कित्येक अंधाऱ्या रात्री मला झोप येत नसताना माझा बेपत्ता नातलग माझ्या डोळ्यासमोर येतो. कुठल्याशा साधूच्या रूपात. त्याच्या मागे दिसते एक मोकळी निर्जन वाट. तो त्या वाटेवर चालतो आहे. मागे पाहातो तो कुणीच नाही. चिटपाखरूसुद्धा. तो खिन्नपणे चालतो आहे. इतका खिन्न की त्याला काही जाणवतंच नाही. तो चालतो आहे एक अंधाराची वाट.. तो अव्याहत चालतोच आहे. एक अंधाराची वाट. हे चालणं.. की पळणं?कशापासूनचं?
दिग्दर्शिका सुमित्रा भावे या पूर्वीच्या नीला उमराणी. त्यांच्या अनेक कविता त्या काळात ‘सत्यकथे’त प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यातली एक कविता मी माझे स्नेही आणि दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्याकडून ऐकली आणि मनात खूप वर्षे झोपलेलं काहीसं अचानक जागं झालं. ती कविता आहे,
‘‘गंगेच्या काठाकाठानी हिंडणाऱ्या साधुंनो,
तुमचे घर कुठे आहे?
तुमच्या भगव्या कफनीत असते का एखादे पत्र? बुलाव्याचे?
गंगेच्या काठाकाठानी हिंडणाऱ्या साधुंनो
बुलावा आला तर? काय करता तुम्ही?
गंगेच्या ओल्या पुळणीवर उमटणाऱ्या
तुमच्या पावलांच्या खुणांबरोबर
तुम्ही मला कुठे नेता आहात?’’
खूप दिवसांनी ‘तो’ आठवला. माझा एक नातलग. तसा दूरचा. नेहमी भेटणाऱ्यातलाही नाही. पण तरी लक्षात राहिलेला. कायमचा. मी साधारण पहिली-दुसरीत असताना आम्ही सातारला राहायचो. तो पुण्यातला. त्याचं सातारला काही काम निघालं की तो आमच्याकडे राहायला असायचा. अशा वेळी आमची जेवणं होऊन झोपायच्या तयारीत असताना रात्री उशिराचा तो यायचा. मी आणि माझा भाऊ दुसऱ्या दिवशी शाळा म्हणून झोपायचो. दुसऱ्या खोलीतनं आई-बाबांचा आणि त्याचा आवाज येत राहायचा. त्याच्या आवाजाला एक घुमारा होता. निळू फुले यांच्या आवाजासारखा. तो सावळा होता. माझ्या बाबांच्याच वयाचा असेल. त्याने लग्न केलं नव्हतं. खूप सिगरेट आणि दारू पिणारी माणसं विशिष्ट प्रकारानं बारीक, हाडाडलेली दिसतात तसा दिसायचा तो. पण त्याचा चेहरा मात्र सतत हसरा असायचा. डोळ्यात एक वेगळीच चमक.. असं वाटायचं या डोळ्यांना वेगळंच जग दिसत असणार. तो बोलायचाही वेगळंच. माझ्या आईच्या वडिलांना सगळे ‘अण्णा’ म्हणायचे. त्यांच्याविषयी बोलताना तो एकदा आईला म्हणाला, ‘अण्णांचं जगणं म्हणजे निरांजनाची वात आहे. ती तेवढी तुम्ही तेवत ठेवा म्हणजे झालं. त्यात तेल कमी पडू देऊ नका?’ त्याचा त्याच्या आईवर खूप जीव होता. कधी पुण्याला त्यांच्या घरी गेलं तर त्याची आई, माझ्या आईला सांगायची की कित्येकदा तो रात्रीचा घरीच येत नाही. तो साधारण पन्नाशीला पोचला असेल तेव्हाची गोष्ट. नेहमीच्या दिवसासारखाच वाटेल असा एक दिवस उगवला. तो नेहमीसारखा वाटला सगळ्यांना. नेहमीइतक्याच सहजतेनं स्वत:चं सगळं आवरून काहीसं आणायला म्हणून तो घराबाहेर पडला आणि परतलाच नाही. अनेक वाटांनी त्याचा शोध घेतला गेला. पोलिसांपासून ते शवागारापर्यंत. तो आजतागायत कुणालाच कुठेच सापडला नाही. तो बेपत्ता झाल्यावर काही वर्षांनी कुणीसं त्याच्या आईला म्हणालं, ‘हिमालयाच्या आसपास त्याच्यासारखा दिसणारा साधू दिसला होता.’ त्याची आई शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या वाटेकडे डोळे लावून होती. तिचा प्राण तो येईल या आशेनं कितीतरी दिवस तिच्या कुडीत थांबून होता. तो आलाच नाही. ती माऊली वाट पाहता पाहताच अखेर एक दिवस गेली. तो बेपत्ता झाला तेव्हा मी लहानच होते. तरीही त्यांचं जाणं आज इतक्या वर्षांनंतरही मनात घट्ट रुतून बसलं आहे. साखर की काय असं क्षुल्लक काहीतरी आणायला गेलेला माणूस बेपत्ता होतो. कायमचा! तो घरातनं निघून गेला तो दिवस मी कित्येकदा मनातल्या मनात अनेकदा माझ्या परीनं चितारला आहे. वरवर दिसणारा दिवस वेगळा, त्याच्या मनात चाललेला आणखीनच वेगळा. त्याचं घरातून निघून जाणं नेमकं केव्हा सुरू झालं असेल? तो गेला त्या दिवशीच की त्याच्याही खूप आधी?
