मनीषा नित्सुरे

तरुण-तरुणी किंवा अल्पवयीन मुलांव्यतिरिक्त आता सायबर गुन्हेगारांचं नवं भक्ष्य ठरलेला वयोगट आहे- ज्येष्ठ नागरिक! ‘सोशल इंजिनीअरिंग’ करून केलेल्या इतर अनेक गुन्हेगारी प्रकारांबरोबरच एकाकी वृद्धांचं ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकण्याचं प्रमाणही वाढत चाललं आहे. ज्येष्ठ नागरिक यात अडकण्यामागे सामाजिक, भावनिक, वैयक्तिक, मनोसामाजिक असे विविध पैलू आहेत. मुख्य म्हणजे ही संघटित गुन्हेगारी असल्यानं कुटुंब आणि समाजानंही याविषयी जागरूक असणं आवश्यक असल्याचंच यातून अधोरेखित होतं.. सांगताहेत गेली १२ वर्ष सायबर गुन्हेगारीविरोधात काम करणाऱ्या सोनाली पाटणकर.

Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
vinoba bhave, vinoba bhave life, vinoba bhave work,
ज्ञानयोगी विनोबांचे स्मरण
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
CCTV camera installed in 60 prisons due to inmate attacks and illegal provisions
सुरक्षेचा ‘तिसरा डोळा’बंदच; अंमली पदार्थ, मोबाईलच्या वापरावर नियंत्रण येणार तरी कसे?

नोकरीतून नुकतीच निवृत्त झालेली साठीच्या घरातली एक विधवा सोशल मीडियावर आलेल्या ‘फ्रेंड रिक्वेस्ट’मधून एका अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात येते. डिजिटली दोघं ‘कनेक्ट’ होतात. आधी चॅटिंग, मेसेजेस, मग फोन नंबर शेअर केला जातो आणि फोनवर बोलणं सुरू होतं. वरकरणी सामान्य वाटणारं बोलणं टप्प्याटप्प्यानं वाढत जातं. पलीकडच्या माणसाचा आवाज आश्वासक भासू लागतो. तो ज्याविषयी माहिती देत असतो ती माहितीसुद्धा खरी वाटू लागते. सहा महिने हे चालू असतं. एव्हाना तो माणूस अगदी विश्वासातला बनून जातो. घर खरेदी हा गुंतवणुकीचा सर्वात फायदेशीर मार्ग कसा आहे हे तो तिला पटवून देतो आणि तीही विश्वासानं त्याच्याबरोबर सगळी वैयक्तिक माहिती शेअर करते. घर घेण्याची तयारीही दर्शवते. अल्पावधीतच त्या स्त्रीच्या नावानं कागदपत्रं तयार होतात. बघता-बघता नव्या घरासाठी थोडे-थोडे करून १९ लाख रुपये ती त्या माणसाच्या खात्यावर ट्रान्सफर करते. पण काहीच दिवसात, फोन करणारी ती व्यक्ती बोलणं टाळू लागते, उडवाउडवीची उत्तरं देऊ लागते आणि त्यानंतर काहीच दिवसांत तो नंबरच बंद होतो. फोन लागत नाही आणि घरही मिळत नाही. सगळी कागदपत्रं खोटी निघतात. फोन नंबरशिवाय त्या व्यक्तीची कुठलीच माहिती त्या स्त्रीकडे नसते. फसवणूक झाल्याचा संशय येऊ लागतो आणि तोच खरा ठरतो. निवृत्तीनंतरच्या पुंजीतून थोडीथोडकी नव्हे, तर १९ लाख रुपयांची रक्कम हातून गेलेली असते. परदेशात राहणाऱ्या तिच्या मुलाला आईच्या बँक खात्यातून वजा झालेल्या पैशांची कल्पना येते. तो आईकडे विचारपूस करू लागतो. त्याला खरं सांगायचं कसं? नातेवाईक काय म्हणतील? पोलिसांना काय सांगणार? तक्रार कुठे आणि कुणाची करणार? तो माणूस आपल्याला फसवू शकतो, यावर ती सुरुवातीला विश्वासच ठेवायला तयार नसते! अखेर या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी तिला मानसिक उपचार देण्याची वेळ येते..

