अवघे पाऊणशे वयमान : भाऊ (सदाशिव) साठे
‘‘मी मुळातला शिल्पकार. खरं तर नव्वदीच्या भोज्यापर्यंत, मी हातात ब्रशही धरला नव्हता; पण न्यायमूर्तीचा हक्काचा आग्रहही मोडवेना. शेवटी एक दिवस हिय्या करून स्टुडिओत गेलो आणि रंगांचे खोके उघडले आणि माझं पहिलंवहिलं पेंटिंग तयार झालं. त्यानंतर मी सुमारे २५ ते ३० पेंटिंग्ज् केली.. आज मी लोकांना विचारतो की, तुम्ही किती शिल्पं बघितलीत? चौपाटीवरील लोकमान्य टिळकांचा किंवा ‘गेट वे ऑफ इंडिया’समोरील शिवाजी महाराजांचा पुतळा तरी पाहिलात का? तर नकार येतो. मन विषण्ण होतं. ‘गेट वे’वर माणसांची गर्दी असूनही शिवाजी महाराज त्यांच्या दृष्टीस पडत नाहीत. याचं कारण या पुतळ्याभोवतीचे महाकाय वृक्ष. हे आक्रमण लक्षात येताच, साधारण दीडेक वर्षांपूर्वी मी याविषयी महापालिका आयुक्तांपासून मुख्यमंत्र्यांच्या सचिवापर्यंत सर्वाना पत्रं लिहिली; परंतु व्यर्थ.. ही अनास्था माझ्यातील कलाकाराला बेचैन करते.’’
वय वर्षे अठरा ते अठ्ठय़ाऐंशी हा माझा शिल्पकलेतील सत्तर वर्षांचा प्रवास कधी सरला ते मला कळलंच नाही. या काळातील माझ्या कलानिर्मितीचा आढावा घेताना, हे सर्व माझ्या हातून कसं घडलं असेल या विचाराने मी आजही आश्चर्यचकित होतो. शिल्पशास्त्रातील प्रदीर्घ अनुभव आणि अनेक राष्ट्रीय स्मारकं-शिल्पं साकारण्याची संधी यामुळे आजही मला ठिकठिकाणी या विषयासंबंधित कार्यक्रमांना प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं जातं. अशा प्रसंगी शिल्पकलेच्या आजच्या स्थितीबद्दल वाटणारी खंत प्रकट करण्याची संधी मी सोडत नाही.
मी शिकत असताना ज्या ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’ने माझ्या शिल्पाला खास ‘स्टुडंट प्राइझ’ देऊन गौरवलं होतं त्याच संस्थेने गेल्याच वर्षी त्यांच्या १२५व्या वार्षकि प्रदर्शनाच्या उद्घाटनाला मला निमंत्रित केलं. तेव्हाही व्यासपीठावरून माझं मत मी निर्भीडपणे मांडलं. संस्थेच्या शतकोत्तर प्रवासात काही विद्यार्थी वैयक्तिक स्तरावर पुढे आले हे खरं; पण शिल्पकलेविषयी सामाजिक पातळीवर जागृती करण्यासाठी, सर्वसाधारण माणसांपर्यंत शिल्पकलेची महती पोहोचवण्यासाठी पावलं उचलली गेली नाहीत याची मी उपस्थितांना जाणीव करून दिली. कारण कलादेखील काळाबरोबर प्रवाहित होत असते आणि ती तशी झाली नाही तर तिची प्रगती खुंटते हे माझं प्रामाणिक मत.
