फ्लॉवर, ब्रोकोली, पाणभाज्या , कंदमुळं, बदाम व नट्स. आठवडय़ातून २-३ वेळा आलटूनपालटून सर्व प्रकार खाण्यामध्ये येणं चांगलं. हल्ली ‘सुपर फूड’चं फॅड आहे. या यादीमध्ये अल्कलाइन भाज्या, फळं व नट्स आढळतात. तसंच डार्क चॉकलेट व काही मासेही यामध्ये आहेत.
शेवटी पुन्हा आपल्याला पारंपरिक शहाणपणाचं उदाहरण देता येईल. जेव्हा एखादा नेता अथवा सामाजिक कार्यकर्ता सरकारवर दबाव आणण्यासाठी उपोषण करतो, तेव्हा ते उपोषण सोडण्याची पद्धत नेहमी मोसंबीचा रस घेऊन असते. संत्र हे परदेशातील आवडतं फळ आहे. पण आपल्या देशात मोसंबं जास्त चांगलं समजतात व ते खरंही आहे. संत्रं व लिंबू आंबट असतं, सर्वाना सहन होतंच असं नाही. पण मोसंबीचा रस नुसता- साखर वा मीठ न घालतासुद्धा चांगला लागतो व सर्वाना मानवतो. आजारी पडल्यावरदेखील मोसंबं देतात. म्हणून इंग्रजीमध्ये त्याला ‘गोड लिंबू’ म्हणतात.
‘क’ जीवनसत्त्वयुक्त अल्कलाइन अन्नपदार्थ खाल्ले, तर प्रतिकारशक्ती वाढते. तेव्हा या करोना विषाणूच्या काळात नेहमीच्या वरण-भाताबरोबर लिंबाची फोड घ्यायलाच हवी!