 अशाच एकाकी आयुष्य जगणाऱ्या आणखी एका ज्येष्ठ स्त्रीची एका व्यक्तीबरोबर ऑनलाइन ओळख होते. फोन, मेसेज, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून मैत्रीचे धागे (की फास?) विणण्यात त्या माणसाचा हातखंडा असल्याचं थोडय़ाच दिवसांत दिसून येतं, कारण त्या बाईंचा समोरच्याच्या गोड बोलण्यावर पुरता विश्वास बसलेला असतो. प्रेमाचे शब्द या एकटय़ा पडलेल्या स्त्रीला भुरळ घालू लागतात, रोजच्या गप्पा हव्याहव्याशा वाटू लागतात. बोलणं झालं नाही तर त्या बाई अस्वस्थ होऊ लागतात. भावनिक गुंतागुंत वाढत जाते. काही महिने हा प्रकार चालू असतो. एके दिवशी ती व्यक्ती त्या बाईंकडे त्यांची ‘एकटीची’ विशिष्ट प्रकारची छायाचित्रं काढून ती ‘शेअर’ करण्याची मागणी करते. बाईंचा एवढा विश्वास त्यानं संपादन केलेला असतो, की यात काही तरी वावगं आहे अशी पुसटशी कल्पनाही त्यांना येत नाही. शिवाय, आपण ज्येष्ठ आहोत, तरी आपलं आकर्षण वाटतंय, असा भाबडा समज झाल्यानं त्या त्याच्या सांगण्याप्रमाणे करतात. फोटो हाती येताच त्यांचं मॉर्फिग केलं जातं आणि सुरू होतो धमक्यांचा खेळ. ‘एवढे पैसे दिले नाहीस, तर तुझ्या नातेवाईकांना, ओळखीच्या लोकांना हे फोटो पाठवू..’, ‘सोशल मीडियावर फोटो टाकून बदनामी करू.’ आपला विश्वासघात झाल्याचं बाईंच्या लक्षात येतं. मनावर झालेला आघात आणि या घटनेचं दडपण प्रचंड असह्य होतं. ही गोष्ट कुणाला आणि कशी सांगणार, सगळय़ाचीच चोरी!

  आणखी एक घटना.. एका प्रतिष्ठित बँकेतून निवृत्त झालेल्या गृहस्थांच्या संगणकावर अचानक पोर्न साइटस् ओपन होऊ लागतात. वेबसाइटस्मध्ये सुरक्षित-असुरक्षित असे प्रकार असतात, याची त्यांना कल्पना नसते. ते त्या साइट्स बंद करून टाकतात, पण इथेच हा प्रश्न संपत नाही. लगेच त्यांना एक मेल येतो. त्यात म्हटलेलं असतं, ‘तुम्ही कोणत्या पोर्न साइट्स बघता ते आम्हाला कळलेलं आहे आणि आम्ही ते सगळीकडे जाहीर करू.’ धमकीचे ई-मेल येऊ लागल्यानं गृहस्थ घाबरून जातात. पुढची पायरी म्हणजे पैशांची मागणी. ‘अमुक एवढे पैसे द्या, नाही तर तुमची सगळीकडे बदनामी करू’ असं त्यांना ब्लॅकमेल केलं जातं. घाबरून सुरुवातीला काही पैसे ते देतातही. पण पैशांची मागणी वारंवार होऊ लागते. दर वेळी वेगवेगळय़ा नावाच्या अकाऊंट्सवर पैसे ‘ट्रान्सफर’ करण्यास सांगितलं जातं. आपण यात अडकत चाललोय ही गोष्ट त्यांना उमगते. पण तोपर्यंत पैसा आणि मानसिक अवस्था दोन्हीची हानी झालेली असते..

या आपल्याकडच्याच, खऱ्या घडलेल्या घटना. यातलं दुसऱ्या क्रमांकाचं प्रकरण आमच्याकडे आलं, तेव्हा तर त्या बाई इतक्या मानसिक धक्क्याखाली होत्या, की काही बोलायलाच तयार नव्हत्या. या सर्व व्यक्तींची अवस्था पाहता त्यांना त्यातून सावरायला खूप वेळ लागणार होता हे स्पष्ट दिसत होतं.