मी लहानपणी दोनदा घर सोडून गेले होते. एकदा भावाशी भांडण झालं म्हणून तरातरा जाऊन हतबल होऊन कपाट उघडलं होतं. हातात मावतील तेवढे कपडे घेतले होते. हे सगळं होत असताना भाऊ हसत होता पण आई मात्र, ‘जाऊ नको बाळा’ म्हणून विनवत माझ्या मागे फिरत होती. ते विनवणं मला आवडत होतं. तरीही मी घराबाहेरच्या अंगणाबाहेरच्या फाटकापर्यंत ताडताड गेले होते. तिथून पुढे जायची भीती वाटली होती. आई बोलावत होतीच, ‘थांब बाळा’ म्हणून. अखेर तिचं बोलणं ऐकून तिच्यावर उपकार केल्यासारखी मी परत आले होते. त्यानंतर एकदा घरी आई-बाबा नसताना चुलतभावाशी भांडण झालं. मी घर सोडून निघाले. त्या वेळी आम्ही एका छोटय़ा गावात राहायचो. घरापासून रेल्वे स्टेशनकडे जाणारी एक पाऊलवाट होती, मातीची. घराचं अंगण ओलांडून फाटक उघडलं आणि त्या पाऊलवाटेवर चालायला लागले. वळून मागे पाहिलं कुणीच बोलवायला आलं नव्हतं. त्या वाटेवर पुढे-पुढे चालत राहिले. तिसरी-चौथीत असेन तेव्हा. हळूहळू घर लहान लहान होत चाललं होतं. माझ्या मागे पडत चाललेल्या मातीच्या नागमोडी वाटेवर अजूनही कुणीच दिसत नव्हतं बोलावणारं, ‘परत ये’ म्हणणारं. मनभर भीती पसरायला लागली. मला जगात कुणीच नाही, असं वाटवणारा एकटेपणा दाटून आला. रडायलासुद्धा येईना. गुदमरायला लागलं. भीतीनं पावलं मंदावली. तोच लांब पडलेल्या घराच्या छोटय़ाशा दारातून ज्याच्याशी भांडले होते तो भाऊ, त्याच्या मागे अजून एक भाऊ, त्याच्या मागे एक इटुकली बहीण असे सगळे कावऱ्या काबऱ्या चेहऱ्याने पायवाटेवरून माझ्या दिशेने येताना दिसले आणि हुश्श झालं. पण ते येण्याआधीची ती नुसतीच मागे पडणारी निर्जन पाऊलवाट अजून डोळ्यासमोरून जात नाही. कित्येक वेळा अशा येतात प्रत्येकाच्या आयुष्यात की मागे पडत चाललेल्या वाटेवर कुणीच उभं नाही असं वाटतं. चुचकारणारं.. ‘घरी चल’ म्हणणारं.. त्या उदमसत्या वेळांना रात्रीच्या अंधारात पाय चालू बघतात एक अज्ञात वाट. माझी एक मैत्रीण आठवते. एका अंधाऱ्या रात्री तिचं नवऱ्याबरोबर भांडण झालं. तो झोपाळ्यावर, ती घर सोडून गेली. त्याला कसलंही भान नाही की ती गेली आहे. मध्यरात्री ही सुनसान रस्त्यांवर ताडताड चालत होती. रात्रीची अशी एकटीच बाई अशी बेभान चालताना बघून कुणीसा एक रात्रपाळी संपवून दुचाकीवरून घरी परतणारा सद्गृहस्थ तिला म्हणाला, ‘सगळं ठीक आहे ना ताई? कुठं चाललीस?’ त्याच्या आपुलकीच्या स्वरानं ती क्षणात भानावर आली. सगळं काही माहीत असल्यासारखा तो पुन्हा म्हणाला, ‘घरी सोडू का?’ ‘नको’ म्हणून ती परत फिरली. घराच्या दिशेने चालायला लागली. तो तिच्या मागे जात म्हणाला, ‘जाशील ना ताई घरी नीट?’ तिनं कृतज्ञतेनं त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली ‘जाईन’. तिच्या निर्जन पाऊलवाटेवर अवचित उगवून तिला परत बोलवणारा तो कुणी एक तिच्या ना ओळखीचा ना पाळखीचा. तो फक्त त्या एका रात्री तिला बोलावण्यासाठी कुठूनसा आला होता. पण मी काय किंवा माझी ही मैत्रीण काय, घरी भांडून धुमसत बाहेर पडलेली माणसं. माझ्या त्या बेपत्ता नातलगाचं तर भांडणही नव्हतं झालं कुणाशी.. रागही नव्हता त्याचा कुणावर. उलट त्याचं त्याच्या आईवर किती प्रेम होतं.. तरी तो का गेला? कुठल्याही वाटेवर कितीही रागावून गेलं तरी मागून कुणी ना कुणी बोलावेलच असा विश्वास असलेल्या मला, कुणाला बोलवायची संधीच न देता हळूच भरल्या घरातून निसटून, निघून गेलेला ‘तो’ कळत नाही.
