डॉ. अंजली जोशी – anjaleejoshi@gmail.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्यांना ‘करोना’ची लागण झालेली नाही, विलगीकरणाला सामोरं जावं लागलेलं नाही किंवा जे ‘करोना’च्या दृष्टीनं थेट धोक्याच्या असलेल्या क्षेत्रातही कामाला नाहीत, त्यांनादेखील करोनामुळे अति मानसिक तणाव येत आहे. कुणी सतत संशयग्रस्त आहे, तर कुणी चिंताग्रस्त आहे. कुणाला स्पर्शगंड सतावतोय, तर कुणी ‘आम्ही-तुम्ही’च्या संकुचित विचारसरणीत अडकलाय. सध्याच्या ‘नवसामान्य’ जीवनात वाढणारी ‘करोनाकेंद्रित’ मानसिकता असणाऱ्यांची ही संख्या सगळ्या समाजाचंच मानसिक स्वास्थ्य ढवळून टाकणार आहे. पण त्यातून बाहेर पडण्याचेही मार्ग आहेत.

‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’, असं यापूर्वी आपल्या सगळ्यांनाच कुठल्या ना कुठल्या प्रसंगात वाटलं असेल. पण सध्याची घडी मात्र अशीच न राहता ती कधी एकदा बदलेल याची सर्व जण आतुरेतनं वाट पाहात आहेत. अर्थात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. टाळेबंदी संपेल का, की तिला मुदतवाढ मिळेल, संपली तरी अंशत: की पूर्णत:?.. पण तरीही ती कधी ना कधी संपेल, ‘करोना’चं संकट दूर होईल, अशी आशाही जोडीला आहे. मग दैनंदिन व्यवहार हळूहळू सुरू होतील, पण त्यांची घडी बदललेली असेल. आपले काही व्यवहार सुरळीत होतील, तर काही होणार नाहीत. काही थोडय़ा, तर काही दीर्घ काळाने सुरळीत होतील. म्हणजेच आपण नवसामान्य जीवनात (‘न्यू नॉर्मल’मध्ये) प्रवेश करू. त्या वेळी मानसिकता कशी असू शकेल हे अमोल, सुबोध, सारिका व स्मिताच्या उदाहरणांतून पाहू या.

अमोल म्हणतो, ‘‘माझ्या मनात हल्ली संशयाचा किडा सतत वळवळत असतो.  कुटुंबाबाहेरचा कुठलाही माणूस दिसला की वाटतं, याचा ‘करोना’बाधितांशी संबंध आला असेल का?  तो स्वच्छतेची पुरेशी काळजी घेत असेल का? तो करोना वाहक असेल का? गाडी धुणाऱ्या माणसापासून ते इस्त्री करणाऱ्या माणसापर्यंत मला सर्वाचाच संशय येतो. टाळेबंदी उठली म्हणजे करोनातून मुक्त झालो असं नव्हे. ती संपल्यानंतरही रिक्षाचालक, भाजीवाला, डिलिव्हरी बॉय यांपकी कुणालाही संसर्गझाला असण्याचा संशय माझ्या मनातून जाणार नाही. पूर्वी मला असं वाटत नसे, पण आता एकदा मनात संशयानं शिरकाव केल्यानंतर तो सहजासहजी जाणारही नाही.’’

सुबोध म्हणतो, ‘‘करोनाग्रस्तांची आकडेवारी मी दर तास-दोन तासांनी पाहतो. आकडा वाढलेला दिसला, की मला धडधड होते. पूर्वी मी आरोग्याबाबत फारसा जागरूक नव्हतो. पण हल्ली मात्र मला सतत धास्ती वाटते. शिंक नाही तर खोकला आला तरी वाटतं, हे ‘करोना’चं लक्षण तर नाही ना?  मला किंवा माझ्या कुटुंबीयांना संसर्ग होण्याच्या नुसत्या विचारानंही माझा थरकाप उडतो. तसं होऊन विलगीकरणात जावं लागलं तर? आमच्यामुळं वस्तीतल्या सगळ्यांना विलगीकरणाला सामोरं जावं लागलं तर? त्यांनी आमच्यावर सामाजिक बहिष्कार घातला तर? अशा अनेक शंका मनात डोकावत राहतात. एकदा चिंतेला सुरुवात झाली, की मग इतरही चिंता मन कुरतडतात. माझ्या कंपनीत नोकरकपात तर होणार नाही ना? मी केलेली आर्थिक तजवीज अपुरी पडली तर?.. मला ‘पॅनिक अ‍ॅटॅक’ येईल अशी धास्ती वाटत राहाते. टाळेबंदी उठली तरी या चिंतेच्या चक्रातून कशी सुटका होणार, ही नवीन चिंता मला आता भेडसावते.’’