असंच आणखी एक प्रकरण- एका आजोबांना एका प्रतिष्ठित विमा कंपनीच्या नावानं फोन येतो. पलीकडचा माणूस सांगतो, की अमुक एक क्रमांक असलेली तुमची पॉलिसी तुम्ही पैसे न भरल्यामुळे मध्येच बंद पडली आहे. उर्वरित पैसे भरा आणि पॉलिसीचा दोन कोटी रुपयांचा क्लेम घ्या. विमा कंपनीचा (?) माणूस सगळा तपशील देतो, नेमानं फोन करू लागतो, रोज दहा-पंधरा मिनिटं गप्पा मारू लागतो. पॉलिसीचे दोन कोटी रुपये मिळवून देण्यासाठी मदत करायची तयारी दर्शवतो. हळूहळू या आजोबांचा विश्वास बसतो. ‘पॉलिसीचे उर्वरित पैसे भरले की दोन कोटी रुपये मिळणार’ ही गोष्ट त्यांच्या मनावर इतकी बिंबवली जाते, की ते सांगाल ती रक्कम भरायला तयार होतात. अर्थात ही गोष्ट एक-दोन आठवडय़ांत घडत नाही. तब्बल साडेतीन वर्ष तो माणूस या ज्येष्ठ नागरिकाच्या सतत संपर्कात असतो. पॉलिसीचे उर्वरित पैसे भरण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून या महिन्यात थोडे, पुढच्या महिन्यात थोडे, असं करून त्या कालावधीत तब्बल ८६ लाख रुपये त्यानं लंपास केलेले असतात. आजोबा एकटेच असतात. मुलं परदेशात असतात आणि इथे सोबतीला फक्त मदतनीस असतो, ही सर्व माहिती त्या सायबर चोरानं काढलेली असते. त्यांच्याशी बोलायला घरी कुणी नसताना हा माणूस मात्र रोज फोन करून गप्पा मारतो, ‘मी सोबत आहे,’ असा आभास निर्माण करतो आणि केसानं गळा कापला जातो.

सायबर गुन्ह्याच्या या पद्धती आता ज्येष्ठ नागरिकांना ‘लक्ष्य’ करू लागल्या आहेत. कधी पॉलिसीच्या पैशांचं आमिष, कधी ‘गिफ्ट’ लागल्याचं आमिष, कधी ‘वीजजोडणी तोडू’ असे धमकीचे मेसेजेस, कधी ‘केवायसी अपडेट करा, नाही तर दोन तासांत फोन बंद करू’ अशा धमक्या, तर कधी गोड बोलून, रोज फोनवर गप्पा मारून ‘हनी ट्रॅप’ची शक्कल. आतापर्यंत आपण अगदी सहज म्हणायचो, की बाहेरच्या देशांमध्ये असे गुन्हे घडतात, आपल्याकडे नाही! पण आता या गैरसमजातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. कारण सायबर गुन्हेगारीमध्ये देश, भाषा, वयोगट, लिंग कशाचाच अडसर राहिलेला नाही. तंत्रज्ञानस्नेही असलेल्या तरुण पिढीच्या बाबतीत किंवा तरुण स्त्रिया आणि अल्पवयीन मुलांच्या बाबतीत हे गुन्हे अधिक घडतात, असं समजून इतरांनी गाफील राहण्याची     चूक अजिबातच करू नये. कारण ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत हे प्रमाण वाढत चाललं आहे. याबाबत आपल्या घरातल्या, आजूबाजूच्या ज्येष्ठ नागरिकांना सावध करणं गरजेचं आहे. कारण आयुष्याच्या या टप्प्यावर आलेल्या एकाकीपणातून अनेक समस्या निर्माण होताना दिसताहेत आणि त्यातलीच एक आहे ती म्हणजे इंटरनेटवर अनोळखी लोकांवर विश्वास ठेवणं!