माझ्या नवऱ्याचा एक मित्रही असाच हिमालयात गेला होता. अचानक एक दिवस विरक्ती आल्यासारखा.. कुणालाही न सांगता. तिथं हिमालयात त्याला अनेक साधू भेटले. त्यातल्या एका साधूबरोबर तो काही दिवस राहिला. तो त्या साधूबरोबर भिक्षा मागायचा. कधी साधू त्याच्यासाठी काहीसं शिजवायचा. तो मित्र ते खायचा. बोलणं-चालणं फार नाही. गांजा ओढायचे दोघंही. काही दिवसांनी त्या मित्राची विरक्ती सरली. घरची आठवण यायला लागली. तो साधूला म्हणाला, ‘जातो उद्या परत’. दुसऱ्या दिवशी मित्र निघाला तशी तो साधू म्हणाला, ‘तुला कोपऱ्यापर्यंत सोडायला येतो.’ थोडं चालल्यावर म्हणाला, ‘अजून थोडं पुढे येतो चल.’ बरंच लांब चालून आल्यावर अचानक एका क्षणी तो साधू म्हणाला, ‘मलाही तुझ्याबरोबर नेतोस?’
कित्येक अंधाऱ्या रात्री मला झोप येत नसताना माझा बेपत्ता नातलग माझ्या डोळ्यासमोर येतो. कुठल्याशा साधूच्या रूपात. त्याच्या मागे दिसते एक मोकळी निर्जन वाट. तो त्या वाटेवर चालतो आहे. मागे पाहातो तो कुणीच नाही. चिटपाखरूसुद्धा. तो खिन्नपणे चालतो आहे. इतका खिन्न की त्याला काही जाणवतंच नाही. तो चालतो आहे एक अंधाराची वाट. त्या वाटेच्या एका वळणावर मला त्याची माऊली दिसते. तिच्या हातात केव्हाचं एक निरांजन तेवतं आहे. ती अजूनही कुठेतरी त्याची वाट पहाते आहे. पण त्याला ती दिसतंच नाही. त्याला निरांजनही दिसत नाही. तो अव्याहत चालतोच आहे. एक अंधाराची वाट. हे चालणं.. की पळणं? कशापासूनचं? कुणापासूनचं? काहीच ऐकू न येणाऱ्या त्याला मला ओरडून सांगावंसं वाटतं, ‘तुझ्यामागची वाट निर्जन नव्हती. त्या वाटेवर ती माऊली केव्हाची तिष्ठत होती. ती तुला रोज बोलावत होती. तिनं धाडलेली इतकी सगळी बुलाव्याची पत्रं कुठे हरवली? तुझ्या आईची इतकी सगळी पत्रं कुठे हरवली. त्यात एकही तुला पोचलं नाही का? खरंच नाही पोचलं?
बुलावा
कित्येक अंधाऱ्या रात्री मला झोप येत नसताना माझा बेपत्ता नातलग माझ्या डोळ्यासमोर येतो. कुठल्याशा साधूच्या रूपात. त्याच्या मागे दिसते एक मोकळी निर्जन वाट. तो त्या वाटेवर चालतो आहे. मागे पाहातो तो कुणीच नाही.
First published on: 09-08-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व एक उलट...एक सुलट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dark nights of sleep in my life