सारिकानं स्पर्शाचा धसका घेतला आहे. ती म्हणते, ‘‘ टाळेबंदीनंतर दैनंदिन व्यवहार चालू झाले तरी लिफ्टचं बटण दाबताना, दाराच्या मुठीला स्पर्श करताना, दरवाज्याची बेल वाजवताना, नाणी-नोटा घेताना याला किती जणांचा स्पर्श झाला असेल, त्यातले किती जण ‘करोना’बाधित असतील आणि त्यामुळे अप्रत्यक्ष संसर्ग होईल, हा विचार टाळता येणं मला कठीण आहे. टाळेबंदी संपली तरी प्रत्येक गोष्ट मी परत-परत धुणं थांबवणार नाही. मित्र-मत्रिणींमध्ये गळाभेटी, हात मिळवणं, टाळ्या देणं, पाठीवर थाप मारणं हे पूर्वी मी सहजतेनं आणि मोकळेपणानं करत होते. आता मात्र मी असे स्पर्श जाणीवपूर्वक टाळणार आहे.’’

स्मितापुढचा प्रश्न वेगळाच आहे. ती म्हणते, ‘‘टाळेबंदीनंतर सर्व पूर्ववत झालं तरी मला प्रश्न पडलाय, की घरकामात मदत करणाऱ्या नंदाला मी परत कामावर घेऊ की नको?.. ती बसनं प्रवास करून माझ्याकडे येते आणि अनेक घरं दाटीवाटीनं असलेल्या वस्तीत राहते.’’ दुसरीकडे नंदा स्मिताला म्हणते, ‘‘मलाही तुमच्याकडं कामाला यायचं की नाही, हा प्रश्न आहे. तुमच्यासारख्या लोकांनी परदेशवाऱ्या केल्या आणि हा रोग फैलावला. आमच्या वस्तीतून नाही. तुमच्यामुळे आम्ही अडचणीत येतो.’’

मे महिन्यात नंदा मुलांना घेऊन तिच्या गावी जाते. पण ‘‘तुमच्या शहरातल्या माणसांमुळे आम्हाला संसर्ग नको,’’ असं म्हणत तिचे गाववाले तिला गावात प्रवेश करू देतील का, हाही प्रश्न आहे.

अमोल, सुबोध, सारिका, स्मिता, नंदा, तिचे गाववाले यांची मानसिकता हल्ली बदलली आहे. ‘करोना’च्या उद्रेकामुळे सगळ्यांची सुरळीत चाललेली घडी एकाएकी बिघडली. जीवनशैलीतले मोठे बदल प्रत्येकाला स्वीकारावे लागले. त्यांच्याशी जुळवून घेताना जी नवीन मानसिकता तयार झाली, ती आहे ‘बदललेल्या घडीची मानसिकता’. या मानसिकतेच्या दोन बाजू आहेत. एक बाजू आत्मविकासाला प्रवृत्त करते. तिच्यामुळं आपण अकल्पिताला धर्यानं तोंड देऊ शकतो. गरसोयी, अडचणींतून मार्ग काढू शकतो. वैफल्य सहन करण्याची क्षमता वाढवू शकतो. मात्र या मानसिकतेची दुसरी बाजू आत्मविकासात अडथळा आणते. ही बाजू आपल्याला ‘करोना’बद्दल अतिसंवेदनशील करते. आपले विचार, भावना व कृती ‘करोना’केंद्रित करते आणि मानसिक तणावाला हातभार लावते. या बाजूला ‘करोनाकेंद्रित मानसिकता’ म्हणता येईल.