आता तर गुणांच्या जीवघेण्या शर्यतीमुळे शिक्षणसंस्थांतून शिल्पकला, चित्रकला यांचं पार उच्चाटन झालंय. नव्या पिढीकडून नवनिर्मितीची क्षमताच काढून घेणं, हे शिक्षण नव्हे तर शोषण आहे, असं मला खेदाने म्हणावंसं वाटतं. कार्यक्रमातील श्रोत्यांना किंवा माझ्या घरी भेटायला येणाऱ्या मंडळींना जेव्हा मी विचारतो की, तुम्ही किती शिल्पं बघितलीत? चौपाटीवरील लोकमान्य टिळकांचा किंवा ‘गेट वे ऑफ इंडिया’समोरील शिवाजी महाराजांचा पुतळा तरी पाहिलात का? यावर होकारार्थी उत्तर क्वचितच मिळतं. अशा वेळी ही शिल्पं बनविताना जीव ओतून केलेली मेहनत आठवून मन विषण्ण होतं. ‘गेट वे ऑफ इंडिया’ या राष्ट्रीय स्मारकासमोर त्याला पूरक असा छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभा केला तेव्हा त्यासभोवती खुला आसमंत होता. कुठूनही तो नजरेस पडत असे. तो पुतळा, त्याचा चबुतरा, ‘गेट वे’ची वास्तू या सगळ्यांचं एक अतूट, पूरक आणि काव्यमय असं नातं होतं. संपूर्ण परिसराला एक भव्य डौल होता. मात्र आज ‘गेट वे’वर माणसांची गर्दी असूनही शिवाजी महाराज त्यांच्या दृष्टीस पडत नाहीत. याचं कारण या पुतळ्याभोवती लावलेले आणि आता महाकाय वाढलेले वड-पिंप पळाचे वृक्ष. हे आक्रमण लक्षात येताच, साधारण दीडेक वर्षांपूर्वी मी याविषयी महापालिका आयुक्तांपासून मुख्यमंत्र्यांच्या सचिवापर्यंत सर्वाना पत्रं लिहिली; परंतु कारवाई तर दूरच, पत्रांची साधी पोच यायलाही आठ-दहा महिने लागले. ही अनास्था माझ्यातील कलाकाराला बेचैन करते.
२००५-०६ मध्ये शिल्पकाम थांबवल्यावर (त्यानंतर २०१२ मध्ये मी लोकाग्रहास्तवर दांडी गावासाठी महात्मा गांधींचा सतरा फुटी पुतळा केलाच.) माझ्याजवळ राहिलेल्या शिल्प प्रतिकृतींचं कायमस्वरूपी जतन करायचा विचार माझ्या मनात आला. अर्थात सत्तर वर्षांच्या कारकीर्दीतील सर्व शिल्पांच्या प्रतिमा सांभाळून ठेवणं जागेअभावी शक्य नव्हतं. तरीही दोनशे ते अडीचशे शिल्पांची मॉडेल्स मी आमच्या साठे वाडय़ातील स्टुडियोत जपून ठेवली होती. आत्तापर्यंत एकाही शिल्पकाराच्या कलाकृतींचं त्याच्या हयातीत संग्रहालय झालेलं नाही. मान्यवर चित्रकारांचा चित्रसंग्रहदेखील त्यांच्या मृत्यूनंतर कुठे नामशेष होतो ते समजत नाही. हा पूर्वइतिहास जाणून असल्यामुळे हे शिल्पालय उभारण्यात मी जातीनं लक्ष घातलं.
डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरात आठ हजार स्क्वेअर फूट जागेत माझी फाऊंड्री (ओतकामासाठी) होती. माझा मुलगा श्रीरंग, आता माझ्याबरोबरीने काम करतोय. आम्ही आमच्या त्या जागेचा सुंदर कायापालट करून दोन दालनं उभी केली. पहिलं माझ्या शिल्पांकरिता आणि पुढचं दालन माझी पत्नी, प्रसिद्ध चित्रकार नेत्रा, हिच्या पेंटिंग्जसाठी. प्रत्येक शिल्पाचं वैशिष्टय़ दिसावं आणि ती एकमेकांना पूरक वाटावी अशा प्रकारे मी त्यांची मांडणी केली. आवश्यक ती प्रकाशयोजना झाली. वरच्या मजल्यावर कलाविषयक फिल्म्स बघण्याची व्यवस्था केली. जी शिल्पं काळाच्या ओघात नष्ट झाली त्यांचे मोठे फोटो भिंतींवर लावले. मोठी शिल्पं म्हणजे लोकमान्य टिळक, इंदिरा गांधी, रामनाथ गोयंका आदींची, बाहेर बगिच्यात तीन फूट उंचीचे चबुतरे बांधून त्यावर बसवली, तर काही आंब्याच्या झाडांच्या पारावर विराजमान झाली. सतरा फुटी गांधी शिल्प गेटवर उभं राहिलं आणि मनासारखं शिल्पालय आकाराला आलं. स्वखर्चाने उभं राहिलेलं हे संग्रहालय काळजीपूर्वक जतन करण्यासाठी नंतर ‘सदाशिव साठे शिल्प प्रतिष्ठान’ या नावाने न्यास (ट्रस्ट) उभारण्यात आला. हा सर्व संग्रह सांभाळणे तसं खूपच खर्चीक आणि जबाबदारीचं काम आहे. कोणत्याही तऱ्हेच्या शासकीय वा सामाजिक मदतीशिवाय आम्ही हे सांभाळले आहे. तरीही माझ्या मते इथे अजून बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. त्यासाठी प्रशासनाने तर पुढे यायला हवेच, पण त्याबरोबर लोकांनी आणि कलारसिकांनी इथे येऊन निरनिराळे उपक्रम राबवायला हवेत. हा चालता-बोलता इतिहास, हा सांस्कृतिक ठेवा जपायला हवा. परदेशात अशा कलाकृतींना ऐतिहासिक वारसा समजून ज्या प्रकारे जपलं जातं ते भाग्य या शिल्पालयाच्या वाटय़ाला येईल काय?
हे शिल्प संग्रहालय पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांना ‘पुतळा ही प्रथम एक कलाकृती असते हे समजावं.. त्यापाठचं शिल्पकाराचं चिंतन त्यांनी जाणून घ्यावं.. शिल्पांशी त्यांचा संवाद साधला जावा’, असा आमचा प्रयत्न असतो. आताशा माझं वय झाल्याने ही जबाबदारी माझ्या मुलाने, श्रीरंगने उचललीय. तरीही आठवडय़ातून एकदा तरी शिल्पालयात गेल्याशिवाय मला चन पडत नाही.
शिल्पांमध्ये लपलेला ‘बिटविन द लाइन्स’ आशय समजून घेतल्यावर येणारे नि:शब्द होतात. ‘कोयना धरण प्रकल्पा’वरील मूर्त स्वरूपात न आलेल्या शिल्प प्रतिकृतीचं उदाहरण घेऊ या. यात तीन अश्व बेभान होऊन, बेफाम वेगाने पर्वताच्या कडय़ावरून उसळी मारून खाली उडी घेण्याच्या पवित्र्यात आहेत आणि एक मानव त्यांच्यावर स्वार होऊन त्यांना काबूत आणल्याच्या अभिमानी पवित्र्यात दिसतो. हे शिल्प अशा प्रकारे घडवण्यामागचं माझं चिंतन असं होतं की, हा कोयना प्रकल्प म्हणजे पृथ्वी, आप आणि तेज या महातत्त्वांच्या सामर्थ्यांची अभिव्यक्ती आहे आणि या सर्व शक्ती ‘अश्वशक्ती’ या मापदंडानेच मोजल्या जातात. तसेच प्राचीन काळापासून पराक्रमाचा, पुरुषार्थाचा मानदंड अश्वालाच मानलं जातं. म्हणून त्या तीन शक्ती मी आवेशपूर्ण घोडय़ांच्या रूपात दाखवल्या आणि मानवाने बुद्धिसामर्थ्यांने त्यावर मात केलीय हे दर्शवण्यासाठी त्या घोडय़ांवर लगाम धरलेल्या आवेशपूर्ण, शक्तिमान पुरुषाचा आकृतिबंध. शिल्पाकडे बघण्याची अशी नवी दृष्टी मिळाल्यावर पाहणाऱ्यांना वाटतं, ‘अरे, मलाही शिल्पकलेतील थोडं ज्ञान झालं. शिल्प कसं पाहावं कळू लागलं.’ शिल्पांच्या जन्मकथा ऐकताना प्रेक्षक भारावून जातात. त्यांना मिळणारा आनंद हे माझं टॉनिक.