तंत्रज्ञानाची फारशी माहिती नसल्यामुळे घाबरत-घाबरतच ज्येष्ठ नागरिक तंत्रज्ञान हाताळत असतात. मोबाइल अ‍ॅप्स, वेबसाइटस्, इंटरनेट ब्राउजिंग, सोशल मीडिया याबाबतच्या सुरक्षिततेच्या गोष्टी त्यांना कुणी सांगितलेल्या नसल्यामुळे बऱ्याचदा हा वयोगट इंटरनेटवर असुरक्षितपणे वावरत असतो. म्हणूनच तो ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरतो. आपण त्यांना चांगला फोन घेऊन देतो, पण त्याच्या सुरक्षित वापराविषयी अनेकदा काहीही सांगितलं जात नाही. त्यामुळे हा वयोगट बऱ्याचशा ‘सेफ्टी फीचर्स’बाबत अनभिज्ञ असतो आणि त्यातून त्यांच्या हातून काही तरी चूक होऊ शकते. आमच्याकडे येणाऱ्या प्रकरणांमध्ये बऱ्याच वेळा असं दिसून येतं, की आपली फसवणूक झाली आहे, ही गोष्टच ते मान्य करायला तयार होत नाहीत. ‘ती व्यक्ती आपल्याला फसवूच शकत नाही,’ असा भोळा आशावाद आणि अनोळखी व्यक्तीबद्दल प्रचंड विश्वास त्यांच्यात दिसून येतो. का होत असेल असं? एरवी साधं रस्त्यात कुणी अनोळखी व्यक्ती आपल्याशी बोलायला आली, तर आपण सावध पवित्रा घेतो. बोलणं टाळतो, अनोळखी व्यक्तीला पटकन घरात घेत नाही. मग इथं इंटरनेटवर असं काय होतं, की अनोळखी व्यक्तीवर आपण डोळे झाकून विश्वास टाकतो? अर्थात ही चूक केवळ ज्येष्ठ नागरिक नाही, तर सर्व वयोगटांतील नेटकरी करताना दिसतात.

ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत या विषयाला सामाजिक, भावनिक, वैयक्तिक, मनोसामाजिक असे विविध पैलू आहेत. जोडीदार नसलेले किंवा कुणा एकाचं निधन झाल्यानंतर एकटे पडलेले लोक, मुलं बाहेरगावी वा परदेशी असलेले, नातेवाईक जवळपास नसणारे, रोज गप्पा मारायला- बोलायला कुणी नसणारे, असं एकाकी आयुष्य जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या गंभीर आहेत. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सायबर गुन्हा घडलाय किंवा घडतो आहे हे लक्षात आल्यावर तक्रार कुठे करायची? पोलीस आपलं म्हणणं ऐकून घेतील का? त्यांनी उलट-सुलट प्रश्न विचारले तर? घरच्यांना काय सांगायचं? हे त्यांचे प्रश्न असतात. परंतु पोलीस मदत करतात आणि अगदी वेळप्रसंगी घरी येऊनही तुमची तक्रार दाखल करून घेऊ शकतात, हे लक्षात असू द्या. वयामुळे असेल किंवा इतर काही गोष्टींमुळे असेल, पण ज्येष्ठ नागरिक या समस्या लवकर कुणाला सांगत नाहीत. जेव्हा ती गोष्ट गंभीर स्वरूप धारण करते तेव्हाच सांगतात. सुरुवातीलाच त्यांनी या गोष्टींची तक्रार केली, तर पुढील नुकसान टाळता येऊ शकतं. तक्रार करायला जेवढा उशीर, तेवढं ते प्रकरण कठीण होत जातं आणि ती सोडवण्यात वेळ खूप लागतो.

सोशल मीडियावरूनही ज्येष्ठ नागरिकांना शोधून त्यांना ‘टार्गेट’ केलं जातं. त्यांच्या आवडीनिवडी, ते कुठे ‘लाइक’ करतात, काय ‘शेअर’ करतात, कुठल्या गोष्टी ‘फॉलो’ करतात, याचं ‘सोशल इंजिनीअरिंग’ केलं जातं. या सगळय़ा गोष्टींचा अभ्यास करून सायबर गुन्हेगार आपली माहिती जमा करत असतात आणि आपला एक प्रोफाइल तयार करतात. ज्याचा फायदा त्यांना त्या व्यक्तीशी बोलताना होतो. मग त्यांच्या बोलण्यावर व्यक्तींचा विश्वास बसत जातो. या गुन्ह्यांमध्ये असं दिसून आलंय, की एकीकडे गुन्हा करत असताना हे गुन्हेगार संबंधित ज्येष्ठ नागरिकाशी रोज फोनवर बोलत असतात. त्यामुळे तोच माणूस गुन्हेगार आहे असं त्यांना कुणी सांगितलं तरी ते मानायला तयार नसतात. माणसाच्या मनोविज्ञानाचा सखोल अभ्यास करून हे गुन्हेगार आपलं ‘भक्ष्य’ शोधतात. ही संघटित गुन्हेगारी आहे असं आमचं म्हणणं आहे. म्हणूनच आपल्या कुटुंबातल्या आणि समाजातल्याही ज्येष्ठ नागरिकांकडे विशेष लक्ष समाजानं देणं खूप गरजेचं आहे. त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे. हल्ली खूपदा ज्या गप्पा होतात, त्याही कुटुंबाच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर होतात. प्रत्यक्ष भेटणं, बोलणं विशेष होत नाही. याची कमतरता खूप ज्येष्ठ नागरिकांना जाणवत असते. याचा फायदा सायबर गुन्हेगार करून घेतात.