परदेशातल्या ‘करोना’शी जवळून किंवा दुरून संबंध आलेल्यांच्या मानसिक तणावात कशी वाढ झाली आहे हे दर्शवणारी संशोधनं समोर आली आहेत. विलगीकरणाचा अनुभव घेतलेल्या अनेकांना तो कालावधी संपल्यानंतरही नराश्य, तणाव, संताप, चिडचिड, अशा अनेक दीर्घकालीन मानसिक दुष्परिणामांना तोंड द्यावं लागत आहे. ‘करोना’ची लागण हाऊन बरे झालेलेही अशाच परिणामांना सामोरे जात आहेत. याव्यतिरिक्त आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या मानसिक आरोग्यावरही आत्यंतिक तणाव, भावनिक बधिरेपण , मानसिक थकवा असे दुष्परिणाम दिसत आहेत. हे परिणाम दीर्घकालीन असल्यानं नवसामान्य जीवनातही ते आढळून येतील, असं संशोधकांचं मत आहे.

पण अमोल, सुबोध, सारिका, स्मिता यांपकी कुणालाही ‘करोना’ची लागण झालेली नाही, विलगीकरणाला सामोरं जावं लागलेलं नाही किंवा ते आरोग्यक्षेत्रात कार्यरत नाहीत, मग तरीही त्यांना मानसिक तणाव का आहे?.. याचं कारण आहे, त्यांनी स्वीकारलेली ‘करोनाकेंद्रित’ मानसिकता. अमोल संशयग्रस्त झाला आहे, तर सुबोध चिंताग्रस्त आहे. सारिकाला स्पर्शगंड झाला आहे, तर स्मिता ‘आम्ही-तुम्ही’च्या संकुचित विचारसरणीत अडकली आहे. संशोधकांचा अंदाज आहे, की नवसामान्य जीवनात ‘करोनाकेंद्रित’ मानसिकता असणाऱ्या लोकांची संख्या बरीच मोठी असेल. तसं झालं, तर मात्र अनेकांना मानसिक दुष्परिणामांना सामोरं जावं लागेलच, पण सामाजिक मानसिक स्वास्थ्यही त्यामुळं ढवळून निघेल.

अमोलप्रमाणे जर अनेक जण स्वत:शी संबंध येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडं संशयानं पाहायला लागले तर सामाजिक स्वास्थ्याला चालना देणारा परस्पर विश्वासाचा पायाच ठिसूळ होईल. संशयग्रस्तता ही वैयक्तिकच नव्हे तर सामाजिक, मानसिक आरोग्य धोक्यात आणेल. चिंताग्रस्ततेचं प्रमाण ‘करोना’पूर्वीही समाजात मोठय़ा प्रमाणात होतं. सुबोधप्रमाणे अनेक जण चिंताग्रस्त झाले तर ‘करोना’च्या चिंतेची आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या अनेक चिंतांची भर पडेल. ‘करोना’नंतरच्या काळात समाजातल्या चिंताग्रस्ततेची टक्के वारी २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असल्याचा कयास आहे. सारिकाप्रमाणे अनेकांच्या मनात स्पर्शगंड निर्माण झाला, तर  प्रेमाविष्कारापासून ते व्यावसायिक नातेसंबंधांतील अनेक स्पर्श टाळले जातील. स्पर्शाबाबत नकारात्मकता व भय निर्माण होईल. स्पर्शसान्निध्य ही आपली मूलभूत भावनिक गरज आहे. स्पर्शगंडामुळे जर आपण स्पर्श आखडते घेणार असू तर भावनिक समस्यांत वृद्धी होऊ शकेल.