वय बोलू लागल्यावर म्हणजे गेल्या चार-पाच वर्षांपासून मी शिल्पांचं काम पूर्ण थांबवलं. त्यानंतर मी आकस्मिकपणे पेंटिंग्जकडे वळलो. या वाटेवर पावलं टाकण्यासाठी निमित्तमात्र ठरले ते आमचे कौटुंबिक स्नेही न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी. त्याचं असं झालं, काही वर्षांपूर्वी त्यांनी नेत्राला त्यांच्या पत्नीचं तारा धर्माधिकारी, यांचं पोट्रेट काढायला सांगितलं. ते आवडल्यावर त्यांनी स्वत:चं पोट्रेट काढून घ्यायची इच्छा व्यक्त केली; पण नेत्राच्या आजारपणाने व त्यातच तिचं निधन झाल्याने, ते पूर्ण होऊ शकलं नाही. तेव्हा न्यायमूर्तीनी ‘हे राहिलेलं काम मी करावं,’ असा आग्रह धरला. खरं तर तोपर्यंत, म्हणजे नव्वदीच्या भोज्यापर्यंत, मी हातात ब्रशही धरला नव्हता. आम्हा उभयतांमध्ये एक गमतीशीर ठरावही झाला होता की, ‘भिंती तिच्या आणि जमीन माझी.’ पण न्यायमूर्तीचा हक्काचा आग्रहही मोडवेना. शेवटी एक दिवस हिय्या करून स्टुडिओत गेलो आणि रंगांचे खोके उघडले. नेत्राच्या अपूर्ण चित्राला हात लावायचं धाडस माझ्यात नव्हतं. मी स्वतंत्रपणे सुरुवात केली आणि महिना-दीड महिन्यांच्या मेहनतीनंतर माझं पहिलंवहिलं पेंटिंग तयार झालं. त्यानंतर रामभाऊ कापसे, किशोरी आमोणकर, कुमार गंधर्व आणि आमची मित्रमंडळी यांची सुमारे दोन-अडीच डझन पेंटिंग्ज मी केली. तरीही ‘ही कला माझ्याकडे आहे’ असं मात्र मी म्हणणार नाही. नेत्राचं पोर्टेट हे माझं अलीकडचं काम. आता पुढचं पेंटिंग मूड लागेल तेव्हा!
शिल्पांच्या जन्मकथा सांगणारं ‘आकार’ हे पुस्तक मी दहा र्वष लिहीत होतो. त्याला अनेकांची मौलिक दाद मिळाली. त्यानंतर अनेक वर्षांनी म्हणजे गेल्या सात-आठ वर्षांपासून मी पुन्हा लेखणी हातात धरलीय. ‘शिल्पकाराचा आत्मशोध’, ‘शिल्पांचे निकष’, ‘शिल्पशास्त्र तंत्र आणि मंत्र’ ही माझी हस्तलिखितं आता प्रकाशकांच्या प्रतीक्षेत आहेत. आजवरच्या आयुष्यात मला पु. ल. देशपांडे, श्री. ना. पेंडसे, वसंत बापट, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, कुमार गंधर्व.. अशा अनेक दिग्गजांचा स्नेह लाभला. त्या समृद्ध आठवणी आणि माझे काही हटके अनुभव ‘मी कसा जगलो’ या आत्मचरित्रात्मक हस्तलिखितात मी शब्दबद्ध केलेत. मी व नेत्राने एकमेकांना लिहिलेल्या (मी दिल्लीत व ती मुंबईत असताना) शंभरच्या वर पत्रांवरही मी काम केले आहे. तो ठेवाही वाचकांसमोर ठेवायचा माझा मानस आहे.
आयुष्याच्या या शेवटच्या वळणावर मी तृप्त आहे, समाधानी आहे. या भावना माझ्याच एका कवितेतून सांगायच्या तर..
‘गात गात वेचीत आलो
सुगंध मातीचे, ऋतुरंगी फुलांचे
डोंगर माथ्यावरुनी विहंग उडता
जे जे दिसले ते सर्वची आक्रमिले
मन भरुन गेले, मन भरुनी गेले..!’
शब्दांकन – संपदा वागळे – sampadawagle@gmail.com chaturang@expressindia.com