    ज्येष्ठ नागरिकांना फोन नीट वापरता येत नाही म्हणून त्यांची बऱ्याचदा खिल्ली उडवली जाते, त्यांनी व्हॉटस्अ‍ॅपवर पाठवलेले ‘फॉरवर्डस्’ कसे त्रासदायक असतात, याविषयी बोललं जातं. पण यामागे त्यांची काय गरज आहे तीही समजून घ्यायला हवी. त्यांना तंत्रज्ञानस्नेही बनवणं, सुरक्षिततेसाठीच्या टिप्स देणं आपल्याला करायलाच हवं. त्यांच्याशी संवाद साधत राहिल्यानं जर एखादा सायबर गुन्हा त्यांच्या बाबतीत घडत असेल, तर ते त्याबद्दल लगेच सांगू शकतील. ज्येष्ठ नागरिक खऱ्या आयुष्यात अनेक गोष्टींची खूप काळजी घेत असतात. प्रत्यक्ष बँकेत जाऊन व्यवहार करताना सावधानता बाळगतात. तशीच काळजी, सावधानता इंटरनेटच्या विश्वात वावरताना घ्यायला हवी. आमच्या ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ या संस्थेच्या माध्यमातून या वयोगटासाठी कार्यशाळा, व्याख्यानं, छोटी प्रशिक्षणं असे कार्यक्रम घेण्याचा आमचा प्रयत्न असतोच, पण घरातल्या मंडळींनीही मोबाइलमधली सुरक्षा प्रणाली, त्याचं तंत्र त्यांना शिकवायला हवं.

  परदेशातल्या ज्येष्ठ नागरिकांना फसवणाऱ्या भारतीय ‘स्कॅमर्स’च्या कहाण्या यूटय़ूबवर मुबलक बघायला मिळतात, पण आपल्या देशातले ज्येष्ठ नागरिकही स्कॅमर्सच्या जाळय़ातून सुटलेले नाहीत, हेच दररोज दिसतं. खरं तर समोरच्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटल्याशिवाय, संपूर्ण माहिती काढल्याशिवाय विश्वास न ठेवणं, संशयास्पद वेबसाइटस्, संशयास्पद लिंक्स न उघडणं, आपली खासगी वा आर्थिक माहिती कोणत्याही फोनकॉलवर न देणं, भूलथापांमुळे लगेच वाहावत न जाता किंवा भीतीनं गांगरून न जाता परिस्थितीचा तर्कसंगत विचार करणं, हे ज्येष्ठ नागरिक नक्कीच करू शकतात. आतापर्यंतच्या जगण्यात त्यांनी हे व्यावहारिक शहाणपण कमावलेलं आहे. मन स्थिर ठेवून, सावधपणे ऑनलाइन जगताला सामोरं गेलं तर फसवणूक निश्चित टाळता येईल.

तक्रार करणं आवश्यकच   

आपल्याबद्दल घडलेल्या सायबर गुन्ह्याची तक्रार करणं आवश्यक आहे. कारण जेव्हा प्रकरणं रीपोर्ट केली जातात, तेव्हा पोलीस यंत्रणांनाही धोरण आखायला मदत होते. 

स्कॅमर्स ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या माध्यमातून पैसे पाठवायला लावतात?