‘करोनाकेंद्रित’ विचारांमुळे ‘आम्ही-तुम्ही’च्या सीमारेषा संकुचित होताना दिसत आहेत. ‘आम्ही’ना वाटतं, की आम्ही नियमांचे पालनकत्रे आहोत पण ‘तुम्ही’ धोकादायक आहात. स्मिताला वाटतं नंदा धोकादायक, तर नंदाला स्मिता धोकादायक वाटते. नंदाच्या गाववाल्यांना शहरातले लोक धोकादायक वाटतात. याच्याच जोडीला आम्ही स्वच्छता पाळणारे, तुम्ही स्वच्छता न पाळणारे, आम्ही संसर्ग न पसरवणारे, तुम्ही संसर्ग पसरवणारे, अशा ‘आम्ही-तुम्ही’च्या अनेक विभागण्या समाजात झालेल्या दिसतात. अशा विभागण्या इतरांबद्दल नकारात्मक भावना आणि पूर्वग्रह निर्माण करत असल्यामुळे त्या समाजात दुही पसरवतात. नवसामान्य जीवनात ही मानसिकता कायम राहिली तर सामाजिक एकात्मकतेला ती हानिकारक आहेच, पण मानसिक स्वास्थ्यालाही धोकादायक आहे. अर्थात हे लक्षात घेणं आवश्यक आहे, की हे दुष्परिणाम अपरिहार्य नाहीत. पुढील प्रतिबंधात्मक काळजी घेतली तर ‘करोनाकेंद्रित’ मानसिकतेच्या दुष्परिणामांपासून आपण बचावू शकतो.

‘करोना’च्या विचारांचं असंवेदनीकरण

असंवदेनीकरण करणं म्हणजे उलटय़ा टोकाला जाऊन ‘करोना’बाबत असंवेदनशील होणं नव्हे, तर ‘करोना’बाबतची अतिसंवेदनशीलता कमी करणं. स्वत:च्या विचारांमध्ये ‘करोना’व्यतिरिक्त  इतर अनेक विषयांना स्थान देणं. बाहेरच्या जगात ‘करोना’विषयक बातम्यांचा मारा इतका आहे, की स्वत:ला ‘करोना’च्या विचारांपासून पूर्णपणे दूर ठेवणं अवघड आहे. पण रोज सराव केला, तर दिवसातला काही काळ आपण ‘करोना’विषयक विचारांना मनातून हटवू शकतो व टप्प्याटप्प्यानं हा कालावधी वाढवू शकतो.

विनोदाचा वापर

जेव्हा आपण एखादी गोष्ट खूप गांभीर्यानं घेतो तेव्हा तिला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देतो. विनोदाच्या वापरानं हे महत्त्व कमी होऊ शकतं आणि ताण हलका होऊ शकतो. मानवी स्वभाव इतका वैचित्र्यपूर्ण आहे, की त्यातील अनेक विसंगती संकटांच्या काळात सामोऱ्या येतात. त्यांच्याकडे खेळीमेळीनं पाहता येणं ही एक कला आहे. ती जोपासू शकतो आणि तिचा योग्य वापर करून अतिसंवेदनशीलता कमी करू शकतो.

आशावादाची जोपासना

कुठलाही काळ- मग तो अनुकूल असो वा प्रतिकूल, कायमस्वरूपी तसाच राहात नाही. तो बदलत असतो. पुढे अधिक चांगलं घडेल, हा आशावाद मनुष्याला जगण्याची उमेद देत असतो. सध्याच्या अवघड काळातही उमेद वाढू शकेल अशा अनेक घटना आजूबाजूला घडत असतात. त्यांच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं, तर आशावाद जागता ठेवता येईल.

सर्जनशील आविष्कार

‘करोना’बद्दल अतिसंवेदनशीलता दाखवण्यात जी मानसिक ऊर्जा खर्च होते ती आपण सर्जनशील आविष्कारांकडे वळवू  शकतो. किंबहुना अवघड प्रसंगी सर्जनशीलतेला जास्त धुमारे फुटतात. आपल्या प्रत्येकात एक सर्जक दडलेला असतो. तो शोधून काढून एखादी जरी सर्जनात्मक कृती केली, तरी विचारांना वेगळा अवकाश मिळू शकेल.

अमोल, सुबोध, सारिका आणि स्मिता यांच्याबरोबर आपण सर्वानीच जर प्रतिबंधात्मक काळजी घेतली तर स्वत:बरोबरच समाजाचं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आपण नक्कीच हातभार लावू शकतो.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus pandemic changed mentality physcroscope dd70