स्कॅमर्स वेगवेगळे ऑनलाइन प्लॅटफॉर्म  वापरायला सांगतात. प्रामुख्यानं ‘यूपीआय’ आधारित ‘पेमेंट गेटवे’च्या माध्यमातून पैसे पाठवायला सांगतात. मोठे घोटाळे असतात, त्यात सरळ-सरळ बँकेच्या खात्यात पैसे टाकायला सांगतात. तिथे तुम्हाला ते एका बनावट बँक खात्याचा तपशील देतात आणि त्यावर ऑनलाइन ट्रान्सफर करायला सांगतात. काही प्रकरणांत बँकेत जाऊन अमुक एवढी रक्कम भरा, असंही सांगितलं गेलंय आणि लोकांनी तसे पैसे भरले आहेत. यूपीआय या माध्यमाचा हल्ली जास्त वापर करायला सांगितला जातो, कारण तो जलद मार्ग आहे. त्यासाठी ‘क्यूआर कोड’ पाठवून पैसे डेबिट करायला सांगतात. अशीही प्रकरणं आहेत, की संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवर लिंक पाठवली जाते, त्यावर क्लिक करून ‘अ‍ॅप’ डाउनलोड करायला सांगतात आणि अगदी कमी रक्कम- म्हणजे पाच-दहा रुपये पाठवायला सांगतात. तुम्ही पाठवले, की त्यांना ‘पिन नंबर’पासून सगळा तपशील मिळतो आणि मग ते पैशांवर डल्ला मारतात. म्हणून अशा कुठल्याही नंबरवरून पाठवण्यात आलेल्या लिंकवर  क्लिक करू नका.

स्कॅममध्ये गेलेले पैसे परत मिळतात का?

वेळेत तक्रार केली, म्हणजे घटना घडल्यानंतर अगदी पहिल्या तासाभरात तक्रार केली (१९३० या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यात) तर ७५ ते ८० टक्के प्रकरणांत लोकांना पैसे परत मिळालेले आहेत. पण तक्रार उशिरा दाखल केली, तर पैसे सहसा परत मिळत नाहीत कारण ते कुणीतरी काढून घेतलेले असतात. सायबर चोरांनी त्यांची यंत्रणा इतकी पक्की बनवलेली असते, की पैसे येताच वेगवेगळी माणसं कामाला लावून ‘एटीएम’मधून ते पैसे काढतात. वेळेत तक्रार केली तर पैसे परत मिळण्याची शक्यता अधिक.

अशा तक्रारींची दखल घ्यायला पोलिस यंत्रणा सुसज्ज आहे का?

पोलिस यंत्रणा सुसज्ज आहे, पण बहुतांश प्रकरणांत तक्रार केलीच जात नाही. ज्यांच्या प्रकरणात खूप गुंतागुंत असते, ते यथावकाश पोलिसांकडे जातात, पण ती गुंतागुंत एवढी वाढलेली असते, की स्टेटमेंट नोंदवून घेऊन, ‘एफआयआर’ करून पुढे जाण्यात खूप वेळ जातो. पोलिसांवरचा भार नक्कीच जास्त आहे त्यामुळे या प्रकरणांना विलंब होऊ शकतो, कारण अशा तक्रारी मोठय़ा प्रमाणात येताहेत. म्हणून जी केंद्रीय यंत्रणा आहे त्याच्यावर रजिस्ट्रेशन केलं (Reporting) तर तिथे अधिक जलद गतीनं मदत मिळते. आमच्या संस्थेच्या ‘सायबर वेलनेस हेल्पलाईन’वरूनही (७३५३१०७३५३) आम्ही सर्वतोपरी मार्गदर्शन करतो. 

मागील वर्षी आमच्या हेल्पलाइनवर आलेल्या एकूण तक्रारींची टक्केवारी अशी होती-

५५% ऑनलाइन आर्थिक गुन्हे

२५ % सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक

३% ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून फसवणूक

मदतीसाठी संपर्क- सायबर वेलनेस हेल्पलाइन- ७३५३१०७३५३

उपयुक्त संकेतस्थळं

www.cybercrime.gov.in  

www.responsiblenetism.org  

ई-मेल – info@responsiblenetism.org

(लेखिका सायबर गुन्हेगारीविरोधातील ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आहेत.)